काही
महिन्यांपूर्वी प्रथमच माझ्या पाहण्यात आलेल्या एका विलक्षण वनस्पतीबद्दल मी आज
लिहिणार आहे. पुण्याजवळच्या सिंहगड किल्याच्या पायथ्या जवळच्या एका गावात ही
वनस्पती मला आढळली. अशा प्रकारची वनस्पती मी आधी कधीच बघितलेली नसल्याने मला ती
मोठी रोचक वाटली. हाताने ओढल्यावर ही वनस्पती अगदी सहज हातात आल्याने ती मी
प्लॅस्टिकच्या पिशवीतून घरी आणली व घरी एका आठ इंच आकाराच्या कुंडीत तिचे रोपण
करुन टाकले.
चार पाच दिवस
वाट बघितल्यावर ही वनस्पती माझ्याकडे कुंडीत वाळून न जाता चांगली स्थिरावली आहे हे लक्षात आले व स्वस्थ मनाने मी
त्या वनस्पतीचे जास्त सखोल निरिक्षण करू लागलो.
या वनस्पतीचे
शास्त्रीय नाव Cyanotis cristata असले तरी
सर्वसामान्य नाव Crested Dew-Grass आहे. Crested cat ears असेही
या वनस्पतीचे आणखी एक नाव आहे. मराठी व मल्याळीमध्ये हिला नभाळी असे म्हणतात.
एशिया व आफ्रिका खंडातील विषुववृत्तिय डोंगराळ भागात ही आढळते. भारतात सह्याद्री व
हिमालयात 2000 मीटर उंचीपर्यंत ही दिसते.
जमिनीवर पसरत जाणार्या किंवा Ground cover creepers प्रकारातील ही वनस्पती
असली तरी Creeping Charlie प्रमाणे ही वनस्पती पसरत गेली तरी खालची जमीन पानांखाली झाकून
टाकत नाही. वनस्पतीला येणारी पाने ही मध्ये बरेच अंतर सोडून फुटत असल्याने एक मोठा
पसरलेला सांगाडा व त्याला मधून मधून फुटलेली पाने असेच काहीसे दृश्य दिसते. त्यामुळे ही वनस्पती कुंडीमध्ये कितपत वाढेल
याबद्दल मी साशंक होतो परंतु माझ्याकडची वनस्पती कुंडीबाहेर न जाता कुंडीतच पसरत राहिली.
या वनस्पतीकडे बारकाईने बघितल्यावर पर्णसदृश दिसणारे निरनिराळे भाग दिसतात.
यातील पाने कोठली असा प्रश्न मला साहजिकच पडला. थोडे वाचन केल्यावर हे समजले की या
वनस्पतीची पाने अंड्याच्या आकाराची पण जरा लांबसर आणि टोकदार असतात. पानांना देठ असा
नसतोच. ती फांदीलाच थेट फुटतात. पानांची लांबी पाच त दहा सेमी व रुंदी एक ते दीड
सेमी असते. फांदीवर पाने मध्ये बरेच अंतर सोडून फुटलेली दिसतात. वनस्पती जमिनीवर
पसरत असली तरी फांद्या अगदी सरळ ताठ होइपर्यंतच्या कोनांपर्यंत सरळ किंवा तिरप्या
ताठ उभ्या राहिलेल्या दिसतात. ही वनस्पती जागा नसली तर आडवी न पसरता उभी सुद्धा राहू
शकते.
या वनस्पतीचा सगळ्यात गंमतशीर भाग म्हणजे फांद्यांच्या टोकाला दिसणारे हिरवे पर्णिका
गुच्छ. मिटलेला जपानी हात-पंखा जसा दिसतो तसे काहीसे हे गुच्छ दिसतात. हे गुच्छ
साधारण अंड्याच्या आकाराचे असले तरी त्यावर असलेल्या पर्णिका (Spathe)
मात्र वळणदार (Curvy) आकाराच्या दिसतात. प्रत्यक्षात या
पर्णिका या वनस्पतीच्या फुलांवरची एकत्र आवरणें (Bract)
असतात. पर्णिकांच्या घड्यांमध्ये अनेक छोटी छोटी फुले कळीच्या स्वरुपात दडलेली
असतात. नभाळीचे हे गुच्छ पाहताना जरा सुद्धा कल्पना येत नाही की या गुच्छांच्या आत
अनेक फुले दडलेली असतात.
नभाळीची फुले अगदी छोटी म्हणजे जेमतेम
चार किंवा पाच मिमि व्यासाची असावीत.
जांभळट- निळसर रंगाच्या तीन मखमली पाकळ्या दिसतात व पाकळ्यांवर लांब लांब
तंतू दिसतात. मध्यभागी पिवळे धम्मक अग्र असलेले सहा पूं केसर असतात. फुले पहाटे किंवा
सकाळी उमलतात व सूर्य मध्यान्नावर येण्याआधीच कोमेजलेली दिसतात.
नभाळीला फळे येतात असे मी वाचले आहे पण अजून तरी दिसली नाहीत. नेटवरच्या
वर्णनाप्रमाणे ही फळे तीन किंवा चार मिमि व्यासाची व तीन बाजू असलेली असतात असे
वर्णन आहे. ही फळे पक्व झाली की स्फोट व्हावा तशी फुटतात व आतल्या सहा बिया दूरवर
फेकल्या जातात असे वाचनात आले. परंतु ही क्रिया अजून तरी मला निरिक्षण करता आलेली
नाही. एका संदर्भाप्रमाणे ही फळे खाण्यास योग्य समजली जातात. ही फळे व त्यांची बीज
दूरवर फेकण्याची क्रिया याची इतर कोणतीच माहिती किंवा छायाचित्र मला नेटवर मिळाले नाही.
नभाळीच्या पानांचा लेप सूज कमी करण्यासाठी होतो असेही वाचनात आले. याच्या
पानांची भाजी करतात तसेच पोह्यासारख्य्या पदार्थांत पाने चवीला टाकतात असेही
वाचले. अर्थातच वापरून बघितले नाही. परंतु पानांत कोणते तरी विषारी द्रव्य असल्याने
ही पाने खाउ नयेत असाही संदर्भ सापडला. त्यामुळे अगदी जाणकार अदिवासीं शिवाय कोणी ही
पाने खाण्यास धजावेल असे वाटत नाही.
माझ्याकडची वनस्पती तशी नवीनच आहे. जसजसे दिवस लोटतील तसतसे आणखी गुणधर्म
लक्षात आले तर अर्थातच पुढे लिहीनच. सध्यातरी एवढेच म्हणावेसे वाटते की एक रोचक
वनस्पती माझ्या बागेत आहे.
--------------




