माझी आई कै. शांता आठवले ही एक अतिशय प्रतिभावान कवयित्री होती. तिने 1946 या वर्षी लिहिलेल्या एका कवितेचे अवचित स्मरण मला सध्याची जागतिक पातळी वरची युद्धजन्य परिस्थिती पाहून झाले. ज्या देशांत युद्धाचा भडका उडला आहे तेथील निष्पाप नागरिकांचे हाल होत आहेत आणि ते जीव गमावत आहेत. आपण दुसर्या देशातले दूरस्थ लोक या बातम्या ऐकत आहोत व त्यांना कारणे प्रदान करत आहोत. हे या कवितेचे सूत्र आहे. ही कविता वाचकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे.
“लोक म्हणती”
ऐकु येती आवाज बंदुकांचे
लाठि काठी ही तशी नित्य नाचे
म्हणूनि माते धडधडे तवहि छाती
लोक म्हणती संगीत मेध गाती
अमानुषता ही जाळीते जिवाला
बघ्नि अन्याया क्रोध तुला आला
नेत्रज्वाला अंतराळात जाई
लोक म्हणती नाचे चपलता ही
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे
बळी पडती निष्पाप तुझी बाळे
म्हणुनि नयनातुनि गळति अश्रुधारा
लोक म्हणति पडति या वर्ष धारा
आज मानवता दिसतसे पिडीत
आदिमाये सहभागी तूच त्यांत
दाविसि सक्रिय सहानुभुती
लोक म्हणति संकटे सर्व येती
घरहि फिरतां फिरतात सर्व वासे
लोक म्हणति आज हे सार्थ भासे
1946
कै. शांता आठवले
माझ्या आईच्या निवडक कविता या ब्लॉगच्या " माझ्या आईची कविता" या पृष्ठावर वाचता येतील.
https://akshardhoolmarathi.blogspot.com/p/blog-page_96.html
03/03/2026
