Showing posts with label प्रवासी. Show all posts
Showing posts with label प्रवासी. Show all posts

Sunday, 5 October 2014

चेरापुंजीमधे पाण्याचे दुर्भिक्ष

भारताच्या ईशान्य कोपर्‍यातल्या ‘सात बहिणी‘ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे मेघालय. अतिशय सुंदर वनश्रीने नटलेले हे राज्य, नेहमीच हिरवे गार असते. या मेघालयात, पश्चिम खासी टेकड्यांच्या भागात चेरापुंजी हे प्रसिद्ध गाव आहे. चेरापुंजी या गावाचे नाव एखादा शाळेत जाणारा मुलगा सुद्धा सांगू शकेल इतके ते प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव म्हणून चेरापुंजी ओळखले जाते. 1972 मधे जेंव्हा मेघालय या राज्याची स्थापना झाली तेंव्हा या राज्याला इथल्या हवामानामुळे ‘मेघांचे घर‘ असे अतिशय समर्पक नाव देण्यात आले. खरे म्हणजे हे नाव संपूर्ण राज्याला देण्यापेक्षा चेरापुंजी गावाला देणे जास्त सयुक्तिक ठरेल कारण सरासरीने या गावात वर्षभरात मिळून, तब्बल 1100 सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. 1861साली चेरापुंजीला फक्त एका महिन्यात 2891 सें.मी. पाऊस पडला होता व हा आतापर्यंतच्या माहिती असलेल्या इतिहासातला उच्चांक आहे.




याच चेरापुंजीत गेल्या चार-पाच वर्षापासून पडणार्‍या पावसाचे प्रमाण 20 टक्के तरी घटले आहे असे इथले हवामान खात्याचे ऑफिस सांगते. सध्या इथे वर्षभरात 800 ते 900 सें.मी. एवढाच पाऊस पडतो आहे. चेरापुंजीला मिळालेला ‘जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव‘ हा किताब आता चेरापुंजीच्या जवळच असलेल्या मॉसिनराम (Mawsynram) या गावाकडे हस्तांतरित झाला आहे. या गावात मागच्या वर्षी 1200 सें.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला.




मेघालयात येणारे प्रवासी राजधानी शिलॉंग बरोबरच चेरापुंजीलाही भेट देतात. या प्रवाशांची खातिरदारी करण्यासाठी बर्‍याच स्थानिक लोकांना उद्योगधंदा मिळतो. यामुळे चेरापुंजीची 1961 मधे असलेली लोकसंख्या मूळ 7000 पासून 15 पटींनी तरी वाढली आहे. चेरापुंजी गावात पाणी साठवण्याची काहीच सोय नसल्याने हिवाळ्याच्या महिन्यांत एवढ्या लोकवस्तीला पाणी पुरेनासे झाले आहे व रोज सकाळी आजूबाजूच्या भागांमधून पाण्याचे टॅन्कर्स चेरापुंजीकडे येताना दिसतात. चेरापुंजीला येणारे बहुतेक प्रवासी इथला पाऊस बघण्यासाठी येत असल्याने त्यांच्या संख्येत घट होण्याची भिती आता स्थानिक लोकांना वाटू लागली आहे.




चेरापुंजीला नियमितपणे भेट देणार्‍या एका प्रवाशाच्या मते नव्वदीच्या दशकात चेरापुंजीला येण्याच्या प्रवासाची मजा काही औरच होती. रस्त्यावर उतरलेले दाट ढग व पाऊस यामुळे रस्ता दिसतच नसे व त्यातूनच मार्ग काढावा लागे. आता याच चेरापुंजीला हिवाळ्यात पाणी विकत घ्यायला लागते आहे. चेरापुंजीचे सरासरी तपमान 2 ते 3 डिग्री सेल्ससने वाढले आहे. अलीकडे पाऊस पडण्याचा पॅटर्नसुद्धा बदलला आहे. जेंव्हा पाऊस अपेक्षित असतो तेंव्हा तो पडत नाही व अनपेक्षितपणे पडतो. सगळीकडे न पडता पाऊस काही जागांच्यावरच काही वेळा पडू लागला आहे.




पाऊस कमी होण्यामागचे कारण तरी काय असावे? चेरापुंजीच्या आसपास घनदाट जंगले कधीच नव्हती आणि जी काय वनसृष्टी आहे ती स्थानिक लोकांच्यात अतिशय पवित्र समजली जात असल्याने लाकूडतोड करण्यास कोणी धजावत सुद्धा नाही. नवे उद्योग आल्यामुळे पाऊस कमी झाला आहे असे म्हणावे तर या भागात एक सिमेंट कारखाना सोडला तर बाकी उद्योग सुद्धा नाहीत.




स्थानिकांच्या मते भू ताप वृद्धी (Global Warming) एवढे एकच कारण चेरापुंजीमधल्या हवामानबदलासाठी असू शकते. कारण काहीही असो! पण कमी पाऊस, वाढलेले तपमान व त्यामुळे वर्षातील काही महिने अदृष्य़ होणारे चेरापुंजीचे प्रसिद्ध धबधबे हे सगळे येथे कमी प्रवासी येण्याला कारणीभूत होत आहेत हे नक्की.



22 डिसेंबर 2009

Monday, 22 September 2014

उलटी गंगा

भारतातील राजस्थान हे राज्य, तिथल्या वाळवंटी हवामानाबद्दल प्रसिद्धच आहे. ग्रेट इंडियन डेझर्ट किंवा थरचे वाळवंट हे या राज्याचाच भाग असल्याने राज्याच्या इतर भागात सुद्धा अतिशय कमी पाउस, खुरटी झुडपे, उन्हाळ्यात धुळीची वादळे व अति उष्ण हवा तर हिवाळ्यात कडाक्याची थंडी यासारखी वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये अनुभवता येतात.

उपग्रहाद्वारा केलेल्या सर्वेक्षणामधे असे आढळले आहे की राजस्थानमधली भूगर्भ जल पातळी वर्षाला एक फूट या प्रमाणात खाली खाली जात चालली आहे. याचा परिणाम साहजिकच हवामानावर होतो आहे. त्यातच या वर्षी पडलेल्या मॉन्सूनच्या पावसाने सरासरीची तीन चतुर्थांश पातळी जेमतेम गाठली आहे व तो अवेळी पडला आहे. याचा परिणाम साहजिकच पिकांच्यावर झाला आहे. बहुतेक ठिकाणी फक्त 5 ते 10 टक्के पीक हातात येईल असे शेतकर्‍यांना वाटते आहे.

जोधपूर हे राजस्थानमधले एक शहर. थरच्या वाळवंटाला लागूनच जोधपूर जिल्हा आहे. या शहराची सूर्य नगर (Sun City) म्हणून प्रसिद्धी आहे. अतिशय सुंदर महाल, किल्ला वगैरे वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणांमुळे, येथे प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते. जोधपूरच्या भौगोलिक स्थानामुळे येथे वाळवंटी हवामान व पाण्याचे दुर्भिक्ष असणार अशी कोणाचीही अपेक्षा असणार.

Jodhpur-map


प्रत्यक्षात जोधपूरमधली भूगर्भजल पातळी, वर्षाला साडेचार ते पाच फूट या प्रमाणात, सतत वाढतच चालली आहे. जोधपूरमधल्या कुंजबिहारी मंदिरात सर्वत्र संगमवरी फरशा बसवलेल्या आहेत. या फरश्यांच्या दोन ते तीन इंच वरपर्यंत सतत पाणी असते. फरश्यांच्या मधल्या भेगांच्यातून सतत पाण्याची छोटी कारंजी उडत असतात. ज्या घरांना तळघरे आहेत तेथे रोज इतके पाणी साठते की ते पंप लावूनच काढून टाकावे लागते.

05jodhpur


जोधपूरमधे पाण्याची एवढी सुबत्ता पूर्वी कधीच नव्हती. शहरवासीय अशी एक दंतकथा सांगतात की इ.स. 1459 मधे तिथल्या महाराजाने, जेंव्हा मेहेरनगड किल्याचे भूमीपूजन केले होते तेंव्हा त्या ठिकाणी वस्तीला असलेल्या एका गोसाव्याला हुसकवून लावले होते. संतप्त होऊन या गोसाव्याने “ तुझ्या राज्यात नेहमीच दुष्काळ राहील” असा शाप राजाला दिला होता. शापवाणीने म्हणा किंवा भौगोलिक परिस्थितीमुळे म्हणा जोधपूरमधे पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष राहलेले आहे. आजूबाजूच्या प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना जोधपूरमधे मात्र आज पाण्याची सुबत्ता कशी? हा एक संशोधनाचा विषय झाला आहे.

jjlmkeaghei_thumb


जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. भवानीशंकर पालीवाल यांच्या मताप्रमाणे, पाण्याच्या या सुबत्तेची दोन प्रमुख कारणे आहेत. प्रथम कारण म्हणजे इ.स. 1997 साली, भारत सरकारने बांधलेल्या राजस्थान कालव्याचे, जोधपूरपर्यंत पोचलेले पाणी. या कालव्यामुळे, पंजाब मधील नद्यांचे पाणी, राजस्थानकडे वळवण्यात आलेले आहे. या कालव्याच्या जवळ शेती असणारे शेतकरी, हे पाणी आपल्या शेतीसाठी वापरतात. त्यामुळे त्यांचा भूगर्भजलाचा उपसाच बंदच झाला आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जोधपूर हे शहर एखाद्या बशीसारख्या खोलगट भूप्रदेशावर वसलेले आहे. त्यामुळे आजूबाजूचे भूगर्भजल जोधपूरच्या शहरी भागाकडे भूगर्भाखालून वहात येते. हे पाणी दुसरा मार्ग नसल्याने जमिनीच्या वर येते आहे.

jjow4fejbjb_thumb


आता या पाण्याचे करायचे तरी काय असा प्रश्न येथील शासनापुढे आहे. शहरांतील बागांना जास्त पाणी पुरवठा केला जात आहे तर नळ टाकून शहरातील जादा पाणी पंप करून आजूबाजूच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या शेतीकडे पाठवावे असाही विचार आहे. या योजना जेंव्हा कार्यवाहीत येतील तेंव्हा येतील, सध्या मात्र वाळवंटाच्या मधे गंगा असा अनुभव जोधपूरवासीयाना येतो आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करणारे हेच लोक आता पाण्याचा मुबलक वापर करताना दिसतात.


26 ऑक्टोबर 2009