Showing posts with label पाकिस्तान. Show all posts
Showing posts with label पाकिस्तान. Show all posts

Thursday, 29 January 2015

मोहेंजो-दारो साठी मृत्यू घंटा



(इतिहास पूर्व कालीन शहर मोहेंजो-दारो वर चमकणारे लेसरचे प्रकाश किरण)
तत्कालीन भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या पश्चिम मंडलाचे प्रमुख पुरातत्त्व अधिकारी कै. पी.डी बॅनर्जी यांनी सिंध मधील आणि सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका जागी, 1922 मध्ये उत्खनन करण्याचा जेंव्हा निर्णय घेतला तेंव्हा त्यांना त्या जागी बहुधा कुशाण कालीन बौद्ध स्तूप आणि मठाचे पुरातन अवशेष सापडतील एवढीच अपेक्षा होती. सिंध मधील एका वैराण अशा कोपर्‍यात असलेली ही जागा कराची बंदरापासून सुमारे 425 किमी एवढ्या अंतरावर होती. या जागी असलेल्या मातीच्या ढिगार्‍याखाली एक पुरातन बौद्ध स्तूप आहे याची साधारण कल्पना पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांना असल्याने प्रत्यक्षात 1923 साली त्यांनी हा स्तूप ज्या जागेवर असेल असे वाटत होते त्याच्या बाजूंनी उत्खनन करण्यास सुरूवात केली. या पुरातन स्तूपाचे बांधकाम मातीच्या भाजलेल्या विटांनी केलेले होते व तो आजूबाजूच्या सपाट जमिनीपासून किमान 70 फूट तरी उंच असल्याचे या शास्त्रज्ञांना आढळून आले होते. कै. बॅनर्जी यांच्या अपेक्षेप्रमाणे स्तूपाभोवतीच्या चौरस आवाराच्या बाहेर त्यांना सर्व बाजूंना मिळून, बौद्ध भिख्खूंसाठी बांधलेले एकूण 30 निवास कक्ष तेथे आढळले होते. या निवासकक्षांचा काल कोणता असावा? याचा स्पष्ट पुरावा, पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात होऊन गेलेला कुशाण राजा वासुदेव याच्या कालातील नाणी, एका पुरातन निवास कक्षात सापडल्याने मिळाला होता. कै. बॅनर्जी यांचे उत्खननात सापडलेल्या या गोष्टींमुळे समाधान न झाल्याने त्यांनी मातीच्या ढिगार्‍याच्या चहोबाजूंनी आणखी खोल असा चर खणण्यासाठी सूचना आपल्या सहकार्‍यांना दिल्या. खाली खणत असताना उत्तरेला असलेल्या हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या व चित्रलिपी मधील मजकूर ठसवलेल्या सील्स सारखे दिसणारे एक मातीचे सील प्रथम तेथे सापडले. यानंतर तेथे या प्रकारची आणखी 2 सील्स सापडली. सील्सच्या या शोधानंतरही, इतिहास पूर्व कालातील या सील्सचे असाधारण महत्त्व, कै. बॅनर्जी व त्यांचे सहकारी यांच्या पूर्णपणे लक्षात आले होते असे म्हणता येणार नाही.

मात्र पुरातत्त्व खात्याचे तकालीन सरसंचालक सर जॉन मार्शल यांना बॅनर्जी उत्खनन करता असलेल्या जागेवर सापडलेली सील्स आणि या आधी शोध लागलेल्या हडप्पा येथील इतिहास पूर्व कालीन जागेवरच्या उत्खननात सापडलेली सील्स यांच्या मधील साधर्म्य लगेच लक्षात आले आणि ते अशा निष्कर्षाप्रत आले की या दोन्ही जागी केलेल्या उत्खननात सापडलेले भग्नावशेष हे आजवर अज्ञात असलेल्या आणि आता नवीनच सापडलेल्या एका प्राचीन संस्कृतीचे आहेत. त्यांनी आपला शोध लगेचच इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या नियतकालिकात प्रसिद्ध केला आणि जगाला किमान 4000 वर्षे पुरातन असलेल्या या प्राचीन संस्कृतीची प्रथम ओळख झाली. या नंतर या जागी केलेल्या उत्खननात, सध्या मोहेंजो-दारो या नावाने ओळखले जाणारे, एक विशाल शहर येथे अस्तित्वात होते असे आढळून आले. भारताच्या 1947 मधील फाळणीनंतर ही इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थळ पाकिस्तानात गेले आणि आता या स्थळाची निगराणी आता पाकिस्तानचा पुरातत्त्व विभाग करत असतो. या स्थळाचा समावेश आता यूनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केलेला आहे आणि या स्थळाला outstanding universal valueअसलेले स्थळ असा दर्जा दिलेला आहे.
मोहेंजो-दारो भग्नावशेष हे सिंधू नदीच्या पात्राच्या अगदी लगत सापडलेले आहेत हे आपण वर बघितलेच आहे. गेल्या शेकडो वर्षात या नदीला सतत येणार्‍या पूरांमुळे या भागातील भूजल पातळी ही सतत वर वर येत राहिलेली आहे. यामुळे येथील जमिनीत असलेले खारवट क्षारांचे प्रमाण वाढत राहिलेले आहे. याचा एक दुष्परिणाम म्हणजे मोहेंजो-दारो येथील भग्नावशेषांखालील माती ढिसूळ होते आहे व त्यांना धोका निर्माण झाला आहे. 1970 मध्ये यूनेस्कोने या विषयासंबंधी एक मोहीम आंतर्राष्ट्रीय पातळीवर हाती घेतली होती. या मोहिमेमुळे मुख्यत्वे विटांचे बांधकाम असलेल्या या इतिहास पूर्व कालीन भग्नावशेषांची होणारी हानी काही प्रमाणात का होईना! थोपवण्यात यश आले आहे. या बाबत यूनेस्कोच्या वेब साइट्वर खाली दिलेला उल्लेख सापडतो.
या ऐतिहासिक वारसा सांगणार्‍या स्थळाची, त्याच्या परिसरात आढळून येणार्‍या, सिंधू नदीला नेहमी येणारे पूर, सतत वर येत राहणार्‍या भूजल पातळीमुळे जमिनीत वाढलेले खारट क्षारांचे प्रमाण आणि परिसरात साठलेल्या पाण्याचा निचरा न होणे, या सारख्या पर्यावरणास हानिकारक अशा बाबींमुळे आणि येथील अतिशय विषम हवामान यामुळे सतत हानी होत असल्याचे आढळून येते आहे. पाकिस्तानी सरकारने 1974 मध्ये याबाबत यूनेस्कोला केलेल्या विनंती नंतर यूनेस्कोने मोहेंजो-दारो वाचवण्यासाठी एक आंतर्राष्ट्रीय मोहीम हातात घेतली होती. या मोहिमेचे कार्य 1997 पर्यंत चालू होते. या मोहिमेच्या अंतर्गत 23 मिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च करून हे स्थळ वाचवण्यासाठी, नदीच्या पुराचे पाणी आत न येऊ देण्यासाठी बंधारे, भूजल पातळी वर येऊ न देण्यासाठीचे उपाय, स्थानिक व्यवस्थापनाला या पद्धतीचे उपाय सतत चालू ठेवता येतील यासाठी त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि या स्थळाचे संवर्धन व त्यावर सतत लक्ष ठेवणे यासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा या सारखे कार्यक्रम हातात घेण्यात आले होते.
मोहेंजो-दारो आंतर्राष्ट्रीय संवर्धन व बचाव समितीचे कार्य कार्य 1997 मध्ये संपल्यानंतर यूनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा व जागतिक वारसा केंद्राने या स्थळाच्या स्थानिक व्यवस्थापनाला सहकार्य देऊ केले होते व 2004 या वर्षापर्यंत काय पद्धतीने संवर्धन कार्य चालू ठेवता येईल या बद्दल सूचना दिल्या होत्या. या सूचनांत स्थानिक व्यवस्थापनाची यंत्रणा, संवर्धन आणि निगराणी, शिक्षण आणि कार्यक्षमता वर्धापन, पर्यटन केंद्र म्हणून विकास अशा विषयांमधील सूचनांचा समावेश होता. सध्या पर्यंत एकूण व्यवस्थापन, संवर्धन आणि पुरातन कालात बांधलेल्या भिंती व बांधकामे यांची सद्यःस्थिती टिकवून ठेवणे, संवर्धन कार्याचे राष्ट्रीय पातळीवर शिक्षण आणि प्रत्यक्ष स्थळावर असलेले व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या कामाचा दर्जा सुधारणे या सारख्या कार्यांना मदत दिली जात आहे.”
मोहेंजो-दारो येथील मुख्यत्वे विटांचे बांधकाम असलेल्या या इतिहास पूर्व कालीन भग्नावशेषांची स्थिती आता किती नाजूक बनली आहे याची चांगलीच कल्पना वरील अहवालावरून आल्याशिवाय रहात नाही. या भग्नावशेषांचे सतत संवर्धन जर केले नाही तर भारतीय उपखंडातील हा सर्वात महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा काळाच्या ओघात नष्ट झाल्यावाचून राहणार नाही हे दिसून येते आहे. पाकिस्तान मधील एक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. आसमा इब्राहिम असे म्हणतात की ज्या पद्धतीने या स्थळाची हानी होताना दिसते आहे ती बघता पुढच्या 20 वर्षात हे स्थळ नष्ट होईल अशी भिती वाटते आहे. दुर्दैवाने पाकिस्तान मधील राजकारण्यांना मोहेंजो-दारो भग्नावशेषांची स्थिती किती नाजूक बनली आहे याची कल्पना सुद्धा बहुतेक नसावी असे त्यांनी पुरस्कृत केलेल्या व दोन आठवडे चालणार्‍या एका सांस्कृतिक महोत्सवावरून वाटते आहे. पाकिस्तानच्या सांस्कृतिक वारशाची लोकांना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव आखण्यात आलेला असून तो मोहेंजो-दारो मधील भग्नावशेषांच्या अगदी लगतच उभारलेल्या एका भव्य मंचावर सादर केला जाणार आहे. पाकिस्तान मधील पाकिस्तान पिपल्स पार्टीने श्री बिलावल-भुट्टो-झरदारी यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे उद्घाटन एका भव्य समारंभाने 1 फेब्रुवारी 2013 या दिवशी केले गेले.



( रंगमंचासाठी लाकडी प्लॅटफॉर्म उभारण्याचे कार्य चालू आहे.)
हा महोत्सवाचे आयोजन करणार्‍यांचे असे म्हणणे आहे की या महोत्सवाद्वारे सिंध प्रांताची वैशिष्ट्यपूर्ण असलेली संस्कृती सर्व जगासमोर येईल आणि त्यायोगे या संस्कृतीचा वारसा टिकून राहण्यास मदत होईल. मात्र पहिल्या दिवशीच्या उद्घाटन समारंभामध्ये लेसर शो, फॅशन शो आणि ऐनी खलीद या लोकप्रिय पॉप गायकाचे गायन यासारखे कार्यक्रमच सादर केले गेले. या सर्व कार्यक्रमांचा परंपरागत सिंधी संस्कृतीशी दूरान्वयानेही संबंध लावणे शक्य नव्हते. पाकिस्तान मध्ये पुरातन स्थळांची निगराणी आणि संवर्धन यासाठी अनेक कायदेकानून केलेले आहेत. यामध्ये 1975 मधील पुरातत्त्व कायदा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या कायद्यातील तरतुदींप्रमाणे असा कोणताही महोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याचा कोणत्याही संरक्षित पुरातन स्थळांवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही ना? याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक मानले आहे. मात्र मोहेंजो-दारो महोत्सवाआधी असा कोणताही अभ्यास महोत्सवाचे आयोजन करणार्‍यांनी केलेला नव्हता. त्यामुळेच हा महोत्सव म्हणजे मोहेंजो-दारो साठी वाजवलेली भय-सूचक घंटा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

मोहेंजो-दारो मधील उत्खननात मिळालेल्या दोन अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या वस्तू दिल्ली मधील राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. यापैकी एक, ..पूर्व 2500 मध्ये बनवलेला एका नर्तकीचा 10.8 सेमी. उंचीचा ब्रॉन्झ धातूचा पुतळा आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे धर्मगुरू-राजाचा चिनी माती मधे बनवलेला एक मुखवटा आहे. पाकिस्तानी पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मताप्रमाणे या दोन्ही वस्तू सर मॉर्टिमर व्हीलर या एका ब्रिटिश पुरातत्त्व अधिकाऱ्याने 1946 मध्ये दिल्लीला एका प्रदर्शनात मांडण्यासाठी म्हणून नेल्या होत्या. फाळणीनंतर पाकिस्तानने या दोन्ही वस्तू परत केल्या जाव्यात अशी मागणी केली होती असेही हे अधिकारी सांगतात. परंतु या वस्तू भारत परत करील याचे सूतराम शक्यताही मला तरी वाटत नाही.

या वस्तू परत करण्याचे कोणतीही नैतिक किंवा कायदेशीर बंधन भारतावर दोन कारणांसाठी नसल्याचे मला तरी वाटते आहे. प्रथम कारण म्हणजे सर मॉर्टिमर व्हीलर यांनी जर 1946 मध्ये या वस्तू खरोखरच दिल्लीला नेलेल्या असल्या तर या वस्तूंचे त्यांचे नेणे हे अपहरण केलेल्या वस्तू एका देशातून दुसर्‍या देशात (सिंधमधून दिल्लीला) नेल्या प्रमाणे होते असे म्हणणे शक्य होत नाही कारण हे दोन्ही प्रांत एकाच देशामधील दोन स्थाने त्या वेळी होती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या वस्तू जर 1946 मध्ये हलवलेल्या असल्या तर 1970 मधील यूनेस्को कनव्हेंशन प्रमाणे त्या वस्तू पाकिस्तानला परत करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन भारतावर येऊ शकत नाही. या कनव्हेंशन प्रमाणे एखादी अशी वस्तू 1970 नंतर जर निर्यात परवान्याच्या शिवाय हलवली गेलेली असली तर मात्र ती परत करण्याचे बंधन ज्या देशात ती वस्तू आहे त्या देशावर येते. या कारणांमुळेच भारत या वस्तू पाकिस्तानला देण्याची शक्यता मला तरी दिसत नाही.
हा वाद-विवाद बाजूला ठेवून आपण अशी आशा करुया की भविष्यकाळात तरी पाकिस्तान सरकार हा महोत्सव मोहेंजो-दारो अवशेषांच्या लगत साजरा करण्यास परवानगी नाकारेल व हा महोत्सव या अवशेषांपासून काही किमी लांबवर असलेल्या एखाद्या स्थानी आयोजित केला जाईल व भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाच्या पुरातन संस्कृतिच्या या वारशाचे संरक्षण करण्यास पाकिस्तान सरकार हातभार लावील.
(लेखातील चित्रे द एक्सप्रेस ट्रिब्यून मधून घेतलेली आहेत व ती या वृत्तपत्राच्या कॉपीराइटची असू शकतात.)
17 फेब्रुवारी 2014

Wednesday, 21 January 2015

पाकिस्तानच्या किनार्‍यालगतच्या समुद्रातून वर आलेले बेट


समुद्र मंथनाची पौराणिक कथा बहुतेक सर्वांना ज्ञात आहेच. या कथेप्रमाणे एकदा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करून रत्नाकराच्या पोटात दडलेले अमृत, मंथन करून बाहेर काढण्याचे ठरवले या अमृताबरोबरच या मंथनातून लक्ष्मी, हलाहल या सारख्या अनेक गोष्टीही बाहेर आल्या असे या कथेत सांगितलेले आहे. आपल्या या समुद्र मंथनाच्या कथेप्रमाणेच ग्रीक पुराणांतील एका कथेत पॉसिडॉन या देवाचा मुलगा टारस याची नौका बुडलेली असताना त्याला एक डॉल्फिन मासा वाचवतो आणि टारस या डॉल्फिन माशावर स्वार होऊन समुद्रातून बाहेर येतो असा उल्लेख आहे. माझी खात्री आहे की कोणतीच सुशिक्षित व्यक्ती या असल्या पुराण कथांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, समुद्र किनार्‍यावर उभे राहून जेंव्हा आपण समुद्राकडे बघतो तेंव्हा समोर दिसणारा अफाट आणि अथांग जलसंचय त्याचप्रमाणे किनार्‍याकडे झेपावणार्‍या आणि आदळणार्‍या महाप्रचंड राक्षसी लाटा बघताना किंवा एखाद्या जहाजाच्या डेकवर उभे राहून आजूबाजूला पसरलेल्या अथांग समुद्राकडे बघत असताना या अफाट जलविस्तारामधून मानवनिर्मित पाणबुड्या आणि जलचर या शिवाय आणखी काही वर काही येऊ शकेल यावर कोणाचाच विश्वास बसणे शक्य होणार नाही.

मात्र पाकिस्तानच्या नैऋत्येला असलेल्या माकरान किनारपट्टीवर रहात असलेल्या काही थोड्या लोकांसाठी, ही अशक्य कोटीतील बाब सत्यतेतील आहे, असे त्यांच्या डोळ्यासमोरच ती घडल्यामुळे, म्हणावेच लागते आहे. ग्वाडर हे एक बंदर आणि मध्यम लोकसंख्येचे एक गाव या किनारपट्टीवर वसलेले आहे. मंगळवार 24 सप्टेंबर 2013 या दिवशी या गावच्या पंचक्रोशींमध्ये भूकंपाचा एक जबरदस्त झटका बसला. 7.7 शक्तीच्या या भूकंपाचे केंद्र होते पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील आवारान या दुर्गम भागात! या भूकंपाच्या झटक्यातून ग्वाडर गावातील लोक सावरतात न सावरतात तोवर त्यांना न भूतो न भविष्यति! असे दृष्य गावाजवळच्या किनार्‍यासमोरील अरबी समुद्रामध्ये दिसले. किनार्‍यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर, समुद्रामध्ये, एक नवीन बेट दिसत होते. भूकंप झाल्याच्या क्षणापासूनच्या पुढच्या फक्त 1 तासामध्ये हे बेट समुद्रातून वर आलेले होते. एक स्थानिक पत्रकार मिया बहराम बलोच म्हणतात: ” मी घराच्या बाहेर पडलो आणि आश्चर्याचा एक धक्का मला बसला. माझ्या नजरेसमोर, पाण्याच्या पृष्ठभागावर पोहणार्‍या एखाद्या व्हेल माशासारखे आणि ग्रे रंगाचे, समुद्रामध्ये काहीतरी दिसत होते आणि ही अशक्य गोष्ट अविश्वासू नजरेने बघत असलेली शेकडो मंडळी तेथे आधीच जमा झालेली मला दिसत होती.”
मिया बलोच आणि त्यांचे काही मित्र यांनी दुसर्‍या दिवशी (25 सप्टेंबर 2013) एक बोट भाड्याने घेतली व ते या समुद्रातून नवीनच वर आलेल्या बेटाकडे निघाले. बलोच यांच्या म्हणण्याप्रमाणे हे बेट लंबवर्तुळाकार आकाराचे आहे व लांबीला 250 ते 300 फूट व रुंदीला 60 ते 70 फूट असावे. त्याचा पृष्ठभाग कमालीचा खडबडीत आणि चिखलाने भरलेला आहे. काही भागात सूक्ष्म आणि जाडसर कणांची वाळू पसरलेली आहे. बेटाच्या एका भागात फक्त अखंड खडक आहेत. या खडकाळ भागात बलोच आणि त्यांचे मित्र बोटीने उतरले होते.

बलोच यांना बेटावर अनेक मृत मासे आढळले आणि एका बाजूच्या खडकातील फटीमधून गॅस बाहेर येताना करतो तसा आवाज येत असल्याचे आढळले. जेथून हा आवाज येत होता त्या खडकामधील फटीजवळ पेटलेली काडी नेल्याबरोबर बाहेर येणार्‍या गॅसने पेट घेतला व नंतर त्या ज्वाला विझवण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. पाणी टाकूनही ज्वाला विझत नव्हत्या. अखेरीस त्यांनी बादल्या भरभरून पाणी टाकल्यावर ज्वाला विझल्या.

पाकिस्तानची माकरान किनारपट्टी ही पूर्व-पश्चिम अशी साधारण 700 किमी लांब आहे व येथे भूकंपासारख्या भूगर्भातील घटना नेहमीच घडत असतात. या भागातील अनेक टेकड्यांवर चिखल बाहेर टाकणारे ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींच्या मुखाजवळ मिथेन गॅस बाहेर टाकणारी विवरे आहेत. ग्वाडर आणि ओरमारा या स्थानांमधील समुद्राखाली गोठलेल्या मिथेन वायूची विशाल भांडारे आहेत आणि हा वायू समुद्रतळातील फटीतून बाहेर येत असल्यामुळे निर्माण झालेले बुडबुडे अनेक वेळा पाण्यावर दिसतात.
मात्र समुद्रातून बेट बाहेर येण्याची ही घटना या भागात घडलेली पहिली किंवा एकुलती एक घटना आहे असे मानण्याचे काहीच कारण नाही. हे प्रकार या पूर्वीही घडलेले आहेत. 1945 सालापासून ग्वाडर जवळ निदान 3 बेटे तरी समुद्रातून वर आलेली आहेत. पाकिस्तानी शास्त्रज्ञ हे बेट म्हणजे प्रत्यक्षात चिखल बाहेर टाकणारा ज्वालामुखी आहे की काय? याची तपासणी करत आहेत. आहेत. याच्या आधीच्या कालात अशी समुद्रातून वर आलेली बेटे परत समुद्रातच गायब झालेली असल्याने हे बेट काही काळानंतर परत समुद्रात बुडण्याची शक्यता आहेच.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सूचनेनुसार किनार्‍यापासून 3 मैल अंतरावर समुद्रातून उदय पावलेले हे बेट काही बिंदूंवर 30 फूटापर्यंत उंचीचे आहे. पाकिस्तानच्या नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेचे महासंचालक अली टाबरेझ म्हणतात की त्यांनी आपल्या सर्व्हे टीम्स या बेटावर त्याची मोजमापे घेणे, तेथील जमिनीचे व खडकाचे नमुने घेणे आणि या बेटाची नैसर्ग़िक वैशिष्ट्ये काय आहेत याची पाहणी करणे या साठी पाठवल्या आहेत. त्यांच्या मताने प्रथम दर्शनी तरी हे बेट 1999 आणि 2010 मध्ये समुद्रातून वर आलेल्या भूभागाप्रमाणेच दिसते आहे. पूर्वीच्या या दोन्ही घटनांत भूकंपासारख्या भूपृष्ठिय हालचालींनी समुद्र तळाखाली अडकलेले मिथेन वायूचे साठे मुक्त झाल्याने समुद्र तळावरील भूपृष्ठ वर उचलले गेले होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सध्या वर आलेल्या या बेटामधून अजूनही मिथेन वायूचे उत्सर्जन होते आहे आणि लोकांनी या बेटावर जाण्याचे टाळावे कारण समुद्र तळावर अजूनही भूपृष्ठिय हालचाल सुरू असण्याची शक्यता आहे. तसेच या बेटाच्या आसपास बोटी नेणे किंवा मासे पकडणे या गोष्टीही करू नयेत.
या रोचक घटनेमुळे एक गोष्ट मात्र सत्य असल्याचे सिद्ध झाले आहे. समुद्रातून बेटे वर येण्यासाठी वर्षे किंवा शतके लागत नसून अशी बेटे काही मिनिटात समुद्रातून वर येऊ शकतात.
9 ऑक्टोबर 2013

Sunday, 18 January 2015

भारत-पाकिस्तान सीमा आणि दोन महा-आपत्ती



भारत आणि त्याच्या पश्चिमेला असलेला पाकिस्तान यांच्यामध्ये 700 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीची व उत्तर-दक्षिण पसरलेली सीमा आहे. या पैकी जम्मू-कश्मिर मधला प्रत्यक्ष ताबा रेषेचा भाग सोडला तर बाकीची सीमा 1947 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या देशाच्या फाळणीमुळे झालेली असल्याने ती नद्या किंवा पर्वतराजी या सारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांनुसार धरून आखलेली भौगोलिक सीमा नाही. मात्र याच सीमारेषेच्या नैऋत्येकडचा, पूर्व-पश्चिम असा पसरलेला भाग मात्र फाळणीच्या किमान एक शतकापासून अधिक काळाआधी नैसर्गिक रितीने अस्तित्वात आलेला आहे. अर्थात नैसर्गिक रितीने अस्तित्वात आलेला हा भाग,प्रथम दोन सार्वभौम राष्ट्रांच्यातील सीमारेषेचा भाग नव्हता तर ही सीमा प्रथम होती ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करलेले एक संस्थान व एक स्वतंत्र अमिरात यांच्यामधली! नंतर ब्रिटिश हुकुमतीखाली असलेला एक प्रांत व एक संस्थान यांच्यामधली! भारताच्या पश्चिम किनार्‍यावर असलेले कच्छ हे स्वतंत्र राज्य आणि इस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 13 ऑक्टोबर 1819 रोजी झालेल्या मांडलिकत्व कराराप्रमाणे, कच्छ राज्य हे ब्रिटिश सार्वभौमत्वाखाली असलेले एक मांडलिक राज्य असेल असे ठरवण्यात आले व दिनांक 4 डिसेंबर 1819 मध्ये हा करार अंमलात आला. या राज्याच्या उत्तरेला त्या वेळेस मिर घुलाम अली खान तालपूर या अमिराच्या अधिपत्याखाली असलेली सिंध अमिरात होती. हा अमिर आणि ब्रिटिश यांच्यात वैर असले तरी या वेळेस तरी सिंध अमिरात स्वतंत्र होती.
सिंधचे अमीर
सिंध अमिरात व कच्छ संस्थान यांच्यामधील सीमावर्ती भागाचा भूगोल 2 शतकांपूर्वी, आजच्या पेक्षा खूपच निराळा होता. हा सीमावर्ती प्रदेश त्या काळात सिंधू नदीचा मुख-प्रदेश (delta) म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचाच एक भाग समजला जात असे. आजमितीला सिंधू नदीचा मुख-प्रदेश म्हणून जो भूभाग गणला जातो, त्यात नदीच्या मुख्य पात्रापासून अनेक छोट्या नद्या अलग होताना आढळतात व अलग झालेल्या अशा नद्यांचे एक जाळेच या प्रदेशात उत्तर दक्षिण असे पसरलेले आहे. या छोट्या-मोठ्या अलग झालेल्या नद्यांच्या मुखांमार्फत ही महाकाय नदी आपले जल समुद्रात पोचवत असते व होती. मात्र दोन शतकांपूर्वीच्या काळात, सर्वात दक्षिणेकडे असलेल्या पण सिंधू नदीच्या मुख-प्रदेशाचाच भाग मानल्या जाणार्‍या आणि सिंधूच्या मुख्य पात्रापासून अलग होऊन वहाणार्‍या, दोन नद्या आपल्या या लेखाच्या विषयाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या आहेत. यापैकी एक नदी सिंधूच्या मुख्य पात्रापासून बान्नाया गावाजवळ अलग होत होती व पुढे पिन्यारी किंवा गूंगरा या नावाने ओळखली जाऊन सिर या नावाने ओळखल्या जाणार्‍या नदी मुखातून अरबी समुद्राला जाऊन मिळत होती. या नदीच्या दक्षिणेला असणारी आणखी एक नदी, कोरी किंवा सिंधूचे पूर्वेकडील मुख या नावाने ओळखल्या जाणार्‍या मुखातून अरबी समुद्राला मिळत होती. ही नदी कोरी किंवा पुरम या नावाने ओळखली जात असे व ती सिंधू नदीच्या मुख्य पात्रापासून हैद्राबाद शहराजवळ अलग होत असे. या कोरी नदीच्या दक्षिण किनार्‍यावर लखपत या नावाचा एक किल्ला होता व या किल्ल्यावर कच्छ संस्थानाचे सैनिक तैनात केलेले असत.

सायरा या नावाने ओळखला जाणारा या दोन नद्यांमधील दुआबाचा प्रदेश कच्छ संस्थानाच्या अधिपत्याखाली होता व तो अत्यंत सुपीक असल्याने येथे भातशेती व शेतकर्‍यांच्या वस्त्या असत. सन 1762 नंतर या भागातील शेतीला उपलब्ध होणारे पाणी हळूहळू कमी होत गेले आणि सायरा भाग ओसाड प्रदेश बनला. अशा परिस्थितीत हा भाग, कच्छ संस्थान किंवा सिंध अमिरात यांच्यापैकी कोणाच्या नियंत्रणाखाली होता? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. जुने नकाशे व कागदपत्र यावरून असे दिसते की कच्छ संस्थानाने या भागात नदीकाठावर काही किल्ले बांधलेले होते. या किल्ल्यात व इतरही ठिकाणी कच्छ संस्थानाचे सैनिक तैनात केलेले असत. या शिवाय येथून जाणार्‍या व्यापारी मालावर कर आकारणी करण्यासाठी येथे कस्टम नाकीही कच्छ संस्थानाने बसवलेली होती.
कोरी नदीच्या काठावर साधारण 24.5 अंश अक्षांशावर सिंदडी या नावाचे एक गाव होते व त्यात एक किल्ला कच्छ संस्थानाने बांधलेला होता. हा सिंदडी किल्ला लखपत गावाच्या नदीप्रवाहाच्या उलट दिशेने 30 मैलावर व पाकिस्तान मधील अली बंदर गावापासून नदीप्रवाच्या दिशेने 20 मैलावर होता. हा किल्ला 150 चौरस यार्ड आकाराच्या चौथर्‍यावर बांधलेला होता व त्या भोवती 20 फूट उंच अशी तटबंदी बांधलेली होती. किल्ल्यात 50 ते 60 फूट उंचीचा एक टेहळणी मनोरा सुद्धा बांधलेला होता. सिंदडी हे नदीवरील एक बंदर, गाव आणि सीमेवरचे नाके असल्याने येथे कच्छ संस्थानाचे सैनिक नेहमीकरता तैनात असत. या सिंदडी गावाच्या उत्तरेला साधारण 5 मैलावर कईरा नाला नावाच्या नाल्याकाठी कईरा नावाचे एक नाके प्रत्यक्ष सीमेवर बसवलेले होते. या नाक्यावरून कच्छ संस्थान सीमा शुल्क वसूल करत असे.
कोरी नदीच्या मुखाजवळच्या भागात पण उत्तर काठावर, कोठाडी आणि बस्ता बंदर या नावाचे दोन किल्ले होते यातही सैनिक व कस्टम नाकी होती. या ठाण्यांच्या उत्तरेला व सिंदडी किल्ल्याच्या पूर्वेला वेयरे आणि लाक या नावाची दोन कच्छ संस्थानाची ठाणी होती. हे सर्व वर्णन एवढ्या बारकाईने मी केले आहे याचे कारण वाचकांना सन 1819 च्या पूर्वी या भागातील परिस्थिती काय होती याची नीट कल्पना यावी हे आहे. भारतीय शाही आरमारातील (Indian Navy) एक अधिकारी लेफ्टनंट टी.जी. कारलेस यांनी 1837 साली लिहिलेल्या आपल्या “Memoir to accompany the Survey of the Delta of the Indus, ” या पुस्तकात या बस्ता बंदर किल्ल्याचा उल्लेख या प्रकारे केलेला आहे. ते लिहितात: नदीच्या पलीकडच्या किनार्‍यावर एक भग्नावस्थेतील बस्ता बंदर या नावाने ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला आधी कच्छ संस्थानाच्या राव या संस्थानिकांच्या ताब्यात होता परंतु पुढे तो सिंधी लोकांबरोबरच्या लढायांमध्ये नष्ट झाला.” (हा किल्ला लढाईत नष्ट झाला की इतर काही कारणांनी हे आपण पुढे बघूया.)

या प्रदेशावर पहिली महा-आपत्ती कोसळली ती 16 जून 1819 या दिवशी! 7.7 किंवा 8.2 एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा झटका येथे बसला व त्या पाठोपाठ एक महाप्रचंड त्सुनामी लाट समुद्रावरून या प्रदेशावर आली व सर्व भाग जलमय झाला. या आपत्तीत 1543 लोकांचा मृत्यू झाला. या भूकंपाने येथे काही दूरगामी परिणामही केले. सिंदडी किल्ला जेथे उभा होता तेथील जमीन खाली जाऊन तेथे एक मोठे डिप्रेशन तयार झाले व ते प्रथम त्सुनामीने आत आलेल्या खार्‍या पाण्याने भरले. नंतर या ठिकाणी मोठे सरोवर निर्माण झाले व त्यात कोरी नदीचे पाणी साठू लागले. येथे पूर्वी सिंदडी हे गाव असल्याने या सरोवराला सिंदडी सरोवर या नावाने ओळखले जाऊ लागले. या शिवाय या भूकंपामुळे भूपृष्ठावर झालेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सिंदडी गावाच्या उत्तरेस कच्छचे रण आणि सिंधची भूमी यांच्या सीमेवरचा 80 किमी लांब आणि 6 किमी रूंद एवढ्या जमिनीच्या पट्ट्यात भूतल 6 मीटर एवढ्या उंचीपर्यंत वर उचलला गेला व नैसर्गिक रितीने एक बंधारा किंवा बंड तयार झाला. या बंधार्‍याने अली बंदर गावाकडून येणारा कोरी नदीचा प्रवाहच पूर्णपणे अडवला गेला. या नैसर्गिक बंधार्‍याला अल्ला बंधारा” (Allah Bund) या नावाने ओळखले जाते.

सिंदडी किल्ला आणि कईरा नाके या भूकंपात पूर्णपणे नष्ट झाले व तेथील लोकांना हलवले गेले. पुढे बरीच वर्षे किंवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, जुना कोठ्डी या नावाने परिचित असलेले या किल्ल्याचे भग्नावशेष अस्तित्वात होते परंतु पुढे तेही नष्ट झाले आणि त्या जागी पूर्वी येथे किल्ला होता याची कोणतीच खूण उरली नाही.
वाचकांना भूकंपामुळे झालेल्या या प्रचंड उलथापालथीने या भागात केवढा परिणाम घडवला असेल याची कल्पना आली असेलच. अल्ला बंधार्‍याने कच्छ संस्थान व सिंध अमिरात यांच्यामध्ये एक नैसर्गिक अशी सीमाच निर्माण झाली. यामुळेच 1819 मधील भूकंपाला अल्ला बंधारा भूकंप या नावाने सुद्धा ओळखले जाते.
1819 मधील भूकंपामुळे सिर मुखातून अरबी समुद्राला मिळणार्‍या गुंगरा किंवा पिन्यारी नदीच्या पाण्यावर जरी फारसा परिणाम झाला नाही तरी कोरी नदीचे पाणी मात्र आटण्याच्या पंथास लागले. या पुढच्या वर्षात, ज्या ज्या वेळेस सिंधू नदीला महापूर येऊन अल्ला बंधार्‍याचा भाग जलमय होत असे फक्त त्याच वर्षांना कोरी नदीला पाणी येऊ लागले यामुळे या भागात केली जाणारी मासेमारी व मिठासारख्या गोष्टींची व्यापारी वाहतूक यावरही मोठा परिणाम होऊ लागला.
त्यानंतर 19 जून 1845 रोजी या प्रदेशाला आणखी एक प्रचंड भूकंपाचा धक्का बसला व त्याच्या पाठोपाठ त्सुनामी लाट अरबी समुद्राकडून आली. या घटनेची साक्षीदार असलेल्या एका ब्रिटिश महिलेने, कोणा एका व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात या भूकंपाने उडवलेल्या हाहाकाराचे प्रत्यक्ष पाहून वर्णन केलेले आहे. Quarterly Journal of Geological Society या नियतकालिकाच्या डिसेंबर 1946च्या अंकात हे वर्णन प्रसिद्ध झाले होते व हे वर्णन खालील प्रकारे आहे.
कॅप्टन मॅकमर्डो यांचा एक वाटाड्या त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणून भूज पासून निघाला होता. तो ज्या दिवशी लखपत गावाला पोचला त्याच दिवशी भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांनी लखपत किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळून जीवितहानी सुद्धा झाली. या धक्क्यांपाठोपाठ एक महाभयंकर लाट कोरी किंवा सिंधू नदीच्या पूर्वेकडच्या मुखाद्वारे समुद्राकडून आली व या लाटेने या प्रदेशातील जमिनीचा सर्व भाग जलमय झाला. पश्चिमेला, गुंगरा नदीपर्यंत ( साधारणपणे 20 इंग्लिश मैलांचे अंतर), उत्तरेला वेयरे गावाच्या थोड्या उत्तरेपर्यंत (कोरीच्या मुखापासून साधारण 40 मैल अंतर) तर पूर्वेला सिंदडी जलाशयापर्यंतचा सर्व भूभाग पूर्णपणे जलमय झाला. हा वाटाड्या लखपत गावात 6 दिवस ( 19 जून ते 25 जून) अडकून पडला व या काळात भूकंपाचे एकूण 66 धक्के मोजता आले. यानंतर त्याला कोटडी किल्ल्यापर्यंत जाणे शक्य झाले. कोटडीमधे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच बैठ्या व लहान इमारती गावामधील एका छोट्याशा हिश्शावर उभ्या आहेत. सिंधमधील गावांच्यात अगदी उत्तम प्रतीची म्हणून गणली जाणारी घरे सुद्धा सूर्यप्रकाशात वाळवलेल्या मातीच्या कच्च्या विटांपासून बनवलेली असतात आणि झोपड्या तर वेड्यावाकड्या लाकडी खांबाच्या आधाराने उभ्या केलेल्या वेळूच्या चटयांनी आच्छादलेल्या असतात. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये असलेल्या बहुतेक गावे व वस्त्यांना, पाण्यात वाहून गेल्याने बहुधा जलसमाधी मिळालेली आहे. हा वाटाड्या येथून पुढे सुमारे 20 मैल पूर्णपणे पाण्यामधून उंटाच्या पाठीवर बसून गेला. या पाण्याची पातळी उंटाच्या छातीपर्यंत येईल एवढी होती. लाक गावात जलपातळीच्या वर कोणा फकिराच्या पिराजवळ उभी केलेली निशाणाची काठी सोडली तर बाकी काहीही दिसत नव्हते. वेयरे आणि इतर गावे यांच्यामधली अगदी तुरळक संख्येने घरे उभी होती.
लखपत मधे वर्षाला निदान दोन वेळा तरी भूकंपाचे झटके बसतात असे म्हणतात. म्हणतात. सिंदडी जलाशयाचे रूपांतर आता खारवट जमिनीमध्ये झाले आहे.”
वरील वर्णनावरून वाचकांना या भूकंपामुळे काय हाहाकार उडला असेल आणि कोरी नदीचे मुख आणि सिर मुख यामधील प्रदेश कसा संपूर्णपणे नष्ट झाला होता याची चांगलीच कल्पना येऊ शकेल.
या दोन दुर्घटनांमुळे, कच्छ आणि सिंध अमिरात यांच्या मधील सीमाप्रदेशाची, जो नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील आंतर्राष्ट्रीय सीमेचा एक भाग बनला, एक नैसर्गिक वाटणीच दोन विभागात केली गेली. ही नैसर्गिक सीमा पूर्वेकडे अल्ला बंधारा व पश्चिमेकडे सिर खाडी ज्यामधून एके काळी सिर किंवा गुंगरा नदी वहात होती यांनी रेखित केली गेली. गुंगरा नदी आणि कोरी नदी यांच्या पात्रांमधील दुआब प्रदेशाचे समुद्र पातळी पेक्षा कमी भूपातळी असलेल्या एक वैराण प्रदेशात रुपांतर झाले. या प्रदेशात अनेक जलप्रवाह निर्माण झाले ज्यात कोळी सध्या मासेमारी करतात.

1845च्या भूकंपाच्या आधी प्रसिद्ध झालेले नकाशे किंवा पुस्तके यात उल्लेख झालेले कोठडी किंवा बस्ता बंदर या सारख्या किल्ल्यांचे पुढे काय झाले? त्यांचे भग्नावशेष तरी पुढे सापडले का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍यांना एका अशा प्रयत्नाची माहिती रोचक वाटेल. भारतीय अवकाश संस्थेमधून निवृत्त झालेले एक अधिकारी श्री. पी.एस.ठक्कर यांना गूगल अर्थ वरून दिसणार्‍या उपग्रह नकाशांचे अध्ययन करण्याचा छंद आहे. अशाच एका प्रयत्नात त्यांना कोरी नदीच्या पश्चिम किनार्‍यावर अर्धवट पाण्यात बुडलेल्या एका किल्ल्याचे भग्नावशेष दिसले. हा किल्ला म्हणजे बस्ता बंदर किल्ला असला पाहिजे हे लक्षात आल्याने त्यांनी याचा बराच पाठपुरावा केला व शेवटी सीमा सुरक्षा दलाच्या क्रोकोडाइल कमांडोच्या एका तुकडीला बरोबर घेऊन आपल्या 3 सहकार्‍यांसह या स्थानावर पोचण्यात यश मिळवले. तेथे जाऊन त्यांनी छायाचित्रे घेतली व इतर काही मोजमापे त्यांना घेता आली.

या प्रयत्नात त्यांना का किल्ला तर सापडलाच पण या शिवाय अनपेक्षित रित्या या भूभागाच्या भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला एक नवीन शोध लावता आला. श्री ठक्कर यांच्याच शब्दात सांगायचे तर: ” 7.9 तीव्रतेच्या 1819 मधल्या भूकंपामुळे अल्ला बंधारा आणि सिंदडी जलाशय तर निर्माण झालेच पण या भूकंपामुळे अल्ला बंधार्‍याच्या नैऋत्येला असलेल्या भूभागाची पातळीही समुद्र पातळीच्या खाली गेली.”
1845 मधल्या भूकंपात, त्सुनामी लाटेमुळे हा सर्व भाग पाण्याखाली का गेला याचे कारण या निरिक्षणामुळे मिळते असे मला वाटते. या भूस्तरावरील घडामोडीमुळे कोरी व सिर खाड्यांमधील भूभागाचे पुढील भविष्यकालासाठी, कच्छच्या रणाप्रमाणे असणार्‍या एका वैराण प्रदेशात रूपांतर झाले व भौगोलिक सीमारेखा म्हणून उपयोगात आणणे शक्य होईल अशी फक्त सिर खाडी तेथे उरली.
15 सप्टेंबर 2013

Thursday, 15 January 2015

इतिहासाच्या सोबतीने कच्छ आणि काठेवाड, भाग 3


(मागील भागावरून पुढे)
गुरूवार
आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने उतरून जातात व मला बसच्या पुढच्या भागात खिडकीजवळची जागा मिळते. पुढच्या काही मिनिटातच बस भरते आणि आम्ही निघतो सुद्धा. या प्रवासासाठी असलेला आमचा गाईड सैन्यदलातून निवृत्त झालेला आहे आणि बर्‍यापैकी विनोदी स्वभावाचा असल्याने त्याच्या सूचनांची आम्हाला सगळ्यांनाच गंमत वाटते आहे. परत एकदा आम्ही भिरंडीयारनी गाव गाठतो व परत एकदा डावीकडे वळून हायवे 45 वरून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतो. आसमंत साधारण तसेच आहे. बन्नी चराऊ राने, मधून मधून धष्टपुष्ट गाई म्हशींचे कळप आणि मधूनच एरंडीची शेते. या रस्त्यावरच असलेल्या खावडागावामध्ये आम्ही पहिला हॉल्ट घेतो. रणाच्या वैराण आणि विशाल मरूभूमीमध्ये प्रवेश करण्याआधी लागणारे हे शेवटचे मोठे गाव आहे. येथे चहाचा कप घेणे अनिवार्य आहे असे आमच्या गाडचे म्हणणे पडते व आम्ही त्याच्या इच्छेला मान देऊन गरमगरम चहाचा थोडा आस्वाद घेतो. या गावाचे सुद्धा एक हस्तकला वैशिष्ट्य आहे. येथे कलात्मक रित्या बनवलेल्या चामड्याच्या वस्तू उत्तम मिळतात. चपला व पर्सेसची डिझाइन अतिशय सुरेख आहेत. पण मला पुढच्या प्रवासाची इतकी उत्कंठा आहे की सध्या खरेदीकडे माझे फारसे लक्ष नाहीये.
खावडा गावातील रहिवासी मात्र इतर कच्छी लोकांपेक्षा खूपच भिन्न दिसत आहेत. चेहर्‍याची लांब ठेवण, धारदार आणि टोकदार नाके, सुरमा घातलेले डोळे यामुळे या लोकांचे बलुची किंवा पख्तुन लोकांशी असलेले साम्य लक्षात येण्याजोगे आहे. त्यांच्या डोकयावरील पगड्या, अंगावरील पठाणी पोषाख व गळ्याभोवती घेतलेले उपरण्यासारखे वस्त्र यामुळे हे लोक इथले मूळ स्थानिक नसावेत असा अंदाज मी बांधतो. आमचा गाईड खुलासा करत मला सांगतो की ही मंडळी काही पिढ्यांपूर्वी वायव्येकडून येथे येऊन स्थायिक झालेली आहेत आणि त्यांनी हे गाव आता आपले केलेले आहे. या लोकांचे मूळ स्थानिक कच्छी लोकांबरोबर फारसे संबंध नसल्याने आता गुजरात सरकार त्यांना इतर समाजाबरोबरच सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे खावडा गावाजवळ मूळ कच्छी लोकांची वस्ती वाढावी म्हणून येथे नव्या उद्योगधंद्याना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे. नवीन उद्योगधंदे आले की नोकरीसाठी मूळ कच्छी मंडळी येथे येतील व सध्या या स्थलांतरितांचे जे इथे प्राबल्य आहे ते कमी होईल अशी कल्पना या मागे आहे.
आमच्या गाईडचा बरोबर आणलेल्या कागदपत्रांचा आणि बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या नावांचा व संख्येचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. याचे कारण म्हणजे खावडा गावानंतर येथील स्थानिक सोडले बाकी असैनिक किंवा सिव्हिलियन लोकांना खास परवाना असल्याशिवाय पुढे प्रवास करता येत नाही. अखेरीस बसचा ड्रायव्हर, कंडक्टर स्वत: गाईड आणि आम्ही सर्व, यांचा ताळमेळ जमतो व आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. कुरन नावाचे एक छोटेसे खेडे रस्त्यात लागते. यानंतर आसमंत हळूहळू बदलू लागला आहे हे माझ्या लक्षात येते. आता एरंडीची शेते जवळजवळ दिसतच नाहीयेत. टाकाऊ आणि वरकड जमिनीचे मोठमोठे तुकडे आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागले आहेत. बाभूळ आणि विलायती बाभूळ यांची झाडे आणि खाली वाळके गवत हे मात्र विपुल प्रमाणात सगळीकडे आहेत. थोडे अंतर पार केल्यावर आता आम्ही रणाच्या तीरावर असलेल्या जमिनीच्या शेवटच्या कडेवर येऊन पोचतो आहोत. बस काही क्षण स्तब्ध उभी आहे. मी त्याचा फायदा घेऊन समोरचे दृष्य मनात साठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
माझ्या अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे एक पूल. या पुलाखाली आता जरी कोरडीच जमीन असली तरी वर्षातील बराच काळ येथे समुद्राचे पाणी असते. माझ्या डाव्या हाताला दिसते आहे ती काल मी अनुभवलेली व मिठाचे थरावर थर असलेली धवल मरूभूमी. ही धवल मरूभूमी पार पश्चिम क्षितिजापर्यंत विस्तारली आहे. मात्र प्रत्यक्षात या धवल मरूभूमीच्या पुढे दलदलीचा प्रदेश व नंतर अरबी समुद्राकडे नेणारी कोरी खाडी लागते असे माझ्या जवळचा नकाशा सांगतो आहे. माझ्या उजव्या हाताला दिसते आहे कोणत्याही प्रकारच्या झाडाझुडपांचा लवलेश सुद्धा दिसत नसलेली, किरमिजी, मळकट रंगाच्या जमिनीची, एक अफाट पसरलेली वैराण मरूभूमी. मात्र अगदी पूर्व क्षितिजाजवळ, याच मरुभूमीने आपला रंग बदलला आहे. या ठिकाणी ही मरुभूमी थोडीशी निळसर ग्रे दिसते आहे. हा रंग बघणार्‍याला सहजपणे फसवतो आहे. असे बघितल्यावर येथे समुद्रकिनारा असला पाहिजे असे वाटते आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही.
मात्र रणाचा हा देखावा बघताना निसर्गाची ही अद्भुत आणि दुर्मीळ करामत बघून माझे मन इतके आश्चर्यचकित झाले आहे की निस्तब्धपणे समोरचा देखावा बघण्याशिवाय काहीही करणे मला शक्य नाही. समोर दिसणार्‍या वैराण रणाचा वायव्येकडचा भाग, येथे गोड्या पाण्याची विपुलता असल्याने 200 वर्षांपूर्वी अतिशय सुपीक होता व येथे वर्षभर पिके डोलत असत असे मी वाचले आहे. परंतु समोर सध्याची परिस्थिती बघितल्यावर हे जवळपास अशक्यप्रायच वाटते आहे.
एखाद्या खोल पाण्याने भरलेल्या समुद्रात असावीत तशी अनेक बेटे या रणामध्ये आढळतात. ही बेटे मॉन्सून कालात पाण्याने वेष्टिलेली असली तरी बाकीच्या काळात या बेटांवर जमिनीवरच्या वाटांनी पोचता येते. अगदी ऐतिहासिक कालांपासून असे अनेक मार्ग येथील स्थानिक लोकांना ज्ञात होते व आहेत आणि या मार्गांनी उन्हाळ्यात रण सहजपणे ओलांडता येते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात, रणाचा उत्तर किनारा हा त्यांच्या अधिपत्याखाली असलेला सिंध प्रांत व कच्छ संस्थान यामधील सीमारेखा म्हणून मानली जात असे. त्या काळात रण ओलांडण्यासाठी 4 मार्ग सर्वसाधारणपणे वापरात होते. यापैकी पहिला मार्ग हा कच्छ मधील लुना गाव आणि सध्याच्या पाकिस्तानातील रहिम की बझारहे गाव यांना विगाकोट आणि कांजरकोट या मार्गे जोडत होता तर पाकिस्तानातील नगरपरकर हे गाव आणि कच्छ मधील बेला आणि लोदरानी यांना जोडणारे 2 स्वतंत्र मार्ग अस्तित्वात होते. मोरी बेटावरून जाणारा व कच्छ मधील खावडा आणि पाकिस्तानातील डिप्लो या गावांना जोडणारा 4था मार्ग त्या वेळी वापरात होता. आता यापैकी कोणतेच मार्ग आता उपलब्ध नाहीत व सीमा सुरक्षा दलाने बनवलेले 2 किंवा 3 पक्के रस्ते आता रण ओलांडण्यासाठी वापरले जातात. या रस्त्यापैकी, खावडा गावापासून निघून रणाच्या उत्तर काठावर असलेल्या विगाकोट या एका जुन्या किल्याच्या भग्नावशेषांपर्यंत, अनेक बेटे जोडत गेलेल्या एका रस्त्याने, आम्ही रण ओलांडणार आहोत.
आमची बस आता परत पुढे निघाली आहे. रणाचा दक्षिण काठ आणि उत्तरेकडे, सर्वात जवळ असलेले कुवर बेट, या मध्ये वाहणारा रणातील जलप्रवाह इतका अरूंद आहे की एका पुलाच्या सहाय्याने तो सहज ओलांडता येतो. इंडिया ब्रिज किंवा भारत सेतू या नावाने ओळखला जाणारा हा पूल आमची बस आता ओलांडते आहे. या पुलाला लागून धर्मशाळा या नावाने ओळखले जाणारे पहिले सीमा चेक पोस्ट समोरच आहे. पाकिस्तानची सीमा जवळच असल्याने या चेक पोस्ट्पासूनच पुढे सुरक्षा नियम पालन अतिशय कडकपणे केले जाते. बस चेक पोस्टवर थांबते. आम्हाला आमच्या जवळचे मोबाइल फोन, कॅमेरे वगैरे सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुरक्षा दलाच्या हवाली करावी लागतात. मोबाइल मधले सिम कार्ड सुद्धा चालत नाही. या नंतर आमची बस सुरक्षा दल कर्मचार्‍यांकडून व या साठी मुद्दाम तरबेज असलेल्या नीलम या श्वानाकडून संपूर्णपणे तपासली जाते. अखेरीस आम्हाला हिरवा सिग्नल मिळतो व आम्ही पुढे निघतो. कुवर बेट, येथे तैनात असलेले सैनिक वगळले तर, बाकी तसे निर्मनुष्य आहे. आजूबाजूच्या जमिनीवर पिवळे पडलेले वाळके गवत व त्यातून मधून मधून वर डोकावणारी बाभळीची झुडुपे या शिवाय काहीच दिसत नाही. मधून मधून दिसणारे उघडे वाकडे खडक मला सह्याद्रीची आठवण करून देतात. मात्र रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंना एका पाठोपाठ एक, सैनिकांचे बंकर्स मात्र दिसत राहतात. एक वळण घेतल्यावर रस्ता बर्‍यापैकी सरळ होतो व थोड्याच वेळात आम्ही कुवर बेट ओलांडून रणावर असलेला आणखी एक पूल पार करतो व पुढच्या बेटावर प्रवेश करतो. या बेटाला सीमा सुरक्षा दलाने चिडियामोरअसे नाव, येथे पक्षी खूप दिसत असल्याने, बहुधा दिलेले असावे. परत एक चेक पोस्ट समोर येते व बस थांबते. येथे बस चालकाने खाली उतरून काही औपचारिकता पूर्ण करणे अपेक्षित असते. बस मधील आमचा गाईड आमचे लक्ष उजव्या बाजूला लांबवर वेधतो व तेथे उभा असलेला चिंकारा किंवा इंडियन गॅझेल आम्हाला दाखवतो. भारतीय वन विभागाने संरक्षित म्हणून ही प्रजाती घोषित केलेली आहे व यांची एकूण संख्या आता मर्यादित असली तरी वृद्धिंगत होते आहे. हे चिंकारा या बेटांवर सुखाने रहातात, कारण त्यांना त्रासदायक ठरतील अशी हिंस्र श्वापदे किंवा माणसे ही दोन्हीही या बेटांवर रहात नाहीत व स्वत:ला परमेश्वराचा आधुनिक अवतार मानणारे चित्रपट नट त्यांची शिकार करण्यासाठी अवैध रित्या येथे फिरकू शकत नाहीत. मॉन्सूनचा काल सोडला तर हे चिंकारा एका बेटावरून दुसर्‍या बेटावर आरामात रणामधून फिरत असतात.
चिडियामोर बेट पार केल्यावर आता आमची बस खर्‍या रण प्रदेशातून प्रवास करते आहे. आम्ही प्रवास करत असलेला रस्ता भराव घालून जमीन पातळीपासून सुमारे 3 ते 4 फूट उंच केलेला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चौरस आकाराचे चिरे ( दगड) कॉन्क्रीटमध्ये बसवून पेव्हमेंट केलेले आहे. हे पेव्हमेंट बहुधा रण पाण्याने भरले की रस्त्याच्या भरावाची हानी होऊ नये म्हणून केलेले असावे. रस्त्याचे डांबरीकरण केलेले असले तरी तो जेमतेम एक प्रवासी वाहन जाऊ शकेल एवढाच रुंद असल्याने दर 100 मीटर्सवर समोरून येणार्‍या वाहनांना एकमेकाला क्रॉस करणे सुलभ जावे म्हणून रस्त्याच्या बाहेरील बाजूस कॉन्क्रीट्मध्ये चिरे बसवून शोल्डर्स बांधलेले आहेत. बाजूला दिसत असलेला रणाचा पृष्ठभाग मात्र अजून ओलसरच दिसतो आहे. बर्‍याच ठिकाणी जमिनीमधे असलेल्या खळग्यांमध्ये पाणी साचलेले अजूनही दिसते आहे. आणखी एखाद्या महिन्याभरात रण वाळून पूर्णपणे शुष्क होईल व मग त्याला पापुद्रे सुटत जातील. मधेच रणामधून आरामात चालताना काही चिंकारा आम्हाला दिसतात. ते बहुधा एका बेटावरून दुसर्‍या बेटाकडे निघालेले असावेत. सुमारे 4 किमी अंतर रणामधून गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा एका बेटावर पोचतो आहोत. या बेटाचे नाव सीमा सुरक्षा दलाने बॉप्स BOPS बेट असे ठेवलेले दिसते आहे. येथे हेलिकॉप्टर उतरू शकतील असा तळ बांधलेला असावा कारण तशी पाटी समोर दिसते आहे. बेटावर पोचल्यावर परत एकदा आसमंत खूपसा बन्नी चराऊ जमिनींसारखा वाटतो आहे. वाळलेले गवत, त्यात मधून मधून काटेरी झुडपे असे दृष्य दिसते आहे. येथे थोडी मोठी विलायती बाभळीची झाडेही बरीच दिसत आहेत. रणातील या बेटांवर आतापर्यंत न बघितलेले एक झुडूप मला दिसते आहे. एखाद्या पुंजक्याप्रमाणे असलेल्या या झुडपातून, सूर्याच्या चित्रात लहान मुले किरण फाकलेले जसे दाखवतात तसे गवताचे दांडे फाकलेले आहेत व त्याला बारीक काटे किंवा पाने असावीत असे दिसते आहे. सेंन्च्रस Cenchrus प्रजाती पैकी ही झुडपे बहुधा असावीत. आम्हाला आणखी काही चिंकारा चरताना दिसतात.
बॉप्स बेट पार केल्यावर आमची बस आता परत एकदा रणामध्ये प्रवेश करते आहे. रस्ता नाकासमोर काढावा तसा सरळसोट दिसतो आहे. हा रस्त्याचा भाग अंदाजे 10 ते 12 किमी तरी असावा व तो सरळ रण ओलांडतो आहे. दोन्ही बाजूंना रणाची वैराण मरूभूमी शिवाय दुसरे काहीही दिसत नाहीये. परत एकदा डाव्या हाताला किंवा पश्चिमेला मला धवल मरूभूमीचे काही पॅचेस तळपणार्‍या सूर्याच्या उन्हात झगमगून उठताना दिसतात व बसच्या समोरच्या काचेतून पार उत्तरेला, झाडे झुडपे असलेला हिरवा पट्टा असल्याचा भास मधून मधून होत राहतो. बहुधा ते मृगजळ असावे किंवा बेटेही असण्याची शक्यता संपूर्ण नाकारता येत नाही. बाजूला दिसणार्‍या रणाच्या मरूभूमी मध्ये पाण्याचे ओढे व ओहोळ तेथे काही महिन्यांपूर्वी वहात होते याच्या स्पष्ट झिग-झॅग आकृत्यांच्या खुणा खालील मातीमध्ये दिसत आहेत. रस्ता थोडा पश्चिमेकडे वळतो व पुढे पुढे जात राहतो. सुमारे 30 ते 40 किमी अंतर असेच पार केल्यावर दूर उत्तर क्षितिजावर, मला वर उचललेली जमीन high ground दिसू लागले आहे आणि त्यावर 3 आधुनिक इमारतीही दिसत आहेत. प्रथम हे मृगजळ असावे असे मला वाटते पण त्या इमारती तशाच दिसत राहतात व त्या प्रत्यक्ष असल्याची खात्री पटते आहे. आमच्या गाईडच्या माहितीप्रमाणे या इमारतींना विगाकोट अतिथी गृह Vigokot guest house या नावाने ओळखतात. विगाकोट ही जागा आता आम्हाला हे स्पष्टपणे दर्शवते आहे की आम्ही रण ओलांडले आहे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही आता सिंधमध्ये आहोत.
विगाकोट या स्थानावर 200 वर्षे पूर्वीपर्यंत एक भुईकोट किल्ला होता व या किल्याचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. मला तर कोठे काही अवशेष दिसले नाहीत, परंतु तो भाग अलाहिदा. येथे एका स्थानिक राजाचे संस्थान 1819 मधील भयानक भूकंपापर्यंत होते. परंतु या भूकंपात हा किल्ला व गाव हे सर्व संपूर्णपणे नष्ट झाले आणि या गावाचा एकुलता एक जलस्रोत असलेली व गावाजवळून वाहणारी एक छोटेखानी नदीही आटली. त्यामुळे येथील वस्ती 1819 नंतर बहुधा उत्तरेकडे सरकली असावी.
विगाकोट अतिथी गृहापाशी आमची बस अजूनही थांबलेलीच आहे कारण अजूनही समोर दिसणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या चेक पोस्टवरून आम्हाला स्पष्ट असा कोणताच संदेश मिळालेला नाही. कदाचित आणखी काही औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असावे. अखेरीस आम्हाला हिरवा दिवा मिळतो व आमची बस तेथून साधारण 200 मीटर अंतरावर असलेल्या एका तारेच्या कुंपणापाशी जाऊन थांबते. मी खाली उतरतो व चालत जाऊन या तारेच्या कुंपणापाशी उभा राहतो. मी आता भारताच्या आंतर्राष्ट्रीय सीमेपाशी पोचलो आहे. या कुंपणापासून साधारण 150 मीटरवर ही आंतराष्ट्रीय सीमा आहे व त्या पलीकडे पाकिस्तानच्या सार्वभौमत्त्वाखालील भूभाग सुरू होतो आहे. प्रत्यक्ष सीमा रेषेवर दर 40 मीटर अंतरावर साडेचार फूट उंचीचे व पांढर्‍या रंगाने रंगवलेले खांब दिसत आहेत. या खांबांवर आमच्या बाजूला इंडिया व विरुद्ध बाजूस पाकिस्तान अशी अक्षरे कोरलेली आहेत. मात्र पाकिस्तानच्या बाजूला पुढे कोणतेही काटेरी कुंपण घातलेले नाही. भारताच्या बाजूने तिकडे कोणी घुसखोरी करण्याची शक्यता नसल्याने पाकिस्तानला बहुधा अशा कुंपणाची गरज भासत नसावी. आमच्या बरोबर सीमा सुरक्षा दलाचे हवालदार राणा आहेत. ते आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देतात. पलीकडे पाकिस्तानने उभारलेले निरीक्षण मनोरे ते आम्हाला दाखवतात. या क्षणाला पाकिस्तानमधील कोणीतरी आमच्या कडे बघतो आहे आणि आम्ही कशासाठी येथे आलो आहोत? असे आश्चर्य मनात व्यक्त करतो आहे ही कल्पनाच मला मोठी थ्रिलिंग वाटते आहे. आमच्या बसमध्ये भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले स्त्री पुरुष आहेत परंतु या क्षणी सीमेवर उभे असताना ते एकच आहेत आणि फक्त भारतीय आहेत हे सर्वांच्या चेहर्‍यावरून मला स्पष्ट दिसते आहे.
या स्थानाच्या साधारण 5 किमी उत्तरेला कांजरकोट नावाच्या किल्ल्याचे भग्नावशेष आहेत. हा किल्ला विगाकोट येथील संस्थानिकाच्या भावाच्या मालकीचा होता व तेथे सन 1819 पर्यंत त्याचे संस्थान होते. कांजरकोट किल्ला व गाव हे दोन्ही विगाकोट प्रमाणेच भूकंपात संपूर्णपणे नष्ट झाले होते. कांजरकोटच्या आणखी काही किमी उत्तरेला, रहिमकी बझार हे गाव लागते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, हा सर्व भाग आणि रहिमकी बझार गाव हे कच्छ्च्या राजाच्या अधिपत्याखालील भाग होता. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याने कच्छच्या या अधिपत्याबद्दल आपत्ती उपस्थित करण्यास सुरुवात केली आणि हा भाग सिंधमध्ये मोडत असल्याने आपल्या सार्वभौमत्त्वाखालील आहे असा दावा भारताकडे केला.
आम्ही उभे असलेल्या स्थानी 1965 या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले होते अशी माहिती हवालदार राणा आम्हाला देतात. येथे पाकिस्तानने हल्ला करून सीमा सुरक्षा दलाच्या 6 जवानांना शहीद केले होते. या जवानांच्या रक्ताने पुनीत झालेल्या भूमीवर मला काही क्षण का होईना स्तब्ध उभे राहण्याचे भाग्य लाभते आहे यासाठी मी मनोमन सीमा सुरक्षा दलाचा ऋणी आहे. त्या वेळचे ब्रिटिश पंतप्रधान यांच्या मध्यस्तीने नंतर येथे युद्धबंदी झाली व एक आंतर्राष्ट्रीय लवाद नेमला गेला. या लवादाच्या निर्णयाप्रमाणे कांजरकोट आणि रहिमकी बझार पाकिस्तानला देण्यात आले व विगाकोट भारतात राहिले. पण या सगळ्या घटनांना 47/48 वर्षे लोटली आहेत. आता ही सीमा पूर्णपणे शांत व सुरक्षित आहे. घुसखोरी होऊ नये म्हणून येथे आता काटेरी तारेचे तिहेरी कुंपण घातलेले आहे. माझ्या बायनॉक्युलर मधून पाकिस्तानमधील प्रदेशाचे निरीक्षण करण्यात मी आणखी काही मिनिटे घालवतो. परंतु आता परत जाण्याची वेळ आली आहे व थोड्या जड पावलांनीच आम्ही बसमध्ये चढतो व बस परत एकदा विगाकोट अतिथी गृहाशी पोचते. येथे आमच्यासाठी एका शामियान्यात उत्तम भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या नंतर मी गेस्ट हाऊसच्या गच्चीवरून परत एकदा बायनॉक्युलर्सच्या सहाय्याने पाकिस्तानचा भूप्रदेश न्याहाळतो. मी उंचीवर असल्याने मला आता दिसते आहे की सीमेपार असलेल्या भूभागावर एक छोटीशी टेकडी सीमेच्या समांतर पश्चिमेकडे पसरलेली दिसते आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला मी या टेकडी बद्दल विचारतो व तेथे टेकडी आहे हे पक्के होते. माझ्या मनात ही टेकडी म्हणजे 1819 च्या भूकंपात तयार झालेली अल्ला बंड ही टेकडी असली पाहिजे असा विचार येतो आहे. या अल्ला बंडमुळेच ज्या नदीला सिंधू नदीचे पूर्वेकडचे मुख असे नाव मिळालेले होते त्या कोरी नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन तिच्या नदीपात्राचे, दलदलीच्या प्रदेशात रूपांतर झालेले होते. मात्र खरे खोटे सांगणे खूप कठीण असल्याने मी जास्त विचार करणे सोडून देतो. परंतु येथे दिसत असलेली टेकडी अल्ला बंड असण्याची शक्यता माझ्या मनाला वाटते आहे हे नक्की.
दुपारच्या भोजनानंतर आमची बस परत एकदा रण ओलांडून खावडा गावाकडे जाण्यास निघते. वर तळपणार्‍या सूर्याच्या प्रखर उन्हात आता प्रवास करावयाचा आहे ही कल्पनाही मला नकोशी वाटते. परंतु बस चालक वातानुकूलन यंत्र चालू करतो आणि त्या सुखद गारव्यात सर्वांचेच डोळे मिटतात. धर्मशाळा चेक पोस्ट पाशी गरम गरम चहाची व्यवस्था आहे. तो घेऊन खावडा मध्ये आम्ही पोचतो आहोत तोपर्यंत दुपारचे 4 वाजून गेले आहेत. रणाला दिलेली भेट जरी संपली असली तरी एक प्रमुख आकर्षण अजून बघायचे राहिले आहे. आमचा गाईड जेंव्हा आता आपण कालो डुंगर किंवा Black hillकडे आता जाणार आहोत याची घोषणा करतो तेंव्हा मी जरा साशंकतेनेच त्याला तिथे काय आहे असे विचारतो. परंतु तिथे एक मंदिर आहे एवढीच माहिती मला मिळते. बस साधारण पूर्वेकडे जाणार्‍या एका रस्त्याकडे वळते. पुढचे 10 ते 15 किमी रस्ता असंख्य चढउतारांचा आहे. मात्र बाहेर दिसणारा आसमंत मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिसतो आहे. बाजूला दिसणार्‍या टेकड्या व दर्‍या या एकावर एक फरशा रचून तयार केल्या आहेत की काय असे दृष्य बाहेर दिसते आहे. 2001 च्या भूकंपात या दर्‍याखोर्‍यांमधे प्रचंड पडझड झालेली आहे व ती अजूनही अर्थात तशीच आहे. वाटेत एक टेकडी चुंबकीय टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. बसमध्ये मला तरी फारसे काही विशेष जाणवत नाही. बस वर पोचते व मुद्दाम तयार केलेल्या वाहन तळावर उभी राहते. आता येथून पुढे निदान अर्ध्या ते पाऊण किलोमीटर लांबीचा अगदी खड्या चढाचा रस्ता समोर दिसतो आहे. बसमधले बरेच जण गाठतात. मी नेटाने पुढे जाण्याचे ठरवतो. पहिल्या लागणार्‍या शिखरावर एक देऊळ आहे त्याच्याकडे मी फक्त एक दृष्टीक्षेप टाकतो व पुढे आणखी उंचावरील शिखराकडे चालू लागतो. या शिखरावर आसमंताचे निरीक्षण करण्यासाठी एक निरीक्षण चौथरा उभारलेला आहे.
या निरीक्षण चौथर्‍यावरून दिसणारे दृष्य मात्र इतके अप्रतिम आहे की वर येण्यासाठी घेतलेले कष्ट मी केंव्हाच विसरलो आहे. माझ्या अगदी डावीकडे अगदी पार क्षितिजापर्यंत धवल मरूभूमी पसरलेली मला दिसते आहे. त्याच्या एका कडेला थोडी मिठागरे आहेत. समोरच खावडा व कुवर बेट मार्गे पाकिस्तानातील सिंध प्रांत यांना जोडणारा इंडिया ब्रिज व त्याच्या मागे कुवर बेट दिसते आहे. इंडिया ब्रिजच्या उजवीकडे दिसते आहे अथांग रण. मात्र या उंचीवरून रणाचा हा भाग वैराण मरूभूमी दिसत नसून निळसर ग्रे रंगाचा एक अथांग सागर वाटतो आहे. या सागराच्या किनार्‍यावरील कडा खर्‍या समुद्रकाठी लाटांच्या फेसामुळे दिसतात तशा पांढर्‍याशुभ्र दिसत आहेत. मात्र येथे त्या तशा साचलेल्या मिठामुळे दिसत आहेत. या जागेवरून रण हे एखाद्या समुद्राच्या खाडीसारखे दिसते आहे. कोण्या जादूगाराने करावा तसा हा प्राकृतिक दृष्टी विभ्रम निसर्ग मला दाखवतो आहे.
नंतर तिन्हीसांजाच्या सुमारास मी कॅम्पवर परत पोचतो, गुजराथी जेवणाचा आस्वाद घेऊन आणखी एक सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम डोळे मिटू लागेपर्यंत बघतो. परंतु अंथरुणावर पडल्यावर मला निद्राधीन होण्यासाठी बरीच वाट बघावी लागते. रण, भारतीय सीमा आणि कालो डुंगरच्या माथ्यावरून दिसणारे अशक्यप्राय दृष्य हे सर्व माझ्या नजरेसमोरून बाजूला व्हायलाच तयार नाहीत.
उद्या मी परत भूजकडे जाण्यासाठी निघणार.
(क्रमश)