Showing posts with label मुले. Show all posts
Showing posts with label मुले. Show all posts

Tuesday, 9 December 2014

घोडा! घोडा!


मी लहान असताना ज्येष्ठ वयाच्या बहुतेक पुरुषवर्गाकडे एक काठी असे. या काठीचे वरचे टोक अर्धवर्तुळाकारात वळवलेले असायचे. या गोल भागाला मुठीत उत्तम रित्या पकडता येत असल्याने ही काठी, ज्येष्ठ नागरिकांच्यात खूपच लोकप्रिय होती. या काठीचा आणखी एक उपयोग, विशेषत: बालचमू करत असत. दोन्ही हातानी ही काठी पकडून दोन्ही पायांमध्ये ठेवायची व तिला घोडा समजून पळायचे हा खेळ सर्व लहान मुलांच्यात तेंव्हा अगदी कॉमन होता. आता ही काठी गेली आणि लहान मुलांचा हा खेळही गेला. पण आज मी जुन्या जमान्यातील ही काठी आणि तिच्यावरचा लहान मुलांचा घोड्याचा खेळ, याकडे कुठे वळलो असे वाचकांना वाटणे साहजिक आहे.

याला कारण आहे माझी 10 वर्षाची नात. माझ्या या नातीला अगदी पहिल्यापासून घोडा या प्राण्याचे विलक्षण आकर्षण आहे. तिला कधीही, कोणत्याही निमित्ताने, काय गिफ्ट आणू? असे जर विचारले तर तिचे उत्तर ठरलेले असते. ” घोडा आण ” म्हणून. मग तो घोडा कागदाचा, कापडाचा, प्लॅस्टिकचा अगदी धातूचा असला तरी चालतो. तिच्याकडे असंख्य घोडे असलेली खेळणी आहेत, चित्रे आहेत आणि मॉडेल आहेत. ही माझी नात परवा रात्री जेवण झाल्यावर खूप कार्यमग्न दिसली. कागदावर काहीतरी आकार काढणे, त्या आकारांवर कसलेतरी रंगकाम, चालू होते. काय करते आहेस? म्हणून विचारल्यावर प्रथम काहीच बोलली नाही. परत एकदा विचारल्यावर “घोडा” एवढेच उत्तर मिळाले.
सकाळी उठल्यानंतर आमच्या डायनिंग टेबलाच्या खुर्च्यांपैकी एक, पूर्वी थिएटर किंवा प्रेक्षागृहात खुर्चीच्या हाताला रूमाल बांधून आरक्षित करण्याची जशी पद्धत होती, तशाच पद्धतीने, त्या खुर्चीच्या पाठीला एक कपडा गुंडाळून आरक्षण केलेली आढळली. नातीला त्या संबंधी विचारले असता ” ती खुर्ची मला महिनाभर हवी आहे. ” असे उत्तर मिळाले. दुसर्‍या दिवशी रात्री परत नातीचे काम चालूच होते.
काल सकाळी उठल्यानंतर, चहा पीत असताना, सहज त्या डायनिंग टेबलाच्या खुर्चीकडे माझे लक्ष गेले. त्या खुर्चीचा चक्क एक घोडा झाला होता.
माझ्या या ब्लॉगपोस्टचा पुढचा परिच्छेद खरे तर बालचमू साठी आहे. मोठ्या माणसांना तो वाचायचा असला तर परत लहान मूल होऊन वाचावा ही विनंती.
तुम्हाला घरात खेळायला एक खराखुरा घोडा हवा आहे का? मग एक खुर्ची घ्या. जरा लंगडणारी असली तर सर्वात उत्तम, कारण मग खर्‍याखुर्‍या घोड्यावर बसण्याची गंमत तुम्हाला अनुभवता येईल. घोड्याच्या तोंडाचे, कानांचे, मानेचे व आयाळीची चित्रे काढून घ्या. शेपटीचे ही एक चित्र काढा. शेपूट व आयाळ यांना काळा रंग द्या. खुर्चीच्या पायांना गुंडाळता येतील असे कागद कापून घ्या. मग चित्रात दाखवल्याप्रमाणे ही सगळी चित्रे खुर्चीला सेलोटेपने चिकटवा. खुर्चीवर आई किंवा ताई यांची एखादी पिवळी ओढणी पसरा. झाला आपला घोडा तयार. त्यावर बसा आणि खेळायला लागा.
पुष्कळ वेळा मुलांना मोठ्या महाग खेळण्यांपेक्षा असली ओबड धोबड खेळणी जास्त पसंत असतात. एक तर ती मोडत नाहीत आणि मोडली तर कोणीच रागावत किंवा ओरडत नाही. हा घोडा त्यामुळेच मस्त आहे. पण मला सर्वात गंमत वाटते आहे ती माझ्या नातीच्या सृजनशीलतेची. स्वत:च्या कल्पनेने कोणाचीही मदत न घेता हा घोडा तिने तयार केला. मुलांच्यात सर्जनशीलता असतेच. तिला पूर्ण वाव देणे किंवा ती दाबून न टाकणे हे सर्वात महत्वाचे!
3 सप्टेंबर 2011

हाऊ एम्बरॅसिन्ग?


माझ्या एक परिचित महिला आहेत. वय पन्नाशीच्या घरात असेल. शरीर यष्टी स्थूलतेकडेच एकूण झुकलेली आहे. मुले मोठी व कर्ती सवरती झालेली आहेत. बाईंचा जीवनाकडे बघण्याचा एकंदर दृष्टीकोन अतिशय निकोप आणि आयुष्य शक्य तितके आनंदात घालवण्याचा आहे. या बाई एका महिला मंडळात मधून मधून जात असतात. तिथे त्यांना काही समवयस्क मैत्रिणी भेटतात व काही काळ आनंदात घालवणे त्या सर्व मैत्रिणींना शक्य होते. त्यांच्या या महिला मंडळाने, एकदा नाचाचा कार्यक्रम करण्याचे ठरवले. नृत्य कसले म्हणाल तर लावणी नृत्य.
सगळ्या सभासद भगिनी, उत्साहाने नाचाची प्रॅक्टिस करू लागल्या. माझ्या या परिचित बाईंनी सुद्धा या नाचात हिरिरीने भाग घेतला. ठरलेल्या दिवशी सगळ्या सभासद भगिनींचे नातलग, मुले, पती यांच्या उपस्थितीत हा नाचाचा कार्यक्रम मोठा छान पार पडला. या बाईंना सुद्धा मजा आली.एकूण सगळ्या जणी आनंदात व खुषीत घरी परतल्या. या बाईंची मुले, जी जरा नाखुषीनेच हा नाच बघायला आली होती, ती मात्र आपल्या आईच्या या डान्सवर अजिबातच खुष नव्हती. त्यांच्या मताने आईचा हा नाच फारच एम्बरॅसिन्ग होता. त्यांना आपल्या आईचा नाच बघणे अगदी अवघड गेले. पुन्हा असले नाच करायचे नाहीत हे आईला सांगायला ती विसरली नाहीत. Twentieth Century Fox या टीव्ही वाहिनीने नुकतेच एक सर्वेक्षण इंग्लंड मधे केले आहे. या सर्वेक्षणासाठी किंवा पाहणीसाठी त्यांनी 1500 इंग्लिश टीन एजर्स कडून माहिती जमा केली होती. या पाहणीचा अहवाल आज माझ्या वाचनात आला. या पाहणीचे निष्कर्ष वाचताना मला माझ्या या परिचित महिलेचा नाच व त्या बद्दलच्या त्यांच्या मुलांच्या कॉमेंट्स, एकदम स्मरणात आल्या. या सर्वेक्षणातील टीन एजर्स काय म्हणतात ते बघूया. या मुलांना सर्वात एम्बरॅसिन्ग जर कोणती गोष्ट वाटत असेल तर ती म्हणजे कौटुंबिक गेटटुगेदर्स किंवा मेळाव्यांच्यामधे या मुलांच्या वडिलांनी केलेला अतिउत्साहात केलेला नाच किंवा आपल्या मुलांवर आपले किती प्रेम आहे याची सर्वांसमक्ष केलेली जाहीरात. या मुलांना आपल्या आईने तेच तेच जुने विनोद सांगणे किंवा मद्य पिऊन तर्र होणे हे ही अत्यंत लाजिरवाणे वाटते. ही मुले म्हणतात की आमच्या आई-वडीलांचे वागणे जर पुढे असेच चमत्कारिक आणि एम्बरॅसिन्ग राहणार असले तर आम्ही आमच्या गर्ल किंवा बॉय फ्रेंडची ओळख, आमच्या आई-वडीलांशी कधीच करून देणार नाही. या सर्वेक्षणापैकी 63 टक्के मुलांना आपल्या वडीलांचे वागणे जास्त चमत्कारिक वाटते आणि एका आठवड्यात ही मुले तीन किंवा चार तासापेक्षा जास्त वेळ आपल्या आई-वडीलांशी बोलण्यात घालवत नाहीत. आंतरजाल किंवा सेलफोन वर मित्रांशी सोशल नेटवर्किंग साईट्सवर ही मुले याच्या किती तरी पट जास्त वेळ घालवतात. या सर्वेक्षणात या मुलांच्या पालकांनाही काही प्रश्न विचारले होते. त्यांची उत्तरेही अशीच मोठी गौप्य स्फोट करणारी वाटतात. मुलांच्यावर आपले चांगले इंप्रेशन पडावे म्हणून हे पालक इतके घायकुतीस आलेले असतात की दहा पैकी सहा पालक त्यांच्या मुलांना आपण पूर्वी हिप्पी, पन्क किंवा मॉड होतो या सारख्या खोट्या गोष्टी सांगत असतात. बीटल्स सारख्या संगीत जलशांना आपण कसे उपस्थित होतो? ही थाप बरेच पालक मुलांना मारतात असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नातेसंबंधाबद्दल संशोधन करणारा Jenni Trent Hughes म्हणतो की या असल्या थापा लगेच उघडकीस येतात व मुले अतिशय एम्बरॅस झाल्याने, आई-वडीलांशी गप्पा मारण्याऐवजी आपल्या बेड रूम मध्ये वेळ घालवणे जास्त पसंत करू लागतात. मुलांना मारलेल्या या प्रकारच्या थापा प्रथम मुलांना खर्‍या वाटतात व त्या गोष्टी ते आपल्या मित्रांना लगेच सांगतात. हे मित्र जेंव्हा आपल्या आई-वडीलांना या गोष्टी पुढे सांगतात तेंव्हा त्या थापा असल्याचे उघडकीस येतेच. आपल्या वडीलांनी सांगितलेली एखादी गोष्ट थाप आहे हे जेंव्हा मुलांना कळते तेंव्हा आपल्या पालकांच्यावरचा त्यांचा विश्वास नष्ट होण्यास वेळ लागत नाही. मनुष्य स्वभाव हा कोठेही गेले तरी तसाच राहतो हे या सर्वेक्षणावरून चांगलेच लक्षात येते. शाळेत जेमतेम काठावर पास झालेला माणूस आपला नेहमी वर्गात पहिला क्रमांक असे किंवा आपण कोणता तरी खेळ कसा उत्तम खेळत होतो? वगैरे सारख्या थापा मुलांना मारतो व त्या थापा अगदी सहजपणे उघडकीस येऊ शकतात. या प्रकारे थापा मारणे, हे कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी एक मूर्खपणाच असल्याने याचा जास्त विचार करणे मला आवश्यक वाटत नाही. परंतु आई-वडीलांनी केलेला नाच किंवा जुने विनोद सांगून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे मुलांना का एम्बरॅसिन्ग होते याचे कारण थोडे वेगळे आहे असे मला वाटते. मुले आपल्या आई-वडीलांकडे काहीसे रोल मॉडेल म्हणून बघत असतात. अशा प्रकारच्या गोष्टी पालकांनी केल्या की त्यांचे पाय मातीचेच आहेत ही गोष्ट मुलांच्या मनावर ठसू लागते व ते त्यांना बहुदा सहन होत नसावे. काही पालक या बाबत पथ्ये पाळताना दिसतात. आधी सहजतेने सामाजिक मद्यपान करत असलेला एखादा बाप त्याचा मुलगा मोठा झाल्यावर मद्यपान करणे सोडून देतो. किंवा चित्र-विचित्र कपडे घालणारी एखादी आई मुलगी मोठी झाल्यावर किंवा सून आल्यावर अगदी सोबर असे कपडे वापरणे सुरू करते. पालकांनी मुलांच्या पातळीला न जाता, “राखावी आपुली अंतरेअसे वर्तन जर केले तर मुलांना चमत्कारिक किंवा एम्बरॅसिन्ग नक्कीच वाटणार नाही. आपल्या आई-वडीलांच्या वर्तनाबद्दल मुलांचे असे मत एकदा ग्राह्य झाले की ती आई-वडीलांपासून दूर जाणारच. मुले एकदा मोठी झाली की त्यांना असे वाटू लागते की पालकांनी आता थोडे मागे सरकावे व सेंटर स्टेज आपल्याला रिकामे करून द्यावे. पण आई-वडीलांच्या वर्तनावरून जर त्यांना असे वाटू लागले की आपल्याला बाजूला सारून, आई-वडीलच प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर ही मुले आपल्या पालकांपासून दूर जाऊन आपले स्वत:चे असे विश्व निर्माण करू पाहतात व पर्यायाने पालकांना दुरावतात. पूर्वीच्या काळी आपल्या समाजात वडीलधारे म्हणजे सर्वश्रेष्ठ असे समजत असत. त्यांना विचारून सर्व करायचे अशी पद्धत होती. ही पद्धत आता कालबाह्य झाली असल्याने मागे पडत चालली आहे. तरीही आई-वडीलांनी अंतर राखून आपले वर्तन आपल्या मुलांना चमत्कारिक वाटणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते. 9 सप्टेंबर 2011

Saturday, 29 November 2014

अथातो ज्ञानजिज्ञासा


महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यातील छोट्या वयाच्या विद्यार्थीचमूसाठी एक (त्यांच्या मताने एक मोठी भेट) घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, सहा ते चौदा या वयोगटातील कोणत्याही विद्यार्थ्याला (अर्थातच विद्यार्थिनीलाही) परिक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपयश आले म्हणून आहे त्याच इयत्तेत ठेवण्यात येणार नाही. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना परिक्षाच द्यावी लागणार नाही.त्यांना पूर्वी प्रमाणेच सर्व परिक्षा द्याव्या लागतील. मात्र जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत असे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी देण्यात येईल व त्यांचा अभ्यास तयार करून घेण्यात येईल. सध्याच्या शालेय शिक्षणाबद्दल एक मोठा आक्षेप घेतला जातो की हे शिक्षण फक्त परीक्षार्थी बनले आहे व मला वाटते की हा आक्षेप बहुतांशी सत्यही आहे. शालेय शिक्षणातून परीक्षांना आलेले अवाजवी महत्व कमी होऊन ते जास्त प्रमाणात ज्ञानार्थी व्हावे या उद्देशासाठी म्हणून जर हे पाऊल उचलले गेले असले तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे असे मला वाटते.
मागच्या वर्षी, शालान्त परीक्षांच्या मध्यवर्ती मंडळाने (CBSE), हे मंडळ घेत असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेमधे, गुण न दाखवता फक्त ग्रेड्स दर्शविल्या जातील अशी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या एकूण गुणांमध्ये, एक, दोन किंवा अगदी पाच, दहा गुणांचा फरक असतो अशा सर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमधे, तसे बघायला गेले तर काहीच फरक नसतो. परंतु आपल्याला दोन गुण कमी मिळाले या कल्पनेने या मुलांना अतिशय ताण तणावातून जावे लागते. शालेय शिक्षण हे त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून द्यायचे असते. तसे न होता, सध्या दिले जाणारे शालेय शिक्षण म्हणजे त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे कारखाने बनले आहेत ही वस्तुस्थिती आहे यात शंकाच नाही. त्या दृष्टीने CBSE ने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे असेच मला म्हणावेसे वाटते.
परंतु वर निर्देश केलेले दोन्ही शासकीय निर्णय, प्रत्यक्षातील मूळ प्रश्नाला लावलेल्या तात्पुरत्या मलमपट्या आहेत असेच म्हणावेसे वाटते. हा मूळ प्रश्न काय आहे हे शोधण्यासाठी जरा खोलात जाऊन, शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. नव्या पिढीला जे ज्ञान आपण शिक्षण म्हणून देऊ इच्छितो ते ज्ञान आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी स्वानुभवांतून आणि विचारातून संग्रहित व संकलित केलेले आहे. पुढच्या पिढ्यांना चाकाचा शोध पुन्हा पुन्हा लावावा लागू नये यासाठी मागच्या पिढ्यांनी संग्रहित व संकलित केलेले हे ज्ञान, शिक्षण म्हणून पुढच्या पिढीला दिले जाते. संत रामदासांनी शिक्षणाचा हा मूल उद्देश जे जे आपणांस ठावे। ते ते इतरां सांगावे! शहाणे करून सोडावेसकल जन या शब्दात मोठ्या समर्थपणे सांगितला आहे.
नव्या पिढीला शहाणे करून सोडावे हा जर शिक्षणाचा उद्देश असला तर मग सध्याच्या शिक्षणाची ही परिक्षार्थी वृत्ती उपटली तरी कोठून? असा प्रश्न साहजिकच मनासमोर येतो. प्राचीन भारतात, गुरुगृही राहून ज्ञान संपादन करण्याची प्रथा होती. असे गुरु विद्यार्थ्याची परिक्षा नक्कीच घेत असले पाहिजेत. पण एखादा विद्यार्थी ज्ञानी बनून गुरूगृहावरून जेंव्हा परत येत असे तेंव्हा जे काय ज्ञान प्राप्त करायचे ते त्याने प्राप्त केल्यामुळे तो स्वगृही परत येत असे. परिक्षा उत्तीर्ण झाला म्हणून नव्हे. नालंदा, तक्षशीला सारख्या विद्यापीठात एखादा विद्यार्थी जेंव्हा ज्ञानप्राप्तीसाठी जात असे तेंव्हा त्याने ज्ञान प्राप्त केले की नाही हे बघण्यासाठी त्याची परिक्षा इतर पंडित जरूर घेत. परंतु त्या विद्यापीठामधे दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा उद्देश, त्या विद्यार्थ्याने ज्ञानप्राप्ती करावी हा असे, त्याने कोणत्या तरी मार्गाने व कशीतरी परिक्षा उत्तीर्ण व्हावे हा नसे.
प्राचीन भारतामधल्या या शिक्षण पद्धतीमधे, आमुलाग्र बदल घडवून आणला एका इंग्रज अधिकार्‍याने. थॉमस बॅबिन्ग्टन मॅकले (1800-1859) हा एक कवी, इतिहासतज्ञ व राजकारणी असलेला ब्रिटिश अधिकारी . 1833 साली, जेंव्हा ब्रिटिश संसदेने भारतीय शासन विधेयक 1833′ मंजूर केले तेंव्हा तो लॉर्ड ग्रे याच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या नियामक मंडळाचा सचीव होता. या मॅकलेने दोन वेळा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेली वक्तव्ये ब्रिटिश संसदेसमोर केली. यापैकी पहिले वक्तव्य त्याने 1833 मधे केले होते. ब्रिटिश राजवटीच्या भारतातील प्राधान्यांपैकी भारतीयांना शिक्षण देणे हे एक महत्वाचे प्राधान्य असल्याचे मॅकलेने या वक्तव्यात सांगितले होते. मेकॅलेच्या विचारांप्रमाणे, भारतीयांना अडाणी व इंग्लंडवर कायम परावलंबी ठेवणे हे ब्रिटिश साम्राज्याच्या दृष्टीने पुढे अत्यंत अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे युरोपियन संस्कृतीची जी मूल्ये आहेत ती भारतातील समाजात रुजवणे अतिशय आवश्यक आहे व यासाठी त्यांना योग्य शिक्षण देऊन स्वावलंबी करणे महत्वाचे आहे.
मॅकलेच्या या विचारांत काही फारसे आक्षेपार्ह आहे असे मला तरी वाटत नाही. त्याने या बाबतीत इंग्लंडचेच दिलेले उदाहरण अगदी योग्य वाटते. पंधराव्या किंवा सोळाव्या शतकामधे, जेंव्हा इंग्लंडमधे सॅक्सन व नॉर्मन यांच्यातील लढाया चालू होत्या त्या कालात, ग्रीक व रोमन तत्ववेत्यांच्या विचाराचा अभ्यास इंग्लंडमधे चालू झाला. मॅकलेच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिश पंडितांनी इंग्लंडमधल्या जुन्या ग्रंथावरच फक्त लक्ष केंद्रित केले असते व ग्रीक किंवा रोमन तत्ववेत्यांचे विचार त्याज्य समजले असते तर इंग्लंडला सध्याच्या वैभवशाली परिस्थितीत येणे शक्यच झाले नसते. याच पद्धतीने भारताला पुढे समर्थ बनवायचे असले तर भारतीयांना सर्व आधुनिक शास्त्रे, तर्कशास्त्र, तत्वज्ञान यांचे ज्ञान प्राप्त करून दिले पाहिजे.
1835 मधे मॅकलेने ब्रिटिश संसदेसमोर एक छोटे वक्तव्य केले. या वक्तव्यात भारतावर अतिशय दूरगामी परिणाम होतील असे दोन महत्वाचे मुद्दे होते. त्यापैकी पहिला मुद्दा भारतात दिलेल्या शिक्षणाचे माध्यम कोणते असावे यासंबंधी आहे. हे माध्यम इंग्रजी भाषाच असले पाहिजे याबाबत मॅकले अतिशय आग्रही होता व त्याची कारणमीमांसा त्याने आपल्या भाषणात केली आहे. या भाषणातला दुसरा मुद्दा आपल्या प्रस्तुत लेखासाठी अतिशय महत्वाचा आहे. मेकॅले म्हणतो की आपल्या मर्यादित साधन संपत्तीत, इतक्या मोठ्या लोकसंख्येला शिकवणे आपल्याला अशक्य आहे. या कारणामुळेच आपण समाजामधे एक असा सुशिक्षित वर्ग तयार करण्याची गरज आहे की जो वर्ग आपण आणि आपण राज्य करीत असलेले कोट्यावधी लोक यांच्यामधे परस्पर संवाद साधू शकेल. समाजातील हा वर्ग पूर्णपणे भारतीय रक्ताचा व वर्णाचा असेल. परंतु त्याच्या आवडी-निवडी, मते, मॉरल्स, व बुद्धीमत्ता ही पूर्णपणे ब्रिटिश असतील. आपण नंतर या वर्गाकडे भारतातील भाषांमधे सुधारणा करणे, पाश्चिमात्य जगतातील शास्त्रीय कल्पनांनी त्या भाषा समृद्ध करणे व हळू हळू एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ज्ञान देऊ शकतील असा बदल त्यांच्यात घडवून आणणे ही कामे सोपवू शकतो. “
“ It is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.”
मेकॅलेच्या या भाषणावरून हे स्पष्ट होते की ब्रिटिश नोकरशाहीला मदत करतील असे लाचार व हांजीहांजी करणारे बाबू लोक फक्त तयार करेल अशी शिक्षण पद्धती निर्माण करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात कधीच नव्हती. परंतु सिंहाचा पुतळा करायला जावे व मांजर बनावे तसे इंग्रजांनी भारतात रूढ केलेल्या शिक्षण प्रणालीचे बहुदा शेवटी झाले असावे. मेकॅलेला अपेक्षित असा ब्राऊन साहेबांचा वर्ग समाजात निर्माण झाला खरा पण या वर्गाने समाजाचे अपेक्षित प्रबोधन न करता तो आत्मकेंद्री बनत गेला. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती नष्ट होऊन, मेकॅलेची ब्राऊन साहेब निर्माण करणारी शिक्षण पद्धती रूढ झाली. पण या पद्धतीचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांचे, मेकॅलेला अपेक्षित होते तसे, समाजातील इतर घटकाशी नाते असे काही राहिलेच नाही व समाजाभिमुख न होता हे शिक्षण घेतलेले तरूण फक्त नोकरशाहीतील बाबू बनू लागले. या शिक्षण पद्धतीत ज्ञानप्राप्ती हा उद्देश न राहता सरकारी नोकरीची पात्रता त्या विद्यार्थ्याला मिळवून देणे हाच त्या शिक्षण पद्धतीचा एकमेव उद्देश बनला. ही सरकारी नोकरीची पात्रता या विद्यार्थ्याला आली आहे किंवा नाही हे त्याची एक परिक्षा घेतली की समजत असल्याने शालान्त परिक्षेची कल्पना निघाली व संपूर्ण शिक्षण पद्धतीचे ध्येय ज्ञानप्राप्ती हे न राहता शालान्त परिक्षेचे प्रशस्तिपत्रक प्राप्त करून देणे हे झाले.
लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर वगैरे सारख्या राष्ट्रप्रेमी तरूणांना, मेकॅलेच्या सरकारी शाळांच्या शिक्षण पद्धती मधील ही तृटी लक्षात आल्यावर न्यू इंग्लिश स्कूल सारख्या शाळा निघाल्या. या शाळांच्यातून बाहेर पडणार्‍या तरूण वर्गाच्या कल्पना जरी थोड्याफार भिन्न असल्या तरी शालान्त परिक्षेचे जू या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर तसेच राहिले. मी प्राथमिक शाळेत व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले तो काळ पन्नासच्या दशकातला होता. स्वातंत्र्य मिळून थोडीच वर्षे झाली होती. त्यामुळे एकूण शिक्षण पद्धती बहुतेक इंग्रजांच्या कालातीलच होती. फार थोडे बदल झाले होते. तरीही सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबर तुलना केली तर मला हे जाणवते की 11वीच्या वर्षात जाईपर्यंत परिक्षेचे ओझे आमच्या खांद्यावर कधीच नव्हते. शालेय वर्षात 4 परिक्षा होत असत. परीक्षेच्या आधी आठवडाभर आणि वार्षिक परीक्षेच्या आधी पंधरा दिवस जादा अभ्यास केला की पुरत असे. प्रत्येक परिक्षेत खूप यश मिळवलेच पाहिजे अशी बहुदा कोणत्याच पालकाची अपेक्षा नसल्याने, बर्‍यापैकी गुण मिळाले की भागत असे. त्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, शाळेमधली वर्षे परीक्षेच्या ताणतणावांपासून मुक्त अशीच गेली. आमचे शास्त्र विषयाचे एक शिक्षक अतिशय रस घेऊन शिकवत. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे ते संपूर्ण निरसन करत. माझ्या आठवणीप्रमाणे या शिक्षकाच्या तासाची, शास्त्रासारखा नीरस विषय असूनही, आम्ही आतुरतेने वाट बघत असू. 11वीच्या वर्षात ज्या वेळेस, शास्त्रीय, भौगोलिक किंवा ऐतिहासिक कारणे द्या हे परिक्षेतले प्रश्न आमचा पीछा करू लागले त्या क्षणी या विषयांमधले आमचे कुतुहल संपल्यासारखे झाले.
कोणत्याही अर्भकाला आसमंतातील प्रत्येक गोष्टीबद्दल अपार कुतुहल किंवा जिज्ञासा असते. प्रथमत: ती गोष्ट हाताळून, त्याची चव घेऊन ते बालक त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या कल्पना ठरवते. याच पद्धतीचे कुतुहल शाळेत जाणार्‍या बालकालाही वाटत रहाते. या त्याच्या जिज्ञासेतूनच प्रत्यक्षात हे बालक ज्ञान प्राप्ती करत असते. त्या बालकाच्या नशीबाने त्याला एखादी चांगली शिक्षिका मिळाली तर अल्पावधीत ते बालक एवढे विपुल ज्ञान प्राप्त करू शकते की मन चकित होते. प्ले ग्रुप मधे शिकणार्‍या माझ्या नातीला मिस जून नावाची अशी एक शिक्षिका मागच्या वर्षी लाभली होती. त्या वर्षात तिचे सर्वसामान्य ज्ञान अक्षरश: मन स्तिमित करणार्‍या गतीने वाढलेले मला स्मरते.
शाळेत जाणार्‍या बालकांना परिक्षेचा गती रोधक एकदा लागला की त्यांची जिज्ञासा शिक्षक, पालक यांच्याकडून पद्धतशीर दाबली जाते. परिक्षेत विचारण्याची शक्यता आहे तेवढेच शिकणे. बाकीच्या गोष्टी बिनमहत्त्वाच्या! हे तत्वज्ञान मुलाच्या डोक्यावर बसलेच की प्रथम त्याची जिज्ञासा व त्या नंतर त्यातून होणारी ज्ञानप्राप्ती याला काही महत्त्वच उरत नाही. पुण्यात शिकत असलेल्या माझ्या नातवंडांच्या सुदैवाने, इयत्ता 5वी पर्यंत त्यांना परिक्षा द्यावीच लागणार नाहीये. परंतु परिक्षेचे ओझे या छोट्या मुलांच्या खांद्यावरून उतरवून टाकणार्‍या अशा शाळा विरळाच आहेत. इतिहास किंवा भूगोल हे शाळेत बहुतेकांना अत्यंत अप्रिय वाटणारे विषय, प्रत्यक्षात किती रोचक आहेत हे जिज्ञासा दाबली गेलेल्या या मुलांना दुर्दैवाने कधी कळतच नाही.
मेकॅलेच्या बाबू तयार करणार्‍या शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गेल्या पन्नास साठ वर्षात अनेक प्रयत्न करण्यात आले व चालू आहेत. परंतु प्रत्यक्षात असे दिसते की मुलांच्या डोक्यावरचे परिक्षांचे ओझे वाढतच चालले आहे. आमच्या वेळच्या चार परिक्षा सध्या आहेतच पण त्यात आता युनिट टेस्ट्स अधिक आल्या. प्रत्येक मुलाने परिक्षेत टोकाचे सुयश मिळवलेच पाहिजे या पालकांच्या दुराग्रहामुळे शाळेबरोबर शिकवण्या, क्लासेस सुरू झाले. या क्लासेसच्या परिक्षा सुरू झाल्या. त्या शिवाय शिष्यवृत्ती परिक्षा, जैन गणिताच्या परिक्षा, मुलांच्या डोक्यावरचे ओझे वाढतेच आहे.
शालान्त परिक्षेत गुण न देता फक्त ग्रेड देणे किंवा प्राथमिक शाळेतील मुलाला ते उत्तीर्ण कसे होईल हे बघणे या सारख्या सुधारणा नक्कीच स्वागतार्ह आहेत. परंतु या परिक्षांमुळे मुलांच्या ज्ञानजिज्ञासेचे जे खच्चीकरण होते आहे त्यात काहीतरी सुधारणा झाल्याशिवाय शालेय शिक्षणाचा मुलाच्या मनात ज्ञानाची एक बैठक निर्माण करण्याचा जो मूळ हेतू आहे तो कधीच साध्य होणार नाही असे मला वाटते. ही मूळ बैठकच जर मनात तयार नसली तर त्या बैठकीवरून आपली सृजनशीलता वापरून तो विद्यार्थी पुढचे उड्डाण करणार तरी कसा? आणि कधी?
2 मे 2010

Saturday, 18 October 2014

मिड डे वंडर

काळची वर्तमानपत्रे वाचली की अलीकडे बर्‍याच वेळा माझे मन अगदी उद्विग्न होऊन जाते. राजकारणी मंडळींनी स्वत:च्या स्वार्थासाठी एकूणच जी देशाची, महाराष्ट्राची आणि माझ्या शहराची म्हणजे पुण्याची ससेहोलपट चालवली आहे ते बघून मन उदासीन होते. आता पुण्याचेच उदाहरण घ्या. गेल्या वीस वर्षात पुण्याची लोकसंख्या बेसुमार वाढत चालली आहे. जिकडे तिकडे मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. पण या लोकसंख्येसाठी ज्या नागरिक सुविधा तयार केल्या गेल्या पाहिजेत त्यांच्याबद्दल नुसत्या चर्चा आणि आश्वासने याच्या पलीकडे काही घडतच नाही. पुण्यात जे काही अजून चांगले उरले आहे ते म्हणजे हवा व पाणी. पण या गोष्टी देवदत्त आहेत. आमच्या नशीबाने, राजकारणी मंडळींना त्यांचा खेळखंडोबा करणे अजून तरी जमलेले नाही. बाकी वीज, कचरा उचलणे, स्थानिक ट्रान्सपोर्ट, वाहतुक शिस्त वगैरेबद्दल बोलणेच नको.
मात्र एखाद्या वेळी असे काहीतरी वाचनात येते किंवा टीव्ही वर बघण्यात येते की मनाची उदासीनता वगैरे पार पळूनच जाते. आज असेच झाले. एक फोटो बघण्यात आला. हा फोटो होता एका छोट्या व शाळेत जाणार्‍या मुलाचा. वय असेल आठ किंवा नऊ. या मुलाच्या हातात होती एक थाळी. या थाळीत तो आपल्या शिक्षकांच्याकडून वरण भात वाढून घेत होता. त्याच्या मागे त्याच्या वर्गातली अशीच तीस चाळीस मुले रांगेत उभी होती. प्रत्येकाच्या हातात थाळी होतीच. या मुलाच्या चेहर्‍यावरचे जे भाव कॅमेर्‍याने टिपले होते ते मात्र लाजवाब होते. त्याच्या चेहर्‍यावर लाजिरवाणा, दीनवाणा असा काहीही भाव तर अजिबात नव्हताच. तर रोज वेळच्या वेळी दोन घास पोटात जाण्याची खात्री असलेल्या मुलाच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास व भविष्याबद्दलची खात्री मला त्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.


हा फोटो होता संपूर्ण देशभर कार्यान्वित असलेल्या Mid-day Meal या स्कीममधल्या मुलांच्या जेवणाचा. शाळेत आलेल्या मुलांच्या पोटात मध्यान्ही व भुकेच्या वेळी गरमागरम व पौष्टिक अन्नाचे चार घास जावे या उद्देशाने ही स्कीम सुरू केली गेली आहे. कोणत्याही सरकारला किंवा राजकारण्याला या स्कीमबद्दल कणाचे सुद्धा श्रेय घेणे शक्य नाही कारण ही स्कीम चालू केली गेली आहे भारताच्या सर्वोच्य न्यायालयाच्या 2001 साली काढलेल्या एका आदेशानुसार.
हा Mid-Day Meal कार्यक्रम या प्रकारचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. देशभरात मिळून तब्बल 14 कोटी मुले या स्कीमचा लाभ रोज घेत आहेत. मध्यवर्ती सरकारला या स्कीमसाठी एक हजार कोटी रुपये तरी खर्च करावे लागत आहेत. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की यातल्या कित्येक मुलांना दिवसभरात हेच एक असे जेवण मिळते आहे की जे पोटभर व पौष्टिक आहे. सर्वप्रथम हा कार्यक्रम तामिळनाडू मधे राबवला गेला होता. सुरवातीला वाटले होते की हा कार्यक्रम म्हणजे निवडणुकीसाठी जशा अनेक पोकळ घोषणा होतात त्यातलीच एक असेल. परंतु तो चालू केला गेला व त्याचे होणारे फायदे लगेचच लोकांच्या लक्षात येऊ लागले व इतर राज्यांनीही तो चालू केला. यानंतर एका सार्वजनिक हित याचिकेवर निकाल देताना सर्वोच्य न्यायालयाने हा कार्यक्रम देशभर चालू करावा म्हणून आदेश काढला.
कर्नाटक राज्यात अनेक खाजगी संस्थाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. त्या राज्यात या कार्यक्रमाला अक्षयपात्रअसे नाव दिले गेले आहे. ‘अक्षयपात्रकार्यक्रमाच्या अंतर्गत साडेअकरा लाख मुलांच्या पोटात रोज दुपारी गरम अन्न जाते आहे.


एका आंतर्राष्ट्रीय अभ्यासाप्रमाणे, भारतात होणार्‍या निम्म्या पाच वर्षांखालील बालमृत्यूंचे मुख्य कारण कुपोषण हेच असते. Mid-Day Meal कार्यक्रमामुळे या कुपोषित व गरीब मुलांना निदान एका वेळचे तरी पौष्टिक जेवण मिळू शकते आहे. या कार्यक्रमाचे आणखीही काही फायदे लक्षात आले आहेत. शाळेतली सर्व मुले, अगदी दलित मुलांसह, हे जेवण एकत्र बसून घेतात. त्यामुळे या मुलांच्या मनातले उंच, नीच, गरीब, श्रीमंत असे भेदभाव आपोआपच नष्ट होताना दिसत आहेत. या शिवाय दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्यातील मुलांचे पालक, मुलांना चांगले जेवण मिळते म्हणून त्यांना शाळेत पाठवायला आता तयार असतात. या पूर्वी हेच पालक मुलांना काहीतरी कामधंद्याला पाठवत असत. मुलींच्या बाबतीत तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली आहे. या कार्यक्रमामुळे मुलांना शाळा आवडू लागली आहे. पोट व्यवस्थित भरलेले असल्याने ती मुले अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ लागली आहेत व त्यांचे आरोग्यही सुधारते आहे.


जेवणाचा मेन्यू हा त्या त्या राज्यामधल्या खाण्याच्या सवईनुसार बदलतो. दक्षिण भारतात भात हे मुख्य अन्न दिले जाते. महाराष्ट्रात खिचडी देतात तर काही उत्तरेकडची राज्ये रोटी देतात. अर्थात कोणत्याही सरकारी कार्यक्रमासारखा थोडेफार गैरव्यवहार या कार्यक्रमातही उघडकीस आले आहेत. काही ठिकाणी भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत या शिवाय धान्य चोरून विकणे, जेवणाबरोबर अस्वच्छ पाणी पिण्यास देणे हे प्रकारही सापडले आहेत. एका ठिकाणी तर मुलांना जेवणाने विषबाधाही झाल्याचे आढळले आहे.
सर्वोच्य न्यायालयाने हा कार्यक्रम नीट चालावा या साठी बिनसरकारी व NGOकमिशनर्सची नेमणूक केली आहे. हे कमिशनर्स सर्वोच्य न्यायालयाला आपला अहवाल देतात. या पद्धतीमुळे हा कार्यक्रम इतर सरकारी कार्यक्रमांच्या पेक्षा बर्‍याच जास्त प्रभावी पद्धतीने राबवला जातो आहे असे दिसते.

19 मार्च 2010 

खरेखुरे सुपरस्टार्स

कल्पना करा की तुम्ही अतिशय कंटाळलेल्या किंवा वैतागलेल्या अवस्थेत तुमच्या घरात शिरत आहात. हॉलमधे तुम्हाला टीव्ही चालू दिसतो त्यावरून तुम्हाला आरडाओरडा व किंचाळ्य़ा ऐकू येतात. तुम्ही नक्की घरातल्या मंडळींच्यावर चिडून, काय त्रास आहे म्हणून टीव्ही बंद करण्यासाठी रिमोट हातात घेता. पण समोर नजर टाकल्यावर, टीव्हीवर जे चित्र दिसते आहे ते बघितल्यावर तुमच्या चेहर्‍यावरची चीड, वैताग, जादूची कांडी फिरवल्यासारखी गायब होते व तिथे मनमोकळे हास्य उमटते. तुम्ही असाल तसेच व तिथेच थबकता. हातातला रिमोट खाली ठेवून देता. टीव्हीवर समोर दिसणार्‍या दोन खर्‍याखुर्‍या सुपरस्टार्सना, तुम्ही पूर्वी शे पाचशे वेळा तरी बघितलेले असते. त्यांचा सध्या चालू असलेला शो सुद्धा तुम्ही तेवढ्याच वेळा बघितलेला असतो. तरीसुद्धा परत एकदा तेवढ्याच तल्लीनतेने तुम्ही त्या शो मधे परत एकदा गुंगून जाता, बुडून जाता.
या वर्णनावरून हे सुपरस्टार्स कोण असावेत? याचा अंदाज बांधणे काही फारसे कठिण नाही. असे म्हटले तरी चालेल की परंतु यासम हे‘, असे दोनच सुपरस्टार आतापर्यंत निर्माण झाले आहेत आणि या दोघांच्या शिवाय आणखी कोणी परत निर्माण होतील असे वाटत नाही. या वर्षी या दोन सुपरस्टार्सना ते चलच्चित्र पडद्यावर प्रथम अवतीर्ण झाले त्याला तब्बल सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे एका अर्थाने आपले लाडके टॉम व जेरी यांचा या वर्षी सत्तरावा वाढदिवसच आहे. एखाद्या दीड ते दोन वर्षाच्या बाळापासून ते कानाने काहीही ऐकू न येणार्‍या व अंधुक अंधुक दृष्टी असणार्‍या नव्वदीतल्या आजींपर्यंतच्या सर्वांवर, आपली मोहिनी टाकणारे हे दोन सुपरस्टार्स खरोखर अजरामजरच आहेत.


टॉम व जेरी रुपेरी पडद्यावर 1940 साली पहिल्यांदा अवतीर्ण झाले. हॉलीवूड मधल्या MGM या स्टुडियो साठी William Hanna and Joseph Barbera या दोन प्रोड्युसर्सनी प्रथम या दोन कार्टून व्यक्तीरेखा निर्माण केल्या. त्या लवकरच इतक्या लोकप्रिय झाल्या की पुढच्या एकोणीस वर्षात म्हणजे 1959 सालापर्यंत या दोघांनी मिळून तब्बल 114 टॉम व जेरीच्या कार्टून फिल्म्स तयार केल्या. यानंतर पूर्व युरोपमधे व परत हॉलीवूडमधे मिळून थोड्याफार फिल्म्स तयार केल्या गेल्या. आज एकूण 161 टॉम व जेरीच्या फिल्म्स अस्तित्वात आहेत.


मांजर व उंदीर यातल्या चिरंतन भांडणाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या कार्टून व्यक्तीरेखांना थोडेफार निराळे व्यक्तीमत्व आहे. टॉम मांजर आपल्या शक्तीच्या जोरावर, जेरीवर कुरघोडी करण्याच्या सतत प्रयत्नात असतो पण आपल्या अफाट बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर जेरी उंदीर टॉमचे प्लॅन्स नेहमीच उधळून लावण्यात यशस्वी होतो. आपल्या लढाईसाठी दंडुक्यापासून ते तोफगोळ्यापर्यंतचे कोणतेही हत्यार त्यांना चालते. त्या लढाईत घर उध्वस्त होते, रस्ते उखडतात. या लढाईसाठी दोघेही दुष्टपणाचे प्रथम क्रमांकाचे जागतिक पारितोषिक मिळू शकेल अशा क्लुप्त्या सतत लढवत असतात. या क्लुप्त्यांमुळे या फिल्म्समधे प्रचंड व्हायोलन्स दिसतो अशी काही लोकांची तक्रार असते. पण कोणत्याही लहान मुलाला या व्हायोलन्सचे काहीच सोयर सुतक वाटलेले मी कधीच बघितलेले नाही. उलट ती मुले नेहमीच अशी दृष्ये कमालीची एन्जॉय करताना दिसतात.


या फिल्म्स्मधे काही इतर पात्रेही दिसतात. त्यापैकी एक म्हणजे फिल्ममधे फक्त बूट व पाय दिसणारी टॉमची मालकीण. या मालकीणीला टॉम कमालीचा घाबरतो. बर्‍याच फिल्म्समधे, जेरीच्या उद्योगांमुळे मालकीणीने टॉमला घरातून हाकलून दिलेले दिसते. या शिवाय स्पाईक किंवा किलर या नावाचा एक बुलडॉग काही फिल्म्समधे दिसतो. हा कुत्रा मठ्ठपणाचा आदर्श समजावा. त्याचे अर्थातच टॉमशी हाडवैर असते. त्याला फसवण्याचा टॉमचा प्रयत्न अनेक फिल्म्समधे दिसतो तर त्याला वापरून टॉमवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात जेरी नेहमीच असतो. या सर्व फिल्म्सना परिणाम साधण्यासाठी संगीत व आवाज घातलेले असतात. प्रत्यक्षात टॉम व जेरी कधीच काही बोलत नाहीत. मात्र काही वेळेला प्रसिद्ध गाणी पार्श्वसंगीत म्हणून वापरलेली आढळतात. ” ऑलिव्हेत्त, जन्तील, ऑलिव्हेत्त!” हे असेच एका फिल्ममधले मला आठवणारे गाणे. टॉम व जेरी यांच्यात तुंबळ युद्ध नेहमीच चालू असले तरी फिल्मच्या टायटलमधे ते दोघे एकमेकाकडे हसून बघताना दिसतात. कोणी कॉमन शत्रू आला की दोघे मिळून त्याचा निप्पात करतात. एका फिल्ममधे तर टॉम जखमी झाला म्हणून जेरी त्याला फर्स्ट एड देताना दाखवला आहे.
मी टॉम व जेरीला प्रथम बघितले ते 16 मिमि च्या फिल्ममधे. भिर्र भिर्र आवाज करत चालणार्‍या प्रोज़ेक्टर्सवरून या फिल्म तेंव्हा दाखवल्या जात. आज आपण डीव्हीडी प्लेयर्समुळे या फिल्म्स घरी कधीही बघू शकतो. दृष्य माध्यम कोणतेही असले तरी फिल्म्सची गोडी तशीच अवीट राहली आहे याबद्दल वादच नाही.
माझ्या चार वर्षाच्या नातीला, जेवताना टॉम ऍन्ड जेरी हे लागतातच. समोर या दोघांची धावपळ चालू असली की जेवण कसे बिनबोभाट, कोणतीही खळखळ न होता पार पडते. पण एवढे मात्र खरे की नात जेवायला लागली की आजी आजोबांची पाउले हातातले काम टाकून आपसुकच हॉलकडे वळतात. कोणाच्या लक्षात येण्याच्या आधीच ते दोघेही कोचावर हळूच विराजमान होतात व नातीच्या जोडीने टॉम व जेरीबरोबर हसू खिदळू लागतात.

14 मार्च 2010

स्वप्न उद्याचे

एखाद्या प्रथितयश डॉक्टरांच्या मुलाने आपण मोठेपणी डॉक्टर होणार म्हणून सांगितले किंवा एखाद्या बड्या सरकारी अधिकार्‍याच्या मुलीने मोठेपणी सरकारी अधिकारी बनण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. ही मुले आपल्या आई-वडीलांच्या पाठबळावर, पैशांच्या आणि इतरही, आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करतीलच. या बाबत माझ्या मनात तरी संदेह नाही. परंतु दिवसभर रस्त्यावरचा कचरा, फाटके तुटके कागद वेचून, दिवसाकाठी चाळीस ते पन्नास रुपये कमावणार्‍या एखाद्या महिलेच्या मुलांनी जर असे काही मोठेपणाचे स्वप्न पाहिले तर किती लोक त्यावर विश्वास ठेवतील? बहुतेक वेळा त्यांची हेटाळणीच होण्याची शक्यता जास्त.
पुण्यातल्या या कचरा वेचणार्‍या महिलांची एक संघटना आहे. या संघटनेचे नाव आहे, कागद कांच पत्रा कष्टकरी पंचायत‘. या संघटनेने पुण्यामधे नुकताच या कचरा वेचणार्‍या आई-वडीलांच्या मुलांसाठी एक बाल-मेळा आयोजित केला होता. या मेळाव्याला तब्बल अडीचशे ते तीनशे मुले उपस्थित राहली होती. या मुलांच्यापैकी जी 13 वर्षे वयाच्या खाली होती त्यांना या मेळाव्याच्या आयोजकानी तुम्हाला मोठेपणी कोण व्हावेसे वाटते“? असा एक प्रश्न विचारला होता व त्याचे उत्तर लेखी द्यायला सांगितले होते. 230 मुलांनी उत्तर दिले. त्यापैकी 120 मुलांना डॉक्टर किंवा पोलिस व्हायचे आहे. बाकीच्या मुलांना शिक्षक, इंजिनीयर किंवा पायलट व्हायचे आहे.


या संघटनेच्या एक सभासद श्रीमती लक्ष्मी नारायण यांनी मुलांच्या या प्रतिसादाबद्दल जो खुलासा केला आहे तो माझ्या मते खूप महत्वाचा आहे. त्यांच्या मताने या मुलांच्या एकूण विचारसरणीतच आता खूप मोठा बदल झाला आहे आणि या बदलाचे प्रमुख कारण या मुलांना आता शालेय शिक्षणापासून वंचित रहावे लागत नाही हेच आहे. ही मुले काही शिशुवर्गातील नाहीत. ती शाळेत जाणारी मुले आहेत आणि आपल्या पालकांच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव आहे. अतिशय वाईट अशा गरिबीतूनच ही मुले वर आली आहेत, त्यांना शिक्षण क्षेत्रात असलेल्या जीवघेण्या स्पर्धेची आणि येणार्‍या प्रचंड खर्चाचीही कल्पना आहे आणि तरीही हे विशेष आहे की ही मुले पहात असलेली स्वप्ने, व या मुलांच्या आशा आकांक्षा या इतर दुसर्‍या सधन पालकांच्या मुलांसारख्याच आहेत. नम्रता या मुलीने या मेळाव्याच्या वेळी एक भाषण केले. तिचे भाषण या मुलांच्या भावनांचे प्रातिनिधिक ठरावे असे मला वाटते. ती म्हणाली की माझी आई रस्त्यावरचा कचरा गोळा करते. पण मी शाळेत जावे म्हणून ती नेहमीच आग्रही असते. रस्त्यावर कोठेही कोरे किंवा पाठकोरे कागद किंवा टाकून दिलेल्या वह्या मिळाल्या की ती ते कागद किंवा वह्या मला गृहपाठ करता यावा म्हणून घरी घेऊन येत असे. मी माझे शिक्षण पूर्ण करून शिक्षक होणार आहे.”
या कचरा वेचणार्‍यांची कागद कांच पत्रा कष्टकरी पंचायत‘. ही संघटना पूर्णपणे या लोकांच्या पैशांतूनच उभी राहिलेली आहे. या संघटेनेचे पुण्यात 3500 सभासद आहेत व दर वर्षी प्रत्येक सभासद 25 रुपये वर्गणी देतो. या संघटेनेचे स्वत:चे भंगार खरेदी विक्रीचे दुकान असल्याने सभासद महिलांनी वेचलेल्या कचर्‍याला चांगला भाव मिळतो. 1997 मधे या पंचायतीने पतपेढी सुरू केली. सभासदाने दर महिन्याला 50 रुपये अशा पद्धतीने 6 महिन्यासाठी पैसे भरले की अडीअडचणीला तो सभासद त्याने भरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम 2% व्याजाने कर्ज म्हणून घेऊ शकतो.
ही संघटना सभासद महिलांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी सतत प्रयत्नशील आहे. हा बाल-मेळावा या प्रयत्नांचाच एक भाग होता.या संघटनेच्या पाठबळावर सभासद कचरा वेचणार्‍या महिला निदान आपल्या मुलांच्या बाबतीत तरी भविष्यकालातील स्वप्ने खासच बघू लागल्या आहेत. या बाल मेळाव्याला आलेल्या काही मुलांनी तर हवाई सुंदरी, गायक, कलाकार, समाज सेवक, संगणक तज्ञ, सैनिक, वकील, शेतकरी, नर्तकी आणि बॉक्सर यासारखे व्यवसाय करणार असेही सांगितले.
एक दोन मुलांनी तर आपण चांगला माणूस बनणार किंवा महत्वाची व्यक्ती बनणार असे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. स्वत: अशिक्षित असून आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी एवढी तळमळणारी आई मिळाल्यावर कोणते मूल तिची इच्छा पूर्ण करणार नाही? ही मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी किंवा व्यवसाय करतीलच. माझी तर याबद्दल खात्रीच झाली आहे.

25 फेब्रुवारी 2010

Wednesday, 8 October 2014

मुलांना सर्वात जास्त आवडणारे बक्षिस

गेले काही दिवस वर्तमानपत्रांतून सतत लहान मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मनाला अतिशय क्लेशदायक अशा या बातम्यांमागे मुख्य सूत्र आहे ते या मुलांच्या मनावर आलेल्या अभ्यासाच्या दडपणाचे. ज्या वयात मनसोक्त खेळायचे आणि मजा करायची त्या वयात ही मुले अभ्यासाच्या, परिक्षेतील यश-अपयशाच्या, तणावाखाली अक्षरश: दबून,चिरडून गेलेली आहेत.
तसे बघायला गेले तर आता परिक्षा पद्धती कितीतरी सुलभ झालेली आहे. चौथी, पाचवी पर्यंत तर अनेक शाळांच्यात परिक्षाच नसतात. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमही सर्वसाधारण मुलांना समजेल उमजेल असेच बनवले जात आहेत. तसेच शिक्षण झाल्यावर पुढे व्यवसायाची इतकी अनेक क्षेत्रे उपलब्ध होत आहेत की एखाद्या परिक्षेतील अपयशावर तुमचे पुढचे संपूर्ण व्यावसायिक आयुष्य अवलंबून असण्याचे दिवस केंव्हाच मागे पडले आहेत. आता हे मात्र खरे की प्रत्येक क्षेत्रात प्रचंड व जीवघेण्या स्पर्धेला प्रत्येकालाच तोंड द्यायला लागते आहे. पण आयुष्यात यश मिळवायचे असले तर या गोष्टींना सामोरे जायलाच लागते. त्यापासून लांब पळून जाऊन कसे चालेल? पन्नास वर्षांपूर्वी मी माझी विद्यार्थीदशा आठवतो तेंव्हाचे चित्र काही फारसे निराळे नव्हते. आम्हालाही अशाच प्रकारच्या स्पर्धेला तोंड द्यायला लागले होते. किंवा वीस वर्षांपूर्वी माझी मुले जेंव्हा आपल्याला हवे ते शिक्षण किंवा व्यवसाय निवडण्यासाठी धडपडत होती तेंव्हाचेही चित्र काही फारसे निराळे नव्हते. स्वत: एक धडपडणारा तरूण म्हणून किंवा स्वत:च्या मुलांची धडपड पहाणारा पालक म्हणून, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही फेज मी चांगलीच अनुभवली आहे.

मग मनाला असा प्रश्न पडतो की आताच असे काय घडले आहे की ज्या योगे हे तरूण किंवा लहान मुले आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत? आताच्या काळात एक लक्षणीय फरक मात्र माझ्या मनाला नक्कीच जाणवतो आहे. तो फरकच या मुलांना आत्महत्येकडे घेऊन जातो आहे का? मला जाणवणारा हा मुख्य फरक म्हणजे लहान मुलांना घरातून मिळणार्‍या पाठिंब्याचा (Support Systems) आता असलेला संपूर्ण अभाव. मला काय म्हणायचे आहे ते सांगायला थोड्या जास्त खुलाशाची गरज आहे.

अलीकडे बहुतेक घरांच्यात, आई आणि वडील दोघेही कामावर जातात. आर्थिक गरज आणि जास्त चांगली जीवनशैली जगण्याची धडपड या दोन्ही कारणांमुळे हे आवश्यक बनले आहे. घरात येणार्‍या दुहेरी उत्पन्नामुळे घरात सर्व आधुनिक सुखसोयी येतात हे जरी खरे असले तरी त्या घरातील मूल किंवा मुले यांना आधारासाठी कोणीच रहात नाही. संध्याकाळी आई-वडील अतिशय दमून थकून घरी येतात. संध्याकाळी घरगुती कामे करावीच लागतात व या नंतर मुलांच्या (त्यांच्या दृष्टीने फालतू) अडचणी व व्यथा सोडवायला त्यांना वेळही नसतो व उत्साहही नसतो. पाठिंबा दुरावलेली मुले एकांडी बनत जातात.

अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी सुद्धा घरात आजी-आजोबा, किमान पक्षी आजी किंवा आजोबा हे असतच. आई-वडील जरी कामावर गेलेले असले तरी आजी- आजोबांचा संपूर्ण किंवा कदाचित थोडा जास्तच पाठिंबा मुलांना मिळत असे. एखादे अपयश किंवा अडचण ही संपूर्ण आयुष्याचा विचार करता किती क्षुद्र आहे हे आजी-आजोबा मुलांना छान पटवून देऊ शकत. एखाद्या अपयशाने नाउमेद होण्यासारखे काही नाही हे मुलांच्या मनावर ठसत असे. आता बहुतेक आधुनिक घरांत चौकोनी किंवा आता तर त्रिकोणी कुटुंबे दिसतात. त्यात आजी आजोबांना स्थानच नसते. आजी-आजोबांच्याबरोबर, नातवंडांना ते देत असलेला पाठिंबाही घरातून जातो.

आई-वडीलांनी घरात आणलेल्या पैशांमुळे घरात आर्थिक सुबत्ता येते हे खरेच आहे. या पैशामुळे ते मुलांना सर्वात उत्कृष्ट दर्जाचा सुखसोयी, खेळणी देऊ शकतात. त्यांना हवे तेथे ते पाठवू शकतात. आपल्या आर्थिक सुबत्तेच्या असलेल्या या खुणा आपण मुलांना दिल्या की आपण त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम व आस्था व्यक्त केली आहे असे पालकांना वाटते व ते एका पातळीपर्यंत खरेही असते. परंतु मुलांना या पुढेही काहीतरी आधिक पालकांच्याकडून हवे असते. ते म्हणजे आई-वडीलांचे प्रेम आणि हे प्रेम मुलांना फक्त आई-वडीलांच्या सहवासातूनच मिळू शकते. त्यांनी कितीही खेळणी सुखसोयी आणल्या तरी त्यातून नाही.

बहुतेक आई-वडीलांना असे वाटते की आपली मुले यामुळे जास्त स्वतंत्र बनतील व जगातील टक्के-टोणपे खायला जास्त योग्य बनतील. परंतु सत्य काही निराळेच असते. आई-वडील मिळेनासे झाले की मुले आधार बाहेर शोधू लागतात. तो योग्य मिळाला तर गाडे ठीक चालते. नाहीतर मात्र सर्व बिनसत जाते. मुले बिघडत गेली किंवा नैराश्येच्या गर्तेत गेली की मग आई-वडील जागे होतात पण तेंव्हा फार उशीर झालेला असतो.

या परिस्थितीवर उपाय तरी काय? सध्याच्या महागाईच्या आणि वाढलेल्या अपेक्षांच्या काळात आई घरी तर बसू शकत नाही. तिच्या स्वत:च्या आपल्या करियर बद्दल अपेक्षा असतात. तिलाही आयुष्यात काहीतरी करायचे असते. त्यामुळे या परिस्थितीत मार्ग एकच आहे. आई-वडीलांनी आपला जास्तीत जास्त रिकामा वेळ मुलांसमवेत घालवणे. तुमचे मित्र मैत्रिणी, सोशल कार्यक्रम, करमणूक व टी.व्ही, सगळे काही थोड्या वर्षांसाठी पुढे ढकलले तरी काहीच बिघडत नाही. आई-वडील जितका क्वालिटी टाईम मुलांना देऊ शकतील तेवढा त्यांना तो आवश्यकच आहे. मुलांना परत घरात पाठिंबा मिळू लागला की बाहेरच्या जगातली जीवघेणी स्पर्धा, आयुष्यातली किरकोळ अपयशे, सर्व काही ती समर्थपणे पेलू शकतात.

एकदा मुले मोठी झाली, स्वतंत्र झाली की होतातच आई-वडील मोकळे! त्यांच्या रुचीप्रमाणे त्यांचे स्वत:चे आयुष्य घालवायला.



11 जानेवारी2010

Tuesday, 16 September 2014

भय इथले संपत नाही!

साधारण एका महिन्यापूर्वी, चीनच्या हूनान प्रांतातल्या एका गावातल्या 1300 मुलांना, रक्तात शिशाचे प्रमाण जास्त झाल्याने, विषबाधा झाली होती. त्या गावात असलेल्या एका मॅन्गनीज शुद्धीकरण कारखान्यामुळे ही विषबाधा झाली होती असे आढळल्यावर, हा कारखाना बंद करण्यात आला होता.

ALeqM5j6WUlyTxJPeEPs6vzC7AD-yd0pgw


या घटनेला महिना व्हायच्या आतच, चीनमधील अग्नेय दिशेला असलेल्या फुजियान प्रांतातल्या, लोंजयान शहराजवळच्या, जिओयांग गावातल्या 121 मुलांना अशीच विषबाधा, रक्तात शिशाचे प्रमाण आधिक असल्याने झाली आहे. या खेपेस ही विषबाधा या गावामधल्या ‘हुचिआंग बॅटरी फॅक्टरी’ (Huaqiang Battery Factory) मुळे झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विषबाधा झाल्याचे कळल्यावर गावकरी संतप्त झाले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली. गावातील सर्व दुकानांनी कडकडीत हरताळ पाळला. हे झाल्यावर तेथील जिल्हा अधिकारी जागृत झाले व त्यांनी ही फॅक्टरी बंद केली आहे. ही फॅक्टरी सरकारने बंद केली नाही तर आपण गाव सोडून जाऊ अशी धमकी सर्व गावकर्‍यांनी  अधिकार्‍यांना दिली आहे.या फॅक्टरीच्या जवळपासच्या गांवामधल्या शाळांमधली उपस्थिती पूर्ण रोडावली आहे.

_46451586_china_longyan0909


सरकारने या भागातल्या सर्व 14 वर्षांखालच्या मुलांची रक्त तपासणी मोफत करून देण्याचे मान्य केले आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर सरकारने ताबडतोब सुरू करावेत असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन महिन्यात झालेली ही तिसरी घटना आहे. जलद गतीने, नियोजन न करता आणि प्रदुषण व पर्यावरणाची हानी याकडे काटेकोरपणे लक्ष न देता, केलेल्या उद्योगीकरणाचे किती भयानक दुष्परिणाम होऊ शकतात याच्या, या तिन्ही घटना साक्षीदार आहेत. पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी सर्व प्रगत राष्ट्रांना, अशा प्रकारचे प्रदुषण निर्माण करू शकणार्‍या उद्योगधंदे, त्यांच्या देशात चालवण्यातले धोके लक्षात आले व त्यांनी सर्व प्रदुषणकारी उद्योग विकसनशील देशांमधे हलवण्याचे धोरण स्वीकारले. नवीन उद्योगधंद्यांना मुक्त वाव देण्याचे चिनी सरकारचे धोरण असल्याने, असे अनेक उद्योग चीन मधे आले. या उद्योगधंद्यांना परवाने देताना पर्यावरण, प्रदुषण या सारख्या बाबींची पूर्तता, फक्त कागदोपत्रीच झाली असावी. प्रत्यक्षात अधिकार्‍यांचे हात ओले करून आपल्याला पाहिजे तशी मनमानी या उद्योगधंद्यांनी केली असावी.

चीन मधले उद्योगीकरण आता इतके बेसुमार वाढले आहे की त्यामुळे त्या देशाच्या पर्यावरणाची होणारी हानी वाढत चालली आहे. या पर्यावरण हानीनेच चिनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका संभवतो आहे.


28 सप्टेंबर 2009

Monday, 15 September 2014

पैसे बाळांच्या जन्मासाठी!

भारताच्या लोकसंख्येला सध्या जरी मानवी भांडवल(Human Capital) किंवा एक ऍसेट(Asset) असे मानले जात असले, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत देशासमोरच्या सर्व समस्यांचे मूळ, अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे असेच मानले जाई. सरकारी प्रचारमाध्यमे मोठ्या प्रचारमोहिमा राबवत असत. “हम दो हमारे दो” या सारख्या घोषणा लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला जाई. संततीप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणार्‍यास रोख रक्कम देण्यात येत असे. या सगळ्या मोहिमांचा कितपत उपयोग झाला हे सांगणे कठिण आहे. परंतु आज निदान सुशिक्षित शहरी लोकांच्यात तरी, आपले कुटुंब लहान असावे याची काळजी घेतली जाते.
मला वाटते की ही जाण लोकांच्यात येण्याचे सर्वात प्रमुख कारण, आर्थिकच आहे. आपल्या उत्पन्नाप्रमाणे जर आपण आपले कुटुंब नियोजित केले नाही तर कुटुंबातल्या सर्वांनाच आर्थिक दुर्बलता येते. त्याच प्रमाणे रहाती लहान घरे, जास्त मुले झाल्यास त्यांना चांगले शिक्षण देता येणार नाही, या सारखी इतर कारणे आहेतच. या सर्वामुळे आज शहरी भागांच्यात तरी दोनपेक्षा जास्त मुले असलेली कुटंबे सहसा आढळत नाहीत. अगदी नवीन ट्रेंड तर एकच मूल होऊ देण्याचा दिसतो आहे.

भारतासारख्या प्रगतीशील देशात सुद्धा ही जाण आली असली तर जपान सारख्या अतिशय प्रगत राष्ट्रात ती असणार यात काहीच शंका नाही. जपानमधल्या एखाद्या सर्वसाधारण मुले असलेल्या कुटुंबाच्या रहाणीचा जर अभ्यास केला तर मुले वाढवणे जपानमधे आर्थिक आणि कष्ट या दोन्ही बाबतीत किती अडचणीचे होत चालले आहे याची कल्पना येते. जपानमधले जीवनमान अतिशय उच्च दर्जाचे असल्याने, ते टिकवण्यासाठी व कुटुंबातील सर्वांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी खर्चही तसाच येतो व तो खर्च भागवण्यासाठी, जपानी पुरुष व स्त्रिया या दोघांनाही अमाप कष्ट करावे लागतात. रोज 14 तास घराबाहेर घालवणारे अनेक असे स्त्री-पुरुष दिसतात. शहरी भागातील घरे अतिशय लहान असतात. त्यात चार पाच माणसांचे कुटुंब रहात असल्यास अतिशय अडचणीचे होते. या शिवाय मुलांना चांगल्या शाळा व पाळणाघरे मिळवणे आवश्यक असते व यासाठी जपानी माता-पित्यांना झगडावे लागते.

JapaneseBaby


या सगळ्या कारणांनी जपानमधला जन्म दर आता 1.34 प्रति माता, एवढा खाली घसरला आहे. आहे ती लोकसंख्या टिकवण्यासाठी हा जन्मदर किमान 2.07 तरी असला पाहिजे असे मानले जाते. जन्मदर एवढा खाली घसरल्याने काही वर्षांतच जपानमधे तरूणांपेक्षा म्हातार्‍यांची संख्या आधिक होणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतील असे हात कमी होत गेल्याने सर्वच संस्थांना, कर्मचार्‍यांची कमी थोड्याच वर्षात भासू लागेल असे अनुमान आहे. या समस्येवर उपाय म्हणून जपानमधल्या नवीन सरकारने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक मुलामागे दरमहा 280 य़ू.एस डॉलर्स आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. ही मदत ते मूल 12वी उत्तीर्ण होईपर्यंत मिळत राहील.

आम्ही पैसे देतो, मदत करतो पण काही करा आणि मुलांना जन्म द्या. अशी विनंती जपानी सरकार लोकांना करते आहे. परंतु या आर्थिक मदतीचा, जन्मदर वाढवण्यास कितपत उपयोग होईल याविषयी बरेच तज्ञ साशंक आहेत. जपानी लोक मुले होऊ देत नाहीत याला आर्थिक कारणाबरोबर इतरही कारणे आहेत. वाढत्या संख्येने जपानी तरूणी आपल्या करीअर संबंधी आता जागृत असतात. माता झाल्यास, आपल्या करीअरच्या प्रगतीला खीळ बसेल अशी भिती त्यांना वाटते व ती खरी आहे. या शिवाय मुलांसाठी डे-केअर व शाळा शोधणे अतिशय जिकिरीचे व खर्चाचे बनत चालले आहे. सरकारने अधिकृत केलेली अशी केंद्रे जपान मधे आहेत परंतु त्यात प्रवेश मिळवणे अतिशय कठिण बनले आहे. चांगले डे-केअर, मुलापाठीमागे 500 यू.एस.डॉलर्स तरी घेते. आपल्याला मुलांचे भविष्य उज्वल करता येणार नसेल तर त्यांना जन्मास कशासाठी घालायचे असा विचार बहुतेक जोडप्यांचा असतो.

या शिवाय बहुतेक जपानी कुटुंबे, जागेच्या टंचाईमुळे व आर्थिक कारणांनी, कामाच्या जागेपासून बर्‍याच अंतरावर रहातात व त्यांना रोज दोन अडीच तास तरी प्रवास करावा लागतो. या कारणांमुळे आपल्याला मुलांचे चांगले संगोपन करता येणार नाही असे त्यांना वाटते व त्यात काही गैर आहे असे वाटत नाही.असेच जर चालू राहिले तर संस्था, कारखाने यात काम करण्यासाठी देशा बाहेरून लोक जपानमधे आणावे लागतील असे जपानी सरकारला वाटते आहे व ती त्यांची खरी भिती आहे.


18 सप्टेंबर 2009