Sunday, 30 November 2014

ऍपलचे वेठबिगारी– 2


आय पॅड, आय फोन व टॅबलेट संगणक यासारखी अतिशय लोकप्रिय उत्पादने निर्मिणार्‍या ऍपल या अमेरिकन कंपनीच्या उत्पादनांचे प्रत्यक्ष उत्पादन करणार्‍या फॉक्सकॉन या कंपनीतल्या कामगारांच्या आत्महत्यांमुळे, या कंपनीतील नवशिक्या कामगारांची केवढी आर्थिक पिळवणूक होते आहे याची माहिती काही आठवड्यांपूर्वीच बाहेर आली. ऍपलला होणार्‍या प्रचंड फायद्यामागे या कामगारांची ही पिळवणूक आहे, हे माध्यमांच्या लक्षात आल्याबरोबर तिथल्या नवशिक्या कामगारांचे पगार जवळपास तिपटीने वाढले. भारतात बाल कामगार आहेत म्हणून तिथल्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे म्हणून नेहमी शंख करणार्‍या पाश्चात्य माध्यमांनी या बाबत फारशी ओरड केल्याचे ऐकिवात नाही. परंतु ते अपेक्षितच होते.
ऍपलच्या या उत्पादनांत जो स्पर्श-पडदा किंवा टच स्क्रीन वापरला जातो तो प्रत्यक्षात फॉक्सकॉन सारखी एक दुसरी तैवानी कंपनीच बनवते. या कंपनीचे नाव आहे विनटेक (WinTek) . ही कंपनी जरी तैवानी असली तरी या कंपनीचे उत्पादन करणारे कारखाने, फॉक्सकॉन प्रमाणेच, चीन मधेच आहेत. या कंपनीच्या सुझॉव्ह (Suzhou) या गावातल्या कारखान्यात, ऍपलच्या निरनिराळ्या उत्पादनांसाठी टच स्क्रीन बनवले जातात. या कारखान्याच्या इमारतीत, दुसर्‍या मजल्यावर एक विभाग आहे. या ठिकाणी उत्पादनांचे भाग काही रसायने वापरून स्वच्छ करण्याचे काम चालते. कामगारांच्या माहिती प्रमाणे, या स्वच्छतेसाठी, n-hexane हे रसायन वापरण्यात येत होते. हे रसायन अतिशय विषारी असल्याने ते हाताळण्यासाठी योग्य मास्क, हातमोजे वगैरे वापरणे गरजेचे असते. हे रसायन कामगारांच्या आरोग्याला घातक असल्याने याच्या वापरावर चीनमधे बंदी आहे. मागच्या वर्षी, मास्क किंवा हातमोजे यांचा वापर न करता हे रसायन उपयोगात आणले गेल्यामुळे, या विभागातले 41 कामगार, चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे या सारख्या लक्षणांमुळे इस्पितळात दाखल केले गेले. त्यांच्या आजारपणाचे निदान केल्यावर त्यांच्या मज्जांना (Nerves) इजा झाल्याचे आढळून आले. हे सर्व कामगार अजूनही कामावर जाऊ शकलेले नाहीत. आता त्यांची तब्येत बरी असली तरी कंपवात, अवयव दुखणे या सारखी लक्षणे अजूनही दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कामगार कसल्या उत्पादनात गर्क होते त्याबद्दल विनटेक किंवा ऍपल यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. ऍपलने तर आपल्या उत्पादनांचे भाग सुझॉव्ह कारखान्यात बनतात की नाही हे सांगण्यास सुद्धा नकार दिला. वार्ताहरांनी इस्पितळात दाखल झालेल्या कामगारांना ऍपलची उत्पादने दाखवल्यावर त्यांनी या उत्पादनांचेच कोणते भाग ते हाताळत होते ते लगेच दाखवले. हे बहुतेक कामगार, वीस बावीस वर्षाचे असून त्यांची ही प्रथम नोकरीच होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरेच आजारी कामगार स्वत:च्या घरीच पळून गेल्याने, आजारी पडलेल्यांचा खरा आकडा 41 पेक्षा बराच जास्त आहे.



विनटेक कंपनीचा आणखी एक कारखाना डॉंनगुआन( Dongguan) या गावात आहे. हा कारखाना Masstop LCD plant या नावाने ओळखला जातो. या कारखान्यात काम करणार्‍या कामगारांना आपण कोणत्या पार्टसचे उत्पादन करतो? ते कोणाला पुरवले जातात? वगैरे काहीच माहिती नाही. हे कामगार आठवड्याला 70 तास काम करतात व त्याबद्दल त्यांना महिन्याला 220 ते 366 अमेरिकन डॉलर्स एवढा पगार मिळतो. फॅक्टरीमधे 10000च्या वर कामगार आहेत व हे सर्व दूरच्या खेडेगावांच्यातून आलेले आहेत. यातले खूपसे बाल कामगारच आहेत. कामावर लागताना ते खोटी प्रमाणपत्रे देऊन कामाला लागतात. या कामगारांना बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची परवानगी नसते.


या Masstop LCD plant मधे जूनच्या पहिल्या आठवड्यात 9 कामगार अचानक आजारी झाले. चक्कर येणे व उलट्या होणे ही लक्षणे त्यांच्यात दिसून येत होती. कारखान्यात n-hexane रसायन वापरले जात होते अशी बातमी लगेच पसरली. विनटेकच्या खुलाशाप्रमाणे मात्र औद्योगिक ऍसिटोन या रसायनामुळे या कामगारांना विषबाधा झाली असावी. कारखान्याच्या वातानुकूलन यंत्रात बिघाड झाल्याने असे झाले असावे. अर्थात कंपनीच्या या खुलाशावर, कामगारांचा विश्वास बसलेला नाही. कंपनीने आता कामगारांना धमकी दिली आहे की जे कामगार कंपनीच्या अधिकृत खुलाशावर विश्वास ठेवणार नाहीत व अफवा पसरवतील त्यांना कामावरून कमी करण्यात येईल.


विनटेक कंपनी म्हणते की आम्ही सर्व कायदेकानूंचे योग्य पालन करत असतो. आम्हाला आमच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे व आमच्या कामगारांना एक सुरक्षित , आरोग्यदायी व बिनधोक असे वातावरण कारखान्यामधे देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” माध्यमांच्या रिपोर्ट्स प्रमाणे खरी परिस्थिती वेगळीच आहे. सुझॉव्ह कारखान्यात काम करणारी व सध्या आजारी असलेली एक महिला कामगार म्हणते की ऍपलची उत्पादने आनंदाने वापरणार्‍या लाखो लोकांनी आमच्या स्वार्थत्यागांची नुसती आठवण जरी ही उत्पादने वापरताना ठेवली तरी आम्हाला बरे वाटेल.”
ऍपलसारख्या कंपन्यांनी आपली उत्पादने बनवून घेताना आपले कंत्राटदार काही बेकायदेशीर कृत्ये करत नाहीत ना? एवढे तरी तपासण्याची गरज आहे. आपल्या पायाखाली काय जळते आहे हे दडवून ठेवण्याचा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी एक न एक दिवस ते उघडकीला आल्याशिवाय थोडेच राहणार आहे?
26 जून 2010