Showing posts with label अमेरिका. Show all posts
Showing posts with label अमेरिका. Show all posts

Thursday, 1 January 2015

महागात पडलेली चिवचिव


दुसर्‍या महायुद्धाच्या कालात, इंग्लंडमधे सरकारकडून एक वाक्य लोकांना सारखे सांगितले जात असे. ‘Loose Lips Sink Ships’ म्हणून. या वाक्याचा अर्थ असा होता की अनवधानाने काहीतरी बडबड करू नका. कोठेतरी काहीतरी बोलाल. शत्रुचे गुप्त हेर सगळीकडे पसरलेले असल्याने त्यांना माहिती मिळेल व देशाचे मोठे नुकसान होईल. महायुद्धाच्या वेळची गोष्ट ठीक होती हो! आता काय त्याचे? असे कदाचित बरेच लोक म्हणण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बाष्कळ व फालतु बडबड कदाचित आता चालून जाईल पण आंतरजालावरच्या ट्विटर किंवा फेसबूकवर तुम्ही अशी बडबड करत असाल आणि त्या बडबडीत जर अमेरिकेबद्दल काही शब्द तुम्ही उच्चारलेत तर दुसर्‍या महायुद्धातील ब्रिटिश सरकारप्रमाणेच अमेरिकन सरकार तुमच्याकडे संशयाने बघू लागेल आणि आता तुमचे काही खरे नाही हे लक्षात येईल.
Leigh Van Bryan या एका आयरिश माणसाने 16 जानेवारी 2012 रोजी आपल्या एक मित्राला ट्विटर वरून एक चिवचिव किंवा ट्विट पाठवली होती. या चिवचिवीचा मसुदा होता ” @MelissaxWalton free this week for a quick gossip/prep before I go and destroy America?” या ब्रायन महोदयांचे म्हणणे आहे की या चिवचिवितल्या “destroy America?” या शब्दांचा अर्थ ब्रिटिश स्लॅन्ग किंवा बोलीभाषेत पार्टी करणे असा आहे. पण अमेरिकन सरकारच्या होमलॅन्ड सिक्युरिटी विभागाच्या हवालदार वगैरे मंडळींनी या शब्दांचा अर्थ मोठ्या गंभीरपणे घेतला असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
हे ब्रायन महोदय व त्यांचा मित्र जेंव्हा अमेरिकेतील लॉस ऍन्जेलिस येथील आंतर्राष्ट्रीय विमानतळावर उतरले तेंव्हा या पोलिसांनी त्यांना सरळ ताब्यातच घेतले. 12 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अतिशय गंभीरपणे या दोघांच्या अमेरिकेला येण्यातील हेतूबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले. या ब्रायन महाशयांनी मागे कधीतरी “digging up Marilyn Monroe,” अशी एक चिवचिव केली होती. या चिवचिवीबद्दलही त्यांना बरेच प्रश्न विचारले गेले. एवढी चौकशी केल्यावरही पोलिसांचे समाधान झाले नाही व ब्रायन आणि त्याचा मित्र या दोघांनाही इंग्लंडला जाणार्‍या पुढच्या विमानात बसवून देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.
या घटनेमुळे दोन, तीन गोष्टी लक्षात आल्या आहेत. एकतर अमेरिकन पोलिस व गुप्त हेर खाती, आंतरजालावरच्या ट्विटर किंवा फेसबूक या सारख्या सोशल नेटवर्किंग मिडिया वरून संदेशांची जी देवाण घेवाण होत असते त्यांच्याकडे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय बारीक नजर ठेवून आहेत. व दुसरे म्हणजे या मिडियावरून जी बाष्कळ बडबड केली जाते त्या बडबडीचा खरा बाष्कळ अर्थ ही मंडळी समजावून न घेऊ शकणारी अशी खाकी डोक्याची आहेत. असल्या फालतु बडबडीतून काहीतरी महत्वाचे शोधण्याच्या या खटाटोपात, प्रचंड प्रमाणात, सरकारचा म्हणजे पर्यायाने लोकांचा पैसा व सरकारी अधिकार्‍यांचा वेळ वाया जातो आहे. अमेरिकन सरकारने हे मागेच जाहीर केले आहे की देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून, आंतरजालावरचे संदेश तपासून, त्यातून काही विशिष्ट वैयक्तिक माहिती असलेल्या मंडळींचा शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न सतत चालू आहे. परंतु हा शोध घेणारी मंडळी जर इतक्या खाकी डोक्याने हा शोध प्रयत्न करणार असले तर या पयत्नांचा मूळ हेतू काही साध्य होण्याची शक्यता वाटत नाही.
आंतरजालावरून फालतु, बाष्कळ बडबड करणार्‍या मंडळींना ही ब्रायन घटना एक प्रकारचा धोक्याचा संदेशच आहे. त्यांचे हे संदेश भविष्यात त्यांना कधीही गोत्यात आणू शकतात. कारण त्यांच्या या बडबडींचा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ काहीही असो! तो तपासणारी मंडळी खाकी डोक्याचीच असल्याने ती काय अर्थ लावतील हे सांगणे मोठे कठिण आहे.
1 फेब्रुवारी 2012

Saturday, 18 October 2014

विमानांचे कबरस्तान

वाचकांच्यापैकी ज्या कोणी हॉलीवूडचा Transformers: Revenge of the Fallen हा चित्रपट बघितला असेल त्यांना या सिनेमात दाखवलेली विमानतळाची भव्य दृष्ये नक्की आठवत असतील. माझी इतके दिवस समजूत होती की हा भव्य विमानतळ, सिनेमाच्या शूटिंगसाठी, छोटी विमाने बनवून, स्टुडियोमधेच बनवलेला असावा. परंतु हा विमानतळ अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील ट्युसॉं (Tucson) या शहराजवळ खरोखरच अस्तित्वात आहे. फक्त गमतीची गोष्ट एवढीच की हा विमानतळ नसून विमानांचे एक कबरस्तान आहे.


2600 एकर आवार असलेला हा विमानतळ, 1430 अमेरिकन फूटबॉल मैदानांच्या आकाराचा आहे. Davis-Monthan Air Force Base या अधिकृत नावाने पण Boneyard या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा विमानतळ, दुसर्‍या महायुद्धानंतर बांधला गेला होता.


या ठिकाणची हवा अतिशय कोरडी असल्याने येथे विमाने उघड्यावर ठेवली तरी खराब होणार नाहीत अशा कल्पनेने हे ठिकाण निवडण्यात आले होते. त्याशिवाय या ठिकाणची जमीनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात वर असलेल्या धूळीच्या थराखाली अतिशय कठिण असा मातीचा थर लागतो. मातीच्या या थरामुळे कोणत्याही प्रकाराने कॉंक्रीटचा वापर न करता विमाने जमीनीवर पार्क करणे शक्य झाले आहे. या विमानतळावर अमेरिकन वायुसेनेची 309th Aerospace Maintenance and Regeneration Group (AMARG) ही तुकडी कार्यरत असते. विश्वास बसणार नाही पण या विमानतळावर 4200 विमाने आणि 40 अवकाश याने ठेवण्यात आलेली आहेत. या विमानांची किंमत 35 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी तरी असावी.

येथे ठेवलेल्या विमानात Tom Cruze याने भूमिका केलेल्या Top Gun या सिनेमात दाखवलेली F 14 TomCats ही विमाने, B-52 शीत युद्ध कालीन बॉम्बफेकी विमाने, A 10 ही रणगाडा भेदी विमाने आहेत. मागच्या 25 वर्षात या विमानतळावर ठेवलेल्या विमानांपैकी 20% विमाने तरी परत दुरुस्त करून वापरण्याजोगी केली गेली. अशी विमाने परराष्ट्रांना विकली जातात. या शिवाय जी विमाने वापर होण्यासारखी नसतात त्यांचे सुटे भाग वेगळे करून विकले जातात व अगदीच जुनी विमाने भंगार म्हणून विकली जातात.


या विमाततळाची चित्रे पाहताना मला जर कसली आठवण झाली असेल तर चाळीस वर्षांपूर्वी पुण्याहून आगगाडीने मुंबईला जाताना, चिंचवड व देहूरोड या स्टेशनांच्या दरम्यान भारतीय सैन्यदलाची निरनिराळी वाहने ठेवलेली दिसत असत त्याची. ही मैलोगणती पसरलेली वाहने बघून छाती अगदी दडपून जात असे.

देहू रोडचा तो वाहन तळ काय? किंवा गूगल अर्थ च्या सौजन्याने वितरण झालेल्या या चित्रात दिसणारा हा ट्य़ुसॉं चा विमानतळ काय? संरक्षण उद्योग हा जगातला एक अत्यंत मोठा असा उद्योग का मानला जातो याची एक चुणूकच आपल्याला या चित्रांवरून बघायला मिळते हे मात्र खरे.

26 फेब्रुवारी 2010

Saturday, 4 October 2014

भारतीय औषध कंपन्यांना सुगीचे दिवस

2003 साली, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रेसिडेंट बुश यांनी, जागतिक स्तरावर पसरत चाललेल्या एड्स या रोगाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक आंर्तराष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला होता. ज्या कायद्याच्या अंर्तगत हा कार्यक्रम राबवण्यात येणार होता त्या कायद्याला United States Leadership Against Global HIV/AIDS, Tuberculosis, and Malaria Act of 2003 असे नाव देण्यात आले. याच कायद्याला पेपफार (PEPFAR) या संक्षिप्त नावानेही संबोधण्यात येते. 30 जुलै 2008 या दिवशी या कायद्याला Tom Lantos and Henry J. Hyde United States Global Leadership Against HIV/AIDS, Tuberculosis, and Malaria Reauthorization Act of 2008 असे नाव देण्यात आले व जुना कायदा सुधारित स्वरूपात लागू झाला. या कायद्यानुसार, पुढच्या 5 वर्षात, 48 बिलियन यू.एस. डॉलर्स या रोगांच्या निर्मूलनासाठी, जगभर खर्च करण्यास अमेरिकन सरकारला संमती दिली गेली आहे.
अमेरिकन सरकारने, इतर देशांच्या सहकार्याने, या कार्यक्रमाद्वारे 2013 सालापर्यंत खालील उद्दिष्टे गाठण्याचे ठरवले आहे. 30 लाख रुग्णांवर उपचार, 1.2 कोटी लोकांचा रोगाची लागण होण्यापासून बचाव, यात 5 लाख अनाथ व गरीब मुले असणार आहेत. या कार्यक्रमासाठी, Botswana, Cote d’Ivoire, Ethiopia, Guyana, Haiti, Kenya, Mozambique, Namibia, Nigeria, Rwanda, South Africa, Tanzania, Uganda, Vietnam and Zambia. हे 15 देश निवडण्यात आले असून तिथल्या रोगपीडीत लोकांवर उपचार सुरू झाले आहेत. तसेच या देशांतील रुग्णसेवेसाठी, हा पेपफार कार्यक्रम, 140000 आरोग्य सेवकांनाही शिक्षण देणार आहे.

आतापर्यंतचा अनुभव असा होता की अशा प्रकारच्या आंर्तराष्ट्रीय कार्यक्रमात, खरा फायदा कोणाचा होत असला तर तो बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांचा. त्यांचा औषधांचा खप, अशा कार्यक्रमांच्यातून बराच वाढतो. या औषधांचे पैसे अमेरिकन सरकार देते व त्यावर या औषध कंपन्या भरपूर नफा कमवतात. परंतु मे 2007 मधे प्रेसिडेंट बुश यांनी एक अध्यादेश जाहीर केला. या अध्यादेशाप्रमाणे, पेपफार कार्यक्रमाला 30 मिलियन यू.एस. डॉलर्स जास्त देण्यात आले व महत्वाचे म्हणजे प्रथमच बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या ब्रॅन्डेड औषधाबरोबरच त्याच औषधांच्या मूळ फॉर्म्युल्याप्रमाणे बनवलेल्या जेनेरिक औषधांच्या खरेदीला अणि वापराला संपूर्ण परवानगी देण्यात आली. जेनेरिक औषधे ब्रॅन्डेड औषधांच्यापेक्षा नेहमीच बरीच स्वस्त असतात व यांच्या वापरामुळे बर्‍याच जास्त रुग्णांना सेवा देणे शक्य होणार होते. अमेरिकेच्या FDAकडून जेनेरिक औषधे मान्यताप्राप्त करून घेण्याची अट या अध्यादेशात होती.

गेल्या दोन वर्षांमधे FDAने 100 अशा औषधांना( anti-retroviral drug) मान्यता दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 100 औषधांत तब्बल 95 औषधे भारतीय औषध कंपन्यांनी बनवलेली आहेत. अरबिंदो फार्मा आघाडीवर असून त्यांची 34 फॉर्म्युलेशन्स मान्य झाली आहेत. सिपला व मॅट्रिक्स लॅबोरेटरीची अमेरिकन शाखा यांना 15 मान्यता मिळाल्या आहेत. स्ट्राईड, एमक्युअर व हेटेरो या कंपन्यांची 5 ते 15 औषधे मान्य झाली आहेत.

antiaids drugs


अरबिंदो फार्माच्या संचालकांच्या मते त्यांची कंपनी ही औषधे ब्रॅन्डेड औषधांच्या एक तृतियांश किंमतीलाच विकत असल्याने पेपफार कितीतरी जास्त रुग्णांना आता सेवा देऊ शकत आहे. सिपला या कंपनीच्या मते त्यांना पेपफार कडून दर वर्षी 20 ते 25 मिलियन य़ू.एस. डॉलर्सचे उत्पन्न मिळते आहे.

भारतीय कंपन्यांच्या औषधांना मान्यता दिल्यामुळे पेपफार कितीतरी मोठ्या प्रमाणात आता या 16 देशातील रुग्णांना मोफत औषधयोजना करू शकते आहे. यातली बहुतेक सर्व औषधे भारतीय कंपन्यांच्याकडून खरेदी केली जात असल्याने भारतीय औषध कंपन्यांच्या नफ्यात भरघोस वाढ झाली आहे.

सर्वांना लाभदायक अशीच ही व्यवस्था असली तरी भारतीय औषध कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत यात शंकाच नाही



14 नोव्हेंबर 2009

स्वच्छतागृहांचे राजदूत

सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे नाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलेले असेल. शहरांच्या गरीब वस्त्यांत व ग्रामीण भागात, स्वच्छतागृहांचा प्रसार व प्रचार कसा वाढेल याचा प्रयत्न ही संस्था करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना, अतिशय कमी खर्चाचे व पर्यावरणास हानी न पोचवणारे स्वच्छतागृह तयार केल्याबद्दल, या वर्षीचे स्टॉकहोम वॉटरबक्षिस नुकतेच मिळाले. श्री. पाठक यांनी हे कार्य जेंव्हा सुरू केले तेंव्हा स्वच्छतागृहांबद्दल साधे बोलणे सुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. असे असताना सुद्धा श्री. पाठक यांनी आपले काम नेटानेच चालू ठेवले व ग्रामीण व गरीब शहरी स्त्रियांना मोठाच दिलासा मिळवून दिला. श्री पाठक यांना या कार्याबद्दल आदराने स्वच्छतागृहांचे राजदूतम्हणून संबोधले तरी चालण्यासारखे आहे इतकी त्यांची या कार्यामागे निष्ठा व तळमळ आहे.

भारतासारख्या देशात या प्रकारचे कार्य, एक सामाजिक चळवळ म्हणूनच चालवणे आवश्यक असले तरी ज्या देशाच्या नसानसातून फक्त व्यापारी रक्त वाहत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात, जेंव्हा अशा प्रकारच्या कार्याची गरज भासू लागते तेंव्हा अशा स्वच्छतागृह राजदूतांची पगारी नेमणूकच करण्याशिवाय इलाज नाही हे लक्षात येते.

स्वच्छतागृहात वापर करण्याचे टॉयलेट पेपर बनवणार्‍या चारमिनया कंपनीने, नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या मधवर्ती भागात असलेल्या टाईम्स स्क्वेअरया चौकाजवळ, नवीन स्वच्छतागृहे चालू केली आहेत. न्यूयॉर्कच्या या भागात, प्रवाशांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते व सोईस्कर पडतील अशी स्वच्छतागृहे जवळपास नसल्याने त्यांची नेहमीच अडचण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही स्वच्छतागृहे चालू करण्यात आली आहेत. सहा आठवड्यांपूर्वी चालू केलेल्या या स्वच्छतागृहांना किमान 5 लाख लोक तरी एका वर्षभरात भेट देतील अशी या कंपनीची अपेक्षा आहे.

toilettes


या स्वच्छतागृहांची पुरेशी माहिती लोकांना नसल्याने या स्वच्छतागृहांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये असे वाटल्याने, या कंपनीने आता 5 जणांची भरभक्कम पगारावर, स्वच्छतागृह राजदूत म्हणून नेमणूक करावयाची ठरवले आहे. या राजदूतांचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 6 आठवड्यांचे असणार असून व त्या साठी त्यांना 10000 यू.एस. डॉलर्स एवढा मोबदला ही कंपनी देणार आहे.

अमेरिकेत नोकर्‍यांची सध्या प्रचंड वानवा असल्याने शेकडो तरूणतरूणींनी या कामासाठी अर्ज केले आहेत. या राजदूतांचे काम, टाईम्स स्क्वेअरमधल्या गर्दीत मिसळून, लोकांना या टॉयलेट्सचे महत्व समजवून सांगणे हे रहाणार आहे. या शिवाय फेसबूक किंवा ट्विटर सारख्या वेब साइट्स वर जाऊन या राजदूतांनी स्वच्छतागृहांचे महत्व लोकांना पटवावे अशीही कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने संभाव्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते तेंव्हा काही उमेदवार पहाटे 4 वाजताच हजर झाले. एवढ्या लवकर का आलात म्हणून विचारणा केली असता माझे स्वच्छतागृहांशी किती जवळचे संबंध आहेत हे परिक्षकांना कळावे म्हणूम मी पहाटे आलोअसे मासलेवाईक उत्तर एका उमेदवाराने दिले. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारात सध्या काम नसलेले नट-नट्या, विद्यार्थी व धंदेवाईकही होते. शिक्षणासाठी फीची व धंद्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी आपण हे काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी काही उमेदवार टॉयलेट पेपरचे ड्रेसेस घालून आले होते. “मी निवडला गेलो तर मी माझ्या टॉयलेटला चिकटून व त्याच्याशी एकनिष्ठ राहीनअसेही एका उमेदवाराने सांगितले.

ही नोकरी सहा आठवड्यांपुरती मर्यादित आहे. ‘चारमिन‘  या  कंपनीने या स्वच्छतागृहांसाठी 150 लोकांना, सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलेलेच आहे. हे राजदूत या व्यतिरिक्त काम करणार आहेत. अमेरिकेत सध्या 10 टक्के लोक बेकारच आहेत. सहा आठवड्यांनंतर हे राजदूत परत बेकारच होणार आहेत. त्यांच्या या अभिनव अनुभवामुळे त्यांना भारतात सुलभ इंटरनॅशनलसारख्या कंपनीत कायम नोकरी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नाही.



9 नोव्हेंबर 2009

Monday, 22 September 2014

सुदृढ बालकाचा विमा? शक्य नाही!

जगामधले सर्वात जास्त लठ्ठ लोक बहुदा अमेरिकेत असावेत. सर्वसाधारण अमेरिकन हा इतर देशांतील लोकांच्या मानाने चांगलाच धष्टपुष्ट वाटतो. या धष्टपुष्टपणाचे लठ्ठपणात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नसावा. सर्वदूर पसरलेल्या या लठ्ठपणामुळे, अमेरिकेतील विमा व्यवसाय, कोणताही व्यक्तीचा विमा उतरताना, तो अतीलठ्ठ तर नाही ना! याची बरीच काळजी घेतात. अमेरिकेत वैद्यकीय सेवा प्रचंड महाग आहे व वैद्यकीय विमा नसला तर रोग्याची तब्येत जसजशी सुधारत जाते तसतशी त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खालावत जाते. यामुळे वैद्यकीय विमा हा अतिशय आवश्यक मानला जातो. लहान बाळांच्या बाबतीत तर हा विमा अत्यावश्यकच ठरतो.

कोणतीही गोष्ट, अचरटासारखी अगदी टोकाला नेण्यात, अमेरिकन लोकांसारख्याच त्यांच्या कंपन्या व व्यवसाय प्रसिद्धच आहेत. विमा कंपन्यासुद्धा या नियमाला अपवाद नाहीत हे त्यांनी नुकतेच दाखवून दिले आहे.
जगभर, नवजात अर्भकांची पहिली तीन चार वर्षे, सर्व बाबतीतील प्रगती व्यवस्थित होते आहे की नाही हे पडताळून बघण्यासाठी काही मानदंड वैद्यकीय व्यवसायाने स्वीकारले आहेत. या मानदंडात बालकाचे वजन, उंची, डोक्याचा घेर वगैरे सारखी मोजमापे पण लक्षात घेतली जातात. असंख्य बालकांच्या घेतलेल्या अशा मोजमापांच्यावरून तौलनिक तक्ते तयार केलेले असतात. या तौलनिक तक्त्यांमधे साधारण (Average)बालकाची ऊंची, डोक्याचा घेर व त्याचे वजन यांचे आलेख दिलेले असतात. या साधारण
बालकाच्या तुलनेत आपल्या बालकाचे मोजमाप किती कमी किंवा जास्त आहे हे टक्केवारी क्रमांकाने (Percentile Rank) सांगितले जाते. साधारण बालकाची ही टक्केवारी 50 % असते. आपल्या बालकाची टक्केवारी 25 % टक्क्यापेक्षा खाली असली तर आपले बालक कमी वजनाचे, उंचीचे किंवा कमी डोक्याच्या घेराचे समजतात. त्याचप्रमाणे 75% पेक्षा जास्त टक्केवारी असली तर ते बालक जास्त उंच किंवा वजनाचे समजतात.

BABYALEX


अमेरिकेतील ग्रॅन्ड जंक्शन या गावात रहाणारे बर्नी व केली लांग हे असेच सर्व साधारण अमेरिकन जोडपे आहे. 4 महिन्यापूर्वी त्यांच्या अलेक्स या मुलाचा जन्म झाला तेंव्हा त्याचे वजन सर्वसाधारण बालकांप्रमाणेच सव्वा आठ पौंड एवढे होते. चार महिन्यानंतर फक्त आईच्या दुधावर वाढत असलेल्या अलेक्सचे वजन 17 पौंड झाले आहे व त्याची ऊंची 25 इंच झाली आहे. बघणार्‍याला, अलेक्स हा अतिशय निरोगी, गुटगुटीत व गालाला खळ्या पडणारा एक मुलगा दिसतो.

या मुलाचा विमा उतरवण्यास विमा कंपनीने साफ नकार दिला आहे. त्यांच्या मते या मुलाचा तौलनिक क्रमांक 99% येतो आहे. म्हणजे तो अतीलठ्ठ आहे. अलेक्सचे आई-वडील व मोठा भाऊ अगदी किडकिडीत आहेत. विमा कंपन्यांच्या या अचरटामुळे लांग जोडपे वैतागून गेले आहे. “मी काय अलेक्सला ट्रेड मिल वर पळायला सांगू का?” त्याचे वडील विचारतात. तर आई म्हणते की “चार महिन्याच्या मुलाला मी काही ऍट्किन्स डाएट वर ठेवू शकत नाही.  तो रडला की मी त्याला पाहिजे तेवढे दूध हे देणारच”

अलेक्सचे डॉक्टर त्याला अगदी उत्तम आरोग्य असलेले बालक मानतात. वैतागून गेलेल्या लांग जोडप्याने आता विमा कंपन्याच्या नियंत्रकाकडे आपली तक्रार नोंदवली आहे.


16 ऑक्टोबर 2009

Friday, 19 September 2014

चंद्रयान आणि अमेरिकन लाल फीत

भारताच्या चंद्रयानावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी बसवलेल्या एका उपकरणाद्वारे, चंद्रावर असलेला पाण्याच्या अस्तित्वाचा शोध हा अतिशय महत्वाचा मानता येईल. पाण्याच्या मॉलेक्यूल्सचा प्रत्यक्ष शोध जरी अमेरिकन उपकरणाच्या निरिक्षणांद्वारे लागला असला तरी हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागाजवळून पाहिजे तसे नेणे, वळवणे ही कामे तर चंद्रयानानेच पार पाडली. त्यामुळेच या यशाचे श्रेय अमेरिकन शास्त्रज्ञ व भारतीय शास्त्रज्ञ या सर्वांना मिळून देणे आवश्यक आहे व शास्त्रज्ञांच्या जागतिक समुदायाने ते दिलेही आहे. चंद्रयान-2 वर आपली उपकरणे बसवण्यासाठी सर्व जगातून भारताकडे इतक्या विनंत्या आल्या आहेत की त्यापैकी कोणती उपकरणे बसवायची हे ठरवणे अवघड बनले आहे. चंद्रयान-1 च्या यशाची ही खरी पोच पावती आहे.

_46295776_launch3ap226


चंद्रयान-1 वर बसवलेले अमेरिकन बनावटीचे उपकरण हे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे जरी द्योतक असले तरी अमेरिकन लाल फितीच्या सागरात हा एकत्रित प्रयत्न, गटांगळ्या खाऊन बुडण्याच्या स्थितीला आला होता ही वस्तुस्थिती आहे. इ.स. 2004 मधे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ या प्रयोगाची रूपरेखा आखत असताना अमेरिकेतील निर्यात नियंत्रण विभागाने या प्रयत्नांत सुरवातीपासूनच मोडता घालण्याचा प्रयत्न केला होता. हे उपकरण अमेरिकेतून बंगलोरला पाठवण्यासंबंधीचे कागदपत्र या विभागातून पुढे सरकतच नव्हते. या विभागाने आपल्या अख:त्यारीत असलेल्या सर्व उचापती करून हा प्रयोग थांबवण्याचे शक्य तितके प्रयास करून बघितले होते. त्या वेळचे अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी प्रत्यक्ष हस्तक्षेप केल्यावर हे उपकरण बंगलोरला येण्याचा मार्ग खुला झाला होता.

चंद्रयान-1 या प्रकल्पाचा खर्च 100 मिलियन यू.एस डॉलर्स एवढा होता व तो संपूर्ण भारतानेच केला आहे. हा प्रकल्प आंर्तराष्ट्रीय व्हावा म्हणून भारताने या यानावरील सर्व प्रायोगिक उपकरणे, पूर्णपणे मोफत घेऊन जाऊ म्हणून आंर्तराष्ट्रीय समुदायाला सांगितले होते. लेसर प्रिंटरच्या आकाराचे व 9 के.जी. वजन असलेले एक अमेरिकन उपकरण या उपकरणांपैकी  असेल असे भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञांनी मिळून ठरवले होते. भारताची अट एवढीच होती की या उपकरणाकडून आलेली संदेशरूपी माहिती दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांना उपलब्ध व्हावी. अमेरिकन नोकरशाहीला,  भारताने देऊ केलेली 400000 किलोमीटरच्या मोफत  राईडची कल्पना मान्य होती परंतु त्या उपकरणाचे संदेश भारताला उपलब्ध व्हावेत ही अट काही मान्य होत नव्हती.
1974च्या अणू चाचण्यांनंतर भारतातील बहुतेक शास्त्रीय प्रयोगशाळांना अमेरिकन सरकारने बहिष्कृत केले होते. त्या जुन्या पुराण्या नियमांचा आधार घेऊन अमेरिकन नोकरशाही या शास्त्रीय प्रयोगात खीळ घालण्याचा शक्य तितका प्रयत्न करत होते. इ.स 2006 पर्यंत अमेरिकन नोकरशाहीने हे उपकरण बंगलोरला जाऊ देण्यास नकार दिला होता. चंद्रयान-1 च्या सर्व आराखड्यांना अंतीम स्वरूप , केवळ अमेरिकन उपकरण येणार की नाही हे न ठरल्याने, भारतीय शास्त्रज्ञांना देता येत नव्हते. केवळ या अमेरिकन उपकरणासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी हे आराखडे तसेच अपूर्ण अवस्थेत ठेवले होते. अमेरिकन उपकरणासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी बघितलेली ही वाट, चंद्रावरच्या पाण्याच्या शोधाशी भारताच्या चंद्रयानाचे नाव आता कायमचे जोडले गेल्याने सार्थ ठरली आहे.

2006 मध्ये अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश भारत भेटीसाठी येणार होते. त्या वेळी अखेरीस, त्यांच्याच हस्तक्षेपानंतर भारतीय व अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञांना, Technology Safeguards Agreement (TSA) आणि Technology Assistance Agreement (TAA) for space co-operation. हे दोन करार पूर्ण करून घेता आले व या एकत्रित प्रयत्नांचा मार्ग खुला झाला.

भारतातील शास्त्रीय प्रगतीला खीळ घालण्याचा अमेरिकन नोकरशाहीचा हा काही पहिला प्रयोग नव्हे. 2006 मधे भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने बोइंग कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर सहकार्याचा एक करार केला होता. या कराराच्या कार्यवाहीमधे अमेरिकन नोकरशाहीने इतक्या अडचणी निर्माण केल्या की शेवटी हा करार रद्द करावा लागला. अजूनही अमेरिकन नोकरशाही, भारताबरोबरच्या अंतराळ संशोधनाच्या कोणत्याही प्रकल्पात, जर फक्त शास्त्रीय संशोधन असेल तर अडथळे निर्माण करत नाही. परंतु यात काहीतरी व्यापारी संशोधन आहे व नफा मिळू शकेल, अशा प्रयत्नांचा त्यांना थोडा जरी वास आला तरी मान्यता देण्यास तयार नसते.
चंद्रयानाच्या यशाची बातमी देताना, पाश्चात्य व अमेरिकन माध्यमांनी, मनाचा जो कोतेपणा दाखवला तो सुद्धा कोणत्याही भारतीयाला खटकल्याशिवाय रहाणार नाही. वास्तविक पाहिले असता, चंद्रावरील पाण्याचा शोध, हा केवळ चंद्रयानाच्या मोहिमेमुळेच लागला आहे. आधीच्या दोन मोहिमांतून मिळालेली माहिती अपूर्ण होती व फार फार तर पूरक होती. असे असूनही सर्व पाश्चात्य माध्यमांनी ही बातमी देताना फक्त अमेरिकन शास्त्रज्ञांना यशाचे क्रेडिट दिले होते व नाईलाजास्तव इतर दोन जुन्या मोहिमांबरोबर चंद्रयानाचे नाव घातले होते.

अर्थात जगभरचा शास्त्रीय समुदाय, माध्यमांच्या बातम्या वाचून आपले मत ठरवत नाही. भारताच्या चंद्रयानाचा या शोधात किती महत्वाचा सहभाग आहे याची या समुदायाला योग्य कल्पना आली आहेच. पाश्चात्य माध्यमांनी चंद्रयानाला कितीही गौण लेखल्याचा प्रयत्न केला असला तरी हा शास्त्रज्ञांचा समुदाय व जगातील इतर राष्ट्रे यांनी या मोहिमेचे महत्व योग्य रित्या जाणले आहे ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे.


9 ऑक्टोबर 2009


Wednesday, 17 September 2014

वॉक थ्रू हॉस्पिटल

या वर्षीच्या जुलै महिन्यात स्वाइन फ्ल्यूचे भारतात आगमन झाले व ऑगस्टपर्यंत त्याने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती. या फ्ल्यूचा सर्वात मोठा दणका पुण्याच्या लोकांना सहन करावा लागला. सुरवातीच्या काळात रोगाच्या साथीपेक्षा, रोगाची भिती आणि दहशत यांचाच लोकांना जास्त त्रास झाला. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची एक किंवा दोनच तपासणी केन्द्रे होती. या ठिकाणी आजारी व भीतीग्रस्त नागरिकांना, पावसात लांबच लांब रांगा लावून उभे रहाण्याची वेळ आली. नंतर जास्त तपासणी केन्द्रे स्थापित करण्यात आली. लोकांना क्यू लावून उभे रहाण्याची गरज उरली नाही. पण पहिल्या दोन तीन दिवसात, आजारी पुणेकरांचे हाल झाले हे मात्र खरे.

हा रोग सुरू झाला मेक्सिकोत फेब्रुवारी मार्च मधे व नंतर हा रोग, अमेरिकेतली त्या ऋतुतली हवा थंड असल्याने, लगेच पसरला. अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात लागण झाली. 1 ऑगस्ट पर्यंत या रोगाने अमेरिकेतील 46 बालकांचा बळी घेतला आहे. नंतर हवा गरम झाल्याने स्वाइन फ्ल्यूने हातपाय आवरते घेतले. आता शरद ऋतु चालू झाल्यावर हवा परत थंड होऊ लागली आहे व रोगाने पुन्हा मोठ्या प्रमाणात डोके वर काढायला सुरवात केली आहे.

टेनेसी राज्यातल्या मेम्फिस शहरातील ‘ल बॉनहर’ हॉस्पिटलमधे 1 ऑगस्टपासून साडेपाच हजार मुले फ्ल्यूची लक्षणे दिसल्यामुळे हॉस्पिटलकडे आली आहेत. टेक्सास राज्याची राजधानी असलेल्या ऑस्टिन मधे मागच्या रविवारी ‘डेल मेडिकल सेंट’र या हॉस्पिटलमधे आप्तकालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी 400 मुले आली. यातली बहुतेक फ्ल्यूच्या लक्षणांनीच पछाडलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजारी मुले येत असल्याने हॉस्पिटल्समधल्या सध्याच्या उपचार केन्द्रांना त्यांच्यावर उपचार करणे कठिण बनत चालले आहे.

h1n1-reuters


अमेरिकेत आणि इतर प्रगत देशात, वॉक थ्रू किंवा ड्राइव्ह थ्रू प्रकारची रेस्टॉरंट्स सगळीकडे असतात. त्याचप्रमाणे एटीएम मशीन बसवलेल्या बॅन्क्स आणि औषधे देणार्‍या फार्मसीज पण असतात. या कल्पनेचा वापर करून या दोन्ही हॉस्पिटल्सनी, ‘वॉक थ्रू’ वैद्यकीय सेवा केन्द्रे चालू केली आहेत. ही सेवा केन्द्रे म्हणजे ओळीने उभारलेले तीन तंबू आहेत. या तंबूंच्यात स्वाइन फ्ल्य़ू साठी सर्व तपासण्या करता येतील अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व सर्दी, खोकला किंवा ताप आलेले रुग्ण या तंबूसमोर गाडी पार्क करतात. बर्‍याच वेळा ते शर्ट पायजमा याच वेशात असतात. तंबूंच्या मधून ते चालत जातात. येथे ताप बघण्यापासून सर्व तपासण्या केल्या जातात. ज्या मुलांना स्वाईन फ्ल्यू झाल्याची शंका असते त्यांना टॅमीफ्ल्यू हे फ्ल्यूवरचे औषध शेवटी देण्यात येते, बाकीच्या मुलांना साधी औषधे देउन लगेच घरी पाठवून दिले जाते. मेम्फिस मधल्या हॉस्पिटलमधे, या ‘वॉक थ्रू’ सेवेचा लाभ, 11 सप्टेंबर नंतर 900 मुलांनी घेतला आहे.

फ्ल्यूचे रोगी या निराळ्या केन्द्रावर पाठवल्याने, मुख्य आपत्कालीन सेवा केन्द्र, हृद्रोग, अपघात सारख्या कारणानी येणारे रुग्ण तपासण्यासाठी मोकळे झाले आहेत. 3 वर्षांच्या मुलांपासून संपूर्ण कुटुंबे फ्ल्यूसाठी तपासणी करण्यासाठी या वॉक थ्रू केन्द्राच्यावर येऊ लागली आहेत.

भारतातल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सनी या धर्तीवर उपचार केन्दे चालू केली तर पुण्याच्या नागरिकांचे जुलै महिन्यात जे हाल झाले ते भविष्यात तरी नक्कीच टाळता येतील असे वाटते.


30 सप्टेंबर 2009

Tuesday, 16 September 2014

विजेचा बल्ब- किंमत 50 कोटी रुपये

थॉमस एडिसनने तप्त तारेच्या विजेच्या दिव्याचा शोध् लावल्यापासून, आजतायागत त्या पद्धतीचे विजेचे दिवे जगभर प्रकाश देत आहेत. अमेरिकेपुरते बोलायचे तर त्या देशात विकल्या जाणार्‍या दिव्यांच्यापैकी निम्मे दिवे, तप्त तारेचे आणि 60 वॉट शक्तीचे असतात. मागच्या वर्षी अमेरिकेत असे 42 कोटी दिवे विकले गेले. ह्या दिव्यांचा प्रकाश जरी अमेरिकन लोकांना खूप आवडत असला तरी या दिव्यांची कार्यक्षमता अतिशय कमी असते. ते विद्युतउर्जा विपूल प्रमाणात भक्षण करतात पण दिव्यातून बाहेर पडणारी प्रकाशउर्जा खूपच कमी असते. या शिवाय या दिव्यांच्यातून प्रकाशाबरोबर मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकली जाते.

lightwiz-20-watt


या बाबींचा विचार करून अमेरिकन सरकारने नवीन तयार केलेल्या उर्जा मानकाप्रमाणे तप्त तारेचे विद्युत दिवे 2012 सालानंतर अमेरिकेत विकण्यास बंदी घातलेली आहे. या दिव्यांच्या ऐवजी सी.एफ.एल. किंवा कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट दिवे आता जगात बाकीच्या देशात वापरले जाऊ लागले आहेत. परंतु बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणार्‍या चोखंडळ अमेरिकन नागरिकांना हे देवे पसंत पडत नाहीत. त्यांच्या मते या दिव्यांचा प्रकाश थंड वाटतो आणि आल्हादकारी वाटत नाही. त्यांचे आयुष्य उत्पादक म्हणतात तेवढे नसून किंमत फारच जास्त आहे. या दिव्यांचा आकार फार मोठा असतो व ते अंधुक प्रकाश देतील असे करता येत नाहीत. ते थंड हवामानात बरोबर चालत नाहीत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या उत्पादनात पारा वापरलेला असतो.

ग्राहकांच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेतील उर्जा मंत्रालय, एकीकडे 2012 सालानंतर तप्त तारेचे दिवे वापरण्यास बंदी तर दुसरीकडे त्याच्या जागी आणलेला दिवा वापरण्यास ग्राहकांची नाखुशी अशा कात्रीत सापडले आहे. यावर उपाय म्हणून या मंत्रालयाने त्यांना पाहिजे तसा दिवा बनवणार्‍यास 50 कोटी रुपयाचे बक्षीसच जाहीर केले आहे. या बक्षीसाला एल बक्षीस असे नाव देण्यात आले आहे. हे बक्षीस मिळवण्यासाठी पात्र दिवा कसा असेल? हे पण जाहीर करण्यात आले आहे. या दिव्याने 60 वॉटच्या तप्त तारेच्या दिव्याच्या रंगाचा व तेवढाच प्रकाश दिला पाहिजे. त्यासाठी या दिव्याने 10 वॉटपेक्षा जास्त विद्युतउर्जा वापरता कामा नये. हा दिवा 25000 तास तरी चालला पाहिजे आणि त्याच्या 75 % भागांचे तरी उत्पादन अमेरिकेतच झाले पाहिजे.

सध्या या आवश्यकता पार पाडेल असे तंत्रज्ञान फक्त एल.ई.डी. किंवा लाइट एमिटिंग डायोड वापरून केलेल्या दिव्यांच्या मधेच आहे. परंतु सध्याचे या प्रकारचे दिवे कसोटीला उतरू शकत नाहीत. 60 वॉट असा दावा केलेला एल.ई.डी दिवा प्रत्यक्षात 20 वॉटच देतो असे आढळले आहे.

25bulb.190


हा नवा दिवा बनवण्याच्या शर्यतीत जनरल इलेक्ट्रिक, ओसराम सिल्व्हानिया, या कंपन्यांच्याबरोबर हॉलंडची फिलिप्स कंपनीही आहे. मात्र नमुन्याचा पहिला दिवा सादर करण्याचा मान फिलिप्स कंपनीलाच मिळाला आहे. त्यांनी असे नमुन्याचे 2000 दिवे चाचण्यांसाठी दिलेही आहेत. ह्या दिव्यांची चाचणी करण्यासाठी 1 वर्षाचा अवधी तरी लागू शकतो. फिलिप्स कंपनीला मात्र आपल्या दिव्यांबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे, त्यांच्यामते हा दोवा सर्व चाचण्या व कसोट्यांना पूर्णपणे उतरेल आणि 50 कोटी रूपयांच्या बक्षिसाचे तेच धनी होतील.
या दिव्याच्या किंमतीचे काय? अमेरिकेतील वीज वितरण करणार्‍या कंपन्यांच्या मते ही किंमत, या दिव्यांचे आयुष्य कितीतरी जास्त असल्याने, सी.एफ.एल दिव्यांच्या मानानेचच राहील. परंतु फिलिप्स कंपनीच्या अंदाजाप्रमाणे सुरवातीला या दिव्यांची किंमत 5000 रुपयांपर्यंत रहाणार असली तरी उत्पादन वाढल्यावर ती किंमत 1250 रुपयापर्यंत खाली येऊ शकेल.

भारतातल्या किती जणांना हा दिवा परवडेल हा प्रश्नच आहे म्हणा?


26 सप्टेंबर 2009

Monday, 15 September 2014

अन्नदाता

1968 साली पॉल.आर. एरलिश या लेखकाने, अतिशय गाजलेले असे एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाचे नाव होते ‘पॉपुलेशन बॉम्ब’. या पुस्तकात, लेखकाने भारताबद्दल अत्यंत निराशाजनक अशी भविष्यवाणी वर्तवली होती. या भविष्यवाणीप्रमाणे, 1970 आणि 1980 च्या दशकात अनेक कोटी लोक भारतात मृत्युमुखी पडणार होते. भारतीय शेतीउद्योग वाढ्त्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नउत्पादन करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरणार होता.

आपल्यापैकी ज्या लोकांनी 1960च्या आधीची अन्नधान्यांची परिस्थिती अनुभवली आहे त्यांना चांगलेच आठवेल की त्यावेळी अतिशय नित्कृष्ट दर्जाचा व अमेरिकन सरकारकडून फुकट मिळालेला गहू, रेशनच्या दुकानात मिळत असे. सर्वच अन्नधान्यांचा तुटवडा असल्याने धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालत असे. एकंदरीत परिस्थिती एरलिश च्या भविष्यवाणीनुसारच होती.

पण 1970च्या दशकात असे घडले तरी काय? की ज्याच्या योगे परिस्थिती एखाद्या जादूच्या कांडीने बदलावी तशी बदलली. 1965 ते 1970 या पाच वर्षात भारतातले गहू उत्पादन 12 मिलियन टनावरून 20 मिलियन टनावर गेले. 1975पर्यंत भारत गव्हाचा निर्यातदार देश बनला. इ.स. 2000 मधे भारताचे गहू उत्पादन 75 मिलियन टनावर गेले. उत्पादनातली ही 600% ची वाढ, ज्याला आता ‘हरित क्रांती’ किंवा (Green Revolution) या नावाने ओळखले जाते ती  घडली तरी कशी? व ती कोणी घडवली?

हा जादूगार होता एक साधासुधा अमेरिकन कृषी तज्ञ. त्याचे नाव होते ‘नॉर्मन बॉरलाग’(Norman Borlaug). नॉर्मनला  जगाचा अन्नदाता या नावानेच खरे तर संबोधले पाहिजे. भारताबरोबरच पाकिस्तान आणि त्याच्या आधी सर्वात प्रथम मेक्सिको, या देशात त्याने ही हरित क्रांती घडवून आणली होती. 1970 साली, नॉर्मनला नोबल शांती पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या वेळी जगातल्या कोट्यावधी भुकेल्या मानवांना, दोन वेळची भाकरी ज्याने एकट्याने पुरवली असा माणूस हे गौरवोद्गार त्याच्याबद्दल काढले गेले.

Borlaug-360_613373a


नॉर्मनचा जन्म 1914 साली, अमेरिकेतल्या आयोवा राज्यातल्या क्रेस्को गावाजवळच्या एका शेतकरी कुटुंबात झाला. मिनिओसोटा विद्यापीठातून त्याने फॉरेस्ट्री विषयातून पदवी प्राप्त केली व थोडी वर्षे त्याने फॉरेस्ट विभागात काम केले. यानंतर प्लॅन्ट पॅथॉलॉजी या विषयात त्याने पुढे शिक्षण घेतले व डॉक्टरेटही घेतली. 1944 मधे ड्यूपॉन्ट कंपनीतील चांगली नोकरी सोडून त्याने मेक्सिकोमधे अन्नधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नव्या जाती शोधून काढण्याचे काम हातात घेतले. पुढची 10 वर्षे त्याने प्राथमिक स्वरूपाच्या सोई असलेल्या संशोधन केंद्रात अपार कष्ट करून नवीन संकरित गव्हाच्या जाती तयार करण्यात यश मिळवले. या काळात ट्रॅक्टर उपलब्ध नसल्यामुळे स्वत: नांगर ओढण्यापासून कामे केली. 12 तास शेतात स्वत: उभे राहून तो गव्हाच्या फुलांमधून पूं केसर काढून दुसर्‍या जाती संकरित करण्याचे काम करत असे. नॉर्मनच्या अथांग परिश्रमांना 1956मधे यश आले. मेक्सिकोचे गहू उत्पादन दुप्पट झाले आणि तो देश स्वयंपूर्ण बनला.
1965मधे भारत सरकारच्या निमंत्रणामुळे नॉर्मन भारतात आला व इथल्या शास्त्रज्ञांच्या मदतीने त्याने अनेक संशोधन केंद्रे स्थापन केली. भारत पाकिस्तान युद्ध चालू असतानाच त्याने पंजाब व हरयाणा मधील हजारो शेतकर्‍यांना या नव्या संकरित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दिली व पुढे या शेतकर्‍यांनी नॉर्मनच्या संशोधनाचे सोने केले. तो भाग आपल्याला माहितीच आहे. 1984मधे निवृत्त झालेला असूनही त्याला आफ्रिकेतून बोलावणे आले. तिथली परिस्थिती बघून त्याने निवृत्तीचा विचार सोडून दिला आणि तो बियांची पेरणी करण्याकडे परत वळला.

लहान असताना नॉर्मनला मानवी भूक(Hunger) म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती.  1933 मधे अमेरिकेत आलेल्या मंदीत त्याने प्रथम एक माणूस अन्नाची भीक मागताना बघितला. या प्रसंगाने त्याच्या लक्षात आले की पोटे रिकामी असली तर देशात शांतता कधीच नांदणार नाही. प्रथम त्याने पिकांवरील रोगांवर संशोधन केले. गव्हावरील तांब्या हा रोग सर्वात धोकादायक मानला जात असे. या रोगाला टक्कर देऊ शकेल अशी गव्हाची संकरित जाती त्याने प्रथम तयार केली. जपानमधे पिकवण्यात येणार्‍या ‘नोरिन’ या खुजा जातीशी संकर करून त्याने जी नवी गव्हाची जाती तयार केली तीच जात भारतातील हरित क्रांतीला कारणीभूत ठरली.


पाकिस्तान व त्यानंतर सूदान हे देशही भारतानंतर गव्हाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. ज्या ज्या देशात हरित क्रांती झाली तिथली लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी कमी होऊ लागली आणि त्याचबरोबर रोगराईही कमी झाली. एरलिशच्या भविष्यवाणीतील मृत्युघंटा कधी वाजलीच नाही.

पर्यावरणवाद्यांना नॉर्मनचे संशोधन कधीच पसंत पडले नाही. तो करत असलेले प्रयोग अनैसर्गिक आहेत असे त्यांचे म्हणणे होते. नॉर्मनच्या मताप्रमाणे निसर्गाने निरनिराळ्या गवतांपासून संकर करून तर गव्हासारखी पिके तयार केली होती. तेंव्हा हे काम मानवाने केले म्हणून काहीच बिघडत नव्हते. नॉर्मनचे असे स्पष्ट मत होते की सर्व देशांनी या प्रकारचे संशोधन करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले तर2025 साली जगात असणार्‍या 8 बिलियन लोकांना अन्नधान्याची ददात भासणारच नाही.

पर्यावरणवादी जी काय ओरडाआरडी करत आहेत ती त्यांना करूदे. प्रगतीशील देशांतल्या कोटी कोटी लोकांचे प्राण वाचवणारा हा संशोधक खराखुरा अन्नदाता आहे व आपण सर्व जण त्याचे शतश: ऋणी आहोत.
मागच्या आठवड्यात, 12 सप्टेंबरला, हा आपल्या सर्वांचा अन्नदाता, वयाच्या 95व्या वर्षी निधन पावला


22 सप्टेंबर 2009

Sunday, 7 September 2014

अमेरिकन स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे फळ पूर्वी निदान पुण्यात तरी दुर्मिळच असे. सीझनमधे क्वचित एखादा विक्रेता कॅम्पातल्या दोराबजीच्या दुकानासमोर पथारी मांडून स्ट्रॉबेरीचे वाटे विकताना दिसलेला मला आठवतो. म्हणूनच त्या दिवसांत महाबळेश्वरची चक्कर झाली की स्ट्रॉबेरी घेऊन खाणे हा एक महत्वाचा कार्यक्रम असे. त्यावेळी स्ट्रॉबेरीची फळे बांबूच्या करंडीतून मिळत. खाली वर पाला आणि मधे लाल केशरी फळे, इतकी लोभसवाणी दिसत की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नसे. नंतर पाचगणीला स्ट्रॉबेरी उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले व पुण्याच्या बाजारात प्लास्टिकच्या पारदर्शी डब्यांच्यात भरलेली फळे सर्व फळविक्रेत्यांकडे मिळू लागली. पण तरी सुद्धा ती फळे सीझनमधेच मिळत. गेल्या चार पाच वर्षात मात्र स्ट्रॉबेरीची फळे सदा सर्व काळ उपलब्ध असतात. जर हे डबे नीट निरखून पाहिले तर लक्षात येईल की ही स्ट्रॉबेरीची फळे, कॅलिफोर्नियामधे उत्पादित आहेत. ही कॅलिफोर्नियाची स्ट्रॉबेरी फळे आकारानी मोठी असतात, दिसतात तर छानच पण खाण्यासही अतिशय मधूर असतात.

straberry2006_mar_01_2


अमेरिकेतील कॅलिफोर्निया हे राज्य, उद्योग-धंद्यांची वाढ होण्याआधीपासूनच, फळे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अंदाजे 80000 टन स्ट्रॉबेरी फळांचे या राज्यात उत्पादन होते. व ही फळे जगभर विक्रीसाठी पाठवली जातात. असे जरी असले तरी गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियामधला हा फलोत्पादनाचा व्यवसाय एका वादळात सापडला आहे. इ.स. 2005 पर्यंत हे फलोत्पादक, मेथाइल ब्रोमाइड (Methyl Bromide) हे कीटकनाशक या पिकावर फवारत असत. या वेळी असे लक्षात आले की हे कीटकनाशक, पृथ्वीच्या डोक्यावरचा ओझोनचा थर कमी करण्यास, आपल्या रेफ्रिजिरेटर किंवा एअर कंडीशनरमधील फ्रेऑन वायुसारखेच एक कारण आहे. त्यावेळचे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर डेव्हिस यांनी एक फर्मान काढून या कीटक नाशकाचा उपयोग 2005 मधे बंद केला
.
पुढच्या एक दोन वर्षांत अर्थातच योग्य कीटकनाशक नसल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. यामुळे कीटकनाशके बनविणार्‍या कंपन्यांनी मेथाइल आयोडाइड (Methyl Iodide) हे नवीन कीटकनाशक बाजारात आणले. व उत्पादकांनी ते वापरून बघितले व त्यांना उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे लक्षात आले.

strawberries


2007 मधे निरनिराळ्या महत्वाच्या विद्यापीठांच्यातून संशोधन करणारे रसायनतज्ञ व डॉक्टर्स यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांना एक पत्र लिहून मेथाइल आयोडाइडच्या अनियंत्रित वापरावर बंदी घालण्याची विनंती केली. या शास्त्रज्ञांच्या मते “हे कीटकनाशक जरी ओझोन थराला हानीकारक नसले तरी ते अतिशय तीव्र शक्तीचे कीटकनाशक आहे. ते फवारल्यानंतर त्या जमिनीतले सर्व जीव जंतू नष्ट होतात. एवढेच नव्हे तर् गर्भवती स्त्रिया, गर्भ, लहान मुले, म्हातारी माणसे, शेत मजूर या सर्वांवर या रसायनाच्या होणार्‍या परिणामांची आम्हाला काळजी वाटते.”

प्रयोगशाळांच्यामधे प्राण्यांच्यावर मेथाइल आयोडाइड वापरून केलेल्या प्रयोगांच्यात थायरॉइड ग्रंथी व मेंदूमधील पेशी यावर या रसायनाचे दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर यांचा परिणाम झालेल्या प्राण्यांच्यात गर्भपाताचे प्रमाणही लक्षणीय रित्या जास्त आहे. हे सर्व दुष्परिणाम लक्षात आल्यावर, कॅलिफोर्निया मधल्या बर्‍याच शेतकर्‍यांनी सेंद्रीय(Organic) कीटकनाशके वापरून स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरवात केली आहे.

organic-strawberry-field-300x225

सेंद्रीय शेती


पुढच्या वेळी कॅलिफोर्निया मधल्या स्ट्रॉबेरी खरेदी करायला जाल तेंव्हा त्यावरचे लेबल नीट वाचा. जर ते फळ सेंद्रीय (Organic) शेतीने उत्पादित असेल तरच घ्या अथवा Risk is all yours!

20 जुलै 2009