Wednesday, 10 September 2014

हस्तांदोलन! नकोच नको!

पाश्चिमात्य जगात, पाहुण्यांचे किंवा नवीन भेट झालेल्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी त्याचा हात हातात घेऊन, हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. जपान हा देश जरी पूर्वेकडचा असला तरी जपानी लोकांच्या अंगात पाश्चिमात्य रितीरिवाज इतके रूळले आहेत की जपानी लोक स्वागत करताना हस्तांदोलनाचाच वापर करतात.
जपानमधे सध्या 30 ऑगस्टला होणार्‍या निवडणुकीचे वारे आहेत. तिथल्या ओकिनावा या भागातून उभे असलेल्या ‘डेनी टामाकी’ यांची चिंता काही वेगळीच आहे. निवडणूक प्रचार करताना, आपल्या मतदारसंघात फिरून मतदारांशी हस्तांदोलन करणे व चार शब्द बोलणे हे फारच महत्वाचे असते असे त्यांना वाटते. जपानमधे सध्या, भारताप्रमाणेच स्वाइन फ्ल्यू किंवा H1N1 फ्ल्यू धुमाकूळ घालत आहे. तीन लोक दगावले असून टामाकींचा ओकिनावा मतदार संघ या फ्ल्यूच्या फटक्यात चांगलाच सापडला आहे.

FLU/JAPAN


त्यामुळे आपण जर मतदारांशी हस्तांदोलन केले किंवा त्यांच्याजवळ जाऊन बोललो तर मतदारांना संसर्ग होण्याची भिती आहे असे टामाकींना वाटते. यामुळे आपल्या प्रचारकार्यात ते लोकांपासून चार हात दूर राहूनच बोलतात व कुणाशीही हस्तांदोलन करण्याच्या आधी जंतूनाशकाने आपला हात त्याच्या समोरच स्वच्छ करून घेतात.

handshake


टामाकी यांचे उदाहरण आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाचे आहे असे वाटते. भारतीय पद्धतीप्रमाणे, नमस्कार करून पाहुण्याचे स्वागत करण्याची पद्धत दोघांच्या साठी अतिशय बिनधोक आहे. पण नवीन पिढीला ती फार जुनाट वाटते हे ही खरेच. H1N1 फ्ल्यूचा प्रसार आणि संसर्ग, मुख्यत्वेकरून तळहातावर साचून राहिलेल्या व्हायरसमुळेच होतो ही गोष्ट लक्षात घेतली, तर इतर कोणत्याही व्यक्तीचा हात आपल्या हातात घेणे या साथीच्या काळात तरी अतिशय धोकादायक आहे हे ही खरेच. काही मंडळींना असे चार हात लांब राहून बोलणे, हस्तांदोलन न करणे, अपमानास्पद वाटण्याची शक्यता आहे.

1181062143_namaskar_to_each_other


जागतिक आरोग्य संस्थेच्या नवीन धोक्याच्या सूचनेनुसार. सध्या आलेल्या फ्ल्य़ूच्यापेक्षा कितीतरी जास्त तीव्र अशी साथ येत्या हिवाळ्यात येण्याची शक्यता आहे. त्यापासून आपल्या सर्वांचा बचाव करायचा असेल तर आपले सामाजिक रितीरिवाज श्री. टामाकी यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून बदलणे आवश्यक आहे.
तेंव्हा दुसर्‍या माणसाशी चार हात लांबवरूनच बोला. जवळ जावेच लागणार असले तर मास्क लावा. हस्तांदोलन न करता नमस्कार करा. दुसर्‍याचा हात हातात घेणे क्रमप्राप्तच असले तर त्यानंतर शक्य असल्यास हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा जंतुनाशकाने स्वच्छ करा.

ape_waving_hand_hg_clr

नमस्कार करणे फारच जुनाट वाटत असले तर उंचावलेला हात हलवून ‘हाय’ म्हणा. पण हस्तांदोलन! नकोच!  नको!


23 ऑगस्ट 2009