Friday, 14 November 2025

नवीन मराठी शाळेचे दिवस

 


(प्रतिमा विकिमीडिया कॉमन्स, वापर करण्यासाठी अंडर ओपन जनरल लायसेन्स)

आज मी वाचकांना एका जुन्या कालखंडात घेउन जाणार आहे. हा काल म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पुढची काही वर्षे आहेत. मी अर्थातच त्यावेळी  अतिशय लहान वयाचा होतो. माझा जन्म स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झालेला असल्याने स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा मी माझे शालेय जीवन नुकतेच सुरु केले होते.

माझे वय साधारण तीन किंवा चार वर्षे असताना माझ्या आईने हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार या शाळेत मला प्रवेश घेउन दिला होता. माझी आई त्या वेळेस या संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत होती. हे शिशुविहार त्या वेळेस डेक्कन जिमखाना मैदानाच्या बाजूला असलेल्या क्रिकेट-नेस्ट नावाच्या एका हॉल मध्ये भरत असे. त्या वेळेस नवीनच प्रचलित झालेल्या मॉन्टेसोरी बाईंच्या शिक्षण पद्धतीने ही शाळा मुलांना हसत खेळत शिक्षण देत असे. या पद्धतीचे शिक्षण नवीन असल्याने काय हे नवीन खूळ?  अशीच या शाळेबद्दल साधारण लोकांचे मत होते. परंतु आमच्या घरातील जवळ जवळ सर्व मंडळीं शिक्षण क्षेत्रातील असल्याने या मॉन्टेसोरी शिक्षण पद्धतीला सर्वांचा पाठिंबा असला पाहिजे. त्या वेळेस आमच्या घरात सर्व विषय चर्चा करून निर्णयाप्रत येत. आताप्रमाणे फक्त आईवडिलांनी मुलांसंबंधी निर्णय घेण्याची पद्धत नसे. अर्थातच या शाळेसंबंधी काहीच आठवणी मला नाहीत.

या शाळेत दोन वर्षे काढल्यावर आता पुढे काय? असा प्रश्न घरात सगळ्यांना पडला. त्या वेळेस पुण्यात डेक्कन जिमखान्यावरच बाल शिक्षण मंदीर म्हणून प्राथमिक शाळा होती.  परंतु मला तेथे न घालता शनिवार पेठेत असलेल्या नवीन मराठी शाळेत घालण्याचे ठरवले गेले. ही शाळा पुण्यातील एक अत्यंत जुनी प्राथमिक शाळा म्हणून गणली जात होती.  या शाळेची अजुनही वापरात असलेली इमारत 1919 साली बांधली गेली होती.

1949 मधल्या गुढी पाडव्याच्या दिवशी आई मला या शाळेत घेउन गेली. तिथे गेल्यावर साने सर म्हणून मुख्याध्यापक होते त्यांना भेटलो. त्यांनी मला काही जुजबी प्रश्न विचारले व शाळेत बसवा म्हणून सांगितले. त्या दिवशी पाटीपूजा होती ती करुन मी आईबरोबरच परत घरी आलो. माझा दुसरीचा अभ्यास तयार असल्याने मला थेट दुसरीत बसवावे असे आईचे मत होते. परंतु शाळेला ते मान्य न झाल्याने मला पहिलीत बसवले गेले. शाळेचा हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल कारण 1959 साली मी जेंव्हा अकरावी मॅट्रिक झालो तेंव्हा माझे वय 16 वर्षे एवढेच होते. आमच्या वर्गातील बहुतेक मुले तेंव्हा 17 वर्षे पूर्ण झालेली होती. त्यामुळे जर नवीन मराठी शाळेने मला दुसरीत बसवले असते तर मी 15 व्या वर्षीच 11वी झालो असतो व ते योग्य ठरले नसते.

त्या दिवशी आईबरोबर जाउन मी घरी परत आलो खरा पण दुसर्‍या दिवशी शाळेत जाण्याची मला प्रचंड भिती वाटू लागली. शाळेची ती भव्य इमारत, बरीच मुले असलेले वर्ग, अनोळखी वातावरण या सगळ्यामुळे शाळेत जाउच नये असे वाटू लागले. परंतु इलाज नव्हता व त्यामुळे रडत रडतच मी शाळेत जायला पाटी घेउन तयार झालो. त्यावेळेस पहिली दुसरीला फक्त पाटी पेन्सिल घेउन शाळेत जावे लागे. पुस्तक वह्या वगैरे काही नसतच. काही मुले डबल पाटी आणत. परंतु माझ्याकडे सिंगल पाटीच होती. एवढ्या लांबच्या शाळेत जायचे कसे? हाही एक प्रश्नच होता. आदल्या दिवशी मी आईबरोबर टांगा करुन गेलो होतो. आता रोज कसे जाणार? हे कळत नव्हते. तेंव्हा आईवडील मुलांना शाळेत सोडत नसत. सगळी मुले चालत शाळेत येत. मी खूपच लांब रहात असल्याने मला हे शक्य नव्हते. परंतु  आश्चर्य म्हणजे नवीन मराठी शाळेची बस होती व त्या बसने जाणे मला शक्य होते. पहिला आठवडा आमच्या कारखान्यातील कोणीतरी माझी नेआण केली असावी पण त्यानंतर मी बसने शाळेत जाउ लागलो. बसचा स्टॉप कुठे होता? वगैरे आता काही आठवत नाही.

त्या वेळच्या पुण्याच्या लोकसंख्येच्या मानाने पुण्यातल्या शाळा कॉलेजे अतिशय प्रशस्त आणि भव्य होती यात शंकाच नाही. आमची शाळाही याला अपवाद नव्हती. प्रशस्त आयताकृती दुमजली दगडी इमारत. खालच्या मजल्यावर पहिली दुसरी व वरच्या मजल्यावर तिसरी चौथीचे वर्ग असत. निदान चार किंवा पांच तुकड्या प्रत्येक वर्गाच्या होत्या. इमारतीच्या मध्यभागी एक प्रोजेक्शन होते. यात तळमजल्यावर मुख्याध्यापक असलेल्या साने सरांचे ऑफिस व वर जायला जिने होते. वरच्या मजल्यावर टीचर्स रूम होती.

इमारतीच्या पुढच्या बाजूस प्रशस्त वाळू पसरलेला मोकळा भाग होता या भाग आणि  दुसर्‍या बाजूस शनिवार पेठेतील  रस्ता या दोन्हीमध्ये मध्यभागी एक छोटी पण सुंदर बाग तर उजव्या बाजूला मातीकाम वर्गाची शेड होती. तर डाव्या बाजूला टोकाला साने सरांचा बंगला होता. आत जाण्यायेण्याची प्रवेशद्वारे बगिचा व मातीकाम शेड आणि बगिचा व साने सरांचा बंगला या मध्ये होती.  शाळेच्या मागच्या बाजूला मुठा नदी पात्रापर्यंत विस्तारलेले मोठे पटांगण होते. आता हे पटांगण आणि नदीपात्र यात अनेक इमारती व रस्ते झाले आहेत त्यामुळे त्या वेळी हे पटांगण एवढे मोठे असेल अशी कल्पनाही करता येत नाही. या पटांगणाच्या कडेला स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याचा मोठा हौद असे. त्याला अनेक तोट्या लावलेल्या असत. या तोटीला तोंड लावूनच सर्व मुले थेट पाणी पीत. एका बाजुला मुले पाणी पीत तर दुसर्‍या बाजूला मुली पाणी पीत. वॉटर बॉटल वगैरे प्रकार कोणी पाहिलेलेच नव्हते. आमच्या घरी वडील होमगार्ड मध्ये असल्याने एक वॉटर बॉटल होती पण एकतर ती पत्र्याची होती व आकारही खूप मोठा होता. स्वच्छता गृहे फारशी वर्णन करण्यासारखी होती असे वाटत नाही पण त्या वेळेच्या एकंदर सार्वजनिक स्वच्छतेच्या कल्पनेच्या मानाने ठीक होती. असेच म्हणावे लागेल.

शाळेतील मातीकामाची शेड हे नवीन मराठी शाळेचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. सिमेंट कॉन्क्रीट्ची लांबलचक टेबले व बाजूला ओटे  चारी बाजूंना या शेडमध्ये बांधलेले होते. त्यावर संपूर्ण वर्ग बसू शकत असे. मध्यभागी शिक्षक एका टेबलावर प्रात्यक्षिक करून दाखवत. प्रत्येक मुलाला चिकण मातीचा एक गोळा  शिपाई आणून देत असे. या गोळ्यातून निरनिराळे आकार करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना शिक्षक दाखवत. माझे कौशल्य बॉल, केळे, बॅट या पलीकडे फारसे कधी गेले नाही. परंतु हातात कला असलेली मुले अगदी गणपती मूर्तीपर्यंत अनेक गोष्टी बनवत असत. या शिवाय चित्रकला, गायन या कलांचे निराळे वर्ग होते कां नाही? हे मला नीट आठवत नाही.  

शाळा सोमवार ते शुक्रवार 11 ते 5 व शनिवारी अर्धा दिवस भरे. मध्ये दोन सुट्ट्या असत. छोटी सुट्टी व मधली सुट्टी. खेळ वगैरे सर्व याच वेळेत होत असे. हे सगळे जरी आता छान वाटत असले तरी तो काळ म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून जेमेतेम एक दोन वर्षे झालेलाच असल्याने शिक्षण पद्धती वगैरे ब्रिटिश काळासारखेच होते. शाळेत शिस्तीला सर्वोच्च महत्त्व होते. शाळेच्या आवारात दंगा मस्ती करणे, वर्गात हसणे वगैरे प्रकार अजिबात चालत नसत.

पहिली व दुसरीमध्ये स्त्री शिक्षिका असत व तिसरी चौथीला पुरुष शिक्षक असत. पहिली दुसरीला वर्गशिक्षिकाच सर्व विषय शिकवित. सर्व शिक्षक, विशेषतः पुरुष शिक्षक, मुलांना शिक्षा सर्रास करत असत. बाकावर किंवा वर्गाबाहेर उभे करणे. पायाचे आंगठे धरून ओणवे उभे राहणे हे सामान्य होते.  चौदावे रत्न दाखवणे सुद्धा सर्रास चाले. काही शिक्षक हातावर छड्या मारत असत. काही कानशिलात ठेवून देत असत. तिसरीमध्ये चटावर आलेला एका शिक्षकाने मला इतक्या जोरात थोबाडीत ठेवून दिली होती की माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः काजवे चमकले होते. हा प्रसंग मला अजुनही स्पष्टपणे स्मरतो. या प्रसंगाशिवाय बाकी कधी फारशी शिक्षा झालेली मला स्मरत तरी नाही.  वर्गाबाहेर उभे असलेली मुले साने सरांना दिसली की हातावर छडीचा मार मिळाल्याशिवाय रहात नसे. सानेसर त्यांच्या फेरीवर हातात छडी घेउनच फिरत असत.  मुलींना मात्र या शिक्षा प्रकरणातून सूट मिळत असे.

शाळा मुलामुलींची असली तरी मुले व मुली एकमेकाशी संभाषणही करत नसत. अगदी बहिण भाऊ शाळेत असले तरी एकमेकाशी बोलत नसत. मुलांचे आणि मुलींचे खेळ वगैरे इतर सर्व अ‍ॅक्टिव्हिटी निरनिराळ्या असत. मला आमच्या वर्गात असलेल्या एकाही मुलीचे नाव सुद्धा माहीत होते की नाही ते आठवत नाही. आता तर स्मृतीला कितीही ताण दिला तर फक्त काही थोड्या मुलांची नावे आठवतात. एकाही मुलीचे नाव, आडनाव काहीही आठवत नाही.

शाळेत दुसर्‍या इयत्तेत गेल्यावर एक अशी वैयक्तिक घटना घडली जिने माझे सर्व भविष्यच ढवळून टाकले. पुढे मी काय करणार? यापासून ते माझ्या आवडीनिवडी, शाळेत मला मिळणारी इतर मुलांकडून मिळणारी वागणूक या सर्व गोष्टींवर या घटनेचा सखोल परिणाम झाला.

वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या इयत्तेच्या वार्षिक परिक्षेत मला अतिशय उत्तम गुण मिळालेले असल्याने मला इयत्ता दुसरीच्या अ तुकडीत घातले गेले होते. या इयत्तेचे वर्ष सुरू झाल्यावर पावसाळ्याच्या दिवसात अचानक कोणाचा तरी संसर्ग होऊन माझे डोळे आले. रोगाची तीव्रता इतकी प्रचंड होती की डोळे लालभडक होऊन त्यातून  काहीतरी चिकट द्रव बाहेर येऊ लागला. डोळे उघडून बघणे सुद्धा अशक्य झाले. त्यावेळेस सेवासदन चौकाजवळ दवाखाना असलेले डॉ. आपटे आमचे फॅमिली डॉक्टर होते. ते होमिओपॅथिक औषधे देत. त्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु फरक पडेना. शेवटी त्यांनी टिळक रोड वर हॉस्पिटल असलेल्या डॉ. फाटकांकडे जाण्याचा सल्ला दिला. डॉ. फाटक मूळ गायनॅक डॉक्टर असले तरी स्त्री, पुरुष, मुले सर्वांना तपासून अ‍ॅलोपॅथिक औषध योजना करत असत. त्यांनी डोळे तपासून पेनिसिलिन ऑइंट्मेंट डोळ्यात घालावयास सांगितले. तेंव्हा हे एकच अ‍ॅन्टिबायॉटिक उपलब्ध होते. या ऑइंटमेंटने मात्र लगेच गुण आला व माझे डोळे बरे झाले व मी शाळेत परत जाउ लागलो.

यानंतर धोड्याच दिवसात दुसरीची तिमाही परीक्षा झाली व निकाल लागल्यावर सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पहिलीच्या परिक्षेत अत्यंत उत्तम गुण मिळवणारा मी जेमतेम काठावर पास झालो होतो. एकदोन विषयात तर मी अनुत्तीर्ण झालो होतो. यानंतर माझी आई शाळेत वर्गशिक्षिकांना भेटावयास आली तेंव्हा तिला आणखी धक्की बसले. वर्गशिक्षिकेच्या मताने माझी अभ्यासात लक्ष नसते टिवल्या बावल्या करतो. मी गृहपाठ नीट करत नाही व वर्गात विचारलेल्या प्रश्नांचीही मी नीट उत्तरे देत नाही अशा अनेक तक्रारी त्यांनी आईकडे केल्या.

शाळेत आई काही बोलली नाही पण घरी आल्यावर रात्री जवळ बसवून तिने मला शांतपणे असे मी कां करतो आहे? असे विचारून माझ्याकडून सत्य जाणून घेतले. खरे तर या सगळ्या तक्रारींमागचे खरे कारण एकच होते. मला शिक्षिका फळ्यावर काय लिहित ते दिसतच नव्हते. मी पुढे बसवा म्हणून त्यांना सांगून बघितले होते परंतु त्यांनी माझे म्हणणे पार धुडकावून लावले होते.  यानंतर माझी आई व वर्गशिक्षिका यांत काय बोलणे झाले ते मला माहीत नाही पण एक दोन दिवसात मला पुढच्या रांगेत बसायला जागा मिळाली व मला थोडेफार कां होईना फळ्यावरचे दिसू लागलो.

यानंतर काही दिवसांनी आई मला अप्पा बळवंत चोकात एका वाड्याच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉ. साठे या नेत्रविशारदांकडे घेउन गेली. हा दवाखाना म्हणजे एक मोठा दिवाणखाना होता व टोकाला डॉक्टरांची तपासण्याची खोली होती. पेशंटना बसण्यासाठी लाकडी बाके असत. इथे गेल्यावर माझ्या डोळ्यांच्यात बाहुल्या मोठ्या करण्यासाठी अ‍ॅट्रोपिन नावाचे एक औषध एका मदतनीसाने टाकले व मला स्वस्थ बसून रहावयास सांगितले. एखाद्या सात आठ वर्षाच्या मुलाला काही न करता डोळे मिटून स्वस्थ बसून रहावयास सांगणे याच्याइतकी भयानक दुसरी शिक्षा नसेल. मी पार रडकुंडीला आलो आहे हे बघून आईने शेवटी माझ्याशी गप्पागोष्टी करायला सुरुवात केली होती. पुढची सात आठ वर्षे या प्रसंगाला मला अनेक वेळा तोंड द्यावे लागले हा भाग अलाहिदा.

डॉक्टरांनी एक जाड फ्रेम माझ्या डोळ्यावर चढवली व त्यात निरनिराळ्या नंबरांच्या काचा टाकून माझ्या डोळ्यांचे निदान केले. माझ्या दोन्ही डोळ्यांना दोन अडीच एवढा नंबर आला होता. व मला सतत चष्मा वापरणे आवश्यक होते.

त्या काळात चष्मा ही गोष्ट फक्त म्हातार्‍या माणसांनी वापरण्याची गोष्ट आहे असे समजले जात असे. तरुण मुलीला चष्मा असला तर तिचे लग्न जमविण्यात खूप अडचणी येत. माझ्या एका मावशीचे लग्न चष्मा असल्याने अनेक दिवस जमत नव्हते. लहान वयात चष्मा लागणे म्हणजे जवळ जवळ अपंगत्व आल्यासारखेच होते असे सर्वांना वाटे त्यामुळे मला चष्मा लागला हे कळल्यावर आमच्या नातेवाइकांपासून सगळ्यांना मोठा धक्का बसला. नातेवाईक येऊन भेटून गेले.  त्यावेळेला पुण्यात चष्म्याची दुकाने फारच कमी होती. लहान मुलांच्या फ्रेम्स तर मिळतच नसत. शेवटी एक दुकानदार मिळाला. तो मुलांच्या फ्रेम्स ठेवलेली एक पेटी घेऊन आला. फ्रेम्स मध्ये आवडीनिवडीला वावच नव्हता. फक्त साइझ बघायचा होता. सिल्व्हर कलर गोल फ्रेम, तशाच काड्या व काड्यांच्या टोकाला जो भाग कानामागे जातो तिथे स्प्रिंग सारखी काडी अशी चष्म्याची फ्रेम होती.  सात आठ दिवसांनी चष्मा आला. तो लावल्याबरोबर अनेक दिवसांनी मला परत स्पष्ट दिसू लागले असल्याने अतिशय आनंद झाला.  नंतर थोड्याच दिवसात माझा अभ्यास, गृहपाठ सर्व पूर्ववत झाले. परत उत्तम गुण मिळू लागले व सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. हा चष्मा मला अजिबात आवडला नव्हता. त्याने खूपच बंधने माझ्यावर आली ती मला आवडत नव्हती. त्यानंतर कित्येक दिवस मी आरशातही बघत नसे.  

चष्म्याने अभ्यास सुधारला हे जरी खरे असले तरी मी तेंव्हा इतर अगणित गोष्टी गमावल्या हेही तितकेच खरे आहे. शाळेत खेळ, कलागुणदर्शन या सर्वातून मी वगळलो जाउ लागलो. खेळांच्या स्पर्धा, वक्तृत्व यात आता प्रेक्षकाची भूमिकाच माझ्या वाट्याला येऊ लागली. सर्वात मुख्य म्हणजे इतर मुलांकरवी केली जाणारी टिंगल टवाळी, हेटाळणी याचा मी कायमचा धनी झालो. या सर्वाचा माझ्या व्यक्तिमत्वावर प्रचंड परिणाम होऊ लागला व आत्मविश्वास कमी होऊन एक प्रकारचा न्यूनगंड माझ्यात निर्माण झाला. हा न्यूनगंड जाण्यासाठी अनेक वर्षे पुढे मला वाट बघावी लागली. मैदानी खेळ वगैरेबद्दल नावड निर्माण झाली व पुस्तके वाचण्यातच माझे मन जास्त रमू लागले. माझे वडील क्रिकेट खेळाडू होते. माझ्या लहानपणी सुद्धा ते डेक्कन जिमखान्याच्या एका टीम मधून खेळत. त्यांनी मला कधी बोलून दाखवले नाही पण मला चष्मा लागल्याने त्यांची माझ्याबद्दल बरीच निराशा झाली असावी असा त्यांच्या  मित्रांच्या काही कॉमेंट्स वरून मला नेहमी वाटत असे. कदाचित मी क्रिकेट खेळेन अशी त्यांची सुप्त इच्छा असावी.

शाळेत माझ्याबरोबर वर्गात जी मुले होती त्यातील बहुसंख्य शाळेच्या अवतीभवती शनिवार नारायण या पेठांत रहाणारी असल्याने आणि मी एरंडवण्यातून बसने येणारा असल्याने आमचे कधी फारसे जुळलेच नाही. मला फक्त दोन तीन मुलेच आठवतात. मधु गुप्ते, जयंत साने, राजा देवधर एवढीच नावे आठवतात. या शिवाय भांडारकर म्हणून एक जण ही माझा मित्र होता. त्याचे वडील शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. हा भांडारकर मोलेदिना रोडवर दोराबजीच्या दुकानासमोर जी सरकारी निवासस्थाने आहेत तेथे रहात असे. त्याच्या एका वाढदिवसाला शाळेतून बसने थेट त्याच्या घरी गेल्याची मला आठवण आहे.  मित्रांपैकी फक्त जयंत साने याच्याशी माझा अजून कॉन्टक्ट आहे. बाकी सर्व विस्मरणाच्या पडद्याआड केंव्हाच गेले आहेत. माझ्या माध्यमिक शाळासोबत्यांपैकी प्रमोद तांबे व वासुदेव केंच हे ही नवीन मराठी शाळेत होते असे मला नुकतेच समजले. परंतु त्यांची तेंव्हाची काहीही आठवण मला नाही. कदाचित ते दुसर्‍या तुकडीत असावेत.

शाळेत मी तीन वर्षे काढली खरी पण तेंव्हाच्या इतर काहीच आठवणी मला नाहीत. पुढे काही अडचण न आल्याने शाळेने मूलभूत किंवा बेसिक शिक्षण उत्तमच दिले असावे. मराठी भाषा आणि अंकगणित हे विषय मला उत्तम समजत असे वाटते. आमच्या चौथीच्या वार्षिक परिक्षेचा निकाल लागला तेंव्हाची एक आठवण मात्र मला आहे. निकाल लागल्यावर त्याची कार्डे वर्गशिक्षकांनी आम्हाला दिली व आम्हाला ओळीने शाळेसमोरच्या प्रांगणात नेले. तेथे मुलांची एक व मुलींची एक अशा दोन रांगा केल्या. नंतर आम्ही ओळीने शाळेच्या फाटकाबाहेर पडलो. मुलींची रांग डावीकडे वळून अहिल्यादेवी हायस्कूल कडे गेली तर मुलांची आमची रांग समोरचा रस्ता ओलांडून समोरच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे गेली. आमच्या वर्गशिक्षकांनी आम्हाला तिथल्या शिक्षकांच्या हवाली केले. अशी आमची 5 वीची अ‍ॅडमिशन झाली. पालकांना यावे लागले नाही. कसले फॉर्म्स भरावे लागले नाहीत. आहे की नाही कमाल! आजच्या पिढीला खरेही वाटणार नाही.

14 नोव्हेंबर 2025