Showing posts with label मराठी साम्राज्य. Show all posts
Showing posts with label मराठी साम्राज्य. Show all posts

Saturday, 18 October 2014

दक्षिणा फेलोशिप

महाराष्ट्र शासन दरवर्षी पदवी परिक्षा,. पदव्युत्तर परिक्षा, यांच्यात अच्चुत्तम यश मिळवणार्‍या किंवा उच्च दर्जाचे संशोधन करणार्‍या संशोधकांना दक्षिणा फेलोशिप नावाची एक शिष्यवृत्ती देत असते. ही शिष्यवृत्ती मिळालेले संशोधक आपल्या बायो-डेटा मधे आपण दक्षिणा फेलो आहोत हे मोठ्या गर्वाने सांगतात. सध्या जरी ही शिष्यवृत्ती कोणत्याही क्षेत्रात कार्य करणार्‍या अभ्यासकाला मिळत असली तरी मुळात ही शिष्यवृत्ती संस्कृत वाङ्‌मय किंवा तत्वज्ञान या विषयांच्या अभ्यासकांना देण्यात येत असे. या शिष्यवृत्तीला हे असे असाधारण नाव का देण्यात आले आहे असे कुतुहल कोणासही वाटल्यावाचून रहाणार नाही. पण या नावामागे अडीचशे वर्षांचा तरी इतिहास आहे.


पहिल्या किंवा बाजीराव बाळाजी या पेशव्यांनी, 1731 मधे त्र्यंबकराव दाभाडे यांच्याबरोबर झालेल्या युद्धात विजयश्री प्राप्त झाल्यानंतर, दख्खन, कर्नाटक, आणि भारतातील इतर ठिकाणे, येथून पुण्यात येणार्‍या, ज्ञानी, व्यासंगी, निर्मळ चारित्र्याच्या व आपले ज्ञान व व्यासंग यांचा मान राखणारे वर्तन असलेल्या ब्राम्हणांना, दर वर्षी श्रावण महिन्यात, दक्षिणा देण्याची प्रथा सुरू केली होती. नंतर या दक्षिणा वाटपासाठी, बाजीराव पेशव्यांचे पुत्र, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवे यांनी, पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी. एक मोठा कक्ष बांधून घेतला होता. या कक्षाला रमणा असे नाव होते.


.. 1737 मधे वाटण्यात असलेली एकूण दक्षिणा 17731/- रुपये असली तरी थोड्याच वर्षात जसजसे मराठी साम्राज्याचे वैभव वाढू लागले तसतशी दक्षिणेची रक्कम लाखात पोचली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात 5 लाख रुपये दक्षिणा म्हणून वाटण्यात आले. या दक्षिणेसाठी पार तंजावर ते बनारस, मथुरा येथून शास्त्री पुण्यात येत असत. आलेल्या पंडितांच्यात वैदिक ब्राम्हण, व्याकरणकार, ज्योतिषी, कवी, वेदांत ज्ञानी, तर्कतीर्थ, वैद्य आणि साधू या सर्व प्रकारचे ज्ञानी पंडित असत. आलेल्या पंडितांना पुण्यातील प्रभुणे शास्त्री, बाळ शास्त्री, आर्य शास्त्री आणि काशिनाथ शास्त्री यांच्या समोर आपल्या ज्ञानाची परिक्षा द्यावी लागत असे. त्या नंतर त्यांचा व्यासंग व ज्ञान यानुसार त्यांना दरबारात किंवा रमण्यात पाचारण करण्यात येई त्यांना भोजन विडा व दक्षिणा देण्यात येत असे.


रमण्याच्या कक्षाला चार द्वारे होती व या चार द्वाराजवळ स्वत: पेशवे, नाना फडणवीस, प्रभुणे शास्त्री व अमृतराव त्यांच्या शरीर संरक्षकांसमवेत बसलेले असत व दक्षिणा वाटत. दक्षिणा मिळालेल्या प्रत्येक पंडिताच्या कपड्यांवर किंवा अंगावर लाल रंगाची खूण करण्यात येत असे. दक्षिणा वाटण्याचे कार्य तसे खूप जिकिरीचे व धोक्याचे होते. परंतु पुण्यातील पेशव्यांचे पोलिस दल व मराठी सैन्य यांच्या कडक बंदोबस्ताखाली ते सुलभतेने पार पाडण्यात येई. पुण्याच्या या दक्षिणा समारंभाची ख्याती एवढी पसरली होती की ब्रिटिश रेसिडन्सी मधले गोरे अधिकारी हा समारंभ बघण्यास येत असत.
1797 मधे कॅप्टन मूर या ब्रिटिश अधिकार्‍याने आपल्या काही सहकार्‍यांबरोबर हा दक्षिणा समारंभ पाहण्यासाठी रमण्याला भेट दिली. त्याने या दक्षिणा समारंभाचे मोठे तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीपर्यंत हा दक्षिणा समारंभ चालू राहला. पण त्या वेळी पंडितांची परिक्षा घेणे वगैरे गोष्टी बंद होऊन आलेल्या सर्व ब्रम्हवृंदाला दक्षिणा वाटप करण्यात येऊ लागले. 1818 नंतर इंग्रज सरकारने दक्षिणा समारंभ बंद केला. परंतु थोड्याच दिवसात त्यांना या दक्षिणा समारंभामुळे राज्यातील व राज्याबाहेरच्या ज्ञानी व पंडितांना पेशवे दरबार केवढे प्रोत्साहन देत होता याची कल्पना आली. 1821 मधे माऊंट स्ट्यूअर्ट एल्फिस्टन याने लिहून ठेवलेल्या एका पत्रात या दक्षिणा समारंभाचे महत्व त्याने मान्य केले. या समारंभामुळे, भारतातील ज्ञानोपासकांना मोठे प्रोत्साहन मिळत होते हे त्याने मान्य केले. हा समारंभ बंद केल्याने पुण्यातील ब्राम्हण समाजाचे, इंग्रज सरकारबद्दलचे मत आणखीनच कलुषित होते आहे व नाराजी पसरत चालली आहे याची जाणीवही त्याला झाल्याचेही तो मान्य करतो.
दुसर्‍या बाजीरावाच्या कारकिर्दीत दक्षिणा समारंभावर जेवढा खर्च होत असे तेवढीच रक्कम इंग्रज सरकारने दक्षिणा ग्रॅन्ट म्हणून देण्यास सुरवात केली. या दक्षिणा ग्रॅन्ट मधून एक संस्कृत पाठशाला चालू करण्यात आली शिष्यवृत्या देण्यात येऊ लागल्या व संस्कृत भाषा व तत्वज्ञान याच्या अभ्यासासाठी व प्रचारासाठी हे पैसे खर्च केले जाऊ लागले.
इंग्रज सरकार नंतर मुंबई सरकारने व नंतर महाराष्ट्र शासनाने दक्षिणा ग्रॅन्टची परंपरा चालूच ठेवली व त्याचेच सध्याचे स्वरूप दक्षिणा फेलोशिप हे आहे.पेशवे दरबार, आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा, ज्ञानी व पंडितांचा योग्य आदर राखला जाऊन त्यांच्या चरितार्थाची सोय व्हावी या साठी किती प्रयत्नशील होता याची या दक्षिणा समारंभाच्या वर्णनावरून योग्य कल्पना आल्याशिवाय रहात नाही.

10 मार्च 2010

पुण्याच्या पेशव्यांचा होळी महोत्सव

पेशवे दरबारात दर वर्षी तीन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. या पैकी पहिले दोन उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि दसरा. याशिवाय अतिशय मोठ्या स्वरूपात व धूमधडाक्यात साजरा केला जाणारा तिसरा महत्वाचा सण म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला सुरू होणारा हा महोत्सव पुढचे पाच दिवस अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात असे. दरबारात साजर्‍या होणार्‍या या सणात, प्रत्यक्ष पेशवे सरकार, अतिशय रुचीने व आनंदाने भाग घेत असल्याने पुण्याच्या सर्वच नागरिकांचा आनंद द्विगुणित होत असे व तेही अतिशय उल्हासाने आपापल्या घरी हा सण उत्साहाने साजरा करत. थोड्याच दिवसांनी येणार्‍या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हा सण आहे असे मानले जात असे. सर्व दर्जाच्या आणि वयाच्या लोकांना हा सण मोकळेपणे आणि मर्जीनुसार साजरा करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याने निरनिराळ्या प्रकारांनी लोक स्वत:ची करमणूक करून घेत.


या उत्सवाच्या दरम्यान, पेशव्यांच्या शनिवार वाड्यात, अनेक नृत्य, गायन व संगीताच्या मैफिली होत असत आणि पुण्यातील नागरिक या कार्यक्रमांना भरपूर दादही देत असत. भवाई गुजराथी आणि वेंकट नरसी हे त्या कालातील दोन प्रसिद्ध गायक होते. आतासारखी संपूर्ण नाटके तेंव्हा होत नसत. परंतु काही नट छोटे छोटे विनोदी प्रसंग पेशव्यांच्या समोर सादर करीत व चांगली बिदागी मिळवीत. .1785 मधल्या पेशव्यांच्या दैनंदिनीत, श्री. बाललिंग नाईक आणि लक्ष्मण गुरव या सुपे येथील दोन नटांना, दशावताराचे चांगले सोंग काढल्याबद्दल रुपये 30/- व पोषाख अशी बिदागी दिल्याची नोंद सापडते.


हा उत्सव पाचव्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी समाप्त होत असे. या दिवशी केशर व पलाश फुले या पासून तयार केलेले रंग, पिचकार्‍या व मातीची भांडी यांचा वापर करून, एकमेकावर मोक़ळेपणाने टाकण्यात येत असत. स्वत: पेशवे सरकार हिराबाग येथील सुख महालात रंग खेळत. यावेळी शिंदे, भोंसले, होळकर वगैरे सारखे सरदार व सेनाप्रमुख यांना पेशव्यांचे खास आमंत्रण असे.


ग्वाल्हेरच्या शिंदे दरबारात असलेल्या ब्रिटिश रेसिडेंटचे शरीर रक्षक मेजर ब्रॉउटन हे एका अशा रंगपंचमीला हजर होते. त्यांनी या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन लिहून ठेवले आहे. ते म्हणतात की
असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात यापूर्वी कधी अनुभवला नव्हता आणि पुन्हा कधी अनुभवीन असे वाटत नाही. कल्पना करा की तुमच्या समोर सोने आणि चांदी यांच्या झिरमिळ्यांनी सजलेले अतिशय रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या अनेक नृत्यांगनांचे समुह नाच करत जात आहेत. या नृत्यांगनांचे अंग व कपडे गुलालाने माखलेले आहेत व सभोवतालून होणार्‍या रंगाच्या पिचकार्‍यांनी त्यांचे सर्व कपडे भिजलेले असून त्यातून पाणी ठिपकत आहे.या नृत्यांगनाच्या चारी बाजूस, डफ, तुणतुणी, तुतार्‍या, सारंगी सारख्या अनेक वाद्यांचा कोलाहल चालू आहे व या वाद्यांच्या तालावर त्या नृत्यांगना खास होळीसाठी रचलेली गाणी म्हणत आहेत. मधूनच पेशवे सरकार आपल्या पिचकारीतून या नृत्यांगनांच्या अंगावर रंग उडवतात. या वेळी या नृत्यांगनांचे चित्कार व बाकी बाजूंना उभे असलेले इतर सर्व लोकांचा जल्लोश व टाळ्या वाजवणे यामुळे सर्व वातावरण मोठे आल्हाददायक व प्रसन्न बनले आहे. गुलाल उडवणार्‍यांचे हास्य व ज्यांच्या अंगावर तो गुलाल उडवला जातो आहे त्यांच्या न उडवण्याबद्दलच्या विनवण्या ऐकू येत आहेत. या प्रसंगाचे जर कोणी चित्र काढले तर त्याला फक्त गुलाबी आणि पिवळ्या रंगातच हे चित्र काढावे लागेल. हा प्रसंग इतका असामान्य आणि अफलातून आहे की माझ्याजवळ त्याचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत.”


उत्तर पेशवाईत पुढेपुढे म्हणजे दुसर्‍या बाजीरावाच्या कालखंडात, या होळीच्या महोत्सवाची गुणवत्ता कमी होत गेली व त्याला अनौचित्यपूर्ण, बीभत्स व अश्लील असे स्वरूप प्राप्त होऊ लागले. या कालखंडात, पेशवाई राज्याची राजधानी पुणे हे हळूहळू एक नीतिमूल्यांचा र्‍हास व लोप पावत असलेले असे एक decadent आणि degenerating शहर होत चालले होते. त्या पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या या होळी उत्सवाचेही स्वरूप बीभत्स व अश्लील झाले असले तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
27 फेब्रुवारी 2010

(लेखात घातलेल्या चित्रांचा होली उत्सवाशी तसा काही संबंध नाही, तत्कालीन पुण्याची ही तैलचित्रे आहेत.)

Tuesday, 16 September 2014

पेशवेकालीन पुण्यातला दसरा

दुर्गा भवानी माता ही भोंसले कुलाची इष्टदेवता असल्याने, सातार्‍याच्या शाहू महाराजांच्या हयातीत, नवरात्रीचे नऊ दिवस व त्यानंतर येणारा दसरा असा दहा दिवसाचा सण, मोठ्या थाटामाटाने, सातार्‍याला मराठी राज्याचा सण म्हणून साजरा होत असे. शाहू महाराजांच्या निधनानंतर, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशव्यांनी हा सण तितक्याच थाटामाटाने पुण्यात साजरा करण्यास सुरवात केली. या प्रसंगी अनेक धार्मिक विधी करण्यात येत असले तरी पेशव्यांची मिरवणूक व नंतर भरवण्यात येणारा खास दरबार हे या सणाचे विशेष वैशिष्ट्य होते.
दसर्‍याच्या दिवशी सकाळी श्रीमंत पेशवे व त्यांचे सर्व सरदार हे एका मिरवणूकीने पुणे शहराबाहेरच्या एका छावणीकडे जाण्यास निघत. या प्रसंगी सर्व सरदारांच्या तुकड्या  स्वत:च्या रंगीबेरंगी आणि फडफडणार्‍या ध्वजाच्या किंवा निशाणांच्या मागे आपापल्या सर्वोत्तम घोड्यांवर स्वार झालेले असत. प्रत्येकाच्या अंगावर उत्कृष्ट कपडे व दागदागिने असत. त्यांची शस्त्रे घासूनपुसून अगदी चकचकीत केलेली असत. सर्व घोडे, उंट व हती हे त्यांच्या अलंकारांनी सजवलेले असत.

पुण्यातील जवळजवळ सर्व नागरिक मिरवणूकीत भाग घेणारे किंवा प्रेक्षक म्हणून या मिरवणूकीबरोबर चालत येत असत. ही अतिशय भव्य अशी मिरवणूक, आधी ठरवलेल्या एका शमी वृक्षापाशी येऊन थांबत असे. यानंतर श्रीमंत पेशवे या शमी वृक्षाची पूजा करत असत. ती झाल्यावर पेशवे या शमी वृक्षाची काही पाने तोडून घेत असत. त्या वेळी सैनिकांच्याजवळच्या सर्व तोफा व बंदुका डागण्यात येत व सर्व आसमंत दुमदुमुन जात असे. या नंतर या प्रसंगासाठी मुद्दाम विकत घेतलेल्या एका ज्वारी किंवा बाजरीच्या शेतात पेशवे जात व पिकाची एक दोन कणसे तोडून घेत. या क्षणी परत एकदा सैनिक बंदुका डागत, काहीजण धनुष्य़ाने बाणांचा वर्षाव करत. व अत्यंत आनंदाने व जल्लोशाने सर्वजण त्या शेताकडे धाव घेत व जमेल तेवढी कणसे खुडून घेण्याचा प्रयत्न करत व घरी परतत. उरलेल्रा सर्व दिवस हर्ष उल्हासात घालवण्यात येत असे. काही मराठा सरदार या प्रसंगी शेळी किंवा बैलाचा बळी देत असत. बळीचे रक्त अतिशय विधीपूर्वक घोड्यांच्या अंगावर शिंपडण्यात येत असे व ते अत्यंत शुभ मानले जाई. बळी जनावराचे मांस आपल्या हाताखालच्या, ब्राम्हण सोडून इतर, सर्व सैनिकांमधे, प्रसाद म्हणून वाटण्यात येत असे. काही मोठे सरदार हाताखालच्या लोकांना, बळीची जनावरे विकत घेण्यासाठी पैसे देत असत व बळी देऊन त्या बळीचे मांसभक्षण करणे हा दसर्‍याचा सर्वात मुख्य विधी मानला जाई.

सीमोल्लंघनाच्या स्वारीवरून परत आल्यावर शनिवारवाड्यातल्या दरबार महालात एक खास दरबार भरवला जात असे. या दरबारात सेनापती, सरदार व शिलेदार पेशव्यांना नजराणा पेश करत व पेशवे दरबारकडून सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्थानाप्रमाणे मानाची वस्त्रे मिळत. हे मानाचे वस्त्र मिळणे हे त्या काळी अतिशय सन्मानाचे मानले जाई. इ. स. 1794 मधे पेशव्यांनी रुपये 2 लाख वीस हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे मान्यवरांना दिली होती. त्यातील प्रमुख काही असे होते.


सातार्‍याचे राजे त्यांचे कुटुंब व सरदार:- रु. 27383/-
पंत प्रतिनिधी, कुटुंब व सरदार :- रु. 1283/-
पंत सचीव व कुटुंब:- रु. 603/-
चिंतामणराव पटवर्धन:- रु. 1238/-
परशुराम रामचंद्र :-रु. 1089/-
तुकोजी पवार:- रु. 789/-
खंडेराव विंचुरकर :-रु.2756/-
कृष्णराव बळवंत:- रु 2398/-
हणमंतराव दरेकर रु.:- 827/-
दौलतराव घोरपडे :- रु. 604/-
रघुजी भोंसले :- रु 6440/-
हैद्राबादचे निझाम:- रु.5888/-
चिंतामणराव फडके;- रु 1120/-
दौलतराव शिंदे :- रु. 11297/-
अलीबहादुर:- रु. 2015/-


या शिवाय घोडदळाच्या अधिकार्‍यांना रु. 34033/- व शिलेदारांना रु. 79703/- एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे दिली होती. इंग्रज रेसिडेंट व त्याचा वकील यांनाही मानाची वस्त्रे देण्यात आली होती. सर्व सैनिक व इतर अधिकारी यांना ही मानवस्त्रे मिळवण्याचा हक्क होता. मजेची गोष्ट म्हणजे राघोबा पेशव्यांच्या अंगवस्त्रांचीही नावे या यादीत होती.

दसर्‍याच्या निमित्ताने सैनिकांचे स्पर्धात्मक खेळ आयोजित केले जात असत व नंतर इंग्रजांच्या काळातही ही प्रथा चालू होती.

मानवस्त्रे देण्याची प्रथा पेशवाईचा अंत होईपर्यंत तर चालू होतीच पण नंतरही इंग्रजांनी ती अनेक वर्षे चालू ठेवली होती. काही वर्षांनी ही मानवस्त्रे दसर्‍याला न देता इंग्रज राजाच्या वाढदिवशी देण्याची प्रथा सुरू झाली व या वेळी इंग्रज एजंट, दरबारही भरवत असे.

या सर्व प्रथा कधी बंद झाल्या कोण जाणे? पेशवे दरबारने ज्या काही रूढी सुरू करून त्यांचे जतन केले होते त्यापैकीच एक हा दसर्‍याचा समारंभ होता. ज्या सैन्याच्या जिवावर मराठी सामार्‍ज्य उभे होते त्या सैनिकांचा व अधिकार्‍यांचा दसर्‍याच्या निमित्ताने सत्कार करण्याची पद्धत अतिशय योग्य होती यात शंकाच नाही.


24 सप्टेंबर 2009

Tuesday, 9 September 2014

शनिवारवाडा

शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले व इ.स. 1713 मध्ये त्यांनी बाळाजी भट यांची, पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली. इ.स. 1817 मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज, सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज हे इंग्रजांच्या स्वाधीन झाले व त्यांच्याच सांगण्यावरून प्रतापसिंह महाराजांनी त्या वेळचे नियुक्त पेशवे, बाजीराव रघुनाथराव यांना पेशवेपदावरून दूर केले. या दोन घटनांमधील 104 वर्षांच्या कालखंडात, मराठी राज्याची सर्व सत्ता, बाळाजी भट व त्यांच्या घराण्यातील 5 पिढ्यांच्यातील पुरुष, यांच्याच हातात पेशवे म्हणून एकवटली होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी, अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या कालात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते.

800px-Shaniwarwada_Pune

दिल्ली दरवाजा


मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला. अशी दंतकथा आहे की या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी एका सशाला कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. हे पाहिल्यावर बाजीरावांच्या असे मनात आले की या जागेत काहीतरी विशेष असले पाहिजे व त्यांनी ही जागा पेशव्यांच्या गादीसाठी मुक्रर केली. ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती. त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत. बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली.

ShaniwarWada

उपग्रहातून शनिवारवाडा


बाजीराव पेशव्यांच्या स्वभावानुसार त्यांनी ही वास्तू बांधून घेण्याचे काम अतिशय जलद गतीने पूर्ण करून घेतले व फक्त 2 वर्षात मराठी सत्तेला व वैभवाला साजेसा होईल असा आतल्या बाजूस 3 चौक असलेला एक दुमजली आलिशान प्रासाद तयार झाला. याच वर्षात म्हणजे शनिवार 22 जानेवारी सन 1732 रोजी बाजीरावांनी या वास्तूचा वास्तुपूजन समारंभ साजरा केला. हा प्रासाद बांधण्यासाठी 16110 रुपये खर्च आला व वास्तुपूजेनिमित्त 15 रुपये आठ आणे ब्राम्हणांना दक्षिणा देण्यात खर्च करण्यात आले. बाजीरावांच्या जीवनशैली प्रमाणे हा प्रासाद साधा पण उठावदार होता. फक्त दिवाणखाना मात्र शोभिवंत वस्तूंनी सजवलेला होता. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी 1750च्या आसपास या प्रासादात बरेच बदल केले व अनेक नवीन इमारती बांधल्या. हे करताना त्यांनी किती पैसा खर्च होईल किंवा वेळ लागेल याचा विचार केला नाही. या बदलांनंतर शनिवारवाडा एका भव्य आणि सौंदर्यपूर्ण दिमाखाने ओळखू जाऊ लागला. आपली सत्ता व वैभव यांचे हा वाडा एक साक्ष आहे या कल्पनेने या पेशव्यांनी वाड्यातील बदलांच्यात जातीने लक्ष घातल्याने, शनिवारवाडा अत्यंत प्रेक्षणीय व देखणी अशी एक वास्तू बनला. नंतर 1780 च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, गॅलर्‍या व टॉवर आणि कारंजी बांधली व शनिवारवाडा, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर सत्ता गाजवणार्‍या पेशव्यांच्या रुबाबाला व इतमामाला साजेसा होईल, याचे जातीने प्रयत्न केले.

800px-ShaniwarWada_Balcony

आतील भाग, जुन्या इमारतींची जोती अजून दिसतात.


शनिवारवाड्याचा मुख्य प्रासाद हा सहा मजली उंच होता. असे म्हणतात की आळंदीच्या देवळाचा कळस सहाव्या मजल्यावरून दिसत असे. पेशव्यांच्या मेघडंबरी या महालाच्यावर असलेल्या गच्चीतून पर्वती वरील देउळ आणि पुणे शहर याचे मोठे सुंदर विहंगम दृष्य दिसत असे. अजून अस्तित्वात असलेल्या दिल्ली दरवाजाच्यावर असलेल्या नगारखान्याच्या उंचीवरून या सहा मजली प्रासादाच्या उंचीची कल्पना येऊ शकते. 5 एकर आवार (कॅम्पस) असलेल्या या शनिवारवाड्यात प्रवेश करण्यासाठी 5 प्रवेशद्वारे होती. ही प्रवेशद्वारे अशी होती. उत्तरेला असलेला दिल्ली दरवाजा, कसबा गणपतीच्या देवळाजवळ असलेला गणेश दरवाजा. जांभूळ दरवाजा, खिडकी दरवाजा आणि मस्तानी दरवाजा. नाना फडणवीसांनी नंतर मस्तानी दरवाज्याचे नाव अली बहादूर दरवाजा असे बदलले. अली बहादूर हे मस्तानीचे नातू होते. त्यांनी पुढे बुंदेलखंड जिंकून तिथे बंडा या जहागिरीची स्थापना केली. दिल्ली दरवाजा हे शनिवारवाड्याचे प्रमुख प्रवेशद्वार होते. ते बांधत असताना शाहू महाराजांनी ते उत्तराभिमुख असल्याने दिल्ली बादशहाचा अवमान होतो असे वाटल्याने त्याचे काम थांबविण्याची बाजीरावाना विनंति केली. ती मानून बाजीरावांनी काम थांबवले. पुढे बाळाजी पेशव्यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर ते काम पूर्ण केले. हा दरवाजा अजूनही उत्तम स्थितीत आहे. व त्याच्यावरून वाड्याच्या एकूण कारागिरीची कल्पना येऊ शकते.

shaniwar wada spiked gate

दिल्ली दरवाजा


वाड्याच्या बाहेर असलेल्या दोन बाजूच्या भिंती 200 फूट लांब आणि 20 फूट उंच आहेत तर उरलेल्या दोन बाजू 150 फूट लांब व 20 फूट उंच आहेत. पायाला दगडी बांधकाम व वर वीटकाम केलेले एकूण 9 बुरुज या बाहेरील भिंतीमध्ये आहेत. हे बुरुज व भिंती यावर कोणत्याही वेळी 275 सैनिक कडा पहारा करत असत. वाड्यात 4 प्रशस्त चौक होते व 8 महत्वाचे दिवाणखाने, महाल किंवा स्टॆट-रूम्स होते.

1. ग़णपती रंग महाल- मुख्य दरबाराचा महाल
2. नाचाचा दिवाणखाना
3. आरसे महाल
4. जुना आरसे महाल
5. दादासाहेबांचा दिवाणखाना- रघुनाथ बाळाजी यांचा दिवाणखाना
6. थोरल्या रायाचा दिवाणखाना- पहिल्या पेशव्यांच्या नावाचा दिवाणखाना
7. नारायणरावाचा महाल
8. हस्तीदंती महाल

याशिवाय पेशवे कुटुंबातील इतरजणांना रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. हा भव्य प्रासाद अतिशय शिस्तबद्ध आणि सुनियंत्रित प्रशासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली चालत असे. जवाहिरखाना, जिन्नसखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी निरनिराळ्या उपयोगांसाठी असलेली स्वतंत्र दालने होती. व त्या प्रत्येक दालनावर त्या विभागाच्या कार्यासाठी व नियंत्रणासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला असे.

या एवढ्या मोठ्या घराच्या संरक्षणासाठी, 1779 मधल्या दस्त ऐवजाप्रमाणे 3144 कर्मचारी तैनात केलेले होते. त्यांची वर्गवारी अशी होती. खाशांचे संरक्षक-480 ,पुरंदर संरक्षक- 229, कानडी सैनिक- 325, घोड्यांच्या पागेसाठी रिसालदार-34, खाशांचे घोडेस्वार- 82, पायसैनिक (इनफन्ट्री)- 224, सेवकवर्ग- 76, शिलेदार व बारगीर- 1690 या शिवाय 300 घोडेस्वार सैनिक कोणत्याही क्षणी जय्यत तयार असत. ही संख्या नंतर 500 पर्यंत वाढविण्यात आली होती. पेशव्यांच्या प्रासादाची शासनयंत्रणा किती प्रभावी होती याची यावरून कल्पना येऊ शकते.

बहुतेक महाल किंवा दिवाणखाने एकाच नमुन्याचे होते. हा नमुना तेंव्हा वापरात असलेल्या शाई आणि बोरू ठेवण्याच्या पात्रासारखा दिसत असल्याने त्याला कलमदानी म्हणत असत. या नमुन्यात मध्यभागी, एक छोटे विभाग केलेला पण आयताकृती आणि सपाट छत असलेला असा, एक महाल असे. याच्या चारी बाजूंना उतरते छप्पर असलेल्या चार पडव्या असत. मुख्य महालाला आधार देत असलेले सुरूच्या झाडासारखे दिसणारे खांब, कोरीव काम केलेले असत. हे खांब एकमेकाला अत्यंत सुंदर असे कोरीव काम केलेल्या कमानींनी जोडलेले असत. छतावर लाकडी तक्तपोशी बसवलेली असे व त्यावर, पाने, फुले, वेलबुट्टी यांची नक्षी किंवा रामायण महाभारतातले प्रसंग चित्रित केलेले असत. जयराज नावाचा जयपूरहून मुद्दाम आणलेला एक कारागीर हे काम करत असे. खांबांच्या मधे रेशमी पडदे टांगलेले असत व जरूरीप्रमाणे ते खाली घेत असत किंवा बांधून ठेवण्यात येत. काही ठिकाणी अरुंद अशा खिडक्याही ठेवण्यात येत.

गणेश रंग-महाल किंवा मुख्य दरबाराचा महाल हा बाळाजी पेशव्यांनी 1755 मध्ये गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करता यावा म्हणून मुद्दाम बनवून घेतला होता. हा महाल अतिशय भव्य असाच होता. एका वेळी 100 नर्तकी सुद्धा यात नाच करू शकत असत. एका टोकाला सोन्याचा पत्रा चढवलेली संगमरवरी गणेशमूर्ती ठेवलेली असे. या मूर्तीच्या भोवती पुराणातील प्रसंगांचीच सजावट केलेली असे. महालाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या एका पाण्याच्या छोट्याशा तलावात सतत थुईथुई उडणारी कारंजी बसवलेली होती. या कारंज्यांच्या दुसर्‍या बाजूसच एक अतिशय सुंदर अशी फुलबाग होती. या फुलांचा येणारा सुगंध व कारंज्यांचा आवाज त्यामुळे या महालात बसणे हा मोठा सुखद अनुभव असे. पेशव्यांची बैठक किंवा मसनद म्हणजे एक चार ते पाच इंच उंचीची गादी असे, यावर पांढरी शुभ्र चादर अंथरलेली असे. सोन्याच्या जरीचे भरतकाम असलेल्या गर्द हिरव्या रंगाचे अभ्रे घातलेल्या 3 उशा या गादीवर ठेवलेल्या असत.

peshwa1790

गणेश रंग महाल


महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. विशेष कारणप्रसंगी ही चालू करण्यात येत असत. गणपती रंगमहालाच्या पश्चिमेला ‘हजारी कारंजे’ या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. 80 फुटाचा परिघ असलेले एक 16 पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडणार्‍या 16 तोट्या बसवलेल्या होत्या. हे कारंजे सुरू झाल्यावर अतिशय अप्रतिम व नयनरम्य असे दृष्य दिसत असे. या कारंजात उडणार्‍या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की शेकड्यांनी इंद्रधनुष्ये दिसत असत. या शिवाय आणखी जरा खोल असलेल्या एका जलाशयाच्या भिंतीवर पाण्याच्या तोट्या इतक्या बेमालूमपणे लपवून बसवलेल्या होत्या की या तोट्यांच्यातून वहाणारे पाणी खडकामधून वहात असताना धबदब्यातून पडणार्‍या पाण्यासारखे किंवा एखादी पांढरी चादर झाल्यासारखे दिसत असे. या पाण्याच्या चादरीमागे रंगीबेरंगी दिवे लावत असत. विशेषत: रात्रीच्या वेळी या पाण्याच्या चादरीचे दृष्य़ अतिशय नेत्रदीपक असे वाटत असे. या कारंजाला पाण्याची चादर या नावानेच ओळखले जाई.

दिवाणखाने किंवा दरबार महाल हे अतिशय सुंदर फर्निचर व पडदे यांनी सजवलेले असत. जिन्नसखाना या महालात, परदेशी व मुगल पद्धतीची तैलचित्रे, निरनिराळ्या परदेशी व देशातल्या लोकांकडून मिळालेल्या भेटवस्तू कलात्मक रित्या मांडून ठेवलेल्या असत. या शिवाय निरनिराळी घड्याळे, खेळणी, दुर्मिळ हत्यारे वगैरे वस्तूही नीट जपून ठेवलेल्या असत. हे सगळेच महाल इतके सुंदर सजवलेले असत की ते पहाणारा दर्शक विस्मित होत असे. मराठी दफ्तरात दुर्दैवाने या प्रासादाबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. परंतु पेशव्यांना भेटायला आलेल्या काही युरोपियन पाहुण्यांनी पेशव्यांचा थाटमाट आणि वैभव कसे होते आणि आपण काय पाहिले याचे बारकाईने वर्णन करून ठेवलेले असल्याने आज आपणाला त्याची थोड्या प्रमाणात कल्पना येऊ शकते.

पेशव्यांचा हा अत्यंत सुंदर व भव्य शनिवारवाडा,  1827 मध्ये लागलेल्या एका महाभयंकर आगीत जळून पूर्णपणे नष्ट झाला. ही आग 7 दिवस भडकलेली होती. एरवी सर्व बाबतीतील रेकॉर्ड अतिशय अचूकरित्या ठेवणार्‍या इंग्रज राज्यकर्त्यांनी या बाबतीतील कोणतीही माहिती कधीच जाहीर केली नाही. ही आग कशामुळे लागली? ती विझविण्याचे काय प्रयत्न केले? या संबंधी कोणतेही रेकॉर्ड अस्तित्वात आहे असे वाटत नाही. शनिवारवाडा, पेशवे यांच्याबद्दल पुष्कळ लिखाण उपलब्ध आहे. परंतु या कोणत्याही पुस्तकात या आगीचे कोणतेही कारण कधीच देण्यात येत नाही.

माझ्या लहानपणी म्हातार्‍या माणसांच्या तोंडून मी असे ऐकले होते की शनिवार वाड्याला आग इंग्रजांनीच लावली. आधीची 150 वर्षे स्वराज्यात, स्वातंत्र्य अनुभवलेल्या, महाराष्ट्रातील व विशेषत: पुण्यातील जनतेला, इंग्रजी अंमल व पारतंत्र्य हे कधीच सहजपणे मान्य होण्यासारखे नव्हते. आपला अंमल चालू झाल्यावर दशक उलटले तरी मराठी माणूस इंग्रजी अंमलाच्या विरुद्धच आहे याची पुण्यातील इंग्रज शासनाला बहुदा जाणीव असावी. पेशव्यांच्या मराठी साम्राज्याची आठवण जोपर्यंत शनिवारवाडा दिमाखाने उभा आहे तोपर्यंत मराठी मनातून कधीही जाणार नाही हे त्यांनी ओळखले असावे आणि म्हणूनच अत्यंत गुप्तपणे त्यांनी मराठ्यांच्या अस्मितेची ही खूण, नष्ट करण्याचा डाव आखला असावा.

पेशव्यांची ही अत्यंत सुंदर, दिमाखदार आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेली वास्तू, जळून नष्ट होण्याचे दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही.

16 ऑगस्ट 2009