मागच्या शतकात जरठ विवाहाच्या प्रश्नावर गोविंद बल्लाळ देवल
यांनी शारदा या नावाचे एक नाटक लिहिले होते. या नाटकातील नायिकेवर जरठ विवाहाची
बळजबरी झाल्यावर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. याच कथाबीजावर
काढलेल्या व अतिशय गाजलेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील नायिका मात्र हा असा
विवाह मान्य करण्यास संपूर्णपणे नकार देणारी एक तडफदार स्त्री दाखविली होती.
काही दशकांपूर्वी घडलेल्या एका सत्य घटनेनुसार, लग्नात आधी
ठरलेले मानपान करण्यास वधुपित्याने असहाय्यता दर्शविल्याने, वरपक्षाने
लग्नसंबंध मोडले होते. या वेळी त्याच मांडवात मुंडावळी बांधलेल्या वधूने येथे
आलेल्या लोकांपैकी कोणा तरूणाला आपल्याशी विवाह करायची तयारी असली तर मी तयार आहे
अशी घोषणा केली होती व त्याप्रमाणे तिचे लग्नही झाले होते.
या सर्वावरची कडी ठरेल असा एक प्रसंग उत्तर प्रदेश राज्यातील
रामपूर येथे या आठवड्यातच घडला. इंदिरा नाव असलेल्या या वधूचे लग्न जुगल किशोर या
तरुणाशी ठरले होते. या जुगल किशोरला आकडी येऊन फिट येण्याचा आजार होता व हा आजार
त्याने व वरपक्षाने वधुपक्षापासून लपवून ठेवला होता.
या दोघांचा लग्नविधी चालू असताना जुगल किशोरला इंदिराच्या गळ्यात
पुष्पमाला घालण्याच्या पूर्वीच आकडीचा झटका आला व सर्व लोकांसमोर तो खाली कोसळला व
त्याला जवळच्या इस्पितळात हलवण्यात आले. संतप्त झालेल्या इंदिराने लग्नसमारंभात भाग
घेण्यासाठी म्हणून आलेल्या आपल्या बहिणीच्या दिराला आपल्याशी लग्न करशील का? म्हणून
विचारले. जरा वेळ विचार करून त्याने होकार दिला व लगेचच त्यांचे लग्न पार पडले.
काही वेळाने जुगल किशोर इस्पितळातून परत आला व त्याने आपल्या वधूचे दुसर्याच
कोणाशी लग्न लागल्याचे बघितले व आता आपली नातेवाईक व मित्र यांच्यासमोर प्रचंड
मानहानी होणार या भितीने त्याने इंदिराची खूप मनधरणी केली परंतु आकडीचा विकार
असलेल्या तरुणाशी तिने स्पष्ट नकार दिल्याने जुगल किशोर आपल्या घरी परतला.
जुगल किशोरच्या नातेवाईकांनी प्रथम पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला
होता परंतु दोन सज्ञान लोकांचा विवाह परस्पर संमतीने झालेला असल्याने पोलिस काही
करू शकणार नाहीत हे कळल्याने ते मागे फिरले.
20 फेब्रुवारी 2015

