Showing posts with label विमानतळ. Show all posts
Showing posts with label विमानतळ. Show all posts

Saturday, 18 October 2014

विमानांचे कबरस्तान

वाचकांच्यापैकी ज्या कोणी हॉलीवूडचा Transformers: Revenge of the Fallen हा चित्रपट बघितला असेल त्यांना या सिनेमात दाखवलेली विमानतळाची भव्य दृष्ये नक्की आठवत असतील. माझी इतके दिवस समजूत होती की हा भव्य विमानतळ, सिनेमाच्या शूटिंगसाठी, छोटी विमाने बनवून, स्टुडियोमधेच बनवलेला असावा. परंतु हा विमानतळ अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील ट्युसॉं (Tucson) या शहराजवळ खरोखरच अस्तित्वात आहे. फक्त गमतीची गोष्ट एवढीच की हा विमानतळ नसून विमानांचे एक कबरस्तान आहे.


2600 एकर आवार असलेला हा विमानतळ, 1430 अमेरिकन फूटबॉल मैदानांच्या आकाराचा आहे. Davis-Monthan Air Force Base या अधिकृत नावाने पण Boneyard या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा विमानतळ, दुसर्‍या महायुद्धानंतर बांधला गेला होता.


या ठिकाणची हवा अतिशय कोरडी असल्याने येथे विमाने उघड्यावर ठेवली तरी खराब होणार नाहीत अशा कल्पनेने हे ठिकाण निवडण्यात आले होते. त्याशिवाय या ठिकाणची जमीनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात वर असलेल्या धूळीच्या थराखाली अतिशय कठिण असा मातीचा थर लागतो. मातीच्या या थरामुळे कोणत्याही प्रकाराने कॉंक्रीटचा वापर न करता विमाने जमीनीवर पार्क करणे शक्य झाले आहे. या विमानतळावर अमेरिकन वायुसेनेची 309th Aerospace Maintenance and Regeneration Group (AMARG) ही तुकडी कार्यरत असते. विश्वास बसणार नाही पण या विमानतळावर 4200 विमाने आणि 40 अवकाश याने ठेवण्यात आलेली आहेत. या विमानांची किंमत 35 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी तरी असावी.

येथे ठेवलेल्या विमानात Tom Cruze याने भूमिका केलेल्या Top Gun या सिनेमात दाखवलेली F 14 TomCats ही विमाने, B-52 शीत युद्ध कालीन बॉम्बफेकी विमाने, A 10 ही रणगाडा भेदी विमाने आहेत. मागच्या 25 वर्षात या विमानतळावर ठेवलेल्या विमानांपैकी 20% विमाने तरी परत दुरुस्त करून वापरण्याजोगी केली गेली. अशी विमाने परराष्ट्रांना विकली जातात. या शिवाय जी विमाने वापर होण्यासारखी नसतात त्यांचे सुटे भाग वेगळे करून विकले जातात व अगदीच जुनी विमाने भंगार म्हणून विकली जातात.


या विमाततळाची चित्रे पाहताना मला जर कसली आठवण झाली असेल तर चाळीस वर्षांपूर्वी पुण्याहून आगगाडीने मुंबईला जाताना, चिंचवड व देहूरोड या स्टेशनांच्या दरम्यान भारतीय सैन्यदलाची निरनिराळी वाहने ठेवलेली दिसत असत त्याची. ही मैलोगणती पसरलेली वाहने बघून छाती अगदी दडपून जात असे.

देहू रोडचा तो वाहन तळ काय? किंवा गूगल अर्थ च्या सौजन्याने वितरण झालेल्या या चित्रात दिसणारा हा ट्य़ुसॉं चा विमानतळ काय? संरक्षण उद्योग हा जगातला एक अत्यंत मोठा असा उद्योग का मानला जातो याची एक चुणूकच आपल्याला या चित्रांवरून बघायला मिळते हे मात्र खरे.

26 फेब्रुवारी 2010

Tuesday, 9 September 2014

बळीचा बकरा

गेल्या काही दिवसांतल्या बातम्या वाचून असे दिसते आहे की अखेरीस भारतातही स्वाईन फ्ल्य़ू किंवा H1N1  व्हायरसने, आपले हातपाय चांगलेच पसरण्यास सुरवात केली आहे. हा फ्ल्य़ू एप्रिल महिन्यात प्रथम मेक्सिकोमधे आढळून आला व हळूहळू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका आणि युरोपमधे तो चांगलाच पसरला. त्यानंतर एशियामधले मलेशिया, सयाम सारखे देश या रोगाच्या झपाट्यात आले. इंग्लंडसारख्या छोट्या देशात सुद्धा दीड लाखापेक्षा जास्त लोकांना हा रोग झाला. अमेरिका, ऑस्ट्रेलियामधे सुद्धा प्रचंड संख्येने लोक या फ्ल्य़ूचे बळी ठरले. या बहुतेक देशात एप्रिलमधे या रोगांचे पहिले रुग्ण सापडले. ऑगस्ट महिन्यापर्यंत रोग्यांची संख्या वाढतच गेली व आता कुठे ती कमी होऊ लागली आहे. या सर्व महिन्यांच्यात, भारतात कडक उन्हाळा असल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी, हा रोग पसरला नाही. पावसाळा आल्याबरोबर हवामान सौम्य झाले व या व्हायरसने आपले हातपाय पसरवण्यास सुरवात केली.

हा व्हायरस सगळीकडे पसरणार अशी चिन्हे दिसू लागल्याबरोबर वर्तमान पत्रे, ब्लॉगर्स आणि अर्थातच आपले नेहमीचेच यशस्वी कलाकार म्हणजे टी. व्ही. चॅनेल्स यांनी भारतात हा व्हायरस पसरला गेला तरी कसा? व याचा दोष कोणाकडे जातो? याचा निष्फळ व निरर्थक शोध घेण्यास सुरवात केलेली दिसते आहे. वर्तमान पत्रात आलेल्या काही वाचकांच्या हास्यास्पद प्रतिक्रिया वाचून तर हसावे की रडावे तेच कळत नाही. एकजण म्हणतात पुण्याला कर्फ्यू लावा. दुसरे एक जण सल्ला देतात की पुण्याच्या लोकांना शहराच्या बाहेर जाऊ देऊ नका. भारतातून येणारी जाणारी सर्व आंर्तराष्ट्रीय उड्डाणे बंद करावी असेही काही लोकांचे मत आहे. यावर प्रतिक्रिया काय द्यायची हे मला तरी समजत नाही.पण हे स्पष्ट आहे की ही साथ का आली या साठी कोणीतरी बळीचा बकरा शोधणे चालू झालेले आहे.

काही मंडळींच्या मते, हा रोग परदेश सफर करून आलेल्या लोकांमुळे पसरला आहे. हे बर्‍याच अंशी खरेही आहे. परंतु सध्याच्या जागतिकरणाच्या परिस्थितीत कोणचाही देश स्वत:ला जगापासून अलग करू शकत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेशाहून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यातील संशयित लोकांना सात ते आठ दिवसासाठी अलग ठेवणे हे आवश्यक आहे. तसेच या संशयितांमधे जर कोणी आजारी झाला तर त्याच्या जवळपास विमानात कोण लोक होते त्याचा शोध घेउन त्या लोकांपैकी कोणी आजारी आहे काय? याचाही शोध घेणे आवश्यक ठरते. भारतात सर्व विमानतळांच्यावर उतरणार्‍या एकूण प्रवाश्यांची मोठी संख्या लक्षात घेतली तर ही वैद्यकीय तपासणी ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे समजू शकेल.
विमानतळांवर वैद्यकीय तपासणी करणारी ही डॉक्टर मंडळीच्, त्यामुळे स्वाईन फ्ल्यूची साथ आली, यासाठी बळीचे बकरे ठरण्याची शक्यता दिसते. आपल्यापैकी ज्या लोकांनी आंर्तराष्ट्रीय विमान प्रवास केला असेल त्यांनी हा प्रवास संपून विमानतळावर उतरल्यावरच्या आपल्या मनस्थितीची आठवण करावी. या वेळी प्रत्येक प्रवासी अत्यंत दमलेल्या व कंटाळलेल्या अवस्थेत असतो.  विमानतळावर आगमन होणार्‍या प्रवाशांना  बसण्यासाठी साध्या खुर्च्यासुद्धा विमानतळांवर नसतात. एमिग्रेशन सारख्या औपचारिकेतून जाण्यासाठी आधी बराच वेळ लागतो. या नंतर अशा वेळी जर तुम्हाला परत डॉक्टरची तपासणी होण्यासाठी बसवून ठेवण्यात आले तर ते सर्व प्रवासी किती दमतील व कंटाळून जातील याची कल्पना फक्त हा प्रवास केलेल्यांनाच येऊ शकेल. मुंबई विमानतळावर रात्री 12 ते 3 या वेळात दोन ते तीन हजार प्रवासी उतरतात. इतक्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करणे हे अत्यंत कठीण काम आहे. त्या शिवाय या आजाराचा रोगी हा त्याला कोणतेही लक्षण दिसण्याच्या एक दिवस आधीपासूनच रोग प्रसार करू शकतो. अशा आजार्‍यांना कसे अलग करायचे हा ही प्रश्नच आहे.

या वैद्यकीय तपासणीत सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे प्रवाशांचे तपमान घेणे ही असते. दोन ते तीन इंचांवर धरता येणार्‍या रिमोट सेन्सिंग तपमापकातून प्रवाशांच्या कपाळाकडे बघून त्याचे तपमान घेणे ही एक त्यातल्या त्यात जलद पद्धत आहे. परंतु हजारो प्रवाशांचे तपमान घेण्यास या पद्धतीनेही खूप वेळ लागू शकतो. जगातील आधुनिक विमानतळावर लांबवरचे थर्मल सेन्सॉर लावलेले असतात. या सेन्सॉरच्या, संगणकासारख्या दिसणार्‍या पडद्यावरच, समोरून चालणार्‍या प्रवाशाचे तपमान नॉर्मल आहे की नाही हे दिसते. आपल्या विमानतळांवर कोणती पद्धत वापरतात हे माहिती नाही. पण आपला फॅमिली डॉक्टर जशी तपासणी करतो तशी तपासणी जर या विमानतळावरच्या डॉक्टर्सना करावी लागत असली तर ते डॉक्टर स्वत: व प्रवासी या दोन्हीसाठी ही एक सत्वपरिक्षाच असणार आहे. या अडचणींमुळेच बहुदा सगळीकडे, तपमानासाठी थर्मल स्कॅनर्स व प्रवाशाकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची पद्धत आहे. व सर्वसाधारणपणे ते पुरेसे होते.
रोज हजारोंनी प्रवाशांना तपासणारी ही डॉक्टर मंडळी खरे तर संभाव्य रोग्याशी ज्यांचा संपर्क येतो अशा लोकांची पहिली फळी असते. त्यांचे काम खरोखरच अतिशय धोकादायक व कष्टप्रद आहे. अशा या डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी त्यांचे कौतुक करणे जरूरीचे आहे.

11 ऑगस्ट 2009