अठरा शतकांपूर्वी होऊन गेलेल्या टॉलेमी या ग्रीक तत्ववेत्याच्या कालापासून
पृथ्वीच्या पृष्ठभागासंबंधीचे आपले ज्ञान सतत किंवा खंड न पडता कधीच वृद्धिंगत होऊ
शकलेले नाही. कुतुहुल, भुगोलासंबंधी आत्मियता आणि धाडस करून स्वतःच्या डोळ्यांनी हे
जग पाहण्याची तीव्र लालसा असलेल्या काही भूसंशोधकांच्या उत्साहामुळे आपल्या या
ज्ञानात मधून मधूनच अचानकपणे वाढ झालेली आहे. अगदी एका शतकापूर्वी
सुद्धा जगातील सर्व महत्वाच्या खंडांच्या आपल्याला ज्ञात नकाशांमद्ध्ये अज्ञात अशा
विस्तीर्ण मोकळ्या जागा नकाशा बघणार्याच्या डोळ्याला खुपल्याशिवाय रहात नसत. मध्य
एशियाची भूमी ही सुद्धा नकाशामधील या मोकळ्या जागांमध्ये प्रामुख्याने होती. या
मोकळ्या जागांच्या अडचणीशिवाय आणखी एक
अडचण त्या काळात नकाशे बनवणार्या नकाशेकारांसमोर उभी रहात होती. धाडसी
भूसंशोधकांनी लिहिलेल्या आपल्या भूसंशोधनाच्या वर्णनांना,
वर्णनाबरहुकुम नकाशांच्यात बसवताना नकाशांचा विपर्यास होत असे व यावर मार्ग
काढण्यासाठी या नकाशेकारांना नकाशात अजब बदल करावे लागत.
भारतीय सर्वेक्षण विभागाने, हिमालय पर्वताने आखून दिलेल्या भारताच्या
नैसर्गिक उत्तरी सीमेपर्यंतच्या सर्व भूभागाचे सर्वेक्षण 1860 या वर्षांपर्यंत
पूर्ण केले होते. या कामाची जबाबदारी असलेल्या ब्रिटिश सर्वेशकांना साहजिकच या
उत्तरी सीमेपलीकडे असलेल्या भूभागासंबंधी माहिती करून घेण्याची तीव्र इच्छा
निर्माण झाली होती. या इच्छेची तुलना, सध्याच्या युगातील
खगोलशास्त्रज्ञ किंवा अवकाशयात्री यांना आपल्या माहितीच्या परिसीमेपलेकडचे विश्व
कसे आहे हे जाणून घेण्याची जी लालसा निर्माण झालेली आहे तिच्याशी करणे अजिबातच अयोग्य ठरणार नाही.
परंतु एशिया खंडातील रहिवासी साहजिकच मुख्यतः सर्वेशक किंवा नकाशाकार, आणि
भरीत भर म्हणून ब्रिटिश वंशांच्या असलेल्या या आगंतुकांकडे अतिशय संशयाने बघत
होते. याचे एक प्रमुख कारण होते ब्रिटिश सर्वेशकांचा सर्वेक्षणाबद्दलचा
प्रमाणापेक्षा जरा जास्तच असलेला उत्साह. या बाबींमुळे भारतीय शासनाने असे कडक
आदेश जारी केले होते की आपल्या सेवेत असलेल्या कोणत्याही कर्मचार्यांने भारताची
सीमा ओलांडून परदेशी भूभागावर पाउल सुद्धा टाकू नये.
भारतीय शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणे शक्य नसल्याने,
सीमेपलीकड्च्या अज्ञात प्रदेशाबद्दलचे आपले ज्ञान वाढविण्याची लालसा पूर्ण
करण्यासाठी ब्रिटिश सर्वेशकांनी एक योजना नंतर आखली. या योजनेप्रमाणे भारतीय
वंशाच्या योग्य उमेदवारांना सर्वेक्षणाचे मूलभूत शिक्षण देण्याचे ठरले. या
शिक्षणात एका ठिकाणापासून दुसर्या ठिकाणापर्यंत पोचण्यासाठी किती पावले चालावी
लागली ते मोजून त्या दोन ठिकाणांमधील अंतर काढणे आणि आकाशातील तार्यांचे निरिक्षण
करून कोणत्याही ठिकाणाचे स्थान व अक्षांश-रेखांश निश्चित करणे या दोन बाबींचा
समावेश होता. अशा रितीने प्रशिक्षित झालेल्या धट्याकट्या व उत्साही तरूणांना,
गुप्त रितीने, आपला मूळ हेतू लपवला जाईल असे
रूप-रंग देऊन त्यांची बोळवण सीमेपलीकडच्या अज्ञात प्रदेशाकडे करावयाचे या
योजनेप्रमाणे ठरले.
कॅप्टन टी.जी. मॉन्टेगोमेरी (आर.ई. ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे, हिमालयामधील
सर्व्हे पार्टीज यांचे इन चार्ज) 1968 मध्ये लिहितात.
ब्रिटिश अंमलाखालील भारताच्या सरहद्दीपलीकडील भूभागाचे
भूसंशोधन या विषयात मागच्या अनेक दशकात तुलनात्मक रित्या बघितल्यास फारशी काहीच
प्रगती होऊ शकलेली नाहीये असे म्हणावे लागते आणि फक्त युरोपियन भूसंशोधकांचा विचार
केला तर ही प्रगती सीमेपलीकडे केलेले एक किंवा दोन दिवसांचे मार्च यापलीकडे कधीच
होऊ शकलेली नाहीये. एशियन लोकांबरोबर प्रवास करताना एखाद्या युरोपियनने कसलेही
सोंग आणले तरी ते आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतेच असा अनुभव आहे. आणि आजकाल
असे सोंग जर उघडकीस आले तर ते परिस्थिती मोठ्या प्रमाणात चिघळवण्यास कारणीभूत ठरते
असे दिसते. अशा बिघडलेल्या परिस्थितीला
सामोरे जाणे किंवा आणि इतर कारणांमुळे आजकाल युरोपियन भूसंशोधकांचे सीमेपलीकडचे
भूसंशोधन हे पूर्णपणे थांबल्यासारखेच झाले आहे. या उलट ब्रिटिश सरकारचे नागरिक
असलेल्या भारतीयांना सीमेपलीकडील भागात दूरवर प्रवास करताना कोणतीच अडचण येत नाही
व त्यांना कोणताही वैयक्तिक स्वरूपातील त्रास दिला जात नाही असा अनुभव आहे.
कोणालाही कसलाही संशय न येता ते भारत- मध्य अशिया आणि भारत-तिबेट यांच्या सीमा व्यापार किंवा तत्सम कारणासाठी
पार करू शकतात.
भारतीयांना प्राप्त असलेल्या या सुविधेचा उपयोग करून घेऊन त्यांना सीमेपलीकडील
भागातील भूसंशोधक म्हणून नोकरीवर घेण्याचा निर्णय 1861 मध्ये झाला. भारत सरकारने
या प्रकल्पाला मान्यता दिली व यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य हा प्रकल्प नीट चालावा
म्हणून मुबलक प्रमाणात उपलब्द्ध करून देण्याचे मान्य केले.
कर्नल वॉकर, द सुपरीडेंटंट ऑफ द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे, यांनी या उपक्रमाअंतर्गत दोन भारतीय ब्रिटिश नागरिकांना कामावर घेतले. त्यांची खरी माहिती
कोणालाही होऊ नये म्हणून त्यांना पंडित या नावाने ओळखण्याचे ठरवण्यात आले. हे दोघेही हिमालयात उंचीवर असलेल्या दोन नद्यांच्या
खोर्यातील प्रदेशातून आलेले होते. एज्युकेशन डिपार्टमेंटच्या श्री. स्मिथ यांनी त्यांच्या
नावांची शिफारस केलेली होती. या मागची कल्पना अशी होती की हे दोघे ज्या प्रदेशातून
आलेले होते तेथील लोकांना सतलज नदीच्या वरच्या खोर्यामधून तिबेट मध्ये प्रवास करण्यासाठी
चिनी अधिकारी कधी आडकाठी करत नसल्याने या दोघांना तसा प्रवास सुलभ रित्या करता येता
येईल.
इतकी चांगली दोन माणसे मिळाल्याने, त्यांना लगेचच ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हेच्या
मुख्यालयात हिमालयात भूसंशोधन करण्यासठी आवश्यक असे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले.
मध्यंतरीच्या कालात कर्नल वॉकर हे इंग्लंडला परत गेल्याने या दोन्ही पंडिताना कॅप्टन मॉन्टेगोमेरी यांच्या
हाताखाली देण्यात आले व त्यांनीच त्यांचे शिक्षण पूर्ण केले. हे दोन्ही पंडीत अत्यंत
कुशाग्र बुद्धीमत्तेचे असल्याचे आढळून आले. लवकरच त्यांना सेक्स्टंट,
कंपास वगैरे उपकरणांचा वापर व आकाशातील तारे यांची चांगलीच ओळख झाली.
त्यांचे काम पूर्णपणे समाधानकारक असल्याचे आढळून आले.
पुढच्या तीन दशकात 12 अशा पंडितांना कॅप्टन मॉन्टेगोमेरी यांनी शिक्षण देऊन हिमालयातील
सफरींवर पाठवले. ही योजना अतिशय यशस्वी झाली आणि पुढची तीस वर्षे या प्रशिक्षित
भूसंशोधकांनी परत आणलेल्या नोंदींच्या सहाय्याने
“ट्रिगनोमेट्रिकल सर्वेक्षण” विभागाच्या डेहराडून येथील मुख्यालयाने या
आतापर्यंत अज्ञात अशा प्रदेशाचे सर्वेक्षण नकाशे बनवले. भारतीय सर्वेक्षण
विभागाच्या दफ्तरात या सर्वेक्षणांच्या तांत्रिक बाबींच्या सर्व नोंदी उपलब्ध
आहेत. एकोणिसाव्या शतकातील या भारतीय
भूसंशोधकांचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण असेेेच आहे यात शंकाच नाही.
26/12/2018