Thursday, 11 September 2014

पेशव्यांचा गणेशोत्सव

पेशवेकालीन पुण्यात साजर्‍या केल्या जाणार्‍या सार्वजनिक उत्सवांत, तीन प्रमुख असत, दसर्‍याचे सीमोल्लंघन, गणेशोत्सव आणि होळी. हे तिन्ही उत्सव अतिशय भव्य प्रमाणात आणि मोठ्या उल्हासाने साजरे केले जात. या उत्सवांचा सर्व खर्च पेशव्यांचा दरबारातून होत असे. या वेळी होणार्‍या कार्यक्रमांच्यात खेळ आणि करमणूकीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत. या निमित्ताने अनेक व्यायामपटू, नर्तक, नट, गायक, शाहिर पुण्यात जमा होत असत.

दर वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंतचे 10 दिवस, पेशव्यांच्या महालात गणेशोत्सव साजरा होत असे. या निमित्ताने, गणपती रंग-महाल अतिशय सुंदर रित्या सजवला जात असे आणि सर्व कार्यक्रम येथेच होत असत. भिंतींच्यावर लावलेली नयन मनोहर तैल-चित्रे आणि आरसे, छतावर टांगलेली स्फटिकांच्या लोलकांची झुंबरे आणि हंड्या यांत या सगळ्या सजावटीची अनेक प्रतिबिंबे दिसत आणि संपूर्ण महाल प्रकाशमय होऊन जात असे. मध्यभागी ठेवलेली पेशव्यांची मसनद त्यावरील सोन्याच्या जरीकामामुळे झगमगत असे. मसनदीच्या दोन्ही बाजूंना वरिष्ठ अधिकारी, सरदार, शिलेदार, दरबारी आपले सर्वोत्तम रत्नजडित कपडे परिधान करून त्यांच्या हुद्द्यांप्रमाणे बसत असत. भालदार, चोपदार यांनी ललकारी दिल्यावर पेशवे अतिशय रुबाबदारपणे महालात प्रवेश करत असत व आपल्या पदाला साजेश्या पद्धतीने, आसनास्थित होत असत. सर्व दरबार हा निरनिराळे रंग आणि जमलेल्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण वैविध्ये, यामुळे मोठा खुलून दिसत असे. सर्वांच्या करमणुकीसाठी आयोजित केलेले, नर्तन, गाणी व संगीत, कथा-कीर्तन आणि इतर कार्यक्रम या नंतर सुरू होत असत.

peshwa1790


1795 या वर्षांत पेशवे दरबारापुढे, किती कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली आणि त्यांना किती बिदागी दिली गेली याचा हिशोब बघितला तर या उत्सवाची भव्यता लक्षात येईल. त्या वर्षी 181 कीर्तनकारांनी कथा सांगितल्या होत्या व त्यांना कपड्यालत्त्याशिवाय 2155 रुपये बिदागी दिली होती. 39 गायकांना 329 रुपये बिदागी मिळाली होती. 43 नर्तकींच्या पथकांना 1026 रुपये बिदागी मिळाली होती. 43 पखवाजांना 121 रुपये तर 25 वाजंत्रीवाल्यांना 240 रुपये देण्यात आले होते.

शनिवारवाड्यातील सर्व सेवक वर्ग या गणेशोत्सवात अगदी मनापासून भाग घेत असे व उत्सव उत्कृष्ट रितीने साजरा करण्यात त्यांचा मोठा भाग असे. या सर्वांना पेशव्यांकडून मिठाई आणि बक्षिसे मिळत असत. या उत्सवाच्या निमित्ताने वाड्यावर अनेक ब्राम्हणांना भोजन घालण्यात येई आणि गरीबांना मिठाई वाटण्यात येत असे.

10 दिवसानंतर, या उत्सवासाठी मुद्दाम तयार केलेल्या, शाडूच्या मातीच्या गणपतीच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यासाठी, पेशवे जातीने एका फुलांची सजावट केलेल्या नावेतून नदीमधे जात असत व सर्व औपचारिक धार्मिक विधी पार पाडून, प्रतिमेचे विसर्जन करत असत.

हे सगळे वर्णन वाचून असे वाटले की हा पेशव्यांचा अतिशय औचित्यपूर्ण, आपल्या इतमामाला साजेसा आणि गुणी कलावंतांना, सजावट करणार्‍या कलाकारांना, प्रोत्साहन देणारा गणेशोत्सव कुठे? आणि आज त्याचे काय झाले आहे?


24 ऑगस्ट 2009