Showing posts with label मार्केटिंग. Show all posts
Showing posts with label मार्केटिंग. Show all posts

Saturday, 18 October 2014

वादाच्या भोवर्‍यात

मागच्या महिन्यात, बॉलीवूडचा एक नवीन चित्रपट वितरण होण्याआधीच बराच गाजला. एका राजकीय पक्षाने आपण तो चित्रपट वितरण होऊ नये यासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. त्याबरोबर सर्व माध्यमाना एक नवीन ब्रेकिंग न्यूज मिळाल्याचा हर्षानंद झाला व काही ना काही पद्धतीने या चित्रपटासंबंधीच्या बातम्या सतत लोकांपुढे येत राहतील याची त्यांनी व्यवस्था केली. साहजिकच लोकांच्यात, विशेषत: स्त्रीवृंदाला, चर्चा करण्यास एक नवीन विषय मिळाला. ” , तू बघितलास का MNIK” ” नाही ग! तिकिटेच मिळत नाहीयेत!” वगैरे वगैरे.
दोन चार दिवसांनी या राजकीय पक्षाने आपले आंदोलन मागे घेतले. चित्रपटाचे वितरण झाले. एक आठवडाभर तरी ब्रेकिंग न्यूज मधे असलेला हा चित्रपट शेवटी आपल्याला बघायला मिळणार म्हणून लोकांनी प्रचंड गर्दी केली. थोड्या दिवसातच चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या लक्षात आले की चित्रपट अगदीच सामान्य दर्जाचा आहे. बुद्धीवैभवाचा अभाव असलेले व प्रत्येक चित्रपट आवडीने बघणारे काही प्रेक्षक सोडले, तर बाकी प्रेक्षकांना आपण पद्धतशीर रित्या गंडवलो गेलो आहोत याची जाणीव प्रकर्षाने झाली.अर्थात त्यांना हे समजेपर्यंत चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपला भांडवली खर्च व फायदा हे दोन्ही कमावले होते पण ही बाब फारशी कोणाच्या लक्षात आली नाही.


वादाचा भोवराहा कोणत्याही उत्पादनाचे, निर्मितीचे किंवा प्रकल्पाचे, कमी खर्चात प्रभावी मार्केटिंग करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध आहे याची जाणीव उत्पादकांना, निर्मितीकारांना किंवा प्रकल्प सादर करणार्‍यांना आता झाली आहे असे दिसते. आपले सामान्य दर्जाचे उत्पादन किंवा निर्मिती, लोकांच्यापर्यंत फारशी जाहिरातबाजी व खर्च न करता, या पद्धतीने पोचवता येते. अगदी एखाद्या राजकीय पक्षाने सुद्धा ही पद्धत अवलंबली तर तो अल्प कालात लोकांच्या नजरेसमोर चमकू शकतो. महाराष्ट्रात उदयाला आलेल्या एका नवीन राजकीय पक्षाने हीच पद्धत अवलंबली आहे. एका वादाच्या भोवर्‍यातून हा पक्ष बाहेर पडतो न पडतो तोच त्या पक्षाचे नेते परत काहीतरी आक्षेपार्ह विधाने करतात. परत एकदा ब्रेकिंग न्यूज आणि वादाचा भोवरा. प्रत्येक वादाच्या भोवर्‍याचे एकूण फलित, त्या पक्षाची वाढती लोकप्रियता हे असल्याने, हा पक्ष आता बराच लोकप्रिय झाल्यासारखा निदान दिसतो तरी आहे.
मॅकडॉनल्ड्स सारख्या फास्ट फूड साखळ्यांनी तर हे वादाच्या भोवर्‍याचे तंत्र चांगलेच आत्मसात केले आहे. कधीतरी कोणता तरी एक शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध होतो. त्यात फास्ट फूड कसे हानीकारक आहे याचे भयानक चित्र उभे केलेले असते. लगेच माध्यमे त्या बातमीवर तुटून पडतात. परिणामी मॅकडॉनल्ड्सची विक्री आणखी वाढते. कधी ते विकत असलेले अन्न जंक फूड आहे म्हणून वाद तर कधी ट्रान्सफॅट्सच्या वापराबद्दल तर कधी ते वापरत असलेले मांस, हलाल आहे की नाही यावरून. थोड्या फार प्रमाणात हेच तंत्र कोका कोला किंवा पेप्सी सारखे सोडा उत्पादक वापरतात. मॅकडॉनल्ड्स घ्या किंवा कोक किंवा पेप्सी त्यांची विक्री या वादामुळे कधी कमी झाल्याचे ऐकले आहे का? नवीन वाद निर्माण झाला की उलटी ती आणखीन वाढतेच.


गॉल्फ सम्राट टायगर वूड्सचे उदाहरण आपल्या सगळ्यांना आठवत असेल. त्याचे अनैतिक संबंध उघडकीस आल्यापासून त्याचे चारित्र्य जेवढे म्हणून कलंकित करता येईल तेवढे प्रसार माध्यमांनी केले. पण रोलेक्स सारख्या घड्याळ्यांच्या जाहिरातीत टायगर अजून झळकतोच आहे. कोणत्याही कंपनीने त्याच्याशी केलेली कॉन्ट्रॅक्ट्स रद्द केलेली मी तरी अजून ऐकलेली नाहीत.
एखाद्या नाटकाबद्दल खूप चांगले अभिप्राय वर्तमानपत्रात आले तर त्याची तिकिटविक्री वाढते असे मला तरी वाटत नाही. याउलट एखादे नाटक शिवराळ आहे, अश्लील विनोदानी भरलेले आहे असे नुसते एखादे वाक्य पेपरात येउद्या. नाटकाचे पुढचे शो हाऊसफुल होतात.
थोडक्यात असे म्हणता येईल की हे वादाचा भोवरातंत्र खूप प्रभावी आहे आणि ते आपल्या सर्वांच्या मानसिकतेचा अगदी बरोबर वापर करते. आता या तंत्राच्या प्रभावाखाली येऊन आपण आपल्यालाच गंडवून घ्यायचे आणि या तंत्राच्या प्रभावाला बळी जायचे किंवा नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

10 मार्च 2010 

Friday, 12 September 2014

रॉबिन हूड मार्केटिंग

एक वर्षापूर्वी, टाटांनी जेंव्हा नॅनो मोटर कार बाजारात आणली तेँव्हा त्यांना कदाचित कल्पनाही नसेल की आपण हे नवीन उत्पादन बाजारात आणून, एक नवीनच पायंडा पाडत आहोत. गेल्या वीस पंचवीस वर्षांत, भारतातल्या सर्व बड्या कंपन्या, कोणतेही नवीन उत्पादन बाजारात आणताना, ते कसे ‘लेटेस्ट’ आहे, ते परदेशात मिळणार्‍या उत्पादनांच्या कसे तोडीस तोड आहे, हे ग्राहकाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करत असत. ग्राहकाची क्रयशक्ती विचारात घेतली तर ही उत्पादने अगदी वरच्या थरावर असणार्‍या ग्राहकांनाच परवडणारी असत. मोटर गाड्यांचे उदाहरण घेतले तर एक मारुती सोडली(कारण ती सरकारी कंपनी होती) तर भारतात आलेल्या प्रत्येक नवीन उत्पादकाने प्रथम इतर देशात विकल्या जाणार्‍या वरच्या श्रेणीच्या गाड्याच प्रथम भारतात आणल्या व आणत आहेत. त्यामुळे त्यांना नाव कदाचित मिळाले असेल पण त्यांचे ग्राहक आणि उत्पादने ही अल्पसंख्याकच राहिली.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधील एक अनिवासी भारतीय प्राध्यापक, श्री. सी.के.प्रल्हाद यांनी ही विसंगती प्रथम दाखवून दिली. कोणत्याही समाजात ग्राहकांची क्रयशक्ती ही एखाद्या पिरॅमिडसारखी असते. जास्त क्रयशक्ती असलेले थोडेच ग्राहक या पिरॅमिडच्या शिखरासारखे असतात तर कमी क्रयशक्ती असलेले प्रचंड संख्येचे ग्राहक या पिरॅमिडच्या तळासारखे असतात. प्रल्हादजींच्या मताप्रमाणे भारतातील कंपन्या फक्त शिखरावरील ग्राहकांच्या मागे लागून आपला वेळ व्यर्थ दवडत आहेत. या ऐवजी जर त्यांनी या पिरॅमिडच्या तळावर असलेल्या ग्राहकांच्यावर लक्ष केंद्रित केले तर या कंपन्या कोट्यावधी रुपये सहज कमवू शकतील.
एक मॅनेजमेंट कन्सल्टन्ट असलेले श्री. हरिश बिजूर, हे याला रॉबिन हूड मार्केटिंग असे नाव देतात. रॉबिन हूड हा स्वातंत्र्यवीर, श्रीमंतांच्या मालकीच्या गोष्टी काढून घेऊन गरिबांना वाटत असे अशी दंतकथा आहे. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीने जास्त क्रयशक्तिच्या ग्राहकांसाठी बनवल्या जाणार्‍या उत्पादनात गुंतलेले भांडवल व मनुष्य़बळ तिथून काढून कमी क्रयशक्तिच्या ग्राहकांसाठी बनवायच्या उत्पादनांसाठी वापरले तर त्यांची मागणीच खूप प्रचंड असल्याने कंपनीची विक्री आणि फायदाही तसाच वाढेल.

भारतातील हे कमी क्रयशक्तीचे ग्राहक मुख्यत: छोट्या गांवात आणि खेडेगांवात रहात असल्याने त्यांना परवडतील व उपयोगी पडतील अशी उत्पादने बनवणे अर्थातच आवश्यक बनते.

shubh_griha


नॅनोच्या पाठोपाठ, टाटा गटाच्याच घरबांधणी कंपनीने दोन ते पाच कोटी किंमतीच्या सदनिकांच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापेक्षा नॅनो घरे बनविण्याचा प्रकल्पाची घोषणा केली. या सदनिका चार लाखापर्यंत किंमतीलाच विकण्याचा त्यांचा मानस आहे. जास्त किंमतींच्या सदनिकांना ग्राहक शोधत बसण्यापेक्षा लोकांना परवडेल असे घर देण्यावर त्यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे.

products-and-services-nokia-1202-cheapest-phone-ever-150x150

नोकिया 1202 सर्वात स्वस्त


नोकिया सारखी आंर्तराष्ट्रीय कंपनीने भारतात विकण्यासाठी मुद्दाम तयार केलेला प्री पेड कनेक्शनसह मिळणारा 1200 रुपयाचा फोन किंवा सॅमसंग कंपनीचा सूर्यशक्तीवर चालणारा मोबाइल फोन ही सगळी उत्पादने या नवीन विचारसरणीनुसारच बाजारात आणली आहेत. हीरो होंडा या मोटर सायकली बनवणार्‍या कंपनीने दोन वर्षात आपली ग्रामीण विक्री आणि सर्व्हिस केंद्रे 2000 वरून 3500 पर्यंत वाढवली आहेत. नोव्हॅटियम या कंपनीने महिन्याला 1200 रुपये या दराने ब्रॉडबॅड कनेक्शनसह एक संगणक, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना देण्याची स्कीम आखली आहे. साध्या बिस्कीटांचा विचार केला तरी बिस्कीट कंपन्या ग्रामीण ग्राहकांना परवडेल अशा आकाराचे पुडे आता वितरण करत आहेत. शांपू आणि तेलांची सॅचे आता एक किंवा दोन रुपयाला म्हणजेच कोणाच्याही खिशाला परवडतील अशा किंमतीला मिळतात.

जास्त क्रयशक्ती असलेला ग्राहक आता बाजारात गेला तर पुष्कळ वेळा वैतागतो. त्याला हवी असलेली उत्पादने आता बाजारात नसतातच. त्यामुळे आणखी जास्त पैसे खर्च करून, आयात केलेली उत्पादनेच घेण्याशिवाय त्याला पर्याय रहात नाही. थायलंड आणि सिंगापूर या देशांबरोबरचे मुक्त व्यापार करार आता कार्यवाहीत आलेलेच आहेत. एसिआन आणि कोरिया या देशांबरोबर असे नवे करार झालेले असून पुढच्या वर्षभरात या देशांची उत्पादनेही आपल्या बाजारात मिळू लागतील. जास्त क्रयशक्तीच्या ग्राहकाला हे पर्याय उपलब्ध होतीलच. या ग्राहकाला कदाचित कल्पनाही नसेल की या नवीन रॉबिन हूड मार्केटिंगमुळे, त्याच्या नेहमीच्या सवईची उत्पादने, आता त्याला बहुदा मिळणारच नाहीत.

भारतीय कंपन्यांच्या या पॉलिसीमधील बदलाला सध्याची आर्थिक मंदी सुद्धा कारणीभूत आहेच. सध्याच्या उत्पादनांची मागणीच घटल्यामुळे, उत्पादकांना नवीन ग्राहक व त्यांना हवी असलेली उत्पादने शोधणे भागच पडले आहे. वाईटातून चांगले निघते असे म्हणतात. त्याचे हे एक उदाहरण आहे.

जागतिकीकरणाच्या काळात, भारतीय कंपन्यांना आपले पाय जमिनीवर घट्ट रोवण्याची ही एक संधीच मिळाली आहे असे मला तरी वाटते.


29 ऑगस्ट 2009