Showing posts with label मुंबई. Show all posts
Showing posts with label मुंबई. Show all posts

Tuesday, 3 February 2015

मुंबई चे बॉम्बे; एक ट्विटर युद्ध



कै. पु.ल. देशपांडे " वार्‍यावरची वरात" या नावाचा आणि त्या काळी प्रचंड लोकप्रिय असलेला एक कार्यक्रम करत असत. या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रवेशात दस्तुरखुर्द लेखक खेडेगाव पहाण्यासाठी म्हणून एका खेडेगावात यष्टीने प्रवास करून ष्ट्यांडावर उतरल्यावर  त्यांना तेथे प्रथम भेटतो एकदम आधुनिक परिवेशात असलेला एक तरूण. ( हे काम श्रीकांत मोघे करत असत.) हा तरूण स्वत:ला फिल्मी हिरो समजत असतो. खेडेगावात काय पहाण्यासारखे आहे या बद्दलच्या प्रत्येक प्रश्नाला त्याचे एकच उत्तर असते. "येथे काही बघण्यासारखे नाही- बघण्यासारखे काही असले तर ते फक्त "बॉम्बे."

पु.लं. च्या या नाटकामधे, मुंबईला त्यांच्या नाटकामधली एक पार्टी बॉम्बे म्हणते म्हणून तो शब्द वगळा असा आदेश तत्कालीन सेन्सॉर बोर्डाने दिल्याचे मला तरी आठवत नाही आणि नसावा कारण अनेक वर्षे या नाटकाचे प्रयोग चालू होते. पण आता 30-40 वर्षांनतर दुसर्‍या एका कलाविष्कारामधे एका मराठी गायकाने बॉम्बे हा शब्द वापरला आणि सेन्सॉर बोर्डाला अवचित जाग आली आणि त्यांनी त्याला हा शब्द काढून टाकण्याचे फर्मान सोडले आहे.

या कलाकाराचे नाव आहे मिहिर जोशी व तो एक गायक आहे. मिहिरने मागच्या वर्षी "मुंबई ब्ल्यूज" या नावाचा आअपला एक अल्बम प्रसिद्ध केला होता. या अल्बम मधील एका गाण्यात मिहिरने बॉम्बे हा शब्द वापरला होता. गंमतीची गोष्ट म्हणजे हे गाणे एक पिता आपल्या मुलीला दिल्ली किंवा मुंबई सारख्या शहरांच्यात मुलींना स्वतंत्रपणे वावरता यावे यासाठी आवश्यक असलेले निर्धोक वातावरण आपण देऊ शकत नसल्याबद्दल तिला सॉरी म्हणतो आहे अशा प्रसंगावर रचलेले आहे.

मिहिरच्या या गाण्याचा एका व्हिडियो मधे अंतर्भाव करण्यासाठी नुकतीच एका कंपनीने सेन्सॉरची परवानगी मागितली होती. त्यावेळेस सेन्सॉरकडून हा शब्द काढून टाकण्याचा हा आदेश त्यांना देण्यात आला.  सेन्सॉर बोर्डाची नुकतीच पुर्नरचना करण्यात आली आहे. हा आदेश, लीला सॅमसन या प्रमुख असलेल्या आधीच्या बोर्डाने काढला असला तरी नवीन बोर्डाने तो कायम ठेवला आहे.

मिहिरच्या गाण्यामधून बॉम्बे हा शब्द काढून टाकण्याच्या आदेशावर ट्विटर वापरणारी मंडळी चांगलीच गरम झालेली दिसत आहेत. हे पहा काही नमुने.





आणि हे मिहिरचे उत्तर.


3 फेब्रुवारी 2015




Saturday, 10 January 2015

कसे आहे देशी स्टारबक्स ?



काही आठवड्यांपूर्वी भारतातील उपभोक्त्यांनी (consumers) जागतिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. हे पाऊल अनिष्ट की स्वागतार्ह? घडायला हवे की नको? वगैरे चर्चा मी येथे करत बसणार नाहीये. तो माझ्या या लेखाचा विषयच नाही.
मागच्या वर्षी भारत सरकारने एका किंवा सिंगल ब्रॅन्ड असलेल्या परदेशी कंपन्यांना भारतात दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. अशी दुकाने उघडताना त्यांना त्यांचे भाग भांडवल म्हणून 100 टक्के रक्कम आणण्यास सुद्धा सरकारने मुभा दिली होती. असे 100% टक्के भांडवल मूळ परदेशी कंपनीचे असल्यास त्यांचे व्यवसाय कौशल्य व ब्रॅन्ड्चे नाव हे पूर्णपणे सुरक्षित राहू शकतात अशी कल्पना या मागे आहे. काही फॅशन हाऊसेसनी आपल्या ब्रॅन्डची दुकाने दिल्ली, मुंबई सारख्या महानगरांच्या पॉश भागात मागच्या वर्षभरात चालूही केली होती. परंतु याची फारशी माहिती तुम्हा आम्हाला झाली असण्याचे फारसे काहीच कारण नव्हते. कारण सर्वसामान्यांना उपयुक्त अशा वस्तू किंवा सेवा देणारा कोणताच बडा (किंवा बिग टिकिट म्हणतात तो) ब्रॅन्ड भारतात आला नव्हता. काही आठवड्यांपूर्वी मुंबईमध्ये स्टारबक्सच्या पहिल्या कॅफेचे उद्घाटन झाले आणि ही परिस्थिती बदलली असे नक्की म्हणता येईल.
स्टारबक्स या कंपनीला स्वत:ची प्रतिमा आणि व्यवसाय कौशल्य याबद्दल इतकी खात्री आहे की त्यांनी 100% भागभांडवल या नवीन उडीमध्ये आणण्याचा वगैरे खटाटोप सुद्धा केला नाही व भारतातील एक मोठा औद्योगिक व्यवसाय असलेल्या टाटा उद्योग समूहाबरोबर त्यांनी 50% भागीदारीत व्यवसाय करण्याचे मान्य केले. टाटा समूहाला भारतात असलेला, चहा, कॉफी यांचे उत्पादन, विक्री आणि अशाच प्रकारच्या कॉफी हाऊसेसच्या साखळ्या चालवणे यातील आधीचा अनुभव आणि त्यांच्या मालकीच्या असलेल्या महानगरातील पॉश विभागातील इमारती, या दोन्ही बाजू टाटा समूहाला चांगल्याच जमेच्या आहेत व त्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही ही भागीदारी चांगलीच फायदेशीर ठरेल अशी खात्री टाटा समूहाला असणार आहे.

तर मग स्टारबक्सच्या या देशी अवताराकडे कॉफी पिण्यासाठी गेलेल्या लोकांचा काय अनुभव आहे? ज्यांनी परदेशी स्टारबक्सच्या कॅफेजना भेट दिलेली आहे त्यांना ही देशी स्टारबक्स कॅफे कशी वाटता? आत प्रवेश करण्यासाठी आणि स्टारबक्सचा अनुभव घेण्यासाठी म्हणून या कॅफेच्या प्रवेशद्वारापाशी रांगा लावणार्‍या ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर भारतात या नवीन कॉफी चेनचे आगमन एकूण धूमधडाक्यात झाले आहे व निदान मुंबईच्या चोखंदळ कॉफी रसिकांना तरी हा नवा चॉइस रुचला आहे असे म्हणता येईल.
मुंबईच्या फोर्ट या भागात असलेल्या हॉर्निमन सर्कल या स्थानावर 4500 चौरस फूट एवढ्या भल्या थोरल्या जागेत हे दुमजली कॅफे सुरू झाले आहे. हॉर्निमन सर्कल हे मुंबईच्या व्यापारी जगतातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेले व मनावर मोठे छाप पाडणारे असे एक ठिकाण आहे. चहूबाजूंनी वर्तुळाकार ऊंच ऊंच इमारती व मध्यभागी एक बाग असे स्वरूप असलेले हे ठिकाण,आपले पहिले कॅफे सुरू करण्यासाठी निवडून स्टारबक्सने आपली व्यापारी दूरदृष्टी किती अचूक आहे हे नक्कीच दाखवून दिले आहे. स्टारबक्सच्या या पहिल्या कॅफेत प्रवेश मिळवण्यासाठी बाहेर असलेल्या रांगा,शनिवार किंवा रविवार म्हणजेच वीक एन्डसना अधिक अधिक लांब होताना दिसत आहेत. आणि बाहेर रांगेत उभे रहाणार्‍या मंडळींना आपला हा वेळ फुकट जातो आहे असे अजिबातच वाटत नाहीये. कारण येथे पटकन एक कप कॉफी घेऊन पुढे जाऊ!” अशा उद्देशाने कोणीच आलेले नाही. हे सर्व ग्राहक,स्टारबक्स अनुभव,आरामात घेण्यासाठी म्हणून आलेले आहेत. सध्यातरी बहुतेक टेबले कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीच भरलेली दिसतात. या सगळ्यांचा येथे येण्याचा उद्देश स्टारबक्स कॅफे बघण्याबरोबरच आपण सुद्धा येथे आलो आहोत हे इतरांनी बघावे हा असल्याने,बाहेर पडण्याची घाई कोणालाच दिसत नाही.
या देशी स्टारबक्सचा मेन्यू तरी काय आहे? भारतात यश मिळवायचे असले तर भारतीय रूचीला आवडतील असेच पदार्थ मेन्यूवर असणे आवश्यक आहे हे आता भारतात आलेल्या व खाद्यपदार्थ उद्योगातील प्रत्येक परदेशी कंपनीच्या लक्षात आलेले आहे. आंतर्राष्ट्रीय ब्रॅन्ड्चे नाव धारण करणार्‍या व भारतात उपहारगृहे चालवणार्‍या KFC, McDonald’s किंवा Pizza hut या सारख्या कंपन्यांच्या उपहारगृहात तुम्ही गेलात व मेन्यू कार्डवर नजर टाकलीत तर उपलब्ध असलेले खाद्यपदार्थ भारतीय रुचीला व येथील समाज व्यवस्थेला रुचतील असेच बनवले जातात याची खात्री पटू शकते. मग स्टारबक्सने या बाबतीत काय पाऊले उचलली आहेत? हे कळण्यासाठी त्यांच्या मेन्यूकडे एक नजर टाकली तर स्टारबक्सने कॅफे सुरू करण्याआधी येथील खाद्यसंस्कृतीचा व्यवस्थित अभ्यास करूनच पहिले पाऊल टाकले आहे याची खात्री निदान मेन्यूवरून तरी पटू शकते. भारतातील अनेक समाजातील लोक हे पूर्ण शाकाहारी असतात, अगदी अंड्याला सुद्धा ते शिवत नाहीत. स्टारबक्सने अशा ग्राहकांसाठी स्वतंत्र काऊंटर्स चालू केले आहेत. सर्व खाद्य पदार्थ हे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन निरनिराळ्या काऊंटर्समध्ये स्वतंत्रपणे बनवून किंवा गरम करून दिले जातात. हे गरम करण्याच्या भट्या सुद्धा निरनिराळ्या आहेत.

पेये मात्र अगदी आंतर्राष्ट्रीय म्हणजे स्टारबक्सच्या इतर देशातील मेन्यूप्रमाणेचन उपलब्ध आहेत. मात्र स्टारबक्स येथे वापरत असलेल्या कॉफी बिया, मात्र भारतातच पिकवलेल्या आहेत व त्या येथेच दळून घेतल्या जात आहेत. सटारबक्सची स्पेशालिटी मानली जाणारी “Caramel Frappuccino,” किंवा Chai Tea Latte” ही पेये सुद्धा येथे उपलब्ध आहेत. मात्र चहाला भारतात किंवा निदान मुंबईत चायअसेच संबोधले जात असल्याने चाय टीहे नाव जरा विनोदी वाटते.
स्टारबक्सने खास भारतासाठी म्हणून काही शाकाहारी पदार्थांची निर्मिती केलेली दिसते आहे. कारण हे पदार्थ जगात दुसरीकडे कोठेच मिळत नाहीत. ” चटपटा पराठा रॅपकिंवा कांद्याची पात, चीज, मिरी आणि चाट मसाला यांचा वापर केलेली ही डिश अशीच खास भारतातील खवय्यांसाठी बनवलेली दिसते आहे. त्याचप्रमाणे गरिबांच्या चमचमीत वडापावाचा श्रीमंत भाऊ, येथे char-grilled sliced potato and pepper in a ciabatta sandwich या नावाने वावरताना दिसतो आहे. मात्र जगभर अतिशय लोकप्रिय असलेले ब्लूबेरी व डबल चॉकलेट मफिन्स मात्र येथे त्याच स्वरूपात उपलब्ध आहेत. Elaichi Mawa Croissant ही मावा वापरलेली अशीच एक खास डिश भारतासाठी बनवलेल्या या मेन्यूवर आहे.
मांसाहारी पदार्थांची आवड असलेल्यांना चिकन पॅटीज सॅन्डविच, Murg tikka panini या नावाने उपलब्ध आहे. या शिवाय खास Tamarind Peanut Chicken Calzone” किंवा Konkani Twist या नावाचे मटन पफ या मेन्यूमध्ये आहे.
थोडक्यात सांगायचे तर स्टारबक्सने, भारतीयांना रुचतील असे फरक आपल्या आंतर्राष्ट्रीय मेन्यूमध्ये जरूर केलेले दिसत आहेत. परंतु सर्वसाधारण भारतीय ग्राहक हा अतिशय चोखंदळ आणि आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळतो की नाही हे पहाणारा असल्याने तो या स्टारबक्सच्या कॅफेजना पुढे कितपत लोकप्रियता मिळवून देईल? हा भविष्यातील एक अंदाजच अजून आहे. जोपर्यंत स्टारबक्समध्ये जाणे हा एक स्टेटस सिम्बॉल मानला जात आहे तोपर्यंत या कॅफेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी झुंबड लागणार आहे हे उघड आहे. परंतु या कॅफेजशी संख्या वाढून त्यांची दुर्मिळता जशी कमी कमी होत जाईल त्यावेळी ग्राहकांना टिकवून धरण्यासाठी स्टारबक्सने ग्राहकांना त्यांच्या पैशाचा भरपूर मोबदला दिला तरच मॅकडोनल्ड किंवा पिझ्झा हट या सारख्या साखळी उपहारगृहांची लोकप्रियता स्टारबक्स कॅफेजना लाभू शकेल.
16 डिसेंबर 2012

Thursday, 11 September 2014

पावसासाठी वेदाचार्यांचा पिंप यज्ञ

शुक्ल यजुर्वेदाच्या एकविसाव्या अध्यायाच्या सुरवातीसच, वरूण किंवा  पावसाच्या देवाची एक मोठी सुरेख प्रार्थना केलेली आहे. “हे वरूणा तू आमच्यावर त्वरित कृपावंत होऊन तुझ्या दयेला आम्हाला पात्र कर” अशी काहीशी सुरवात असलेली ही प्रार्थना, यजुर्वेद हा यज्ञाच्या वेळी म्हणण्याचा वेद असल्याने, यज्ञाच्या प्रसंगी केली जात असे.

आपल्यावर कोणतेही संकट येऊ घातले आहे असे वाटल्यावर, सर्व श्रद्धाळू जन आपल्या आपल्या श्रद्धास्थानांची प्रार्थना करतात. यात नवल असे काहीच नाही. पाऊस न पडणे हे तर सर्व जनांसाठी महासंकट आहे. मुंबईमधले, वेदमंत्रात पारंगत असलेले वेदाचार्य आणि वेद अभ्यासक, यांनी हे संकट लवकरात लवकर टळावे म्हणून, दोन दिवसांपूर्वी असेच एक यज्ञकर्म, वरूणराजाने कृपा करावी म्हणून संपन्न केले.

for rain


मुंबईत माटुंग्याला असलेल्या व कांची शंकराचार्यांच्या भक्तगणांनी स्थापन केलेल्या, ‘शंकर मठम’ या संस्थेत हे यज्ञकर्म करण्यात आले. नवलाची गोष्ट म्हणजे हे यज्ञकर्म करण्यासाठी या वेदाचार्यांना यज्ञाची वेदी, अग्नि वगैरे सामुग्रीची काहीच आवश्यकता भासली नाही. हे यज्ञकर्म करण्यासाठी या मंडळींनी ऍल्युमिनियम धातूची 10 मोठी पिंपे पाण्याने भरली व त्यात गळ्यापर्यंत येईल एवढे पाणी भरून हे वेदाचार्य त्यात स्थानापन्न झाले. नंतर तब्बल चार तास यजुर्वेद आणि ऋग्वेदातील वरूणाच्या स्तुतीपर ऋच्यापठण केले.

हे यज्ञकर्म, ऍल्युमिनियम धातूच्या पिंपातच का केले? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. यजुर्वेदाच्या काली ऍल्युमिनियम धातूचा शोध नकीच लागलेला नव्हता. या धातूचा शोध तर एकोणिसाव्या शतकात लागला होता. मग हे यज्ञकर्म कोणत्या तर्काने या धातूची भांडी वापरून केले? याचे काहीच स्पष्टीकरण या वेदाचार्यांनी दिले नाही. पण त्यांचे “वेदमंत्रांच्या उच्चाराने कंपने निर्माण होऊन, पाऊस पडत असल्याने, पर्जन्य वृष्टी साठी वेद शास्त्रात सांगितलेला हा उत्तम उपाय आहे” हे विधान वाचून मात्र हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले.
वेद अभ्यासकांची वेदांबद्दल श्रद्धा असणे साहजिकच आहे. त्या श्रद्धेच्या पोटी हे यज्ञकर्म या वेदाचार्यांनी, समाजाच्या भल्यासाठी केले, यात कोणालाच काही गैर वाटण्यासारखे नाही. परंतु काहीतरी अशास्त्रीय व भोंगळ विधाने केल्यामुळे त्यांच्या श्रद्धेबद्दल इतरांना आदर वाटण्याऐवजी ते फक्त उपहासासच पात्र होतील अशी भिती आहे. त्यांच्या या यज्ञकर्माने, पाऊस पडेल की नाही ते मला माहिती नाही. पण या दहा वेदाचार्यांना सर्दी पडसे होण्याची शक्यता मात्र जास्त वाटते.


28 ऑगस्ट 2009

Saturday, 6 September 2014

गोस्ट पन रस्त्यांची!


आमचा बाप मला शालत रोज हाकायचा तवाची गोस्ट आहे. एक दिवस बाप म्हनला की पोरा तुज्या शालत एक नवा मास्तर आला आहे त्याची तुला शिकवनी लावली आहे स्पेश्यल. त्याच्याकडे आज जा. गंमत म्हनजे तो मास्तर होता मिल्ट्रीतला. त्याला आम्ही पोरे, एनसीसी मास्तरच म्हणायचो. त्याची शिकवणी म्हणजे नुसती हडेलहप्पी असायची. आता आमाला ती आवडायची ही गोस्ट निराली. शालला सुट्टी पडली की तो मास्तर आमाला क्यांपला घेऊन जायचा. क्यांप म्हनजे नुसता दंगा. पन तो मास्तर आमाला शरम्दानाला घीऊन जायचा. शरम्दान म्हनजे दुसर्‍यांच्या पोरांकडन फुकाट काम करून घ्यायाच. आता आमी धा बारा वर्साची पोरे काय काम करनार? मंग मास्तर आमाला रस्ता करायला लावायचा.

आता रस्ता करयाचा म्हनजे एकदम इझी (सोपं) काम. मास्तर जिमिनीवर चुन्याच्या फक्कीच्या दोन लाइनी मारायचा. आमी पोरे त्या लाइनीमधे एक दीड फूट खोल खनायचो. मंग त्या खड्यात दगडं,धोंडं जमवायची आणि वरच्या अंगाला, खनलेला मुरुम परत भरायचा. झाला रस्ता. या रस्त्याने गणपत पवार त्याची बैलगाडी नेवून बघायचा. पाउसपान्यात वरचा मुरुम खाली बसायचा. मग परत शरम्दानानी दुसर्‍या जागेतली माती, मुरुम आणून टाकयाचा. दोन पांच वर्से असेच केले की एकदम ब्येस रस्ता तयार.

आता तुम्हाला एक शिक्रेट सांगतो. आपल्या कोल्हापूर,सांगली,सातार्‍यापासून पार पुन्यापर्यंतच्या म्युंशिपालट्या असाच रस्ता बनवतात. मी सताच्या दोल्यांनी पायलेले आहे. आता त्यांना रस्त्यावरून मोटरगाड्या पन पलवायच्या असतात. ते पन इझी आहे. चार लाकड पेटवायची आनि त्यावर डांबर उकलवायचं. रस्त्यावर दगडाची बारीक खडी टाकायची आनि त्यावर डांबर वतायचं. ब्येस मोटर गाड्या धावतात यावरनं. पान्यानं खड्डं पडल तर परत खडी टाकायची आनि परत डांबर टाकायच. आमी या रस्त्यांना बैलगाडी छाप रस्तेच म्हनतो. आपल्याकडे सगले रस्ते असेच असतात.

पुन्याच्या वरच्या अंगाला, औंध गावाजवल, मुला नदी आहे. या नदीवर गोर्‍या साहिबांनी एक पूल बांधला होता. हा पूल एकदम कंडम. नदीला पानी आले रे आले की पानी पुलावर. मंग पुढच्ये थेरगावकडचं पब्लिक वाट बघत बसायचं. मंग आपल्या बॉम्बेच्या शासनानं या पुलाच्या आधीच्या बाजुला एक आणखी झ्याकपाक पुल बांधला. त्याला लाल पिवला रंग दिला. तो पुल बघायला पेपरवाल्यांना बोलावलं त्यांनी फोटु काढले. पन पुन्याचेच पेपरवाले ते, पुल बघायच्या ऐवजी पीडब्ल्युडीच्या साहेबालाच विचारायला लागले साहेब या पुलावर जायाचं कसं? आता पुलावर जायचा रस्ता पीडब्ल्युडीसाहेब थोडाच बनवणार. ते काम ग्रामपंचायतीचं. मंग पब्लिक जुन्याच पुलावरून जायाच. भरकन दोन पांच् वर्सात ग्रामपंचायतीनं पुलाच्या दोन्ही अंगाना आपले बैलगाडी छाप रस्ते बनवले. चांगलं डांबर खडी टाकली. पन आता दुसरीच गोची झ्याली. पुन्याचं ट्रॉपिक लै भारी आनि पुलावरनं एका वेली ज्येमतेम दोन मोटरगाड्या जायाच्या. सारखं ट्रॉपिक जाम व्हायाला लागलं. लोकं पीडब्ल्युडीसाहेबाच्या नावानं बोंब मारू लागलं. असा कसा बनवला पुल म्हनुन. मंग पीडब्ल्युडीसाहेबानं जाहिरच करून टाकलं ‘ आता शासन नवीन पूल बांधणार आहे. निविदा काढणार आहेत.’ झालं पेपरवाल्यांचा विषयच संपला.

आता चार दिवसांपूर्वी आपल्या सोनिया मॅडमनी, बॉम्बेला एक ‘शी लींक’ म्हनुन पुल चालू केला ना! वांदृयापासुन वरलीला जायाला. एकदम ब्येस पुल आहे. आपल्या वालचंद शेटजींनी बांधला म्हनतात. एका वेली आठ मोटरगाड्या जा ये करनार म्हनतात. मी अजुन बघितलेला नाही पन आमचा अर्जुन रहातो ना वरलीनाक्याला, तो सांगत होता. आपलं अशोकजी चव्हान आहेत ना बॉम्बेचं, मुख्य मंत्री हो! त्यांची पन एक पीडब्ल्युडी आहे म्हनं. या पीडब्ल्युडीचा एक साहेब वालचंदशेटजींचा पुल बघायला गेला होता म्हनं. तो पन पुल बघुन खुष झाला. पन त्याचं असं मत पडलं की एका वेली आठ मोटरगाड्या धावणार म्हनजे केवढं पेट्रोल लागणार आनि पर्यावरनाची केवढी हानी. म्हनुन त्यानं एकदम ब्येस आयडिया काढली. वरलीनाक्यावर पुलाकडून जाणारा रस्ता त्यानं ज्येमत्येम दोन गाड्या जातील एवढाच ठेवला. बाकी सगल्या गाड्या हाजी अली पर्यंत गप उभ्या. केवढी पेट्रोल बचत आणि पर्यावरनाची हानी तरी किती कमी! पीडब्ल्युडीचे काम एकदम ब्येस बरकां.

आता तुमी म्हनाल की हे रस्त्याच भारुड मी तुम्हाला कशाला सांगत बसलो आहे? कारन याचा दिल्लीशी डायरेक्ट संबंध आहे. अलीकडे सगल्या गोस्ठींचा दिल्लीशी संबंध असतो. दिल्लीच्या मेट्रोचं एक दोन पुल परवा पडलं तर आमचं पुन्याच नगरसेवक म्हनायला लागल की पुन्यातली मेट्रो नको. असा दिल्लीचा संबंध असतो प्रत्येक गोस्ठीत. तर काय आहे की आपले मनमोहनसिंहजी आहेत ना, प्रैम मिनिस्टर हो! त्यांच्या मंत्रीमंडलांत एक एकदम भारी मानूस आहे. म्हनजे तशी खूप भारी मंडली आहेत, पन हे कमलनाथजी आहेत ना ते लैच भारी आहेत.

हे कमलनाथजी विलेक्शनच्या आधीच्या मंत्रीमंडलात पन होते कॉमर्स मंत्री म्हनजे वानिज्य मंत्री हो! त्यांनी म्हने त्या युरोप-अमिरिकेच्या सरकारला ठनकावून दिले की तुम्ही तुमच्या देशातल्या शेतकर्‍यांना पैशाची मदत करता व त्यांचा शेतमाल आमच्या देशात स्वस्तात पाठवायला बघता. आमाला आमचे शेतकरी मारायचे नाहीत. तुमी शेतकर्‍यांची मदत बंद करा आनि मगच शेतमाल आमच्या देशात पाठवा. थोडक्यात म्हनजे कमलनाथजींनी या देशांचा सगला प्लान उधलूनच लावला की. असा स्ट्रॉंग मानूस आहे कमलनाथजी. आता थोड्याफार शेतकर्‍यांनी त्या नागपुरकडे आत्महत्या केल्या म्हनतात. पन त्यात कमलनाथजींचा काय संबंध?
तर नवीन मंत्रीमंडल केले ना मनमोहनसिंहजींनी, तेंव्हा त्यांनी कमलनाथजींना विचारले की तुम्हाला कोनते काम देऊ. कमलनाथ तयार गडी. त्यांनी असा पेच टाकला की विचारू नका. ते म्हनले की मला कोनतेतरी अशक्य काम द्या. आता आला का प्रैम मिनिस्टरपुढे प्रॉब्लम? पन मनमोहनसिंग त्यांच्याहून सवाई. ते म्हनले “तुमी असे म्हनाल असे मला वाटलेच होते. मी तुमाला रस्ते बांधायचा मंत्री बनवतो”. आता तुमी म्हनाल यात कठीन काय आहे? पन हे काही बैलगाडी छाप रस्ते बनवायचे काम नाही. तुमी पुन्याहून बॉम्बेला त्या गडकरीसाहेबांनी बनवलेल्या रस्त्याने गेले का कधी? एकदम ब्येस रस्ता आहे. प्वाटातलं पानी सुद्धा नाही हलत. कमलनाथजींचे हे सगले नवे रस्ते असे शिमेटचे, खूप ठिकानी हवेतून जानारे आणि एकदम कडक असे रस्ते होणार आहेत. मुख्य म्हनजे गेल्या पन्नास वर्षात हे रस्त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमानातले काम कोनत्याच मंत्र्याला पन करता आलेले नाही.

या लै भारी मानसानं दोन महिन्यातच आपला प्लान पन जाहिर केला की. पुढच्या वर्सभरात दहा हजार कोटी रुपये, म्हंजी एकावर किती झीरो हो? खर्च करून 12 हजार किलोमीटर रस्ते बनवणार म्हनतात कमलनाथजी. पैशाचा काही प्राब्लेम नाही पन म्यानिजर लोकांची कमी पडल असं वाटत त्यांना.

कमलनाथजी बनवा तुम्ही जरूर रस्ते! आपला देश लै दिवस गरीब राहिला आहे. पण म्या आपल्या अडानी मानसाची एक कालजी सांगू तुम्हाला. तुमची नवीन रस्त्यांची जाली तुमी म्हनता तशी तुमी तयार कराल हो! पन हे सगले रस्ते आमच्या बैलगाडी छाप रस्त्यांना झ्याक जोडले जातील हे बघा. आमच्या पुन्याबॉम्बेच्या पीडब्ल्युडीसाहेबांसारखे नका करू. नाहीतर तुमची रस्त्याची जाली राहील हवेतच् आणि आमी आपले जात राहू आमच्या बैलगाडी छाप रस्त्यांवर, खडम! खडम!

14 जुलै 2009