Friday, 19 September 2014

एक अभिनव उद्यान- न्यूयॉर्क स्टाईल!

न्यूयॉर्क म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतात दाटीवाटीने बांधलेल्या उंचउंच इमारती, त्याच्यांमधून जाणारे व वाहनांनी फुललेले रस्ते आणि माणसे. अर्थात बाकी इतर महानगरे काही फारशी निराळी आहेत असे नाही. न्यूयॉर्क या इतर महानगरांच्यापेक्षा थोडेसे निराळे जरूर आहे. ते या शहराच्या मध्यभागी सेंट्रल पार्क या नावाचे एक प्रचंड मोठे उद्यान आहे त्याच्यामुळे. पण एक सेंट्रल पार्क, एवढ्या मोठ्या शहराला कसे पुरणार. इमारतींच्या जंगलांनी भरलेल्या या शहरात खरे म्हणजे ठिकठिकाणी उद्याने असायला हवीत.

_46484632_9dfc1309-ac11-4ce1-8838-d0dd52377273


मॅनहॅटन बेटाच्या पश्चिम बाजूला एक जुनी रेल्वे लाईन आहे. ही रेल्वे लाईन जमिनीपासून उंचावर बांधलेली आहे व जुनी गुदामे व नवीन चकचकीत इमारती यांच्यामधून आपला मार्ग काढते. आज जर ही रेल्वे लाइन बघायला गेले तर रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेले व आज गंजक्या अवस्थेत असलेले मोठमोठे लोखंडी पूल व ठिकठिकाणी वाढलेली झाडे झुडपेच फक्त बघायला मिळतात. त्यामुळेच आजमितीला तरी हा ‘हाय लाइन’ नावाचा रेल्वे मार्ग काही न्यूयॉर्कमधले प्रेक्षणीय स्थळ आहे असे खासच म्हणता येणार नाही.

_46483843_rusting_bridge226x282


या कारणांनीच लोकल कौन्सिल मधे हा मार्ग भंगारात काढावा असा ठराव आणण्यात आला आहे हे कळल्यावर काही लोकांना असे वाटू लागले की या रेल्वे लाइनचा काहीतरी दुसरा उपयोग केला पाहिजे. अशा काही मंडळींनी एकत्र येऊन ‘हाय लाइनचे मित्र’ अशी एक संस्था स्थापन केली. ही गोष्ट दहा वर्षांपूर्वीची आहे.
आज या हाय लाइनच्या मार्गाच्या एका भागावर, मॅनहॅटनचे सर्वात नवीन उद्यान विकसित होते आहे. जमिनीवरच्या रस्त्यावरून, एका नव्यानेच बांधलेल्या जिन्याने वर गेले की तुम्ही या पार्कमधे शिरता. आजुबाजुची गुदामे व कॉंक्रीटच्या इमारती यात एकदम हिरवाई फुललेली बघून कोणीही आश्चर्यचकीतच होते. हिरवेगार लॉन व इतर झाडे यामधून  काढलेला एक पदपथ आपले लक्ष  वेधून घेतो.

_46484639_837ae319-1bf9-45d8-bf9c-63040294b5a3


पायी फिरणारे, जॉगर्स, सूर्याचे ऊन खाणारे न नातवंडांना घेऊन येणारे आजी आजोबा या सर्वांनी, कोणत्याही सूर्यप्रकाश असलेल्या रवीवारी, हा पार्क फुललेला असतो. या पार्कमधे येणार्‍या लोकांना, एका बाजूला हडसन नदीचे पात्र तर दुसर्‍या बाजूला एम्पायर स्टेट बिल्डिंग दिसते. आणि लांबवर बघितले तर स्वातंत्र्यदेवीचा पुतळाही दिसू शकतो.

या पार्कचा पुढचा विभाग आणखी वर्षभरात लोकांसाठी खुला होईल असे वाटते. या भागात जुने रेल्वे यार्डही आहे. त्यामुळे हा भाग विकसित झाल्यावर हा सर्व परिसर हिरवा गार व सुंदर होईल यात शंकाच नाही.
सर्व महानगरांच्यात असे मोडके व गंजलेले लोखंडी पूल आपण नेहमीच बघतो. पण न्यूयॉर्कमधल्या या मंडळींनी या जुन्यापान्या बांधकामाचा कायापालट करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो अनुकरणीय आहे यात शंकाच नाही.

5 ऑक्टोबर 2009