गेले काही दिवस वर्तमानपत्रांतून सतत लहान मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. मनाला अतिशय क्लेशदायक अशा या बातम्यांमागे मुख्य सूत्र आहे ते या मुलांच्या मनावर आलेल्या अभ्यासाच्या दडपणाचे. ज्या वयात मनसोक्त खेळायचे आणि मजा करायची त्या वयात ही मुले अभ्यासाच्या, परिक्षेतील यश-अपयशाच्या, तणावाखाली अक्षरश: दबून,चिरडून गेलेली आहेत.
तसे बघायला गेले तर आता परिक्षा पद्धती कितीतरी सुलभ झालेली आहे. चौथी, पाचवी पर्यंत तर अनेक शाळांच्यात परिक्षाच नसतात. पूर्वीपेक्षा अभ्यासक्रमही सर्वसाधारण मुलांना समजेल उमजेल असेच बनवले जात आहेत. तसेच शिक्षण झाल्यावर पुढे व्यवसायाची इतकी अनेक क्षेत्रे उपलब्ध होत आहेत की एखाद्या परिक्षेतील अपयशावर तुमचे पुढचे संपूर्ण व्यावसायिक आयुष्य अवलंबून असण्याचे दिवस केंव्हाच मागे पडले आहेत. आता हे मात्र खरे की प्रत्येक क्षेत्रात प्रचंड व जीवघेण्या स्पर्धेला प्रत्येकालाच तोंड द्यायला लागते आहे. पण आयुष्यात यश मिळवायचे असले तर या गोष्टींना सामोरे जायलाच लागते. त्यापासून लांब पळून जाऊन कसे चालेल? पन्नास वर्षांपूर्वी मी माझी विद्यार्थीदशा आठवतो तेंव्हाचे चित्र काही फारसे निराळे नव्हते. आम्हालाही अशाच प्रकारच्या स्पर्धेला तोंड द्यायला लागले होते. किंवा वीस वर्षांपूर्वी माझी मुले जेंव्हा आपल्याला हवे ते शिक्षण किंवा व्यवसाय निवडण्यासाठी धडपडत होती तेंव्हाचेही चित्र काही फारसे निराळे नव्हते. स्वत: एक धडपडणारा तरूण म्हणून किंवा स्वत:च्या मुलांची धडपड पहाणारा पालक म्हणून, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही फेज मी चांगलीच अनुभवली आहे.
मग मनाला असा प्रश्न पडतो की आताच असे काय घडले आहे की ज्या योगे हे तरूण किंवा लहान मुले आत्महत्या करायला प्रवृत्त होत आहेत? आताच्या काळात एक लक्षणीय फरक मात्र माझ्या मनाला नक्कीच जाणवतो आहे. तो फरकच या मुलांना आत्महत्येकडे घेऊन जातो आहे का? मला जाणवणारा हा मुख्य फरक म्हणजे लहान मुलांना घरातून मिळणार्या पाठिंब्याचा (Support Systems) आता असलेला संपूर्ण अभाव. मला काय म्हणायचे आहे ते सांगायला थोड्या जास्त खुलाशाची गरज आहे.
अलीकडे बहुतेक घरांच्यात, आई आणि वडील दोघेही कामावर जातात. आर्थिक गरज आणि जास्त चांगली जीवनशैली जगण्याची धडपड या दोन्ही कारणांमुळे हे आवश्यक बनले आहे. घरात येणार्या दुहेरी उत्पन्नामुळे घरात सर्व आधुनिक सुखसोयी येतात हे जरी खरे असले तरी त्या घरातील मूल किंवा मुले यांना आधारासाठी कोणीच रहात नाही. संध्याकाळी आई-वडील अतिशय दमून थकून घरी येतात. संध्याकाळी घरगुती कामे करावीच लागतात व या नंतर मुलांच्या (त्यांच्या दृष्टीने फालतू) अडचणी व व्यथा सोडवायला त्यांना वेळही नसतो व उत्साहही नसतो. पाठिंबा दुरावलेली मुले एकांडी बनत जातात.
अगदी दहा पंधरा वर्षांपूर्वी सुद्धा घरात आजी-आजोबा, किमान पक्षी आजी किंवा आजोबा हे असतच. आई-वडील जरी कामावर गेलेले असले तरी आजी- आजोबांचा संपूर्ण किंवा कदाचित थोडा जास्तच पाठिंबा मुलांना मिळत असे. एखादे अपयश किंवा अडचण ही संपूर्ण आयुष्याचा विचार करता किती क्षुद्र आहे हे आजी-आजोबा मुलांना छान पटवून देऊ शकत. एखाद्या अपयशाने नाउमेद होण्यासारखे काही नाही हे मुलांच्या मनावर ठसत असे. आता बहुतेक आधुनिक घरांत चौकोनी किंवा आता तर त्रिकोणी कुटुंबे दिसतात. त्यात आजी आजोबांना स्थानच नसते. आजी-आजोबांच्याबरोबर, नातवंडांना ते देत असलेला पाठिंबाही घरातून जातो.
आई-वडीलांनी घरात आणलेल्या पैशांमुळे घरात आर्थिक सुबत्ता येते हे खरेच आहे. या पैशामुळे ते मुलांना सर्वात उत्कृष्ट दर्जाचा सुखसोयी, खेळणी देऊ शकतात. त्यांना हवे तेथे ते पाठवू शकतात. आपल्या आर्थिक सुबत्तेच्या असलेल्या या खुणा आपण मुलांना दिल्या की आपण त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम व आस्था व्यक्त केली आहे असे पालकांना वाटते व ते एका पातळीपर्यंत खरेही असते. परंतु मुलांना या पुढेही काहीतरी आधिक पालकांच्याकडून हवे असते. ते म्हणजे आई-वडीलांचे प्रेम आणि हे प्रेम मुलांना फक्त आई-वडीलांच्या सहवासातूनच मिळू शकते. त्यांनी कितीही खेळणी सुखसोयी आणल्या तरी त्यातून नाही.
बहुतेक आई-वडीलांना असे वाटते की आपली मुले यामुळे जास्त स्वतंत्र बनतील व जगातील टक्के-टोणपे खायला जास्त योग्य बनतील. परंतु सत्य काही निराळेच असते. आई-वडील मिळेनासे झाले की मुले आधार बाहेर शोधू लागतात. तो योग्य मिळाला तर गाडे ठीक चालते. नाहीतर मात्र सर्व बिनसत जाते. मुले बिघडत गेली किंवा नैराश्येच्या गर्तेत गेली की मग आई-वडील जागे होतात पण तेंव्हा फार उशीर झालेला असतो.
या परिस्थितीवर उपाय तरी काय? सध्याच्या महागाईच्या आणि वाढलेल्या अपेक्षांच्या काळात आई घरी तर बसू शकत नाही. तिच्या स्वत:च्या आपल्या करियर बद्दल अपेक्षा असतात. तिलाही आयुष्यात काहीतरी करायचे असते. त्यामुळे या परिस्थितीत मार्ग एकच आहे. आई-वडीलांनी आपला जास्तीत जास्त रिकामा वेळ मुलांसमवेत घालवणे. तुमचे मित्र मैत्रिणी, सोशल कार्यक्रम, करमणूक व टी.व्ही, सगळे काही थोड्या वर्षांसाठी पुढे ढकलले तरी काहीच बिघडत नाही. आई-वडील जितका क्वालिटी टाईम मुलांना देऊ शकतील तेवढा त्यांना तो आवश्यकच आहे. मुलांना परत घरात पाठिंबा मिळू लागला की बाहेरच्या जगातली जीवघेणी स्पर्धा, आयुष्यातली किरकोळ अपयशे, सर्व काही ती समर्थपणे पेलू शकतात.
एकदा मुले मोठी झाली, स्वतंत्र झाली की होतातच आई-वडील मोकळे! त्यांच्या रुचीप्रमाणे त्यांचे स्वत:चे आयुष्य घालवायला.
11 जानेवारी2010