Showing posts with label समुद्री चाचे. Show all posts
Showing posts with label समुद्री चाचे. Show all posts

Saturday, 6 December 2014

सामर्थ्य प्रदर्शनाची गरज


मागच्या शुक्रवारी म्हणजे 11 मार्चला भारताच्या पश्चिम किनार्‍यापासून सुमारे 600 किमी अंतरावर, खुल्या समुद्रात एक मोठी नाट्यमय घटना घडली. भारतीय नौदलाचे एक डॉर्नियर विमान त्या दिवशी या भागात टेहळणी करत होते. या विमानाला अचानक “आम्ही धोक्यात आहोत, आम्हाला वाचवा!” असा संदेश मिळू लागला. हा संदेश एक मालवाहू जहाज एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज (MV Vancouver Bridge) या मालवाहू जहाजावरून पाठवण्यात येत होता. विमानाने त्या संदेशाला उत्तर दिले व काय झाले आहे? अशी पृच्छा केली. त्या वेळेस असे समजले की या जहाजावर समुद्री चाचे किंवा डाकू हल्ला करण्याच्या तयारीत होते. नौदलाच्या डॉर्नियर विमानाने साहजिकच ही बोट जिथे होती तिथे आपला मोर्चा हलवला. तिथे गेल्यावर वैमानिकांना असे दिसले की या बोटीच्या बरोबरीने, काही अंतरावर मासेमारी करणारी एक दुसरी बोट चाललेली होती व त्या बोटीवरून शस्त्रसज्ज चाचे, अतिशय वेगवान अशा दुसर्‍या दोन छोट्या बोटींच्यावर उतरून हल्ला करण्याच्या तयारीत होते. वर आकाशात नौदलाचे विमान आले आहे हे लक्षात आल्याबरोबर त्या चाच्यांची गडबड उडाली व घाईघाईने त्यांनी आपल्या छोट्या वेगवान बोटी परत मुख्य मासेमारी बोटीला बांधून टाकल्या व ते परत आपल्या मासेमारी बोटीवर चढून गेले व एमव्ही व्हॅन्क्यूव्हर ब्रिज या बोटीवर हल्ला करण्याचा आपला डाव त्यांनी सोडून दिला.
हे सर्व दृष्य बघत असतानाच, डॉर्नियर विमानाच्या वैमानिकाच्या हे लक्षात आले की ही मासेमारी बोट म्हणजे मोझंबिक देशाचा ध्वज फडकवणारी व्हेगा 5 (Vega 5) हीच बोट आहे. या बोटीचे, 28 डिसेंबर 2010 रोजी समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते व त्यानंतर ही बोट आपल्या समुद्री डाकुगिरी करण्याच्या कामात चाचे मुख्य बोट म्हणून वापरत होते. या बोटीवरून त्यांना सोमालियाच्या किनार्‍यापासून दूर अंतरावर चाचेगिरी करण्यासाठी सहज रित्या जाणे शक्य होत होते. वैमानिकाने साहजिकच आपले निरिक्षण ताबडतोब नौदलाच्या नियंत्रण कक्षाला कळवले.
हा संदेश मिळाल्याबरोबर नियंत्रण कक्षाने समुद्राच्या त्या भागात गस्त घालणार्‍या भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस खुकरी‘ (क्षेपणास्त्रवाहक कॉर्व्हेट पद्धतीची बोट) (INS Khukri, a missile corvette) आणि ‘आयएनएस कल्पिनी‘ ( वेगवान हल्ला चढवू शकणारी बोट) (INS Kalpeni, a fast attack craft ) या बोटींना त्वरेने व्हेगा 5 या बोटीच्या स्थानाकडे प्रयाण करण्याची आज्ञा दिली. रविवारी म्हणजे 13 मार्चच्या रात्री या बोटींनी, व्हेगा 5 बोटीला कोची बंदरापासून पश्चिमेला सुमारे 700 किमी अंतरावर गाठले व समुद्रात थांबण्याची आज्ञा दिली. या आज्ञेचे पालन न करता बोटीवरील चाच्यांनी अंधाराचा फायदा घेऊन निसटून जाण्यासाठी आपल्या जवळच्या दोन छोट्या वेगवान बोटी समुद्रात उतरवल्या व सर्व शस्त्रसज्ज चाचे त्यावर उतरले व पळून जाताना त्यांनी नौदलाच्या बोटींवर गोळाबारी केली. ही गोळाबारी सुरू झाल्याबरोबर नौदलाच्या बोटींनी त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले व त्यात या दोन्ही छोट्या वेगवान बोटी समुद्रात बुडाल्या व त्याच्यावरील चाच्यांनी समुद्रात उड्या मारल्या. व्हेगा 5 च्या डेकवर चाच्यांनी समुद्रात दूरवर जाता यावे म्हणून इंधनाची बरीच पिंपे साठवली होती ती या हल्यात पेटली व व्हेगा 5 बोटीला आग लागली. यानंतर नौदलांच्या बोटींनी थोड्याच कालावधीत समुद्रात उड्या मारलेल्या सर्व 61 सोमाली चाच्यांना अटक केली व व्हेगा 5 वरच्या 13 खलाशांची सुटका केली. या सर्व चाचांना आता नौदलाच्या बोटीवर हल्ला केल्याच्या आरोपावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी मुंबईला आणण्यात येत. आहे. नौदलाच्या सैनिकांना या चाच्यांच्या जवळ 80 ते 90 लहान रायफली व काही रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड्स यासारखी हत्यारे सापडली.

नौदलाच्या बोटींनी व सैनिकांनी 2011 सालात ( फक्त 3 महिने) समुद्री चाच्यांविरूद्ध केलेली ही तिसरी कारवाई आहे. या अगोदर मागच्या महिन्यात(फेब्रुवारी 2011) 28 सोमाली चाच्यांना तर जानेवारी महिन्यात 15 सोमाली चाच्यांना नौदलाने पकडले होते.
मागच्या आठवड्यातील ही घटना म्हणजे भारताच्या किनार्‍याला लागून असलेल्या समुद्रामध्ये, भारतीय व इतर देशाच्या व्यापारी वाहतुक करणार्‍या जहाजांना, चाचेगिरीचा केवढा गंभीर धोका निर्माण झाला आहे याचेच द्योतक आहे. भारताचा 90% व्यापार हा या समुद्रमार्गे होत असतो तसेच भारताची उर्जा सुरक्षितता ही मध्यपूर्वेतील तेलाच्या पुरवठ्यावर अवलंबून असल्याने या तेलाच्या पुरवठ्यात चाचेगिरीने कोणताही खंड पडला तरी त्याचे मोठे गंभीर परिणाम भारताला सहन करावे लागतील हे स्पष्ट दिसत आहे. एडनच्या आखातामधे चाचेगिरीला प्रतिबंध करण्यासाठी भारतीय नौदल, नोव्हेंबर 2008 पासून आंतर्राष्ट्रीय मान्यता प्राप्त समुद्रमार्गांवर (Internationally Recommended Transit Corridor (IRTC) ) गस्त घालत आहे. परंतु सोमालियातील समुद्री चाच्यांनी, चाचेगिरी करण्याचे क्षेत्र आता बरेच व्यापक केले आहे. त्यामुळे लक्षद्वीप बेटाजवळील अरबी समुद्राच्या भागातही भारतीय नौदलाने गस्त घालण्यास नोव्हेंबर 2010 पासून सुरू केले आहे. या कालात भारतीय नौदलाने चाच्यांच्या 3 मोठ्या बोटी बुडवल्या आहेत. 50च्या वर चाच्यांना पकडले आहे व 300 भारतीय निशाण फडकवणारी जहाजे धरून एकंदर 1500 जहाजांना सुरक्षित रित्या या भागातून प्रवास करणे शक्य केले आहे. हे आकडे जरी इम्प्रेसिव्ह असले तरी चाचेगिरीची गंभीरता लक्षात घेतली तर ही कारवाई अगदी किरकोळ स्वरूपाची आहे असेच म्हणावे लागते. . आंतर्राष्ट्रीय समुद्री व्यापार ब्यूरो ( International Maritime Bureau) या संस्थेने प्रसिद्ध केलेले या बाबतीतले काही आकडे मोठे बोलके आहेत.
Figures for piracy and armed robbery incidents
as reported to the IMB Piracy Reporting Center in 2011.
(Updated on 28 February 2011)
Incidents Reported for Somalia: , सोमालिया मधील घटनांचे आकडे
Total Incidents: 61 , एकूण घटना - 61
Total Hijackings:13, जहाजे जबरदस्तीने ताब्यात घेतल्याच्या घटना - 13
Total Hostages: 243, चाच्यांच्या बंदीत असलेले एकूण ओलिस - 243
Total Killed: 7, मृत्यूमुखी पडलेले कर्मचारी - 7
Current vessels held by Somali pirates: सोमाली चाच्यांच्या ताब्यात असलेली एकूण जहाजे व ओलिस
Vessels: 33, जहाजे- 33
Hostages: 711 , एकूण बंदीवान ओलिस - 711
या 711 बंदींपैकी तब्बल 136 व्यक्ती या भारतीय वंशाच्या आहेत व यापैकी काही जण 11 महिन्यांपेक्षा जास्त काल कैदेत आहेत. यांना मिळणारी वागणूक अतिशय खराब आहे व त्यांना दोन ते तीन दिवसांनंतर भोजन देण्यात येते. साहजिकच या बंदीवानांच्या भारतात असलेल्या नातेवाईकांकडून भारत सरकारकडे सारख्या तक्रारी केल्या जात आहेत. या नातेवाईकांना स्वाभाविक रित्या असे वाटते आहे की भारत सरकार या प्रश्नाकडे अजिबात गंभीरपणे बघत नसून या बंदींची सुटका करण्याबाबत सरकार काहीच हालचाल करत नाहीये.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी बघता असे म्हणता येते की व्यापारी नौदलच्या अधिकार्‍यांच्या समितीने या बाबतीत सरकारवर जो दबाव आणला आहे त्यामुळे भारत सरकार झोपेतून बहुदा जागे झाले आहे व काहीतरी कार्यवाही करण्याच्या मागे आहे. भारतीय नौदल सरकारकडे बरेच दिवस मागणी करत होते की संयुक्त राष्ट्र सभेने समुद्राच्या आंतर्राष्ट्रीय वापरासाठी जे नियम आखून दिले आहेत त्या नियमाच्या अंतर्गत आणि इतर देशांच्या नौदलांच्या मदतीने गल्फ ऑफ एडन व सोमालियाची किनारपट्टी येथे योग्य ती कारवाई करण्याची परवानगी द्यावी. भारत सरकारच्या एका अधिकार्‍याच्या निवेदनाप्रमाणे नौदलाला अशी परवानगी आता देण्यात आली आहे. या प्रवक्त्याने सांगितले की
” भारतीय नौदल गरज आणि परिस्थितीचे गांभीर्य याला अनुसरून गस्त घालत असताना योग्य ती कारवाई करेल. चांच्यांविरूद्ध कारवाई करताना व ओलिसांच्या सुटकेचे प्रयत्न करताना उद्‌भवू शकेल अशा सर्व प्रकारच्या परिस्थितीत काय कार्यवाही करायची याच्या स्पष्ट सूचना व परवानगी नौदलाला आता दिली गेली आहे. “
या अतिरिक्त आणखी काही निर्णय घेतले जातील असे दिसते आहे. विमानात सुरक्षेसाठी जसे स्काय मार्शल्स तैनात केले जातात त्याच पद्धतीने भारतीय निशाण फडकवणार्‍या प्रत्येक जहाजावर शस्त्रधारी व्यक्ती तैनात केल्या जाणार आहेत. तसेच उपग्रह संदेश यंत्रणा बसवलेली एक सुरक्षित खोली किंवा खोल्या प्रत्येक जहाजावर तयार ठेवणे जहाजांना बंधनकारक राहणार आहे. चाच्यांच्या हल्ल्यात किंवा त्यांनी जहाज ताब्यात घेतल्यास या कक्षातून जहाजाचे कर्मचारी नौदलाशी संपर्क साधू शकतील.
मागच्या आठवड्यातील घटनाक्रमावरून नौदलाला कारवाईचे स्वातंत्र्य खरोखरच देण्यात आलेले आहे. असे दिसते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ही कारवाई पुरेशी ठरणार नाही अशी आशंका वाटते.
सोमालियन चाचे आता इतके धीट झाले आहेत की भारताला धमक्या देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. बिले हुसेन हे नाव सांगणार्‍या व स्वत: समुद्री चाचा असल्याचे सांगणार्‍या एका सोमालियन व्यक्तीने, रविवारच्या कारवाईबद्दल बोलताना, ” भारत स्वत:ची जहाजे व खलाशी यांना संकटात लोटत आहे” अशी धमकी दिली. तो म्हणाला की
“आपले किती लोक समुद्रावर कार्यरत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी (भारतीयांनी) पकडलेल्या सोमाली लोकांना (चाच्यांना) त्वरित सोडून द्यावे नाहीतर आम्ही पकडलेल्या सर्व भारतीयांना तुरुंगात टाकू. आम्ही भारतीयांना धोक्याची सूचना म्हणून हा संदेश प्रथम पाठवत आहेत. त्यांनी आमच्या मित्रांना त्वरित सोडून द्यावे नाहीत भारतीय नागरिकांना भविष्यात चांगली वागणूक आमच्याकडून दिली जाणार नाही. “
सोमाली चाच्यांची ही हिंमत लक्षात घेतल्यावर भारत सरकारने कडक कारवाई करण्याची व आपले सामर्थ्य दाखविण्याची किती गरज आहे हे लक्षात येते. ओलिस असलेल्या भारतीयांची सुटका करणे हे जरी प्राधान्य असले तरी पुढच्या काळात अशा घटना घडण्यास प्रतिबंध बसावा म्हणून सरकारने काही पाऊले उचलणे गरजेचे वाटते. इराक युद्धाआधी त्या देशावरच्या आकाशाच्या काही भागात संपूर्ण उड्डाणबंदी करण्यात आली होती. त्याच पद्धतीने सोमालियाच्या किनारपटीजवळचा 100 किंवा 200 किमी पट्टा कोणत्याही जहाज वाहतुकीस बंद केला पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडे जाऊन भारताने अशी मागणी करणे गरजेचे वाटते.
या पद्धतीने उचललेली कडक पाऊले व भारतीय नौदलाचा प्रभावी उपयोग यामुळेच सोमालियाची किनारपट्टी व लक्षद्वीप, मॉरिशस व सैचेल्स या बेटांजवळील समुद्रात दिवसे दिवस वाढत जाणारा हा धोका टाळणे शक्य होणार आहे. अन्यथा रॉबर्ट लुइ स्टीव्हनसन याने आपल्या ट्रेझर आयलंड या सुप्रसिद्ध कादंबरीमधे, सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील समुद्री चाचेगिरीची वर्णने केली होती ती प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत अशी सयुक्तिक भिती वाटते.
17 मार्च 2011

Saturday, 18 October 2014

समुद्री चाच्यांची मगरमिठी

भारतीय द्वीपकल्पाच्या नैऋत्य दिशेला व कन्याकुमारीपासून अंदाजे 1800 मैल अंतरावर, हिंदी महासागरामधे, 115 द्वीपांचा मिळून असलेला एक सुंदर द्वीपसमुह आहे. हा द्वीपसमुह सेचैल्स (Seychelles) या नावाने ओळखला जातो. पाचूसारखी हिरवीगार वनश्री, पांढर्‍याशुभ्र वाळूचे किनारे, नितळ व पारदर्शक समुद्र व त्या खाली असलेली कोरलशिल्पे व समुद्राच्या काठावजिकच असलेले काळ्याशार रंगाचे ग्रॅनाईट दग़डाचे उभे कडे यामुळे सेचैल्स बेटे एखाद्या चित्रासारखी सुंदर दिसतात. साहजिकच सेचैल्सला जाण्यासाठी श्रीमंत पर्यटकांची व मधुचंद्राला येणार्‍या जोडप्यांची प्रथम पसंती असते. या पर्यटकांच्या सोईसाठी या द्वीपसमुहावर अनेक पंचतारांकित हॉटेल्स पसरलेली आहेत.

पर्यटन हा जरी सेचैल्सचा प्रथम क्रमांकाचा उद्योग असला तरी या शिवाय या भागातील समुद्रात ट्यूना मासे भरपूर प्रमाणात मिळत असल्याने, मासेमारीच्या मोठ्या बोटीही सेचैल्सच्या आसपास मासेमारी करत असतात. या माशांच्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे उद्योग सेचैल्समधे आहेत. दुर्दैवाने हे सगळे उत्तम असले तरी सेचैल्स द्वीप समुह हा देश मात्र सध्या एका मोठ्या संकटाच्या छायेखालून जातो आहे. हा सुंदर देश सध्या अत्यंत बदनाम होत चालला आहे. या देशाचे शासन ही बदनामी झटकून टाकण्यास प्रयत्नशील आणि अतिशय उत्सुक जरी असली तरी हतबल होऊन बघण्याशिवाय दुसरे काहीच करणे या शासनाला सध्या तरी शक्य दिसत नाही.

या बदनामीचे मूळ कारण आहे सेचैल्सच्या वायव्येला 900 मैलावर असलेला पूर्व आफ्रिकेतला सोमालिया हा देश. सोमालिया मधे गेले एक दशक तरी कोणतेच शासन नाही. सर्व अंदाधुंदी व गुंडागर्दी यांचेच राज्य आहे. हजारोने बेकार असलेल्या सोमालियन तरूणांनी यावर एक मार्ग चार पाच वर्षापूर्वी शोधून काढला. छोट्या पण अतिशय वेगवान बोटी त्यांनी पैदा केल्या. या बोटीवर 15 ते 20 सशस्त्र गुंड बसवून, सोमालियाच्या उत्तरेला असलेल्या एडनच्या आखातामधे ,भर समुद्रात प्रवास करणार्‍या मालवाहू बोटींच्यावर हल्ला चढवून हे सोमालियन गुंड त्या बोटी ते ताब्यात घेऊ लागले. या बोटींवर स्वसंरक्षणाची फारशी साधने नसल्याने हे बोटी पकडण्याचे काम या सोमाली गुंडांना अगदी सोपे वाटू लागले. या बोटी मग सोमालियाच्या बंदरात ओढून आणून ठेवल्या जातात. कोट्यावधी डॉलर्सची खंडणी घेतल्यावरच या बोटींची मुक्तता केली जाते. हा सर्व धंदा एवढा नफा मिळवून देणारा आहे की सोमालियाच्या उत्पन्नापैकी हे उत्पन्न अतिशय महत्वाचे बनले आहे. या कामात भरपूर पैसे मिळत असल्याने सोमाली तरूण या गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. व ही चाचेगिरी वाढतच चालली आहे.

एडनच्या आखातातून दरवर्षी 22000 पेक्षा जास्त बोटी ये जा करत असल्याने या समुद्र मार्गाचे महत्व फार आहे. या समुद्र मार्गावरील वाढत्या चाचेगिरीला आळा बसावा म्हणून भारत, चीन, अमेरिका, युरोपियन देश वगैरे अनेक राष्ट्रांची नौदले 2008 सालापासून येथे सतत गस्त घालू लागली आहेत. या भागातून जाणार्‍या व येणार्‍या बोटींना एका काफल्यातून आता जावे लागते व या नौदलांच्या युद्धनौका त्यांना सुरक्षा देतात. या कारवाईमुळे सोमाली चाच्यांची गुन्हेगारी काही प्रमाणात तरी का होईना पण कमी झाली आहे.
एडनच्या आखातात चाचेगिरी करण्यास अडचणी येऊ लागल्याने, सोमालियन चाच्यांनी आपले लक्ष त्या देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या हिंदी महासागरातून प्रवास करणार्‍या बोटींच्या कडे केंद्रित करण्यास सुरवात केली. सेचैल्सच्या किनार्‍याजवळ मासेमारी करणार्‍या मोठ्या मच्छीमार नौका, आलिशान यॉट्स वगैरे सावजे या चाच्यांच्या नजरेत लगेच भरली. 2008 मधे Le Ponant या फ्रेंच निशाण फडकवणार्‍या आलिशान बोटीवर या चाच्यांनी हल्ला चढवून ताब्यात घेतली. Paul and Rachel Chandler हे ब्रिटिश जोडपे, त्यांची स्लूप प्रकारची बोट, सेचैल्सपासून 150 किलोमीटर अंतरावर असताना नाहीसे झाले. काही दिवसांनी सोमालियन चाच्यांनी ते जोडपे व बोट आपल्या ताब्यात असल्याची घोषणा केली.
चाच्यांनी पकडलेली मच्छीमार बोट, खंडणी भरून सोडवून घेतल्यानंतरचा फोटो
सेचैल्स जवळ ट्यूना जातीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. या माशांवर् प्रक्रिया करणारे बरेच उद्योग सेचैल्स मधे आहेत. ट्यूना मासेमारी करणार्‍या बोटींच्यावर चाच्यांनी हल्ले सुरू केल्याने ट्यूनाची मासेमारी 30 टक्यांनी तरी घटली आहे. याचा मोठा परिणाम सेचैल्सवर झाला आहे. एका मोठ्या आर्थिक संकटातून सेचैल्स हा देश नुकताच डोके बाहेर काढू लागला असतानाच ही चाचेगिरी सुरू झाली आहे. सेचैल्स मधल्या स्थायिक लोकांना आवश्यक अशा वस्तू आयातच होतात. आता या चाचेगिरीमुळे कोणतीही शिपिंग कंपनी सेचैल्सला बोटी नेण्यास तयार नसते. परिस्थिती सुधारावी म्हणून येथील सरकारने 3 मिलियन अमेरिकन डॉलर्स सुरक्षा व्यवस्थेसाठी खर्च करावयाचे ठरवले आहे.
या चाचेगिरीला जर प्रभावी प्रतिबंध लवकर करता आला नाही तर या देशाचे भवितव्य अंधकारमयच आहे असे दिसते.

24 फेब्रुवारी 2010