श्रद्धांजली
कै. माधव धनंजय गाडगीळ
तसे बघायला गेले तर माझा आणि माधवचा संपर्क तुटल्याला नाही म्हटले तरी 20/25 वर्षे झालीच होती. तरी त्याच्या जाण्याच्या बातमीने मन काही क्षण का होईना प्रचंड हेलावून गेले. 1940 च्या दशकात एरंडवण्याच्या माळावर घरे बांधून जे थोडेफार लोक रहात होते त्यात धनंजयराव गाडगीळ, दिनकर कर्वे आणि माझे आजोबा हे प्रमुख होते. माझ्या आजोबांचा कारखानाही तिथेच होता. त्यामुळे साहजिकच मी, माधव आणि गौरी कर्वे या तिघांची घट्ट मैत्री असणे क्रमप्राप्तच होते. रोज संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी आम्ही एकमेकाच्या सहवासात असायचो. सुट्ट्या लागल्या की पत्ते खेळणे, किंवा गणपती दिवाळी सारखे सण सगळे एकत्र साजरे करायचो.
माधव जात्याच प्रचंड हुशार होता. घरची खानदानी श्रीमंती दोन्ही बाजूनी असली तरी तो अतिशय साधा होता. उंच उडी हा खेळ प्रकार त्याला खूप आवडे. दर वर्षी शाळेला तो एक तरी पदक हमखास मिळवून द्यायचा. त्याला घरी प्रॅक्टिस करता यावी यासाठी त्याच्या वडिलांनी मुलांसाठी एक खास हाय जंप पिट बनवून घेतले होते. संध्याकाळी आम्ही मुले बेसबॉल खेळायचो. त्यात सुद्धा त्याचा फटका म्हणजे होम रन हे ठरलेलेच होते.
माधवला दऱ्या खोऱ्यात भटकण्याची प्रचंड आवड त्यामुळे शाळा कॉलेजांच्या वर्षांत वेताळ टेकडीवर आम्ही संध्याकाळी मनमुराद भटकायचो.
माधवला प्राणीशास्त्र विषयाची अतिशय आवड. कॉलेजात गेल्यावर प्रॅक्टिस म्हणून तो झुरळे, उंदीर यांचे डिसेकशन सुद्धा घरी करायचा. माधव माझ्या एक वर्ष पुढे असल्याने तो त्याच्या नोट्स मला नेहमी देत असे. मला अभ्यासाला खूप उपयोग व्हावा म्हणून.
माधवला वाचनाचीही अत्यंत आवड होती. आम्ही सर्वजण मराठी माध्यमातून शिकलेले असल्याने माधवाकडे पु ल, गंगाधर गाडगीळ, अनंत काणेकर या सारख्या प्रतिथयश लेखकांची पुस्तके होतीच पण या शिवाय इतरही अनेक पुस्तके मी वाचली होती.
माधवचा विवाह पुढे आमच्या वर्गातल्या सुलोचना फाटक हिच्याशी झाला. आणि तो अमेरिकेला गेला. डॉक्टरेट मिळाल्यावर तो परत आला आणि बंगळूर च्याच IISC मध्ये कार्य करू लागला. मी त्याच्या मल्लेश्वरम मधल्या घरी एकदा भोजनास गेलो होतो. तिथेही त्याचे साधेपण लक्षात. येण्यासारखे होते. निवृत्त झाल्यावर तो पुण्याला आला पण जुन्या घरात न राहता पाषाणला त्याने घर बांधले. नंतर आमचा संपर्क तुटल्यासारखाच झाला. पुण्याला परत आल्यावर एकदा तो माझ्याकडे भोजनास आला होता व नंतर त्याच्या मुलीच्या लग्नात त्याने अत्यंत साधेपणाने सेनापती बापट रस्त्यावरील घराच्या अंगणात नियोजित केलेल्या स्वागत समारंभात झालेली आमची भेट शेवटची म्हणावी लागेल. दोन महिन्यापूर्वी त्याची पत्नी सुलोचना निवर्तली व आता माधवही गेला.
माधवच्या जाण्याने मनातला स्मृतींचा एक भाग कायम हरवला यात शंकाच नाही.
या श्रद्धांजलीने त्याच्या आठवणींना थोडा फार उजाळा एवढेच माझ्या हातात आहे.
कालाय तस्मै नमः
9 डिसेंबर 2025