Showing posts with label हिमालय. Show all posts
Showing posts with label हिमालय. Show all posts

Wednesday, 26 December 2018

मॉन्टेगोमेरीचे पंडीत



अठरा शतकांपूर्वी होऊन गेलेल्या टॉलेमी या ग्रीक तत्ववेत्याच्या कालापासून पृथ्वीच्या पृष्ठभागासंबंधीचे आपले ज्ञान सतत किंवा खंड न पडता कधीच वृद्धिंगत होऊ शकलेले नाही. कुतुहुल, भुगोलासंबंधी आत्मियता आणि धाडस करून स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहण्याची तीव्र लालसा असलेल्या काही भूसंशोधकांच्या उत्साहामुळे आपल्या या ज्ञानात मधून मधूनच अचानकपणे वाढ झालेली आहे. अगदी एका शतकापूर्वी सुद्धा जगातील सर्व महत्वाच्या खंडांच्या आपल्याला ज्ञात नकाशांमद्ध्ये अज्ञात अशा विस्तीर्ण मोकळ्या जागा नकाशा बघणार्‍याच्या डोळ्याला खुपल्याशिवाय रहात नसत. मध्य एशियाची भूमी ही सुद्धा नकाशामधील या मोकळ्या जागांमध्ये प्रामुख्याने होती. या मोकळ्या जागांच्या अडचणीशिवाय  आणखी एक अडचण त्या काळात नकाशे बनवणार्‍या नकाशेकारांसमोर उभी रहात होती. धाडसी भूसंशोधकांनी लिहिलेल्या आपल्या भूसंशोधनाच्या वर्णनांना, वर्णनाबरहुकुम नकाशांच्यात बसवताना नकाशांचा विपर्यास होत असे व यावर मार्ग काढण्यासाठी या नकाशेकारांना नकाशात अजब बदल करावे लागत.
भारतीय सर्वेक्षण विभागाने, हिमालय पर्वताने आखून दिलेल्या भारताच्या नैसर्गिक उत्तरी सीमेपर्यंतच्या सर्व भूभागाचे सर्वेक्षण 1860 या वर्षांपर्यंत पूर्ण केले होते. या कामाची जबाबदारी असलेल्या ब्रिटिश सर्वेशकांना साहजिकच या उत्तरी सीमेपलीकडे असलेल्या भूभागासंबंधी माहिती करून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. या इच्छेची तुलना, सध्याच्या युगातील खगोलशास्त्रज्ञ किंवा अवकाशयात्री यांना आपल्या माहितीच्या परिसीमेपलेकडचे विश्व कसे आहे हे जाणून घेण्याची जी लालसा निर्माण झालेली  आहे तिच्याशी करणे अजिबातच अयोग्य ठरणार नाही.
परंतु एशिया खंडातील रहिवासी साहजिकच मुख्यतः सर्वेशक किंवा नकाशाकार, आणि भरीत भर म्हणून ब्रिटिश वंशांच्या असलेल्या या आगंतुकांकडे अतिशय संशयाने बघत होते. याचे एक प्रमुख कारण होते ब्रिटिश सर्वेशकांचा सर्वेक्षणाबद्दलचा प्रमाणापेक्षा जरा जास्तच असलेला उत्साह. या बाबींमुळे भारतीय शासनाने असे कडक आदेश जारी केले होते की आपल्या सेवेत असलेल्या कोणत्याही कर्मचार्‍यांने भारताची सीमा ओलांडून परदेशी भूभागावर पाउल सुद्धा टाकू नये.
भारतीय शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणे शक्य नसल्याने, सीमेपलीकड्च्या अज्ञात प्रदेशाबद्दलचे आपले ज्ञान वाढविण्याची लालसा पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश सर्वेशकांनी एक योजना नंतर आखली. या योजनेप्रमाणे भारतीय वंशाच्या योग्य उमेदवारांना सर्वेक्षणाचे मूलभूत शिक्षण देण्याचे ठरले. या शिक्षणात एका ठिकाणापासून दुसर्‍या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी किती पावले चालावी लागली ते मोजून त्या दोन ठिकाणांमधील अंतर काढणे आणि आकाशातील तार्‍यांचे निरिक्षण करून कोणत्याही ठिकाणाचे स्थान व अक्षांश-रेखांश निश्चित करणे या दोन बाबींचा समावेश होता. अशा रितीने प्रशिक्षित झालेल्या धट्याकट्या व उत्साही तरूणांना, गुप्त रितीने, आपला मूळ हेतू लपवला जाईल असे रूप-रंग देऊन त्यांची बोळवण सीमेपलीकडच्या अज्ञात प्रदेशाकडे करावयाचे या योजनेप्रमाणे ठरले.
कॅप्टन टी.जी. मॉन्टेगोमेरी (आर.ई. ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे, हिमालयामधील सर्व्हे पार्टीज यांचे इन चार्ज) 1968 मध्ये लिहितात.   
ब्रिटिश अंमलाखालील भारताच्या सरहद्दीपलीकडील भूभागाचे भूसंशोधन या विषयात मागच्या अनेक दशकात तुलनात्मक रित्या बघितल्यास फारशी काहीच प्रगती होऊ शकलेली नाहीये असे म्हणावे लागते आणि फक्त युरोपियन भूसंशोधकांचा विचार केला तर ही प्रगती सीमेपलीकडे केलेले एक किंवा दोन दिवसांचे मार्च यापलीकडे कधीच होऊ शकलेली नाहीये. एशियन लोकांबरोबर प्रवास करताना एखाद्या युरोपियनने कसलेही सोंग आणले तरी ते आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतेच असा अनुभव आहे. आणि आजकाल असे सोंग जर उघडकीस आले तर ते परिस्थिती मोठ्या प्रमाणात चिघळवण्यास कारणीभूत ठरते असे दिसते.  अशा बिघडलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे किंवा आणि इतर कारणांमुळे आजकाल युरोपियन भूसंशोधकांचे सीमेपलीकडचे भूसंशोधन हे पूर्णपणे थांबल्यासारखेच झाले आहे. या उलट ब्रिटिश सरकारचे नागरिक असलेल्या भारतीयांना सीमेपलीकडील भागात दूरवर प्रवास करताना कोणतीच अडचण येत नाही व त्यांना कोणताही वैयक्तिक स्वरूपातील त्रास दिला जात नाही असा अनुभव आहे. कोणालाही कसलाही संशय न येता ते भारत- मध्य अशिया आणि भारत-तिबेट  यांच्या सीमा व्यापार किंवा तत्सम कारणासाठी पार करू शकतात.
भारतीयांना प्राप्त असलेल्या या सुविधेचा उपयोग करून घेऊन त्यांना सीमेपलीकडील भागातील भूसंशोधक म्हणून नोकरीवर घेण्याचा निर्णय 1861 मध्ये झाला. भारत सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली व यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य हा प्रकल्प नीट चालावा म्हणून मुबलक प्रमाणात उपलब्द्ध करून देण्याचे मान्य केले.
कर्नल वॉकर, द सुपरीडेंटंट ऑफ द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे, यांनी या उपक्रमाअंतर्गत दोन भारतीय  ब्रिटिश नागरिकांना कामावर घेतले. त्यांची खरी माहिती कोणालाही होऊ नये म्हणून त्यांना पंडित या नावाने ओळखण्याचे ठरवण्यात आले.  हे दोघेही हिमालयात उंचीवर असलेल्या दोन नद्यांच्या खोर्‍यातील प्रदेशातून आलेले होते. एज्युकेशन डिपार्टमेंटच्या श्री. स्मिथ यांनी त्यांच्या नावांची शिफारस केलेली होती. या मागची कल्पना अशी होती की हे दोघे ज्या प्रदेशातून आलेले होते तेथील लोकांना सतलज नदीच्या वरच्या खोर्‍यामधून तिबेट मध्ये प्रवास करण्यासाठी चिनी अधिकारी कधी आडकाठी करत नसल्याने या दोघांना तसा प्रवास सुलभ रित्या करता येता येईल.
इतकी चांगली दोन माणसे मिळाल्याने, त्यांना लगेचच ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हेच्या मुख्यालयात हिमालयात भूसंशोधन करण्यासठी आवश्यक असे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. मध्यंतरीच्या कालात कर्नल वॉकर हे इंग्लंडला परत गेल्याने  या दोन्ही पंडिताना कॅप्टन मॉन्टेगोमेरी यांच्या हाताखाली देण्यात आले व त्यांनीच त्यांचे शिक्षण पूर्ण केले. हे दोन्ही पंडीत अत्यंत कुशाग्र  बुद्धीमत्तेचे  असल्याचे आढळून आले. लवकरच त्यांना सेक्स्टंट, कंपास वगैरे उपकरणांचा वापर व आकाशातील तारे यांची चांगलीच ओळख झाली. त्यांचे काम पूर्णपणे समाधानकारक असल्याचे आढळून आले.
पुढच्या तीन दशकात 12 अशा पंडितांना कॅप्टन मॉन्टेगोमेरी यांनी शिक्षण देऊन हिमालयातील सफरींवर पाठवले. ही योजना अतिशय यशस्वी झाली आणि पुढची तीस वर्षे या प्रशिक्षित भूसंशोधकांनी परत आणलेल्या नोंदींच्या सहाय्याने  “ट्रिगनोमेट्रिकल सर्वेक्षण विभागाच्या डेहराडून येथील मुख्यालयाने या आतापर्यंत अज्ञात अशा प्रदेशाचे सर्वेक्षण नकाशे बनवले. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या दफ्तरात या सर्वेक्षणांच्या तांत्रिक बाबींच्या सर्व नोंदी उपलब्ध आहेत. एकोणिसाव्या शतकातील या  भारतीय भूसंशोधकांचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण असेेेच आहे यात शंकाच नाही.

26/12/2018



      

 
   
 

Sunday, 30 November 2014

अदृष्य होणारी नदी


या मे महिन्यात मी कूर्गला गेलो होतो. त्या वेळी, कावेरी नदीच्या उगमस्थानाला भेट देण्यासाठी जात असताना भागमंडलेश्वर या देवस्थानाजवळ कावेरी नदीचा त्रिवेणी संगम आहे असे समजल्यामुळे तो बघण्यासाठी तेथे थांबलो होतो. नदी पात्राजवळ प्रत्यक्ष जाऊन बघितल्यावर, फक्त दोन नद्यांची पात्रे एकमेकात मिळताना दिसली. तिथल्याच एका माणसाला विचारल्यावर या दोन नद्या म्हणजे कावेरी व कणिका असल्याचे समजले. मग दोन नद्यांचा संगम त्रिवेणी कसा असू शकेल अशी शंका आल्याने तिथल्याच एका दुकानदाराला माझी शंका विचारली. त्याच्या मताने तिसरी नदी म्हणजे सुज्योती ही नदी असून ती गुप्त असल्याने दिसू शकत नाही. नदीची ही गुप्तता हा काय प्रकार आहे? हे मला आतापर्यंत तरी कधीच सुधरलेले नाही.
अलाहाबाद जवळ पण असाच एक प्रसिद्ध त्रिवेणी संगम आहे, गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा. प्रत्यक्षात बघितले तर दोनच नद्या दिसतात, गंगा आणि यमुना. येथेही तिसरी, म्हणजे सरस्वती नदी ही गुप्तच आहे म्हणे! ही सरस्वती नदी म्हणजे तर अतिप्राचीन भारताच्या इतिहासाच्या आणि वैदिक संस्कृतिच्या अभ्यासकांचा मानबिंदू असलेली नदी. जी नदी कोठे होती? किंवा ती गुप्त कशाने झाली? याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नसताना, आर्य संस्कृती सरस्वती नदीच्या काठी कशी बहरली होती याचे पोवाडे बरीच मंडळी गाताना आढळतात. मला मात्र एक मूलभूत प्रश्न इतके दिवस पडलेला होता. नद्या गुप्त कशा होऊ शकतात? त्या फार तर मार्ग बदलू शकतील परंतु भौगोलिक परिस्थिती बदललेली नसताना, कोणतीही नदी गायब कशी होणे शक्य आहे? नद्या निर्माण तरी कशा होतात? उंच डोंगरांवर पडलेले पावसाचे पाणी, अनेक छोट्या प्रवाहांच्यामधून खाली वाहत जाते. ते एकमेकाला मिळून एक मोठा प्रवाह बनतो. त्याला आपण नदी म्हणतो. या डोंगराचे शिखर पुरेसे उंच असले किंवा हा डोंगर उच्च अक्षांशांवर असला तर त्याच्या शिखरमाथ्याजवळ बर्फ पडलेले असते. उन्हाळ्यात हे वितळते व नद्यांना परत पाणी येते. त्यामुळे पाऊस किंवा बर्फ वृष्टी या दोन क्रिया जोपर्यंत अबाधित चालू आहेत तोपर्यंत नदी गुप्त कशी होऊ शकेल हे मला न समजलेले एक कोडे होते.
मात्र माझ्या मनातल्या या कोड्याचे उत्तर मला या वर्षी भारताच्या उत्तर सीमेवरच्या (1947 मधे पाकिस्तानने बळकवलेला असल्याने, सध्या त्या देशाच्या ताब्यात असलेल्या) हुंजा या भागात घडलेल्या एका नैसर्गिक उलथापालथीमुळे मिळाले आहे. लेह शहराच्या साधारण उत्तरेला हुंजा हा भाग येतो. अतिशय निसर्ग रम्य व रमणीय असा हा भाग असून हुंजा या नावाचीच नदी येथे वाहते. ही नदी पुढे गिलगिट नदीला मिळते व गिलगिट नदी नंतर सिंधू नदीला मिळते. या नदीच्या खोर्‍यातच हा भाग असल्याने साहजिकच हिरवागार असतो. येथे परदेशी प्रवाशांचीही खूप वर्दळ असते. ही हुंजा नदी या वर्षीच्या जानेवरी महिन्यात एकदम गुप्त झाली. गिलगिट नदीला येऊन मिळणारे या नदीचे पाणी एकदम कमी कमी होऊन त्याचा प्रवाह एकदम आटलाच. भारताकडून बळकावलेल्या या भागातून, पाकिस्तान सरकारने, चीनकडे जाणारा, काराकोरम हायवे म्हणून एक रस्ता बांधलेला आहे. हा रस्ता या हुंजा नदीच्या किनार्‍या किनार्‍याने जातो. हुंजा भागातच या रस्त्यावर सात पूल बांधलेले आहेत.

मागच्या वर्षाच्या अखेरीस या भागात मोठे धरणीकंपाचे धक्के बसले होते. या धक्यांमुळे इथले डोंगर व कडे यांना मोठमोठ्या चिरा व भेगा पडल्याचे आढळून आले होते. या वर्षीचा 4 जानेवारी हा दिवस या भागातील अट्टाआबाद व ऐनाआबाद या दोन खेडेगावांसाठी मोठा दुर्दैवी ठरला. या दिवशी या दोन्ही गावांच्यावर मोठमोठ्या दरडी एकदम कोसळल्या व दोन्ही गावांची नामोनिशाणीही उरली नाही. 20 गावकरी मृत झाले तर अनेक जण जखमी झाले. शेकड्यांनी इतर लोक बेघर झाले. इतकेच नाही तर या घटनेचे दुष्परिणाम नंतरच्या कालात हजारोंच्या संख्येने इतर लोकांना भोगावे लागत आहेत. या दरडी कोसळल्या त्या सरळ हुंजा नदीच्या पात्रावर. या दरडींच्यातले दगड. गोटे आणि मुरुम हा सगळा राडारोडा, नदीच्या पात्रातच पडला व त्यामुळे हुंजा नदीचा प्रवाहच बंद झाला. गिलगिट आणि इतर भागातल्या लोकांसाठी हुंजा नदी गुप्तच झाली.

परंतु हुंजा नदीच्या उगम स्थानाजवळच्या डोंगर शिखरांवरून खाली येणारे नद्या नाले तर वहात राहिलेच. हे सगळे पाणी हुंजा नदीच्या पात्रात, पुढे जाण्यास मार्ग नसल्याने, साठू लागले व अट्टाआबाद येथे एक नैसर्गिक असा मोठा जलाशय निर्माण होऊ लागला. या जलाशयाचे पाणी जसजसे वाढू लागले तसतसा काराकोरम रस्त्याच्या 25 किलोमीटर लांबीचा भाग व सात पूल पाण्याखाली बुडले. हा काल हिवाळ्याचा असल्याने हुंझा नदीकडे येणारे बहुतेक नदीनाले गोठलेले होते त्यामुळे फारसे पाणी सुरवातीला या जलाशयात आले नाही. परंतु उन्हाळ्याची चाहूल लागताच जलाशयामधल्या पाण्याची पातळी हळू हळू वाढू लागली. मे महिन्यापर्यंत हा जलाशय 17 किलोमीटर लांब व 353 फूट खोल झाला. फकिरबाद, मायून, हुसेनाबाद व खान ही खेडेगावांना जलसमाधी मिळाली व अनेक खेडेगावांचा संपर्क तुटल्याने त्यांना बोटीमार्फत आवश्यक त्या गोष्टी पुरवाव्या लागू लागल्या.

हुंजा नदी अशी गुप्त झाली खरी परंतु ती तशीच राहणे गिलगिट भागातल्या लोकांसाठी अतिशय धोकादायक आहे याची पाकिस्तान सरकारच्या लक्षात आले. हा नैसर्गिक बांध जर पाण्याच्या दाबाने फुटला तर नदीच्या खालच्या अंगाला असलेल्या असंख्य गावाना जलसमाधी मिळेल याची जाणीव झाल्याने पाकिस्तान सरकारने आपल्या मायबाप चिनी सरकारला बोलावणे धाडले. चिनी व पाकिस्तानी तंत्रज्ञांनी हा बांध फोडण्याचा जानेवारीपासून प्रयत्न चालू केला असला तरी नदीत पडलेला हा राडारोडा अंदाजे 196000 घन मीटर एवढा असल्याने मार्च महिन्यापर्यंत त्यांना फारसे यश मिळाले नाही. हुंजा नदी गुप्तच राहिली.
मे महिन्यापर्यंत या नदीवर निर्माण झालेल्या नैसर्गिक बांधामधून पाण्यासाठी एक पाट काढण्यात पाकिस्तानी तंत्रज्ञाना यश मिळाले प्रथम हा पाठ 15 मीट्रर खोल होता नंतर तो 39 मीटर खोल करण्यात आला. हुंजा नदीच्या खालच्या पात्रात थोडेफार पाणी परत दिसू लागले. उन्हाळ्यामुळे पर्वत कड्यांवर असलेले हिमनद वितळू लागले आहेत. व त्यामुळे अट्टाआबाद जलाशया मधे पाणी झपाट्याने येऊ लागले आहे.

जुलै 22 ला पाटातून 17000 क्यूसेक्स एवढे पाणी वाहू लागले आहे. आता हा बांध फुटला तर कमालीची गंभीर परिस्थिती निर्माण होईल हे लक्षात आल्याने पाकिस्तानी सरकार चीनला पूर्णपणे शरण गेले आहे. हा प्रश्न सोडवण्याची त्यांनी चीनला अधिकृत विनंती केली आहे.

आधुनिक कालात मानवाजवळ असणारे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री यामुळे गुप्त झालेल्या हुंजा नदीचा प्रवाह परत चालू होईलही. परंतु पूर्वीच्या काली नद्या गुप्त कशा होत असत याच्या एका कारणाचे प्रात्यक्षिकच निसर्गाने आपल्याला दाखवून दिले आहे हे मानलेच पाहिजे.
सरस्वती नदी गुप्त कशी असू शकेल हा प्रश्न मी परत कोणाला कधी विचारीन असे मला तरी वाटत नाही.
7 ऑगस्ट 2010