दिनांक- 25 मे 2009. जागा- भारतीय वायुदलाचा, जामनगर मधील एअरबेस. तीन
MIG -29 आणि 3 जॅग्वर विमाने एका पाठोपाठ एक अशी त्वरेने उड्डाण करतात आणि
भारताच्या पश्चिम वायुसीमेकडे रवाना होतात. या विमानांनी हे उड्डाण,
वायुदलाच्या रडार यंत्रणेने शत्रूचे एखादे विमान भारताच्या हद्दीत
शिरल्याचा संकेत दिल्यामुळे, केलेले नसते किंवा सरावासाठीही केलेले नसते.
ही विमाने एका विशेष कामगिरीवर वायुसीमेवर गेलेली असतात. त्यांच्याकडे काम
असते स्वागताचे. वायुदलाचा राजा म्हणता येईल असे एक विमान आता भारतीय
वायुसीमेत शिरणार असते. या विमानाच्या स्वागतासाठी ही विमाने भारतीय
वायुसीमेवर प्रतीक्षा करत असतात. काही क्षणातच हा राजा भारतीय वायुसीमेत
प्रवेश करतो व ही सर्व विमाने पुढच्या काही मिनिटातच जामनगर विमानतळावर
उतरतात. पश्चिमी वायुदलाचे मुख्य एअर मार्शल के. डी. सिंग आणि इतर वरिष्ठ
अधिकारी या विमानाचे आणि विमानाचे सारथ्य करणारे ग्रुप कॅप्टन बी.साजु
यांचे स्वागत करण्यासाठी जातीने उपस्थित असतात.

एवढे विशेष काय आहे या विमानात? याचे स्वागत एवढ्या थाटामाटाने का केले गेले? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. AWACS (Airborne Warning and Control System) या नावाने ओळखली जाणारी ही विमाने, आपल्या पौराणिक कथांमधे दिव्य दृष्टीचे ऋषि असत त्यांचाच आधुनिक अवतार म्हणता येतील. उडत असताना हे विमान आपल्या सभोवतीच्या 200 मैलापर्यंतच्या वायुहद्दीत, कोणती विमाने उडत आहेत? कोणती उडण्याच्या तयारीत आहेत? सैनिकांची जमवाजमव चालू आहे का? कोणती मिसाइल्स प्रक्षेपित करण्यात आली आहेत का? किंवा प्रक्षेपणाच्या तयारीत आहेत? या सारख्या सैनिकी दृष्ट्या अतिशय महत्वाच्या हालचालींवर सतत नजर ठेवू शकते. सैनिकी पथकांच्या मधील संपर्क व संभाषणे यावरही ते नजर ठेवू शकते.

ही विमाने इतकी परिणामी असतात की त्यांना शक्ती गुणक (Force Multiplier) म्हणतात. हे विमान वर आकाशात असले की कमी संख्येने असलेली सैनिक पथके किंवा विमाने खूप मोठ्या परिसरातही परिणामी राहू शकतात. ही विमाने भारताच्या संरक्षण दलांचा प्रत्युत्तर काल आणि परिणामाची व्याप्ती याच्यात लक्षात येण्यासारखी प्रगती करू शकतात.
भारताने घेतलेल्या या विमानात इझराईल ने तयार केलेली ‘फाल्कन’ ही त्वरित सूचना देणारी यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा जगातील सर्वोत्तम अशा यंत्रणांच्यापैकी मानली जाते. गंमतीची गोष्ट म्हणजे ज्या विमानावर ही यंत्रणा बसवली आहे ते इल्युशिन् 76 हे भव्य विमान, रशियन बनावटीचे आहे. इझराईलच्या उत्पादकांना, ही यंत्रणा रशियन विमानावर कशी बसविली आहे याचे बारकावे, भारताशिवाय इतर कोणालाही देण्यास रशियन सरकारने मनाई केली आहे. आणखी AWACS विमाने पुढच्या तीन चार वर्षांत भारताकडे येतील.
आपल्या पश्चिमी आणि उत्तर सीमांच्या पलीकडे असलेले सतत अशांत वातावरण बघता हा वायुदलाचा राजा थोड्याच दिवसात सर्व वायुसीमांवर आपले प्रभुत्व गाजवू लागेल यात शंकाच नाही.
18 ज़ुलै 2009