Showing posts with label न्यूयॉर्क. Show all posts
Showing posts with label न्यूयॉर्क. Show all posts

Saturday, 4 October 2014

स्वच्छतागृहांचे राजदूत

सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे नाव बहुतेक सगळ्यांनी ऐकलेले असेल. शहरांच्या गरीब वस्त्यांत व ग्रामीण भागात, स्वच्छतागृहांचा प्रसार व प्रचार कसा वाढेल याचा प्रयत्न ही संस्था करत असते. या संस्थेचे संस्थापक श्री. बिंदेश्वर पाठक यांना, अतिशय कमी खर्चाचे व पर्यावरणास हानी न पोचवणारे स्वच्छतागृह तयार केल्याबद्दल, या वर्षीचे स्टॉकहोम वॉटरबक्षिस नुकतेच मिळाले. श्री. पाठक यांनी हे कार्य जेंव्हा सुरू केले तेंव्हा स्वच्छतागृहांबद्दल साधे बोलणे सुद्धा हीनपणाचे लक्षण मानले जात असे. असे असताना सुद्धा श्री. पाठक यांनी आपले काम नेटानेच चालू ठेवले व ग्रामीण व गरीब शहरी स्त्रियांना मोठाच दिलासा मिळवून दिला. श्री पाठक यांना या कार्याबद्दल आदराने स्वच्छतागृहांचे राजदूतम्हणून संबोधले तरी चालण्यासारखे आहे इतकी त्यांची या कार्यामागे निष्ठा व तळमळ आहे.

भारतासारख्या देशात या प्रकारचे कार्य, एक सामाजिक चळवळ म्हणूनच चालवणे आवश्यक असले तरी ज्या देशाच्या नसानसातून फक्त व्यापारी रक्त वाहत आहे अशा अमेरिकेसारख्या देशात, जेंव्हा अशा प्रकारच्या कार्याची गरज भासू लागते तेंव्हा अशा स्वच्छतागृह राजदूतांची पगारी नेमणूकच करण्याशिवाय इलाज नाही हे लक्षात येते.

स्वच्छतागृहात वापर करण्याचे टॉयलेट पेपर बनवणार्‍या चारमिनया कंपनीने, नुकतीच न्यूयॉर्क शहराच्या मधवर्ती भागात असलेल्या टाईम्स स्क्वेअरया चौकाजवळ, नवीन स्वच्छतागृहे चालू केली आहेत. न्यूयॉर्कच्या या भागात, प्रवाशांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते व सोईस्कर पडतील अशी स्वच्छतागृहे जवळपास नसल्याने त्यांची नेहमीच अडचण होते. ही गोष्ट लक्षात घेऊन ही स्वच्छतागृहे चालू करण्यात आली आहेत. सहा आठवड्यांपूर्वी चालू केलेल्या या स्वच्छतागृहांना किमान 5 लाख लोक तरी एका वर्षभरात भेट देतील अशी या कंपनीची अपेक्षा आहे.

toilettes


या स्वच्छतागृहांची पुरेशी माहिती लोकांना नसल्याने या स्वच्छतागृहांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाहीये असे वाटल्याने, या कंपनीने आता 5 जणांची भरभक्कम पगारावर, स्वच्छतागृह राजदूत म्हणून नेमणूक करावयाची ठरवले आहे. या राजदूतांचे कॉन्ट्रॅक्ट फक्त 6 आठवड्यांचे असणार असून व त्या साठी त्यांना 10000 यू.एस. डॉलर्स एवढा मोबदला ही कंपनी देणार आहे.

अमेरिकेत नोकर्‍यांची सध्या प्रचंड वानवा असल्याने शेकडो तरूणतरूणींनी या कामासाठी अर्ज केले आहेत. या राजदूतांचे काम, टाईम्स स्क्वेअरमधल्या गर्दीत मिसळून, लोकांना या टॉयलेट्सचे महत्व समजवून सांगणे हे रहाणार आहे. या शिवाय फेसबूक किंवा ट्विटर सारख्या वेब साइट्स वर जाऊन या राजदूतांनी स्वच्छतागृहांचे महत्व लोकांना पटवावे अशीही कंपनीची अपेक्षा आहे. कंपनीने संभाव्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले होते तेंव्हा काही उमेदवार पहाटे 4 वाजताच हजर झाले. एवढ्या लवकर का आलात म्हणून विचारणा केली असता माझे स्वच्छतागृहांशी किती जवळचे संबंध आहेत हे परिक्षकांना कळावे म्हणूम मी पहाटे आलोअसे मासलेवाईक उत्तर एका उमेदवाराने दिले. नोकरीसाठी आलेल्या उमेदवारात सध्या काम नसलेले नट-नट्या, विद्यार्थी व धंदेवाईकही होते. शिक्षणासाठी फीची व धंद्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी आपण हे काम करण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतीसाठी काही उमेदवार टॉयलेट पेपरचे ड्रेसेस घालून आले होते. “मी निवडला गेलो तर मी माझ्या टॉयलेटला चिकटून व त्याच्याशी एकनिष्ठ राहीनअसेही एका उमेदवाराने सांगितले.

ही नोकरी सहा आठवड्यांपुरती मर्यादित आहे. ‘चारमिन‘  या  कंपनीने या स्वच्छतागृहांसाठी 150 लोकांना, सहाय्यक म्हणून नोकरीवर ठेवलेलेच आहे. हे राजदूत या व्यतिरिक्त काम करणार आहेत. अमेरिकेत सध्या 10 टक्के लोक बेकारच आहेत. सहा आठवड्यांनंतर हे राजदूत परत बेकारच होणार आहेत. त्यांच्या या अभिनव अनुभवामुळे त्यांना भारतात सुलभ इंटरनॅशनलसारख्या कंपनीत कायम नोकरी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नाही.



9 नोव्हेंबर 2009

Friday, 19 September 2014

एक अभिनव उद्यान- न्यूयॉर्क स्टाईल!

न्यूयॉर्क म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतात दाटीवाटीने बांधलेल्या उंचउंच इमारती, त्याच्यांमधून जाणारे व वाहनांनी फुललेले रस्ते आणि माणसे. अर्थात बाकी इतर महानगरे काही फारशी निराळी आहेत असे नाही. न्यूयॉर्क या इतर महानगरांच्यापेक्षा थोडेसे निराळे जरूर आहे. ते या शहराच्या मध्यभागी सेंट्रल पार्क या नावाचे एक प्रचंड मोठे उद्यान आहे त्याच्यामुळे. पण एक सेंट्रल पार्क, एवढ्या मोठ्या शहराला कसे पुरणार. इमारतींच्या जंगलांनी भरलेल्या या शहरात खरे म्हणजे ठिकठिकाणी उद्याने असायला हवीत.

_46484632_9dfc1309-ac11-4ce1-8838-d0dd52377273


मॅनहॅटन बेटाच्या पश्चिम बाजूला एक जुनी रेल्वे लाईन आहे. ही रेल्वे लाईन जमिनीपासून उंचावर बांधलेली आहे व जुनी गुदामे व नवीन चकचकीत इमारती यांच्यामधून आपला मार्ग काढते. आज जर ही रेल्वे लाइन बघायला गेले तर रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेले व आज गंजक्या अवस्थेत असलेले मोठमोठे लोखंडी पूल व ठिकठिकाणी वाढलेली झाडे झुडपेच फक्त बघायला मिळतात. त्यामुळेच आजमितीला तरी हा ‘हाय लाइन’ नावाचा रेल्वे मार्ग काही न्यूयॉर्कमधले प्रेक्षणीय स्थळ आहे असे खासच म्हणता येणार नाही.

_46483843_rusting_bridge226x282


या कारणांनीच लोकल कौन्सिल मधे हा मार्ग भंगारात काढावा असा ठराव आणण्यात आला आहे हे कळल्यावर काही लोकांना असे वाटू लागले की या रेल्वे लाइनचा काहीतरी दुसरा उपयोग केला पाहिजे. अशा काही मंडळींनी एकत्र येऊन ‘हाय लाइनचे मित्र’ अशी एक संस्था स्थापन केली. ही गोष्ट दहा वर्षांपूर्वीची आहे.
आज या हाय लाइनच्या मार्गाच्या एका भागावर, मॅनहॅटनचे सर्वात नवीन उद्यान विकसित होते आहे. जमिनीवरच्या रस्त्यावरून, एका नव्यानेच बांधलेल्या जिन्याने वर गेले की तुम्ही या पार्कमधे शिरता. आजुबाजुची गुदामे व कॉंक्रीटच्या इमारती यात एकदम हिरवाई फुललेली बघून कोणीही आश्चर्यचकीतच होते. हिरवेगार लॉन व इतर झाडे यामधून  काढलेला एक पदपथ आपले लक्ष  वेधून घेतो.

_46484639_837ae319-1bf9-45d8-bf9c-63040294b5a3


पायी फिरणारे, जॉगर्स, सूर्याचे ऊन खाणारे न नातवंडांना घेऊन येणारे आजी आजोबा या सर्वांनी, कोणत्याही सूर्यप्रकाश असलेल्या रवीवारी, हा पार्क फुललेला असतो. या पार्कमधे येणार्‍या लोकांना, एका बाजूला हडसन नदीचे पात्र तर दुसर्‍या बाजूला एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसते. आणि लांबवर बघितले तर स्वातंत्र्यदेवीचा पुतळाही दिसू शकतो.

या पार्कचा पुढचा विभाग आणखी वर्षभरात लोकांसाठी खुला होईल असे वाटते. या भागात जुने रेल्वे यार्डही आहे. त्यामुळे हा भाग विकसित झाल्यावर हा सर्व परिसर हिरवा गार व सुंदर होईल यात शंकाच नाही.
सर्व महानगरांच्यात असे मोडके व गंजलेले लोखंडी पूल आपण नेहमीच बघतो. पण न्यूयॉर्कमधल्या या मंडळींनी या जुन्यापान्या बांधकामाचा कायापालट करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो अनुकरणीय आहे यात शंकाच नाही.

5 ऑक्टोबर 2009