Showing posts with label कर्नाटक. Show all posts
Showing posts with label कर्नाटक. Show all posts

Tuesday, 6 January 2015

चला कर्नाटक कडे !


लेखाचा मथळा वाचून वाचकांचा कदाचित असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की हा लेख उन्हाळ्याच्या सुट्टी मधील पर्यटनासंबंधी आहे. परंतु ही मागणी मी किंवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणीही केलेली नसून महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 41खेडेगावांनी केली आहे. त्यांना महाराष्ट्रापासून विभक्त होऊन कर्नाटक राज्यात सामील व्हायचे आहे. या गावांतील ग्राम पंचायतींनी तसे ठरावच मंजूर केले आहेत.
या अभूतपूर्व मागणीमागे आहे या वर्षीचा कडक उन्हाळा, पाण्यासाठी करावी लागणारी वणवण आणि जनावरांसाठी लागणार्‍या वैरणीची टंचाई. आतापर्यंत या गावांतील लोकांना पुढार्‍यांची आश्वासने सोडली तर दुसरे काहीच न मिळाल्याची भावना आहे. पुढार्‍यांचे दौरे मात्र भरपूर प्रमाणात अनुभवण्यास मिळत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे एक प्रमुख नेते दौरा करून गेले. सर्वांनी परिस्थितीवर आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू अशी आश्वासनेही दिली.परंतु गावकर्‍यांच्या हातात काहीच पडलेले नाही. पुढार्‍यांनी आपली गावे म्हणजे दुष्काळी पर्यटनाची ठिकाणे बनवली आहेत असे गावकर्‍यांना वाटते आहे.
गावकर्‍यांची सर्वात मुख्य मागणी ही अर्थातच पाण्याची आहे. कृष्णा नदीचे पाणी या भागात आणण्यासाठी 1986 साली टाकरी-म्हैसाळ प्रकल्पया नावाचा एक प्रकल्प महाराष्ट्र शासनाने हातात घेतल्याचे जाहीर केले होते. त्या वेळेस या प्रकल्पाचा खर्च 82कोटी रुपये येणार होता. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण झालेलाच नाही व आता त्यावरील खर्च मात्र 2224कोटी रुपये येणार आहे. पुढार्‍यांच्या दौर्‍यांवर पैसे खर्च करण्याऐवजी त्याच खर्चातून पाण्याचे जास्त टॅन्कर महाराष्ट्र सरकारने पाठवावे अशी गावकर्‍यांची मागणी आहे. गावांना टॅन्कर 3दिवसातून फक्त एकदा येतो. भूजलातील पाण्याची पातळी एवढी खाली गेली आहे की 1000फूट खाली जाऊनही पाणी लागत नाही. गावामधील डाळिंबांच्या बागा वाळून गेल्याचेही काही शेतकरी सांगतात.
आपण मराठी असूनही आपल्याला कर्नाटकमध्ये जावेसे वाटत आहे याबद्दल काही गावकर्‍यांच्या मनात विषाद जरूर आहे. मात्र महाराष्ट्रातील परिस्थिती एवढी गंभीर आहे की असे केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी नाइलाजाची भावना त्यांच्या मनात आहे. 12तास वीज बंद असते. बोअरवेलला पाणी असले तरी पंप चालवता येत नाही. Mahatma Gandhi Rural Employment Guarantee Scheme [MGNREGS] योजनेच्या अंतर्गत काम करणार्‍यांना गेले 10आठवडे पगार मिळालेला नाही. सरकारने जनावरांसाठी कमी दरात वैरण देण्यासाठी डेपो उभारले आहेत.परंतु डेपोवर वैरण सहजासहजी मिळत नाही व अमर्यादित कालावधीसाठी वाट बघावी लागते.
या गावकर्‍यांच्या मताने कर्नाटक सरकार लोकांची जास्त काळजी घेताना दिसते आहे. त्यांना मोफत बी-बियाणे दिली जात आहेत. दुष्काळ पडला तर विजेची बिले माफ होतात. त्यांना पुरेसे पाणीही पुरवले जाते आहे. थोडक्यात म्हणजे कर्नाटक सरकार दुष्काळी भागातील जनतेची जास्त काळजी घेताना दिसते आहे.
या गावकर्‍यांची मागणी अभूतपूर्व आहे खरी! परंतु महाराष्ट्र शासनाने यावर आत्मसंशोधन करण्याची खरीखुरी गरज आहे असे मला वाटते. सर्वच राजकीय पक्षांनी याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे.
8मे 2012 

Monday, 5 January 2015

निर्लज्जपणाची कमाल!


मला आठवते की मागच्या वर्षी कधीतरी एक बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली होती. कर्नाटकच्या सर्व आमदारांना स्मार्टफोन देण्यात येणार म्हणून!. त्या वेळेस मला थोडे आश्चर्यही वाटले होते की ही मंडळी हे स्मार्टफोन घेऊन काय करणार? पण राज्यासमोर असलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची माहिती करून घेता यावी. त्यांच्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती उत्पादन या सारख्या संख्या लक्षात ठेवता याव्या व मूलभूत स्वरूपाची माहिती स्वत:जवळ ठेवण्यासाठी हे स्मार्टफोन दिले गेले असल्याची माहिती या बातमीत दिलेली होती.
पण 2 दिवसापूर्वी कर्नाटक विधानसभेत, सत्र चालू असताना, लक्ष्मण सावेदी, सी.सी.पाटील व जे. कृष्णा पालेमार हे तीन मंत्री आपल्या स्मार्टफोनवर अश्लील चित्रफीत बघत असताना त्यांचे चित्रीकरण टीव्ही वाहिन्यांनी करून आपल्या वाहिन्यांवरून प्रसृत केले व कोणत्या कारणासाठी या मंडळींना हे स्मार्टफोन खरे तर हवे होते याचा उलगडा झाला. यातले लक्ष्मन सावदी हे मंत्री तर ‘स्त्री व बालक कल्याण’ विभागाचे मंत्री होते आणि दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या एक सेमिनार मध्ये नैतिकता कशी महत्वाची आहे या बद्दल त्यांनी जोरदार विवेचन केले होते.
लैंगिक दृष्ट्या उपासमार होत असलेले किंवा विकृत मनोवृत्तीचे लोक अशा प्रकारचे अश्लील वाङ्मय किंवा चित्रफिती नेहमीच बघत असतात. त्याला फार महत्व देण्याचे कारण नाही असे मला वाटते. परंतु आपल्या शयनगृहात हे उद्योग न करता, विधानसभेचे सत्र चालू असताना, तेथे हे उद्योग या मंत्र्यांनी करावेत हे त्यांची लायकी तर सिद्ध करतेच परंतु या शिवाय स्वत:ला लोकांचे प्रतिनिधी म्हणवून घेणार्‍या या आमदारांची गुणवत्ता किती खालच्या स्तराला जाऊन पोचली आहे हे ही चांगलेच लक्षात येते.
विधान सभा किंवा लोक सभा यात मोबाईल फोन वापरण्यास सुद्धा संपूर्ण बंदी असते. लोकसभेचे माजी सभापती श्री. सोमनाथ चॅटर्जी यांच्या कारकीर्दीत एकदा लोकसभेमध्ये कोणा सभासदाचा मोबाईल वाजला होता. सोमनाथजींनी हा मोबाईल मार्शलकरवी जप्त करून टाकला होता.
आजकालच्या तरूणाईचे, मोबाईल हातात असणे हे एक लक्षण झाले आहे. त्याला अनुसरून लोक सभेतही अनेक तरूण खासदार मोबाईल हातात घेऊनच असतात. परंतु लोकसभेत सर्वत्र जॅमर लावलेले असल्याने हे मोबाईल त्यामुळे देखाव्यापुरते राहिलेले असतात. फोन चालत नसला तरी या तृटीवर स्मार्टफोन वापरून मात कशी करायची याचा एक धडा किंवा शिक्षण या चित्रफितीच्या निमित्ताने कर्नाटकच्या या मंत्र्यांनी सर्व इच्छूक खासदार व आमदारांना दिला आहे.
नगर पालिका, महानगरपालिका, राज्य विधानसभा व लोकसभा या सर्व चर्चागृहांत लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या मंडळींची गुणवत्ता, ही भारतीय लोकशाही समोरची सर्वात मोठी समस्या आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. आणि अण्णा हजारे म्हणतात तसा ‘राईट टू रिजेक्ट’ अधिकार मतदारांना मिळाल्याशिवाय या समस्येचे निराकरण होण्याची सुतराम शक्यता नाही हे कोणत्याही निवडणुकीत निवडून आलेल्या मंडळींच्या प्रोफाईलवर नुसती नजर टाकली तरी ध्यानात येऊ शकते.

कर्नाट्क चित्रफीत प्रकरणातून एक चांगली गोष्ट निष्पन्न होणार असे दिसते आहे. लोकसभेच्या खासदारांना आयपॅड देण्याची कल्पना संसद सचिवालय बहुदा रद्द करील अशी चिन्हे दिसत आहेत.
10 फेब्रुवारी 2012

Tuesday, 16 December 2014

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 5


जोग धबधब्याला भेट दिल्यानंतर झालेल्या निराशेवर दुसर्‍या एखाद्या धबधब्याला भेट देणे हा उत्तम उपाय असू शकेल असा एक विचार काल संध्याकाळी कोणीतरी मांडला. मागोड धबधब्याला सध्या भरपूर पाणी असल्याची माहिती पण कोणीतरी दिली. सर्वांनाच ही सूचना पसंत पडली व आज परत मागोड धबधब्याच्या एका नव्या जंगल सफारीला जाण्यासाठी मी सज्ज झालो आहे. सकाळी गेल्या काही दिवसांप्रमाणेच, इडली, उप्पीठ, नीर डोसा आणि त्याच्या जोडीला गरमागरम ऑमलेट असा मस्त ब्रेकफास्ट आज पण झाला आहे व सफारीहून परत यायला थोडा उशीर झाला तरी चालण्यासारखे आहे.
मागोड धबधब्याला जाण्यासाठी असलेला एकुलता एक रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ( हुबळी-कारवार रस्ता) या रस्त्याला येल्लापूरच्या पश्चिमेकडे साधारण 3 किलोमीटरवर एक फाटा लागतो तेथून पुढे सरळ दक्षिणेकडे जातो. त्यामुळे साहजिकच आम्ही प्रथम येल्लापूरकडे निघालो आहोत. येल्लापूर या गावाला मध्यम आकाराचे गाव असे म्हणता येईल. हुबळी-कारवार रस्ता गावातून जात असल्याने साधारण 25000 वस्ती असलेले हे गाव महामार्गावरील सर्वसाधारण गावे असतात तसेच आहे. हे गाव मला तरी अगदी लोणावळा खंडाळ्याची आठवण करून देते आहे. गावातून जाणार्‍या महामार्गाच्या बाजूला, अनेक चहाच्या टपर्‍या, वाहन-देखभाल करण्यासाठी गॅरेजेस व बरा दर्जा असलेली उपहारगृहे व दुकाने दिसत आहेत. आज दिवाळीचा दिवस असल्याने येल्लापूर मार्केट फुलांच्या ढिगांनी नुसते सजलेले दिसते आहे. झेंडू, मोगरा या सारखी फुले मोठ्या ढिगांनी विकली जात आहेत. घरांची प्रवेशद्वारे, गाड्या, मोटर सायकली या सारख्या सर्व गोष्टी फुलांच्या माळांनी सजवलेल्या आहेत. साधारणपणे अशा आकाराच्या गावातून जाताना उघड्या गटारांमुळे प्रथम आपल्याला लक्षात येतो तो एक विशिष्ट दुर्गंध! आज मात्र येल्लापूर मध्ये नाकाला जाणवतो आहे तो धुंद करणारा मोगर्‍याचा सुवास. येल्लापूर मार्केट मधील एकूण गर्दी, उलाढाल बघून सुपारीच्या व्यापारामुळे हे एक सधन झालेले गाव आहे हे लगेच लक्षात येते आहे. अर्थात गावाच्या बाहेर अनेक मैलांपर्यंत हिरवीगार भातशेती सर्व बाजूंना दिसतेच आहे.
मागोड गावाकडे जाणारा रस्ता
मागोड फाट्यावर वळल्यानंतर लगेचच अतिशय घनदाट अशी झाडी आमचे स्वागत करते आहे. रस्ता अतिशयच अरूंद आहे व रस्त्याच्या दोन्ही कडांना असलेल्या ऊंचऊंच झाडांच्या फांद्या व काटक्या एकमेकात इतक्या अडकून किंवा मिसळून गेल्या आहेत की वरून येणार्‍या सूर्यप्रकाशाला सुद्धा वाट काढणे मुष्कील व्हावे. या रस्त्याने थोडे पायी चालावे या विचाराने मी खाली उतरतो. मी काही वनस्पतीतज्ञ नाही तरीही बाजूच्या जंगलात असलेली साग, जांबा, किंजल, सावर व जांभूळ या सारखी झाडे मला लगेच ओळखू येतात. काली रात्री बहुदा येथे जोरदार वादळ झाले असावे कारण जमिनीवर तुटलेल्या फांद्या व काटक्या यांचा खच पडला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मला काही फूट तरी ऊंच असलेले एक मुंग्यांचे वारूळ दिसते आहे. या वारूळाचा आकार एखाद्या किल्यासारखा वाटतो आहे. मुंग्यांना जात्याच बहुदा वास्तुबांधणी शास्त्र अवगत असले पाहिजे.
मागोड रस्त्यावरील मुंग्यांचे वारूळ
मागोड गाव येल्लपूरहून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यापैकी 12 किलोमीटर अंतर जंगलातील हा अरूंद रस्ता आहे. या रस्त्याची परिस्थिती व चिंचोळेपणा यामुळे वाहन चालवणे म्हणजे एक परीक्षाच असल्याने हे अंतर कापायला आम्हाला 1 तासाहून अधिक काल लागला आहे. मागोड गावातील घरे तशी मोठ्या भागावर पसरली असावीत असे वाटते कारण गावाच्या मध्यभागी फक्त 2 किंवा 3 घरे दिसत आहेत. या गावाला येताना शेवटचे काही किलोमीटर रस्ता तर सदाबहार अशा गच्च हिरव्यागार जंगलातून आलेला आहे. मागोड गावात एक वाहनतळ आहे तेथे आमची गाडी थांबते व मी खाली उतरतो. पर्यटकांना आवश्यक अशा स्वच्छतागृहासारख्या थोड्या सुविधा येथे उपलब्ध केलेल्या दिसत आहेत. मागोड गावापासून खूप उतार असलेली एक छोटी पायवाट पुढे जाते. या पायवाटेवर काही ठिकाणी पायर्‍या बांधलेल्या असल्याने मार्ग काढणे तसे सोपे आहे. ही पायवाट प्रथम वळणावळणाने एका अरूंद खिंडीत खाली उतरते व ही खिंड पार केल्यावर पुढे चढाचा रस्ता लागतो. हा रस्ता समोर असलेल्या एका बर्‍यापैकी ऊंच व बांबूची दाट वने असलेल्या एका टेकडीवर चढतो व टेकडीला वळसा घालून परत खिंडीपर्यंत येतो. या सर्व रस्त्याच्या किंवा पायवाटेच्या पूर्वेकडच्या बाजूला ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधून सुरेख व्हिस्टा पॉइंट्स बनवलेले आहेत. तेथे उभे राहिले की समोर 800 फूटाची उडी घेणार्‍या मागोड धबधब्याच्या भव्य दर्शनाचा आनंद मनमुराद लुटता येतो.
मागोड धबधबा
मागोड धबधब्याचा मुख्य भाग
मागोड या पदपथाने फिरत मी मागोड धबधब्याचे चांगले छायाचित्र कोठून घेता येईल हे बघतो आहे. मागोड धबधबा बेडथी या नदीवर आहे आणि या धबधब्याला जोग फॉल्स सारखे पाण्याचे दुर्भिक्ष नसून भरपूर पाणी असल्याने या धबधब्याला भेट देण्याची कल्पना योग्यच होती असे म्हणता येईल. मात्र या धबधब्याची एकूण ऊंची 800 फूट असली तरी जोग फॉल्स सारखा हा धबधबा ही ऊंची एका उडीत घेत नाही. प्रथम बेडथी नदी उतारावरची अनेक वळणे (Rapids) घेत खळखळाट करत एका मोठ्या जलाशयात येते. व या जलाशयातून अधिकच गतीमान होऊन 200 फुटाची एक जबरदस्त उडी घेते. यानंतर ही नदी एका बाजूला असलेल्या 800 फूट उंचीच्या सरळ कड्यामुळे एका अंगाला दाबली गेल्याने या कड्याला लागून असलेल्या घळीतून, मी उभा आहे त्या टेकडीच्या तळाला, सबंध टेकडीभोवती चक्कर मारते. टेकडीच्या दुसर्‍या बाजूला बटरमिल्क फॉल्स या एका धबधब्यामधून वाहत आलेले सोंदे नदीचे पाणी या नदीला येऊन मिळते व त्या नंतर या प्रवाहाला गंगावल्ली असे म्हटले जाते. ही गंगावल्ली नदी या बिंदूपासून पश्चिमेला वहात जाते. 200 फुट उडी घेणारा पाण्याचा प्रवाह एवढ्या जोराने खाली पडतो आहे की त्यामुळे तळाला धुक्याचा एक मोठा ढग तयार झाला आहे. डोक्यावर दुपारचा सूर्य तळपत असल्याने त्या प्रकाशात या धुक्यामध्ये तयार झालेले एक दुहेरी इंद्रधनुष्य मला दिसते आहे.
धबधब्याच्या तळाजवळ तयार झालेले धुके
हे अप्रतिम सुंदर दृष्य जास्तीत जास्त जेवढा वेळ बघणे शक्य होईल तेवढा वेळ मी या टेकडीवर काढतो आहे. परंतु वेळ खूपच भरभर चालला आहे व परतण्याची वेळ जवळ आली आहे. परत फिरताना प्रथमच माझे लक्ष आजूबाजूला जाते. अनेक काळेभोर डोळे माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत हे माझ्या लक्षात येते. मागोड परिसरात खूपच माकडे आहेत व प्रवाशांच्या हातात काही खाद्यवस्तू असली तर एका सेकंदात त्यावर डल्ला मारून ती पळवण्याच्या प्रयत्नात ही माकडे असतात.
चंदगुळि परिसरातील घनदाट झाडी
परतीच्या प्रवासात आमची गाडी एका बाजूच्या कच्च्या रस्त्यावर वळते व चंदगुळी नावाच्या अगदी एका छोट्या खेड्याजवळ उभी राहते. या खेड्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे आहेत. यापैकी एका घराच्या छतावर कळस दिसतो आहे. जवळच लावलेल्या एका फलकाप्रमाणे हे गणेशाचे मंदिर आहे. चंदगुळी सिद्धिविनायक मंदिर या नावाने हे मंदिर ओळखले जाते. या गणेश मंदिराचे एक मोठे गंमतीदार वैशिष्ट्य आहे. या मंदिराला भेट देणारे भाविक गणेशाला त्यांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराची घंटा देवापुढे वाहत असतात. त्यामुळे हे मंदिर एक घंटांचे संग्रहालय झाले आहे. अगदी छोट्या घंटांपासून भरभक्कम घंटेपर्यंत सर्व प्रकारच्या घंटा भाविकांनी देवाला वाहिलेल्या आहेत. या मंदिराच्या भिंती, ओसरी, छत आणि प्रवेशद्वार हे घंटांनीच सजवलेले आहे. या गणपतीला घंटा ग़णेश असेही नाव पडलेले आहे.
चंदगुळि मंदिरातील घंटा
मी गाडीत बसतो व आम्ही पुढे निघतो. आता आम्हा सर्वांच्या पोटात कावळे चांगलेच कोकलू लागले आहेत. तरीही आम्ही वाटेतच लागलेल्या एका मोठ्या सुंदर दिसणार्‍या जलाशयाशी थोडा वेळ थांबतोच. या जलाशयाचे नाव कवडीकेरे असे आहे. जलाशयातील पाणी मोठे नितळ, स्वच्छ वाटते आहे. जलाशयाशेजारीच एक देवीचे मंदिर आहे. हा सर्वच परिसर अतिशय रमणीय आहे यात शंकाच नाही. मंदिराला एक धावती भेट देऊन आम्ही आता परतीच्या मार्गावर आहोत. आजची आमची सफर छान झाल्याने समाधान वाटते आहे. जेवण झाल्यावर नंतर आराम करायला भरपूर वेळ आहे.
कवडीकेरे जलाशय
सह्याद्री पर्वतराजी तसे बघायला गेले तर मला काही नवीन नाही. माझे पुण्यातले घर या पर्वतराजीमधल्या काही टेकड्यांच्या अगदी जवळ आहे. अगदी लहानपणापासून मी या टेकड्यांवर मनमुराद भटकलो आहे. परंतु याच सह्यराजीच्या दक्षिण भागात फिरण्याचा हा गेल्या काही दिवसांचा अनुभव मला नवीन व हृद्य असाच वाटतो आहे. दक्षिण सह्याद्री परिसर उत्तरेपेक्षा निराळाच आहे. घनदाट जंगले, नितळ पाण्याचे निसर्गरम्य जलाशय, धबधबे हे तुम्हाला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात. दक्षिण सह्याद्री मधली माझी ही सफर आता संपल्यासारखी असली तरी स्मृती पटलावरून ती पुसली जाणे माझ्या उर्वरित आयुष्यात तरी शक्य वाटत नाही.
(समाप्त)
21 नोव्हेंबर 2011 

दक्षिण सह्याद्री मधील भटकंती भाग 4


आपली शाळा, तिथले वर्गमित्र, त्यांच्याबरोबर केलेली मौजमजा, यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना आपल्या आयुष्यात कहीतरी विशेष स्थान असते. तरीही शाळेतल्या दिवसांच्या माझ्या आठवणी या कृष्ण-धवल छायाचित्रांसारख्या आहेत, गतकाळातील काही क्षण फक्त त्यांनी पकडून ठेवलेले आहेत असे मला नेहमी वाटते. 1954-55 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेने कर्नाटकची एक सहल आयोजित केली होती.
मी त्या वेळी पाचवी-सहावी इयत्तेमध्ये होतो व या सहलीमध्ये मी भाग घेतला होता. या सहलीमधल्या ज्या काही थोड्याशा आठवणी अजून मला आहेत त्या सुद्धा सगळ्या अशाच कृष्ण-धवल छायाचित्रांसारख्या आहेत. या छायाचित्रांपैकी स्पष्ट आठवणारे व विस्मृतीच्या गर्तेत कधीच न दडू शकणारे असे एक चित्र एका खूप मोठ्या, खूप रूंद अशा धबधब्याचे आहे. या धबधब्यात प्रत्यक्षात चार किंवा पाच धबधबे एका शेजारी एक होते. मी हा धबधबा समोरच्या बाजूस असलेल्या एका कड्याच्या टोकावरून बघितला होता. पाणी खूप उंचीवरून पडत होते व त्यामुळे तयार झालेल्या धुक्याने मी व समोरचा धबधबा यांच्यामध्ये असलेली खोल दरी संपूर्णपणे भरूनच गेलेली होती. हा धबधबा जगातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असा मानला जात असे व त्या वेळेला तो गिरसप्पा धबधबा या नावाने परिचित होता.
विस्मृतीच्या कप्प्यांमध्ये दडलेले हे एक स्मृती छायाचित्र आज मी परत आठवण्याचा प्रयत्न करतो आहे याचे कारण म्हणजे याच धबधब्याला पुर्नभेट देण्याचा आमचा आज बेत आहे. हा धबधबा आता जोग फॉल्स या नावाने सुपरिचित आहे. काल संध्याकाळी मला कोणीतरी या धबधब्याला जोग फॉल्स असे नाव का दिले गेले याची एक कथा सांगितली. या कथेप्रमाणे पुण्याच्या एका बांधकाम व्यावसायिकाने या धबधब्यापासून 6 किलोमीटर अंतरावर मागे एक मोठे धरण 1964 साली बांधले होते. तो प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल त्या व्यावसायिकाचे नाव म्हणे या धबधब्याला आता दिले आहे. माझा विश्वास काही या कथेवर बसत नाहीये व ही एक लोणकढी थाप कोणाच्या तरी सुपीक मेंदू मधून आली असावी असा माझा कयास आहे. मला राहवत नसल्याने मी शेवटी माझ्या संगणकावर थोडी शोधाशोध करतो व माझ्या कयासाप्रमाणे ही कथा ही एक शुद्ध लोणकढी आहे हे लगेचच समजून येते. प्रत्यक्षात गिरिसप्पा या नावाचे एक खेडे शरावती नदीच्या किनार्‍यावर होनावर या पश्चिम समुद्र किनार्‍याजवळ असलेल्या गावांच्या पूर्वेला साधारण 16 मैलावर आहे व या गावाच्या नावाने हा धबधबा ओळखला जात होता. मात्र या धबधब्याजवळ रहात असलेले स्थानिक या धबधब्याला जवळच असलेल्या जोग या नावानेच प्रथम पासूनच ओळखत असल्याने शेवटी हेच नाव अधिकृत म्हणून ठरवण्यात आले आहे.
मी आता जोग फॉल्स कडे जाण्यासाठी निघालो आहे. सिरसी गावापासून सिद्दपूर गावाकडे जाण्यासाठी राज्य महामार्ग क्रमांक 93 हा रस्ता आहे व हाच रस्ता आम्ही धरला आहे. या रस्त्यावर लागणार्‍या कन्सूर गावापासून ते सिद्दपूरपर्यंतचा रस्ता अगदी दाट जंगलाच्या मधून जातो आहे. सिद्दपूर गावाजवळ या राज्य महामार्गाला माविनगुंडी गावाकडे जाणारा एक फाटा लागतो. या फाट्याने सरळ आले की माविनगुंडी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 206 (होनावर-शिमोगा) लागतो. या रस्त्याने सागर गावाच्या दिशेने थोडे किलोमीटर गेले की शरावती नदीवरचा पूल लागतो. या पुलापाशी आम्ही पोचलो आहोत. हा पूल ओलांडला की लगेचच एखादा किलोमीटर अंतरावर, जोग फॉल्स बघण्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेला वॅटकिन्सप्लॅटफॉर्म हा व्हिस्टा पॉइंट लागतो.
आमची गाडी एका मोठ्या पटांगणावर येऊन थांबते व मी खाली उतरतो. कर्नाटक शासनाने येथे खूप मोठी जागा प्रवाशांची वाहने ठेवण्यासाठी म्हणून विकसित केली आहे. या पटांगणाच्या बाजूला, प्रवाशांच्या सोईसाठी, स्वच्छता गृहे, उपहार गृहे व राहण्यासाठी कक्ष उपलब्ध आहेत. या पटांगणापासून, कॉंक्रीटमध्ये बनवलेला पायर्‍या पायर्‍यांचा एक रस्ता, कड्याच्या टोकाकडे व तेथून कड्याच्या परिमितीवर तुम्हाला घेऊन जातो.
गिरसप्पा किंवा जोग फॉल्स सध्याचा व पूर्वीचा
काही ठिकाणी मधे असलेल्या घळी ओलांडता याव्या म्हणून या वाटेवर टांगते पूल सुद्धा बनवलेले आहेत. या रस्त्याने कड्याच्या टोकाकडे जात असताना मी 1950 च्या दशकात परत एकदा मनाने गेलो आहे. त्या वेळी, हाच धबधबा बघण्यासाठी म्हणून मी आलो होतो व इथे फारशा काहीच सोई वगैरे उपलब्ध नव्हत्या. एका मोकळ्या जागेवर आमची बस थांबली होती व आम्ही मुले एका रांगेत शिक्षकांच्या नजरेसमोरून चालत चालत या कड्याच्या टोकापाशी असलेल्या एका बंगलेवजा इमारतीच्या पुढच्या बाजूस येऊन थांबलो होतो. या कड्याच्या टोकाजवळचा भाग तेंव्हा वॅटकिन्स प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात होता. या इथे उभे राहून मी जे दृष्य त्या वेळी समोर बघितले होते ते माझ्या स्मृती कोषात एखाद्या शिलालेखाप्रमाणे पक्के बसलेले आहे. मी उभा असलेल्या कड्याच्या टोकाखाली एक अतिशय खोल अशी, निदान 1000 फूट तरी खोल, एक दरी होती व या दरीच्या पलीकडच्या बाजूला, पीक कापणी करण्यासाठी शेतकरी जो विळा वापरतात त्या मुठीसकट विळ्याच्या आकाराचा, एक मोठा खडकाळ असा तुटलेला कडा दिसत होता. या खडकाळ कड्यावरून थोड्या थोड्या अंतरावरून पाण्याचे विस्तृत असे चार ओघ कडाडल्यासारखा आवाज करत खाली कोसळत होते. हे जलौघ एवढे रूंद होते की मोठ्या पांढर्‍या चादरी त्या कड्यावरून खाली सोडल्या आहेत की काय? असे वाटावे. कडाडून खाली आदळणार्‍या या जलौघांनी खाली दरीमध्ये धुक्याचा एक मोठा ढग तयार केला होता. मधून मधून वार्‍याबरोबर हे धुके इकडे तिकडे फेकले गेले की समोरचा निम्मा धबधबा सुद्धा दिसेनासा होत होता. आणि अचानज वार्‍याची दिशा आमच्या बाजूला फिरल्याने, दरीच्या विरूद्ध बाजूच्या कडांवर उभे असलेली आम्ही मुले त्या धुक्यामुळे अंगावर उडणार्‍या तुषारांनी मोठे आनंदित झालो होतो. त्या धबधब्याचा कडाडणारा आवाज एवढा प्रचंड होता की आमची बस ठेवली होती त्या ठिकाणांपर्यंत हा आवाज ऐकू येत होता.
1950 च्या दशकातील गिरसप्पा धबधबा आता क्वचितच, तो सुद्धा ऐन पावसाळ्यात (जुलै-ऑगस्ट मध्ये) दिसू शकतो. याचे कारण म्हणजे या धबधब्यापासून सुमारे 6 किलोमीटर मागे लिंगनमक्की या नावाचे एक मोठे धरण शरावती नदीवर कर्नाटक सरकारने 1964 मध्ये बांधले आहे. या धरणामुळे शरावती नदी मध्ये वाहणार्‍या पाण्याचा ओघ एकदम आटल्यासारखा झाला आहे. ऐन पावसाळ्यात जेंव्हा हे धरण पूर्ण भरून वाहू लागते त्याच वेळेस फक्त गिरसप्प्याचे पूर्ण जलवैभव आता बघता येते.
जोग फॉल्स ; सध्याचे 
राजा, रोअरर व रॉकेट धबधब्यांचे पाणी तळाच्या जलाशयात पडताना
या धबधब्याचे 60 वर्षांपूर्वीचे जलवैभव आता काही आपल्याला पुन्हा बघता येणार नाही आणि जो धबधबा समोर दिसणार आहे तो म्हणजे पाण्याचे थोडे मोठ्या आकाराचे ओहोळ असणार आहेत याची मनाला पूर्ण जाणीव असल्यामुळे, थोड्याशा नाराजीने व अनिच्छेने मी कड्याच्या टोकाकडे असलेल्या वॅटकिन्स प्लॅटफॉर्म घेऊन जाणार्‍या पायवाटेने चालू लागलो आहे. कड्याच्या टोकापाशी पोचल्यावर मला समोर परत एकदा दिसते आहे तीच 1000 फूट खोल असलेली दरी व त्याच्या मागे असलेला मूठ असलेल्या विळ्याच्या आकाराचा कडा. मात्र आता या कड्याच्या टोकावरचे सर्व खडक उघडे बोडके पडलेले दिसत आहेत. साधारण मध्यान्हीची वेळ असल्याने सूर्य अगदी डोक्यावर तळपतो आहे. त्यामुळे दरीच्या अगदी तळाला असलेली, नदीच्या पाण्यातील छोटी मोठी डबकी, धबधब्यांचे पाणी जिथे खाली पडते आहे तेथे असलेला एक मोठा जलाशय आणि पात्रातील खडक अगदी स्पष्ट दिसत आहेत. आणि मुख्य म्हणजे ज्या धुक्यामुळे मला गिरसप्पा धबधबा अतिशय गूढ व जादूचा वाटला होता त्या धुक्याचा आता मागमूसही दिसत नाहीये. प्रवाहातील कमी पाणी किंवा दुपारची वेळ यामुळे हे धुके दिसत नसावे अशी मी माझ्या मनाची समजूत करून घेतो.
वॅटकिन्स प्लॅटफॉर्म
त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच वाटते आहे की चारी धबधब्यांचे प्रवाह अजूनही पहायला मिळत आहेत. सगळ्यात डाव्या अंगाला असलेला राजा धबधबा (याला ग्रॅन्ड, मेन किंवा घोड्याच्या नाल अशीही नावे आहेत.) अजूनही दरीत 830 फूट खोल कोसळतो आहे. विळ्याच्या आकाराच्या कड्यावर मुठीपासून सर्वात दूर असलेल्या वक्राकार भागातून, हा जल प्रवाह खाली येतो आहे. आणि खाली पडताना या प्रवाहाला कोणत्याही खडकाचा अडथळा नसल्याने वरून खालपर्यंत हा प्रवाह म्हणजे एक सलग पांढर्‍या रंगाचा पट्टा वाटतो आहे. हा प्रवाह खाली पडताना मोठ्या सुरेख रित्या एका वक्राकार परिघावर पडतो आहे व खालच्या जलाशयाशी पोचल्यावर अनेक फवारे उडवत जलाशयाच्या पाण्यात लुप्त होतो आहे. मात्र पूर्वी हा प्रवाह जसा एक पांढरी चादर वाटत असे तसे न वाटताना एखादी पांढरी चिंधी असावी तसाच दिसतो आहे. या प्रवाहाच्या साधारण 1000 फूट डावीकडे आणि कड्याच्या विळ्याच्या आकाराच्या मुठी जवळच्या वक्राकार भागातून, दुसरा धबधबा खाली कोसळताना दिसतो आहे. हा धबधबा पूर्वी प्रचंड कोलाहल निर्माण करत असे व त्यामुळे त्याला रोअरर असे नाव होते. वैभवाच्या कालात हा रोअरर, कड्याच्या अगदी वरच्या टोकावरून राजा धबधब्याकडे तोंड करून कोसळत असे. त्यामुळे या धबधब्याचे पाणी, राजा धबधब्याच्या पाण्यावर मध्यंतरी हवेतच कोठेतरी आदळून ध्वनी गर्जना व मी वर वर्णन केलेले प्रसिद्ध धुके निर्माण करून या धबधब्याला एक गूढत्व व जादू प्रदान करत असे. आता मात्र हा धबधबा कड्याच्या वरच्या टोकावरून कोसळत नसून मधेच अर्ध्या खोलीवर कोठेतरी कड्यावरून बाहेर येतो व याचे पाणी राजा धबधब्याच्या पाण्याला अगदी तळाशी भेटते त्यामुळे याची गर्जना व धुके हे दोन्हीही लुप्त झाले आहेत. हा रोअरर किंवा गर्जणारा धबधबा बघितल्यावर याचे नाव आता कण्हणारा धबधबा असे ठेवले पाहिजे असे मला वाटते आहे. या रोअरर धबधब्याच्या सुमारे 700 फूट डावीकडे आणि विळ्याच्या मुठीच्या जागी जो धबधबा आहे त्याला रॉकेट असे नाव आहे कारण हा धबधबा प्रथम 100 फुटांची खाली उडी घेतो व या धबधब्याचे पाणी एका बाहेर आलेल्या खडकावर आदळल्यामुळे ते पाणी समोरच्या दरीत एखाद्या रॉकेट सारखी हवेत झेप घेते व त्यानंतर राजा फॉल प्रमाणेच एका वक्राकार परिघावर घरंगळत खाली येते. सुदैवाने या रॉकेट धबधब्याचे वैभव अजून बर्‍यापैकी टिकून आहे. हा एकच धबधबा जुन्या गिरसप्प्याची आठवण करून देऊ शकतो आहे. या रॉकेट धबधब्याच्या सुमारे 500 फूट डावीकडे शेवटचा म्हणजे राणी धबधबा आहे. या धबधब्याचे जुने नाव ल दाम ब्लांच असे होते. आता याला राणी धबधबा असे म्हणतात. हा धबधबा खालच्या खडकांच्यावर मलमलची चादर पांघरलेली दिसावी तसा हळूवारपणे घरंगळत खाली येताना दिसतो आहे. अर्थात आता पाणी कमी असल्याने चादरीऐवजी मलमलची पट्टी पांघरावी असे दिसतो आहे.
गिरसप्पा किंवा जोग फॉल्सची तुलना जगातल्या नायगारा सारख्या मोठ्या धबधब्यांशी पूर्वी केली जात असे. आता मात्र याची तुलना मध्यम आकाराच्या धबधब्यांशी करणेही कठिण आहे. फक्त पावसाळ्यात या धबधब्याची गणना आता जगातील मोठ्या धबधब्यांशी करणे शक्य आहे. वॅटकिन्स प्लॅटफोर्म वरून जोग फॉल्स कडे बघत असताना धबधब्याच्या उजवीकडे मला सुबक व छान दिसणारे 3 बंगले दिसत आहेत. मी असे वाचले आहे की रॉयल इंजिनियर्स या सैनिकी पलटणीतील एक अधिकारी कॅप्टन क्रुकशॅन्क यांनी या ठिकाणी 1868 मध्ये एक चुन्यामध्ये बांधकाम केलेला एक बंगला, वरिष्ठ ब्रिटिश अधिकार्‍यांसाठी म्हणून बांधला होता. समोर दिसणार्‍या घरांपैकी एखादे अजून त्याच वेळचे आहे का आता ते पाडून नवे बांधले गेले आहे? हे कळण्यास मला तरी वाव नाही. त्या वेळेस या बंगल्यातून दिसणारा व्ह्यू अतिशय अप्रतिम आणि स्वप्नवत होता. हा बंगला धबधब्याच्या इतका जवळ होता की पाण्याच्या गर्जनेने घराची दारे खिडक्या हादरत असत. या बंगल्यातून आज धबधबा दिसत तरी असेल का? या बाबत माझ्या मनात शंका आहे. अर्थातच धबधब्याच्या गर्जनेचे आता कण्हण्यात रूपांतर झालेले असल्याने तो आवाज या बंगल्यात ऐकू येण्याचीही सुतराम शक्यता वाटत नाही.
कॅप्टन क्रुकशॅन्क बंगला ?
वॅटकिन्स प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूंना असलेल्या डोंगराच्या कडांवर आता कर्नाटक सरकारने व्हिस्टा पॉइंट्स व त्यांना जोडण्यासाठी टांगते पूल बांधले आहेत त्यावरून मी एक फेरफटका मारतो. खरे तर सर्व धबधबे वरच्या टोकापासून खालपर्यंत दिसू शकतील अशी जागा फोटो काढण्यासाठी मी शोधतो आहे. तशी जागा मला सापडते पण तेथून काढलेले फोटो मात्र निराशाजनक आहेत.
जोग फॉल्स बघून झाल्याने मी परत गाडीकडे वळतो आहे. येताना लागलेल्या शरावती नदीवरचा पूल परत न ओलांडता त्याच्या उजव्या बाजूने असलेल्या एका रस्त्याने मी आता कारगल या गावाकडे निघालो आहे. पुढे परत एक पूल लागतो मात्र हा पूल शरावती नदी वरचा नसून एका मानव निर्मित नदीवरचा आहे. लिंगनमक्की धरणात अड्वलेले शरावतीचे पाणी या कॅनॉल मधून शरावती जल विद्युत केंद्राकडे नेण्यात येते. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन ही संस्था हा प्रकल्प चालवते. या लिंगनमक्की धरणाने अडवलेल्या पाण्याचा जलाशय पावसाळ्यात तुडुंब भरला की जास्त आलेले पाणी सोडून न देता पश्चिम बाजूला असलेल्या तलकालाली या दुसर्‍या जलाशयात साठवले जाते. पुण्याजवळच्या पानशेत व वरसगाव येथील जलाशय जसे एकमेकाला लागून व मधे असलेल्या एका टेकडीमुळे विभाजित होतात तसाच काहीसा प्रकार येथे दिसतो आहे. मात्र ही दुभाजक टेकडी अतिशय घनदाट अशा अरण्याने माखलेली आहे. या जंगलातून असलेल्या रस्त्याने आता आम्ही दक्षिणेकडे असलेल्या कारगल या गावाकडे निघालो आहोत. मात्र आजूबाजूचे जंगल हे बहुदा गेल्या अर्ध शतकात म्हणजे धरण पूर्ण झाल्यावरच एवढे फोफावलेले असावे. कारगल गाव ओलांडून पुढे गेल्यावर काही किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याचा एक फाटा लागतो. हा रस्ता अतिशय अरूंद आहे. आमची गाडी जेमतेम या रस्त्यावरून जाऊ शकते आहे. थोडे पुढे गेल्यावर समोर एक प्रवेशद्वार व त्यावर असलेली कमान दिसते आहे. कमानीच्या बाजूला असलेला मोपाणी अभयारण्यामध्ये तुमचे स्वागत असोअसा फलक मला दिसतो आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रवेशद्वार कुलुप लावून बंद केलेले आहे. एकूण सगळा गोंधळच आहे. आम्ही काही कालापूर्वी ओलांडून आलेल्या कारगल गावातील ऑफिस मधून प्रवेश पत्रिका आम्ही घेऊन येणे गरजेचे आहे असे तिथल्या काही मंडळींचे म्हणणे दिसते आहे. गरम व जोरदार चर्चा, उशीर व एकूण गोंधळ भरपूर झाल्यानंतर शेवटी एक कर्मचारी सायकलवरून किल्ल्या घेऊन येताना दिसतो व दार उघडले जाते. 30 ते 40 मिनिटे रस्त्याच्या बाजूचे सृष्टी वैभव बघून कंटाळलेल्या आम्हाला अखेरीस अभयारण्यात प्रवेश मिळतो आहे.
जंगलातील आडवळणाची वाट
मोपाणी अभयारण्यामधील रस्ता इतक्या वेड्यावाकड्या वळणांचा व चढउतारांचा आहे की आमची गाडी तो 3 किलोमीटरचा रस्ता अगदी कण्हत कुंथत पार करते आहे. अखेरीस जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोकळा जागेत गाडी थांबते व मी खाली उतरतो. चहू बाजूंना नजर फिरवल्यावर लक्षात येते की सगळीकडे घनदाट अशी झाडी आहे की ज्याच्यातून सूर्यप्रकाशही खालपर्यंत उतरू शकत नाहीये. फक्त समोरच्या बाजूच्या झाडीमधून आणखीनच अरूंद असा एक कच्चा रस्ता वळणाआड लपलेला दिसतो आहे. या रस्त्याने फार फार तर एखादी जीप जाऊ शकेल. पुढे आता चालत जाण्याशिवाय काही प्रत्यवाय नाही हे लक्षात आल्याने मी चालायला सुरूवात करतो. चालायला लागल्यावर लक्षात येते की घनदाट झाडीमुळे या रस्त्याने चालणे खूपच सुखकर वाटते आहे. अर्धा किलोमीटर चालल्यानंतर समोर एक मोठा जलाशय दिसतो आहे. या जलाशयाच्या किनार्‍यावर पोचल्यावर लक्षात येते आहे की हा जलाशय, मागची झाडी आणि किनारा यामुळे हे स्थळ नितांत रमणीय बनले आहे.
मोपाणी अभयारण्यातील जलाशय
हे स्थळ म्हणजे प्रत्यक्षात कर्नाटक शासनाने उभारलेली ही एक पर्यटक छावणी आहे. येथे एक पर्यटक निवास आहे. पर्यटकांना तंबू ठोकण्यासाठी मोकळी जागा आहे. ज्यांना जंगलांची आवड आहे अशांसाठी ही पर्यटक छावणी म्हणजे एक पर्वणीच आहे. समोरच्या तलावाचे पाणी शांत आणि मनोहर आहे. येथे तुम्ही पोहू शकता. किनार्‍यावर स्वैपाकपाणी करू शकता आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाला पूर्ण विसरून विरंगुळ्याचे चार क्षण निवांतपणे घालवू शकता. समोर दिसणारा जलाशय लिंगनमक्की जलाशय आहे की तालकालाली जलाशय आहे हे सांगणे मला मोठे कठिण वाटते आहे. आमच्या प्रवासाची दिशा बघितली तर कदाचित हे तालकालाली सरोवर असू शकेल असे मला वाटते. आजूबाजूच्या कोणालाही विचारून काहीच फायदा नाही कारण इंग्लिश किंवा हिंदी जाणणारे कोणी दिसत नाहीयेत. मात्र सगळे फलक किंवा नकाशे मात्र हा जलाशय लिंगनमक्की आहे असे सांगतात त्यामुळे कदाचित हा जलाशय लिंगनमक्की असू शकतो.
मोपाणी अभयारण्यातील जलाशयाचा किनारा
अभयारण्यातील घनदाट झाडी मधील रस्ता
या जलाशयाच्या काठावर थोडा काल व्यतीत केल्यावर मी परतीच्या मार्गाला लागतो. परत एकदा जोग फॉल्सच्या परिसरातून जाताना माझ्या मनाला प्रश्न पडतो. आता भविष्यकालात माझ्या स्मरणात कोणता धबधबा राहील? 60 वर्षांपूर्वी बघितलेला गिरसप्पा धबधबा की मोठे ओहोळ या स्वरूपातला जोग धबधबा? तुम्ही उत्तराचा नक्कीच अंदाज बांधू शकाल. शाळेच्या सहलीत बघितलेला गिरसप्पा हा कोणत्याही क्षणी आणि परिस्थितीत आज बघितलेल्या जोग फॉल्स वर सहज मात करू शकेल.
(क्रमश :)
18 नोव्हेंबर 2011

दक्षिण सह्याद्रीमधील भटकंती- भाग 3


ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर दक्षिण सह्याद्रीतील येल्लापूर गावाजवळच्या परिसरात असलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनवासी हे गाव असे लगेच सांगता येते. या बनवासी गावाचा मागील 2250 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे. बनवासी गावाबद्दलची सर्वात पूर्वीची ज्ञात नोंद, ..पूर्व 242 या वर्षामधील आहे. या वर्षी, म्हणजे सम्राट अशोक गादीवर आल्यानंतर 18 वर्षांनी, एक बौद्ध महासभा आयोजित केली गेली होती. या महासभेनंतर रक्षितया बौद्ध भिख्खूला बौद्ध धर्मप्रचारासाठी बनवासी येथे पाठवले गेले होते.
हे बनवासी गाव वरदा नदीच्या डाव्या किनार्‍यावर आणि सिरसी गावापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर आहे. सहस्त्रलिंग या स्थानाला भेट दिल्यानंतर मी आता बनवासी गावाकडे निघालो आहे. सिरसी आणि बनवासी या गावांना थेट जोडणारा रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यानेच मी आता निघालो आहे. सिरसीहून निघाल्यावर पहिले काही किलोमीटर तरी रस्ता अतिशय दाट अशा जंगलातून जातो मात्र या नंतर जंगल एकदम मागे पडते आणि लागवडीखाली असलेली जमीन दोन्ही किंवा निदान एका बाजूला तरी दिसू लागते. भात शेती शिवाय फळझाडे आणि मुख्यत्वेकरून अननसाची लागवड बर्‍याच ठिकाणी दिसते आहे. आमची गाडी काही छोट्या छोट्या गावांना पार करते आहे. ही गावे दिसायला तरी टुमदार दिसतात. गावांतील घरे नीट नेटकी व दिसायला बरी वाटत आहेत. या गावातील शेतकरी वर्ग बर्‍यापैकी सधन असावा असे रस्त्यावर जी काही उलाढाल चाललेली दिसते आहे त्यावरून मला तरी वाटते आहे. राजकीय दृष्ट्या इथले लोक बरेच सक्रीय असावेत. गावागावात, चौकाचौकात सगळीकडे बीजेपी चे ध्वज फडकताना दिसत आहेत.
बनवासी गावात पोचल्यावर प्रथम लक्षात भरतो तो तिथला अरूंद रस्ता. गावातील मुख्य रस्ता इतका अरूंद आहे की जर दोन वाहने एकमेकासमोर येऊन ठाकली तर एका वाहनाला पार गावाच्या बाहेर पर्यंत रिव्हर्स गिअर मधे मागे जावे लागते. तरच वाहतूक परत सुरळीत होऊ शकते. काही हजार वर्षे तरी अस्तित्वात असलेल्या या बनवासी गावात पोचताना माझ्या मनात थोड्या विचित्र पण संमिश्र भावना आहेत. भारतातील प्राचीन संस्कृती किती प्रगत होती याचे हे गाव म्हणजे एक द्योतक आहे असे मला वाटते. हे गाव प्राचीन भारतात अतिशय महत्वाचे मानले जात होते. पुण्याजवळ असलेल्या कार्ले येथील लेण्यांमध्ये, तेथील एक लेण्यात असलेले गुंफा मंदिर, बनवासी येथील एका व्यापार्‍याने इ..पूर्व 100 वर्षे या कालात, दान देऊन बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. बनवासी गाव तेंव्हा वैजयंती या नावाने ओळखले जात होते. नाशिक येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यांमधील एका गुंफेतील शिलालेखात, ( गुंफा क्रमांक 2) वैजयंतीच्या प्रबळ सैन्यदलाचा उल्लेख सापडतो.(संदर्भ क्रमांक 1). दुसर्‍या शतकामध्ये ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने बनवासी गावाचा Banaausi or Banauasi या नावाने उल्लेख केलेला आहे. बनवासी गावातच सापडलेल्या एका शिलालेखाप्रमाणे, टॉलेमीच्या कालातच, “हरितिपुत्र सातकर्णी या महाराष्ट्रातील सातवाहन राजघराण्यातील एका राजाची सत्ता बनवासीवर होती.
हे पुरातन संदर्भ जरी महत्वाचे असले तरी बनवासी गाव हे कदंब राजांची राजधानी म्हणूनच मुख्यत्वे ओळखले जाते. पहिल्या कदंब राजघराण्याची बनवासीवर चवथ्या किंवा पाचव्या शतकापासून सत्ता होती. “त्रिलोचनहा या कदंब राजघराण्याचा पहिला राजा होता. महाराष्ट्रावर राज्य करणारा प्रसिद्ध चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने बनवासी ताब्यात घेण्याचा बराच प्रयत्न केला होता परंतु त्याला त्यात यश मिळाले नव्हते असे इ.. 647 मध्ये खोदून घेतलेल्या पुलकेशीच्या प्रसिद्ध शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात पुलकेशी राजाच्या सेनेने बनवासी गावाला फक्त वेढा घातल्याची नोंद आहे. मात्र पुढील काळात चालुक्य राजांना बनवासीवर आपली सत्ता आणण्यात यश मिळाले होते. त्या काळात (.. 947-48) बनवासी मध्ये 12000 खेडेगावांचा समावेश होता. प्रसिद्ध अरब इतिहासकार अल-बिरूनी हा इ.. 1020 मध्ये बनवासीचा बनवासया नावाने त्याच्या पुस्तकात उल्लेख करतो. अकराव्या ते चवदाव्या शतकात, बनवासीवर पुन्हा एकदा कदंब राजघराण्याची सत्ता प्रस्थापित झाली होती. या नंतर बनवासीवर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती व त्यानंतर ते विजयनगर राज्यात सामील झाले. विजयनगरच्या र्‍हासानंतर जवळच्याच सोंदे गावातील राजांनी बनवासी ताब्यात घेतले. अरसाप्पा आणि रघू नाईक हे या सोंदे राजघराण्यातील पहिले दोन राजे होते. या सोंदे राजांचा उल्लेख मी मागच्या भागात सहस्त्रलिंग या स्थानाच्या संदर्भात केलेला आहे. इतिहासात एवढ्या ठिकाणी नामनिर्देश असला तरी या सर्व इतिहासाच्या कोणत्याच पाऊलखुणा दुर्दैवाने बनवासी गावात सापडत नाहीत. या सर्व इतिहासाचे एकुलते एक साक्षीदार असलेले प्रसिद्ध मधुकेश्वर शिव मंदिर, फक्त आज बनवासी गावामध्ये अस्तित्वात आहे व ते बघण्यासाठी मी आता निघालो आहे. गावातील मुख्य रस्ता जरी अगदी अरूंद व चिंचोळा असला तरी मधुकेश्वर मंदिराच्या बाहेर मात्र भरपूर मोकळी जागा ठेवलेली आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यास कोणतीच अडचण येत नाही. मी गाडीतून बाहेर उतरतो. मंदिराच्या उजव्या हाताला एका मोठ्या शेडमधे एक भव्य लाकडी रथ मला ठेवलेला दिसतो. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीच्या दिवशी या रथातून मधुकेश्वराची भव्य रथ यात्रा काढली जाते.
प्रवेशद्वाराजवळील गजशिल्प
संध्याकाळच्या सोनेरी उन्हात झळाळणारा ओसरीवरचा दगडी स्तंभ
गरूड स्तंभ
गरूड स्तंभावरील बास रिलीफ
देवळाचा परिसर एका 12 ते 15 फूट उंचीच्या भरभक्कम भिंतीने सुरक्षित केलेला आहे. देवळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठी गजशिल्पे आहेत. या गजशिल्पांमागे एक ओसरी आहे. ओसरीचा तळ अंदाजे 4 फूट तरी ऊंचीवर आहे व तळाच्या बाजूच्या भिंतीमधे बसवलेल्या दगडांच्यावर कोरीव काम केलेले दिसते आहे. ओसरीवर असलेल्या छताला आधार देण्यासाठी दीड ते दोन फूट व्यासाचे दगडी खांब आहेत. या खांबांच्यावरही कोरीव नक्षीकाम केलेले आहे. मुख्य प्रवेशद्वार अर्थातच पूर्वाभिमुख असल्याने ओसरीवरील या दगडी खांबावर, प्रवेशद्वारामधून येणारे संध्याकाळच्या सूर्याचे किरण, थेट पडताना मला दिसतात. घोटून गुळगुळीत केलेला हा खांब सुवर्णकांती असावी तसा झळकताना दिसतो आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून मी आत शिरतो. समोरच एक ऊंच स्तंभ दिसतो आहे. अर्थात हा गरूड स्तंभ आहे व याच्या तळावर कोरलेल्या बास रिलिफ शिल्पांमधे एक गरूडाचेही शिल्प आहे. या गरूड स्तंभाच्या बरोबर पुढे मंदिराचे 3 कक्ष व सर्वात शेवटी गाभारा हे एका पाठोपाठ एक असे बांधलेले आहेत. या सगळ्या कक्षांची बांधणी बाहेरच्या ओसरी प्रमाणेच उंचावलेला तळ, त्यावर उभारलेले दगडी गोल खांब व त्यावर छत या पद्धतीचीच आहे. अगदी अखेरीस असलेल्या गाभार्‍यात असलेले शिव लिंग, मधाचा रंग असलेल्या पाषाणापासून बनवलेले आहे. कन्नड देशातील हेमाडपंत, श्री जखनाचार्य हे या मंदिराचे बांधणीकार होते असे समजले जाते. शिवलिंग मधाच्या रंगाच्या पाषाणाचे असल्याने या मंदिराला मधुकेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.
मधुकेश्वर मंदिर ; डाव्या बाजूचे छोटे मंदिर मधुमतीचे
बाजूने दिसणारा मंदिराचा देखावा; एका पाठोपाठ एक असणारे 3 कक्ष
काळ्या कातळापासून बनवलेली नंदीची मूर्ती
गरूड स्तंभाजवळ असलेल्या पहिल्या मंदिर कक्षात काळ्या कातळापासून बनवलेली 7 फूट उंचीची नंदीची मोठी सुंदर मूर्ती आहे. या नंदीचे डोळे तर फारच अप्रतिम आहेत. मधल्या कक्षात किंवा मंडपामध्ये, मध्यभागी एक गोल चबुतरा बांधलेला आहे. या चबुतर्‍यावर नर्तकी देवासमोर नृत्य सादर करत असत. या चबुतर्‍याच्या चारी बाजूंना असलेल्या गोल दगडी खांबांच्या साधारण मध्यावर अंतर्गोल व बहिर्गोल असे अत्यंत गुळगुळीत पृष्ठभागाचे गोलावे दिलेले असल्याने, मध्यभागी नृत्य करणार्‍या नर्तकीची अनेक प्रतिबिंबे चारी दिशांकडील खांबावर दिसत असत व हा सर्वच देखावा मोठा अद्भुतरम्य व देखणा दिसत असला पाहिजे यात शंका नाही.
त्रैलोक्य मंडप
पाताळ लोक दर्शविणारे 5 फण्य़ाच्या नागाचे शिल्प
स्वर्ग लोक दर्शविणारे शिव-पार्वती शिल्प ; त्रैलोक्य मंडप
त्रैलोक्य मंडपावरील बास रिलीफ
गाभार्‍याच्या सर्वात जवळ असलेल्या किंवा तिसर्‍या मंडपात एक मोठा दगडी देव्हारा, गाभारा प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला ठेवलेला आहे. या देव्हार्‍याला त्रैलोक्य मंडप असे नाव आहे. या मखराच्या तळाच्या बाजूस असलेला 5 फण्यांचा नाग, पाताळ लोक दर्शवतो मधला भाग अर्थातच पृथ्वी आहे व छत हे स्वर्गलोक दर्शवित असल्याने यावर नंदीवर आरूढ झालेल्या शिव-पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे.
मंदिराची सुबक बांधणी
मंदिराच्या कळसावरील कोरीव काम
मधुकेश्वर गाभार्‍याच्या डाव्या अंगाला, मधुमती किंवा पार्वतीचे एक लहान मंदिर आहे. बाहेरच्या कक्षात ठेवलेल्या नंदी मूर्तीची रचना अशी साधली आहे की या नंदीचा एक डोळा मधुकेश्वराच्या गाभार्‍यातून दिसतो तर दुसरा डोळा मधुमती मंदिराच्या गाभार्‍यातून दिसतो. मंदिरांच्या कक्षात उभे असलेले खांब असे उभारलेले आहेत की त्यांच्यामधून हा डोळा बरोबर दिसू शकतो. नंदीचे आपला मालक व मालकीण या दोघांच्या आज्ञेकडे अगदी बारीक लक्ष आहे हेच बहुदा मंदिर रचनाकारांना सुचवायचे असावे. मंदिराच्या बाह्य भिंतीच्या आतील बाजूस, भिंतीला लागूनच, अनेक कक्ष व मंदिरे बांधलेली आहेत. यात नृसिंह, कदंबेश्वर व गणपती यांची मंदिरे आहेत. गणपतीची मूर्ती अर्धी कापलेली आहे. मूर्तीचा उरलेला अर्धा भाग काशीमध्ये आहे असे मानले जाते. या शिवाय एका मंदिरात 5 फण्यांचा नाग कोरलेली एक पाषाण पाटी आहे. या पाटीवर बाजूंना ही पाटी हरितिपुत्र शातकर्णी याने मंदिराला दान दिली असल्याचा उल्लेख आहे. ही पाटी पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात मंदिराला दिली गेली असावी. बाह्य भिंतीजवळच्या एका खोलीत, अतिशय सुंदर रित्या घडवलेला एक पाषाण मंचक ठेवलेला आहे. या मंचकाच्या चारी कडांना पोस्टर पद्धतीचे नक्षीकाम केलेले उभे खांब आहेत. हा मंचक सोंदे घराण्याचा राजा, रघू नाईक याने मंदिराला भेट दिलेला आहे व तो फेब्रुवारी मधे होणार्‍या रथयात्रेमध्ये वापरला जातो. बनवासी मंदिरात असलेल्या 11 कन्नड भाषेतील शिलालेखांमुळे हे मंदिर व त्यातील शिलालेख हे इतिहासाच्या व प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी एक अमूल्य खजिना आहे यात मला तरी शंका वाटत नाही.
मंचकाच्या पोस्टरवरील अप्रतिम घडण काम
विष्णू मूर्ती
प्रवेश द्वारावरील कोरीव काम
एक बास रिलिफ पॅनेल
थोड्याशा जड अंत:करणानेच मी मधुकेश्वर मंदिरातून बाहेर पडतो आहे. हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीच्या 2250 वर्षाच्या इतिहासाचे एक द्योतक आहे आणि तरीही या मंदिराची देखभाल पाहिजे तेवढ्या उत्कृष्ट रितीने होत नाहीये. मंदिराच्या अगदी समोरच ताजे अननस कापून मिळण्याची व्यवस्था आहे. मी काही तुकडे खाऊन बघतो. अननसाची आंबट गोड चव इतकी मस्त आहे की परत एकदा आणखी थोडे तुकडे तोंडात टाकण्याचा मोह मला आवरत नाही. परतीचा प्रवास अगदी आरामात होतो. दिवसभराच्या भ्रमंतीने मी आता चांगलाच दमलो आहे. लवकर जेवण करून मी अंथरूणावर अंग टाकतो. डोळे कधी मिटतात ते कळतही नाही.
(क्रमश :)
संदर्भ 1 - Bombay Gazetteer Vol XV Part I
12 नोव्हेंबर 2011