Showing posts with label विजेचे दिवे. Show all posts
Showing posts with label विजेचे दिवे. Show all posts

Tuesday, 16 September 2014

विजेचा बल्ब- किंमत 50 कोटी रुपये

थॉमस एडिसनने तप्त तारेच्या विजेच्या दिव्याचा शोध् लावल्यापासून, आजतायागत त्या पद्धतीचे विजेचे दिवे जगभर प्रकाश देत आहेत. अमेरिकेपुरते बोलायचे तर त्या देशात विकल्या जाणार्‍या दिव्यांच्यापैकी निम्मे दिवे, तप्त तारेचे आणि 60 वॉट शक्तीचे असतात. मागच्या वर्षी अमेरिकेत असे 42 कोटी दिवे विकले गेले. ह्या दिव्यांचा प्रकाश जरी अमेरिकन लोकांना खूप आवडत असला तरी या दिव्यांची कार्यक्षमता अतिशय कमी असते. ते विद्युतउर्जा विपूल प्रमाणात भक्षण करतात पण दिव्यातून बाहेर पडणारी प्रकाशउर्जा खूपच कमी असते. या शिवाय या दिव्यांच्यातून प्रकाशाबरोबर मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर टाकली जाते.

lightwiz-20-watt


या बाबींचा विचार करून अमेरिकन सरकारने नवीन तयार केलेल्या उर्जा मानकाप्रमाणे तप्त तारेचे विद्युत दिवे 2012 सालानंतर अमेरिकेत विकण्यास बंदी घातलेली आहे. या दिव्यांच्या ऐवजी सी.एफ.एल. किंवा कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट दिवे आता जगात बाकीच्या देशात वापरले जाऊ लागले आहेत. परंतु बारकाईने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणार्‍या चोखंडळ अमेरिकन नागरिकांना हे देवे पसंत पडत नाहीत. त्यांच्या मते या दिव्यांचा प्रकाश थंड वाटतो आणि आल्हादकारी वाटत नाही. त्यांचे आयुष्य उत्पादक म्हणतात तेवढे नसून किंमत फारच जास्त आहे. या दिव्यांचा आकार फार मोठा असतो व ते अंधुक प्रकाश देतील असे करता येत नाहीत. ते थंड हवामानात बरोबर चालत नाहीत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या उत्पादनात पारा वापरलेला असतो.

ग्राहकांच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेतील उर्जा मंत्रालय, एकीकडे 2012 सालानंतर तप्त तारेचे दिवे वापरण्यास बंदी तर दुसरीकडे त्याच्या जागी आणलेला दिवा वापरण्यास ग्राहकांची नाखुशी अशा कात्रीत सापडले आहे. यावर उपाय म्हणून या मंत्रालयाने त्यांना पाहिजे तसा दिवा बनवणार्‍यास 50 कोटी रुपयाचे बक्षीसच जाहीर केले आहे. या बक्षीसाला एल बक्षीस असे नाव देण्यात आले आहे. हे बक्षीस मिळवण्यासाठी पात्र दिवा कसा असेल? हे पण जाहीर करण्यात आले आहे. या दिव्याने 60 वॉटच्या तप्त तारेच्या दिव्याच्या रंगाचा व तेवढाच प्रकाश दिला पाहिजे. त्यासाठी या दिव्याने 10 वॉटपेक्षा जास्त विद्युतउर्जा वापरता कामा नये. हा दिवा 25000 तास तरी चालला पाहिजे आणि त्याच्या 75 % भागांचे तरी उत्पादन अमेरिकेतच झाले पाहिजे.

सध्या या आवश्यकता पार पाडेल असे तंत्रज्ञान फक्त एल.ई.डी. किंवा लाइट एमिटिंग डायोड वापरून केलेल्या दिव्यांच्या मधेच आहे. परंतु सध्याचे या प्रकारचे दिवे कसोटीला उतरू शकत नाहीत. 60 वॉट असा दावा केलेला एल.ई.डी दिवा प्रत्यक्षात 20 वॉटच देतो असे आढळले आहे.

25bulb.190


हा नवा दिवा बनवण्याच्या शर्यतीत जनरल इलेक्ट्रिक, ओसराम सिल्व्हानिया, या कंपन्यांच्याबरोबर हॉलंडची फिलिप्स कंपनीही आहे. मात्र नमुन्याचा पहिला दिवा सादर करण्याचा मान फिलिप्स कंपनीलाच मिळाला आहे. त्यांनी असे नमुन्याचे 2000 दिवे चाचण्यांसाठी दिलेही आहेत. ह्या दिव्यांची चाचणी करण्यासाठी 1 वर्षाचा अवधी तरी लागू शकतो. फिलिप्स कंपनीला मात्र आपल्या दिव्यांबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे, त्यांच्यामते हा दोवा सर्व चाचण्या व कसोट्यांना पूर्णपणे उतरेल आणि 50 कोटी रूपयांच्या बक्षिसाचे तेच धनी होतील.
या दिव्याच्या किंमतीचे काय? अमेरिकेतील वीज वितरण करणार्‍या कंपन्यांच्या मते ही किंमत, या दिव्यांचे आयुष्य कितीतरी जास्त असल्याने, सी.एफ.एल दिव्यांच्या मानानेचच राहील. परंतु फिलिप्स कंपनीच्या अंदाजाप्रमाणे सुरवातीला या दिव्यांची किंमत 5000 रुपयांपर्यंत रहाणार असली तरी उत्पादन वाढल्यावर ती किंमत 1250 रुपयापर्यंत खाली येऊ शकेल.

भारतातल्या किती जणांना हा दिवा परवडेल हा प्रश्नच आहे म्हणा?


26 सप्टेंबर 2009