मागच्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्रपती भारतात आले होते
तेंव्हा त्यांच्याबरोबर केलेल्या चहापानाच्या वेळेस भारताच्या पंतप्रधानांनी
घातलेला सूट नंतर बरेच दिवस माध्यमांमधून गाजत होता. या सूटची किंमत 10 लाख तरी
असावी असा अंदाज प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना पंतप्रधानांनी इतका किंमती सूट
घालावा हे रुचले नाही. या महिन्यात झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत
पंतप्रधानांच्या राजकीय पक्षाच्या उडालेल्या धुव्व्याची कारणे देताना हा सूट हे
सुद्धा एक प्रमुख कारण असले पाहिजे असे अनेक विश्लेषकांनी सांगितले होते.
या सूटचे वैशिष्ट्य तरी काय होते की ज्यामुळे त्याची एवढी किंमत
केली जात होती. या
सूटवर लांबून बघितल्यास उभ्या रेषा (pinstripe)
दिसत होत्या. मात्र जवळून बघितल्यावर या रेषा नसून पंतप्रधानांच्या नावाची अक्षरे
एका खाली एक अशा पद्धतीने कापड विणतानाच विणलेली होती.
हा सूट पंतप्रधानांना भेट म्हणून मिळाला होता हे आता उघड झाले
आहे कारण हा सूट आणि त्याबरोबरच गेल्या 9 महिन्यात पंतप्रधानांना मिळालेल्या इतर
455 भेटी ( ज्यात पितळ,
चांदी,
सोने व ब्रॉन्झ या धातूंपासून बनवलेल्या वस्तू आहेत) यांचा लिलाव गुजराथ राज्यातील
सुरत या शहरात केला जात आहे. पंतप्रधान गुजराथचे मुख्यमंत्री असल्यापासून आपल्याला
मिळालेल्या सर्व भेटींचा लिलाव करण्याची त्यांची परंपरा त्यांनी पुढेही चालू
ठेवलेली दिसते आहे. या लिलावातून मिळालेली रक्कम स्वच्छ गंगा अभियानाला दिली जाणार
आहे.
पंतप्रधानांना मिळालेल्या गोष्टी सरकारी खजिन्यात जमा करण्याची
सरकारी शिस्त आहे. त्या बरहुकुम या भेटवस्तू तेथे न जाता त्यांचा लिलाव का केला
गेला आहे? असा
प्रश्न काही लोकांना पडला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी हा सूट वापरणे हे
आत्मप्रौढीचे लक्षण आहे त्याचप्रमाणे आता केला जाणारा लिलाव हा या प्रकरणमुळे
झालेले राजकीय नुकसान कमी करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत.
सध्याच्या माहितीप्रमाणे या सुटाला 1 कोटी 21 लाख रुपयांची
बोली आल्याचे सुरतच्या म्युन्सिपल कमिशनरांनी सांगितले आहे. सूट वापरणे आणि त्याचा
लिलाव हे भारतातल्या माध्यमांना मात्र एक
तैय्यार खाद्य मिळाले आहे एवढे मात्र नक्की!.
18 फेब्रुवारी 2015
