Thursday, 26 March 2026

सृष्टिनिर्मितीचे गीत (नासदीय सूक्त, ऋग्वेद 10.129)

 


(छायाचित्र एआय निर्मित. प्रत्यक्षातील कोँणत्याही व्यक्तिशी, स्थानाशी आणि घटनेची कोणताही संबंध नाही.)

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९ वे सूक्त नासदीय सूक्त या नावाने परिचित आहे. केवळ सात ऋचांच्या ह्या लहानशा सूक्तात सृष्टीच्या पूर्वास्थितीचे आणि सृष्ट्युत्पत्तीबद्दलचे रचनाकार कवीचे मार्मिक विचार मांडलेले आहेत. त्याच प्रमाणे कवी त्याला पडलेले प्रश्नही येथे ऐकणार्‍याना किंवा वाचकांना विचारताना लक्षात येतो. सूक्ताचा रचनाकार कवी परमेष्ठी प्रजापती म्हणून जरी ऋग्वेदात सांगितलेला असला तरी याची मूळ रचना व नंतर त्यात केलेले बदल हे कवींच्या अनेक पिढ्यांनी केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय या सूक्ताची देवता परमात्मा, आणि छंद त्रिष्टुप् आहे असेही ऋग्वेद संहिता सांगते.

या सूक्ताचे साधारण ३ भाग करता येतात. पहिल्या ३ ऋचांचा एक भाग करता येतो.  येथे सृष्टी निर्मितीच्या आधीची परिस्थिती कशी व काय होती हे कवी आपल्या कल्पना शक्तीने रंगवताना दिसतो. शेवटच्या ३ ऋचांमध्ये कवी आपल्या मनाला पडलेले काही प्रश्न आपल्याला सांगताना दिसतो. ४ क्रमांकाच्या ऋचेचा अर्थ व संदर्भ खरेतर नीट स्पष्ट होत नाही. ती out of context  आणि अर्थ लावण्यास कठिण वाटते. या पुढे जाण्याआधी आपण संस्कृतमधील मूळ सूक्त बघूया.

नासदीय सूक्त (ऋग्वेद 10. 129)

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ 1

 

मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः ।

आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किं चनास ॥ 2

 

तम आसीत्तमसा गूळ्हमग्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् ।

तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥ 3

 

कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् ।
सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥ 4

 

तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासी३दुपरि स्विदासी३त् ।
रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥ 5

 

को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः ।
अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥ 6

 

इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न ।
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥ 7

 

-------------

 

या सूक्तामधील मूळ संस्कृत भाषा ही समजण्यास अतिशय कठिण व क्लिष्ट आहे. बराच प्रयत्न करून मी याचे मराठीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. मी केलेले भाषांतर खाली देतो आहे.

 

सृष्टिनिर्मितीचे गीत (नासदीय सूक्त, ऋग्वेद 10.129)

नव्हते नसणारे नव्हते असणारे अस्तित्वातच तेंव्हा

नव्हते धूलिकण नव्हते आकाश  दूरवरि जेंव्हा I

होते कां कसले आच्छादन अन् कुठे कशाचा आश्रय?

अस्तित्वातच कसे जल अथांग गहन होते शक्य? II 1


न मरण तेंव्हा न अमरत्वहि मिळे कशास

न होत्या दिनरात्री ऋतुकाल अन् मास I

प्रगट तरी होई कसे? ह्या निवांत निर्वातात

नच आणलेले अन्य वा परके, एकत्व स्वबळात II 2


प्रारंभी तमासि होता आच्छादित अंधार

अप्रगट जल होते इथे सर्वत्र अन् अपार I

रिक्तता झाकत होत्या ज्या महानता शून्यतेने

कल्पि मनि एकत्व नजन्मलेले ते तपाने II 3


आरंभी होती इच्छा जी करि प्रथम

महानतेच्या मनि कल्पितबीज उत्पन्न I

असतेपण नसतेपण यांत असे बाह्य बंधुत्व

अपेक्षी कवींना उमजे शोधून हृदि विचारे ते तत्व II 4


कोण धारक महान देई या बीजाची आहुति

कुणा अर्पिली ती कुठे खालती का वरती I

किरण पसरती का इथे या समर्पणामधून

विस्तारती का ते तिरपे कसे वरून वा खालून II 5


कोण निश्चित जाणे ही न जन्मलेली रचना

पुढे सांगू शके कोठुन येई कोठे वसे लोकी या I

अगोदर देवांच्याही आधी कशी ही इथे अवतरे

ये कोणा विसर्जने ही जो हे जाणे असा कोण असे II 6


रचना विशेष ही प्रगटे ज्या तत्त्वा कारणे

करिते का नच करिते धारित निर्मिती आपुलि ते I

जाणते का नचच जाणते ते तत्व या रचनेस

जरी असे ते सर्वोच्च मुख्य या अंतरिक्षात II 7

-----------

 

आपल्याला सहज समजू शकेल असे हे भाषांतर वाचल्यानंतर काही महत्वाच्या मुद्यांचा परामर्ष आपल्याला घेता येईल. या सूक्ताचा परिचय झाल्यापासून याचा रचनाकार (एक किंवा अनेक कवींच्या पिढ्या) यांच्या बद्दल माझ्या मनात जो आदर निर्माण झाला आहे तो कधीही कमी होणे शक्य नाही. पाच सहस्र वर्षांपूर्वी किंवा तत्सम कालापूर्वी होऊन गेलेल्या या कवींची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा अवर्णनीय आहे. गेल्या दोन शतकात भौतिकी मध्ये ज्या नवीन संकल्पना आल्या त्यातील अनेक या कवींना परिचित होत्या असे दिसते. वानगीदाखल काही उदाहरणे देतो. Big bang singularity ला हे कवी एकं असा प्रतिशब्द योजतात. या singularity पासून निघालेले प्रकाश किरण आपल्या पर्यंत पोचतात हे त्यांना ज्ञात आहे पण ते कसे पोचतात याबद्दल ते आश्चर्य व्यक्त करतात. अंतराळ निर्वात आहे हे त्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे primordial soup ही संकल्पना त्यांना आहे व त्याला ते “गहन आणि गंभीर असलेले अप्रगट जल” असे संबोधतात. या सूक्ताचा विचार करताना, जवळ जवळ आदिवासी असलेल्या, आपले पशु हेच धन समजणार्‍या, आणि पंचमहाभुतांना देवता मानणार्‍या या hearders समुदायाच्या अफाट बुद्धिमत्तेने थक्क व्हायला होते. त्याचप्रमाणे “तमासि होता आच्छादित अंधार” किंवा “रिक्तता झाकत होत्या ज्या महानता शून्यतेने” या सारखा अफाट कल्पनाविलास ही आपल्याला  थक्क केल्याशिवाय रहात नाही.

या सूक्तात निर्दिष्ट केलेले एकत्व किंवा Singularity  हे ज्या तत्वाने प्रत्यक्षात आणले त्याला सूक्ताचे रचनाकार महानताकिंवा Great Entity या नावाने संबोधितात. तिसर्‍या आणि पाचव्या ऋचेत हा महानतेचा उल्लेख आपल्याला दिसतो.  अगदी सायनापासूनचे ऋग्वेदाचे सर्व भाष्यकार  या महानतेचा संबंध चवथ्या ऋचेत वर्णिलेल्या निर्मिती प्रक्रियेशी जोडताना दिसतात. त्यामुळे ही निर्मिती प्रक्रिया, महानतेच्या मनात कधी व कशी निर्माण झाली याचे वर्णन या चवथ्या सूक्तात आहे असे मानले जाते व म्हणून माझ्या वरील अनुवादात मी हा संदर्भ तसाच ठेवला आहे.

वास्तविक रित्या पाहता या चवथ्या ऋचेत ही निर्मिती प्रक्रिया, सृष्टि रचनेची आहे की कवीच्या मनातील विचार प्रक्रिया आहे हे स्पष्ट होत नाही. ऋचेमध्ये “कवींचे विचार” हे शब्द स्पष्टपणे आलेले दिसतात. त्यामुळे या ऋचेतील “महानतेच्या” या शब्दाऐवजी येथे सृजन शक्तिनेहे शब्द  खरे तर वापरायला हवेत असे मला वाटते. त्याचप्रमाणे याच ऋचेतील “असतेपण नसतेपण यांत असे बाह्य बंधुत्व” हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत असे मला वाटते. Matter आणि Dark matter अशा काहिशा अर्थाने येथील असतेपण आणि नसतेपण हे शब्दप्रयोग कदाचित जर रचनाकारांनी योजलेले असले तर यांच्यातील बाह्य बंधुत्व हे कवींच्या लक्षात आल्यावर या बंधुत्वाचा सृष्टी निर्मितीशी काहीतरी संबंध कवींना उमजलेला आहे आणि तो ही ऋचा जोडू पाहते असे वाटणे स्वाभाविक आहे. आणि सध्याच्या भौतिकीच्या विचारसरणीशीही ते जुळते आहे असे मला वाटते. हे माझे विचार काहीसे प्रवाहाविरुद्ध असल्याने आणि सर्वमान्य विचारांच्या विरुद्ध जाण्याचे धाडस आणि विद्वत्ता माझ्यात नसल्याने मी हे माझे विचार माझ्यापुरतेच ठेवले आहेत.

 

असो! मी केलेले भाषांतर या ब्लॉगच्या वाचकांना आवडेल अशी आशा व्यक्त करून येथे थांबतो.

 

25 मार्च 2025