भारतातील अनेक शहरे किंवा देवस्थाने येथे होणारा माकडांचा उपद्रव
ही काहे नवी गोष्ट नाही. पुण्याजवळ असलेल्या बनेश्वर देवळाच्या रम्य परिसरात जर आलेले
भाविक काही खात असले तर तेथे असलेली माकडे हातातील खाद्यपदार्थ खुशाल हिसकावून घेता
असल्याचे मी स्वत: बघितलेले आहे.
उत्तर हिंदुस्थानामधील अनेक शहरांत, अगदी दिल्लीसह, माकडे
त्रास देत असतात. यामध्ये प्रामुख्याने असतात ती पिवळट, ब्राउन रंगाची
रिसस माकडे (the rhesus monkeys) ही माकडे आकाराने लहानखोरी असतात व त्यामुळे
बागा,
कचेर्या, घरांची छपरे यासारख्या ठिकाणी बसून कोठे अन्न पदार्थ दिसताहेत
का हे बघत राहतात. अन्नपदार्थ दिसले की क्षणार्धात ही माकडे उड्या मारून तेथे पोचतात
व ते पळवून लांबा जाऊन त्यांचा फन्ना उडवतात. या त्यांच्या कार्यक्रमात लोकांना घाबरवणे
किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासही ही माकडे मागे पुढे पहात नाहीत. माकडे ही हनुमानाचा
वंश असल्याचे भारतात मानले जाते व त्यामुळे माकडांना मारले जात नाही.
ताज महाल साठी प्रसिद्ध असलेल्या आग्रा शहरात तर या माकडांनी अक्षरश:
धुमाकूळ घातला आहे. लग्नाचे खुल्या बागेत किंवा पटांगणात असलेले स्वागत समारंभ तर या
माकडांच्या खास जागा बनल्या आहेत. या परिस्थितीला कंटाळून आग्र्यामधील लोकांनी आता
या माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी एक नामी युक्ती शोधून काढली आहे.
अशा स्वागत समारंभात माकडांपासून संरक्षण मिळावे म्हणून आता मोठ्या
लंगूर जातीच्या माकडांना पाचारण केले जाऊ लागले आहे. प्रशिक्षण दिलेली लंगूर माकडे
व त्यांचे प्रशिक्षक यांना लग्ना समारंभात बोलावले जाते व 3 ते 4 लंगूर माकडांना मोक्याच्या
ठिकाणी तैनात केले जाते. आधी बुकिंग केले तर हे प्रशिक्षक 3000 रुपयासाठी एका दिवसाचे
बुकिंग घेतात पण आयत्यावेळी बोलावले तर 10000 रुपये सुद्धा खर्च करण्याची तयारी ठेवावी
लागते.
भलीथोरली दिसणारी ही लंगूर माकडे मोक्याच्या ठिकाणांवर तैनात असली
की रिसस माकडे पुढे येण्यास धजावत नाहीत व लांब अंतरावर बसून राहतात आणि लग्न किंवा
स्वागत समारंभ सुखरूपपणे पार पडतात.
आहे की नाही नामी शक्कल!
4 फेब्रुवारी 2015
