Sunday, 13 September 2026

लोक म्हणती




 माझी आई कै. शांता आठवले ही एक अतिशय प्रतिभावान कवयित्री होती. तिने 1946 या वर्षी लिहिलेल्या एका कवितेचे अवचित स्मरण मला सध्याची जागतिक पातळी वरची युद्धजन्य परिस्थिती पाहून झाले. ज्या देशांत युद्धाचा भडका उडला आहे तेथील निष्पाप नागरिकांचे हाल होत आहेत आणि ते जीव गमावत आहेत. आपण दुसर्‍या देशातले दूरस्थ लोक या बातम्या ऐकत आहोत व त्यांना कारणे प्रदान करत आहोत. हे या कवितेचे सूत्र आहे. ही कविता वाचकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.


“लोक म्हणती”

ऐकु येती आवाज बंदुकांचे
लाठि काठी ही तशी नित्य नाचे
म्हणूनि माते धडधडे तवहि छाती
लोक म्हणती संगीत मेध गाती
अमानुषता ही जाळीते जिवाला
बघ्नि अन्याया क्रोध तुला आला
नेत्रज्वाला अंतराळात जाई
लोक म्हणती नाचे चपलता ही
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे
बळी पडती निष्पाप तुझी बाळे
म्हणुनि नयनातुनि गळति अश्रुधारा
लोक म्हणति पडति या वर्ष धारा
आज मानवता दिसतसे पिडीत
आदिमाये सहभागी तूच त्यांत
दाविसि सक्रिय सहानुभुती
लोक म्हणति संकटे सर्व येती
घरहि फिरतां फिरतात सर्व वासे
लोक म्हणति आज हे सार्थ भासे
1946
कै. शांता आठवले 

माझ्या आईच्या निवडक कविता या ब्लॉगच्या  " माझ्या आईची कविता" या पृष्ठावर वाचता येतील.


एआय च्या मदतीने संगीताचा साज चढवलेली ही कविता  यू ट्यूब वर खालील दुव्यावर ऐकता येईल. जरूर ऐका. 

03/03/2026

Friday, 8 May 2026

सकाळची शोभा

 सकाळची शोभा

(कवितेचे नाव कविवर्य कै. भा रा तांबे यांची क्षमा मागून)

{पुणे शहराची लोकसंख्या जरी आता पन्नास साठ लाखांच्या पुढे गेली असली तरी महानगरपालिकेचे कार्य अजून साधारण 1050-60 च्या आसपास लोकसंख्या होती त्या प्रमाणेच चालू असते असे माझ्यासारख्या सामान्य नागरिकास वाटते. यात घनकचरा विभाग हा तर अग्रम आहे. रस्त्यावरचे कचर्‍यांचे ठीग बघून म्हणावेसे वाटते.)

महापूर कचऱ्याचा येता कोण वाचु शके बरे I

प्लास्टिक ताटे बाटल्या पिशव्या जीव त्यात गुदमरे II

डबेडूबे खोकी पेयांची थर्मकोलात सजती I

त्याज्य अन्नपदार्थही शिळे मधून फणा काढती II


आक्रमिले पदपथ भूमितल अन् पथ किनारे I

सडा घालती वर शुष्क पर्ण विविध आकारे II

चिवडती निवडती कचरा हा कार्मिक हातानी I

का न पुरवितो यंत्रे यास्तव आम्ही ही व्यथा मनी II

7 मे 2026
_______