Monday, 22 December 2025

काळया टोळ

काळया टोळ 
(Robinia pseudoacacia)

माझ्या घराच्या फाटकाच्या बाहेर एक मोठा वृक्ष आहे. चांगला 60 ते 70 फूट उंच तरी असावा. खोड पांढरट पण अत्यंत खडबडीत किंवा त्याच्यावर खालपासून वरपर्यंत उभ्या रिजेस  दिसतात. वृक्ष उंच असल्याने पाने, फुले दिसत नाहीत. 
या वृक्षाने पाच सहा वर्षांपूर्वी एका मोठ्या त्रासापासून आम्हाला वाचवले होते.  पुण्यातल्या कर्वे रत्यावर मेट्रोचे काम चालू झाल्यावर तिथला ट्रॅफिक आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून सुसाट न्यायचा अशी योजना पोलिसांनी कार्यवाहीत आणली होती. यासाठी सर्व रस्ते शक्य तितके रुंद केले गेले होते. त्यामुळे कडेचे पदपथ उखडून टाकण्यात आले होते. त्यामुळे अवजड वाहने अगदी घराजवळून जातील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण या योजनेत हा वृक्ष मोठाच अडसर ठरला. वृक्षामुळे चार फूट रुंदीचा का होईना, पदपथ ठेवणे भागच पडले होते. 

या कारणामुळे या वृक्षाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आमच्या मनात निर्माण झालेलाच आहे.
दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेने या वृक्षाच्या रस्त्यावर आलेल्या अजस्त्र फांद्या कापून टाकल्या व पालापाचोळा रस्त्यावरच पडून राहिला. तो सहज बघताना माझ्या लक्षात आले की ही पाने बरीचशी कॅशियाच्याच पानांसारखी दिसत आहेत. मग जरा शोध घ्यायचा ठरवला. तेंव्हा समजले की याला काळया टोळ किंवा Robinia pseudoacacia असे नाव आहे. गमतीची गोष्ट म्हणजे याचे लाकूड अत्यंत टणक असते व त्यामुळे इमारती किंवा फर्निचर बनवायला वापरतात.

याला ब्लॅक लोकस्ट असेही म्हणतात. फुले कॅशिया सारखीच पांढरी गुलाबी पण आकाराला लहान असतात. फुलांना सुवास असतो व किड्यांना हे झाड प्रिय असते. शेंगा चपट्या असतात व प्रत्येक शेंगेत दोन बिया असतात. पान संयुक्त पर्ण प्रकाराचे असते. मधल्या देठाला विरुद्ध दिशेला येणाऱ्या पर्णिका एकाआड एक फुटलेल्या असतात. फांदीला फुटलेली संयुक्त पाने तशीच एकाआड एक विरुद्ध बाजूला फुटलेली दिसतात. झाड खूपच उंच असल्याने एखाद्या डहाळीचा  फोटो काढणे कठीणच होते परंतु खाली पडलेल्या एका डहाळीचा फोटो मिळाला. पानांचा विपुल कचरा हे झाड फेब्रुवारी मार्च मध्ये करते. 
या झाडाचाच भाऊ असलेला हनी लोकस्ट हा वृक्ष आहे व दोन्हीमध्ये फक्त शेंगांचा आकार निरनिराळा असतो. हनी लोकस्ट ची पाने फुले खातात पण ब्लॅक लोकस्ट विषारी मानला जातो. 
पुण्यात या वृक्षाला रानटी समजतात पण इतर देशात याची लागवड होते. 
असे हे काळया टोळचे पुराण
23/12/2025