भौतिकी मधील नवीन संशोधनाचा विचार केला तर 1905
या वर्षात आइनस्टाइनने या संशोधनाला एवढा मोठा हातभार लावला होता की हे वर्ष त्याने
घडवलेल्या चमत्कारांचे वर्ष होते असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. या वर्षानंतर
जगातील आघाडीच्या भौतिकी शास्त्रज्ञांच्या श्रेणीत आइनस्टाइनचे नाव घेतले जाऊ
लागले. यावेळी त्याचे वय फक्त 26 वर्षे एवढेच होते. त्या वर्षी त्याने 5 शोधनिबंध
तर प्रसिद्ध केलेच पण या शिवाय निरनिराळ्या जर्नल्स मध्ये 23 रिव्ह्यू लेख लिहिले.
विशेष म्हणजे हे सगळे त्याने पेटंट ऑफिसमधून घरी आल्यावर स्वत:च्या खाजगी वेळात
केले. शैक्षणिक क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना दाखवलेले हे कर्तुत्व उल्लेखनीयच
म्हटले पाहिजे. भौतिकीच्या जगात, काही वेळा वादग्रस्त असलेल्या त्याच्या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे
आइनस्टाइन भौतिकी शास्त्रज्ञांच्या श्रेणीत वरवर चढत गेला.
1666 मध्ये आयझॅक न्यूटनने असेच एक चमत्काराचे वर्ष घडवले होते. त्या वर्षात
न्यूटनने आपल्या गणित, गुरुत्वाकर्षण
आणि प्रकाश या विषयांतील भविष्यातील संशोधनाचा पाया रचला होता. न्यूटननंतर परत दुसर्या कोणत्याही वैज्ञानिकाने एवढे
महत्त्वपूर्ण संशोधन एका वर्षात सादर
केलेले नव्हते.
1905चे वर्ष सुरु झाले तेंव्हा आइनस्टाइन 25 वर्षांचा होता. तो लग्नाला 2
वर्षे पूर्ण झालेला एक कुटुंबवत्सल माणूस होता. त्याचा मुलगा हान्स अल्बर्ट हा एक
रांगते बाळ होता. आइनस्टाइनला कंटाळवाण्या स्वरुपाचे काम असलेली का होईना! पण
प्रतिष्ठित समजली जाणारी नोकरी होती. या सगळ्या सर्वसामान्य म्हणता येईल अशा
आयुष्यात आइनस्टाइनने भौतिकीबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढला हे विशेष म्हणावे
लागेल. कदाचित त्याचे अपार्टमेंट आणि पेटंट ऑफिस यामधे चालण्यासाठी त्याला 20
मिनिटांचा जो वेळ लागत असे त्या वेळात त्याने हा विचार केला असावा. किंवा 1
वर्षाच्या हान्स अल्बर्ट बरोबर खेळून
त्याला झोपवल्यावर रात्री भौतिकीमधील नव्या सिद्धांतांवर त्याने काम केले असावे. अल्बर्टने
म्हटले आहे की मिलेव्हा त्याला कामात मदत करत असे. परंतु आइनस्टाइनच्या संशोधनात
मिलेव्हाचा हातभार किती? याबद्दल नक्की माहिती आपल्याला नाही.
आपल्याला हे माहीत आहे की ते दोघे त्याच्या कल्पनांच्या वर चर्चा करत, मिलेव्हा त्याच्या कल्पनांवर आपले मत देत असे आणि त्या कागदावर
उतरवण्यासाठी मदत करत असे.
त्याच्या गडबडीच्या आयुष्यात भौतिकीवर विचार केंद्रित करण्यात तो कसा यशस्वी
झाला हे सांगणे कठिण असले तरी हे मात्र खरे की या विचारांतून 1905 मध्ये जे काही
निष्पन्न झाले त्याला नेत्रदीपकच म्हटले पाहिजे. या वर्षी आइनस्टाइनने जे 5
शोधनिबंध लिहिले ते भौतिकीच्या इतिहासात प्रसिद्ध झालेले सर्वात विद्वत्तापूर्ण
शोधनिबंध म्हणून ओळखले जातात. त्या शोधनिबंधापैकी एका निबंधाने आइनस्टाइनला पुढे डॉक्टरेट डिग्री मिळवून दिली
आणि अणूंचे खरोखरच अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यास मदत केली. दोन शोधनिबंधांनी
भौतिकीमधील एक नवे अभ्यासक्षेत्र- विशेष सापेक्षतावाद- अभ्यासकांसाठी खुले केले. या शोधनिबंधांनी
आइनस्टाइन जगप्रसिद्ध बनला. चवथ्या एका शोधनिबंधाने परागकणांच्या अनियंत्रित
हालचालीचे विलक्षण निरिक्षण – ब्राउनियन
मोशन – याचा संबंध अणूच्या आकाराशी जोडला. पाचव्या शोधनिबंधाने आइनस्टाइनला 1921
मधले भौतिकीसाठीचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पुंज सिद्धांत- क्वान्टम थिअरी -
वरील हा शोधनिबंध आधुनिक भौतिकीच्या पायाचा दगड बनला.
आपले शोधनिबंध प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत आइनस्टाइन आता नवशिका नव्हता. त्याचा
पहिला शोधनिबंध 1901 मध्ये प्रसिद्ध झाला होता व त्यानंतर त्याचे चार शोधनिबंध
प्रसिद्ध झाले होते. हे सर्व शोधनिबंध “अॅनालेन डेअर फिजिक” या अतिशय प्रतिष्ठित
मानल्या जाणार्या जर्मन जर्नल मधे छापले गेले होते. त्याचे शोधनिबंध किती
विस्मयकारक किंवा निदान वाचकांना डिवचणारे तरी होते याची आइनस्टाइनला कल्पना होती
किंवा नाही ते सांगणे कठिण आहे. त्याच्या ज्या शोधनिबंधामुळे त्याला पुढे डॉक्टरेट
मिळाली त्या शोधनिबंधाबद्दल आपला मित्र कॉनरॅड हाबिख्ट याला 1905 च्या मे महिन्यात
लिहिलेल्या पत्रात आइनस्टाइन लिहितो. “हा शोधनिबंध प्रकाशाचे उत्सर्जन आणि उर्जा
या संबंधीच्या गुणधर्मांची चर्चा करतो आणि
तो क्रांतिकारी आहे.” विशेष सापेक्षतावादावरील शोधनिबंधांबद्दल आइनस्टाइन म्हणतो.
“या शोधनिबंधांतील युक्तिवाद गमतीशीर आहे पण एखादवेळेस परमेश्वर या युक्तिवादाला
हसत असेल आणि मला दिशा दर्शवित असेल.”
--------------