Thursday, 12 February 2015

काय म्हणायचे तरी काय या उद्योगाला?



गुजराथ राज्यामधील राजकोट जिल्ह्यात सुमारे 80000 एवढी लोकसंख्या असलेले एक गाव कोठडिया! या गावामधील तरूणांनी 2996 मध्ये एक भारतमातेचे म्हणून एक देऊळ बांधले होते. नंतर राज्याचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी तेथील गावकर्‍यांमध्ये एवढे लोकप्रिय झाले की त्यांचे एक छायाचित्र गावकर्‍यांनी या देवळात लावले.
गावामधे एक ओम युवा या नावाचा एक तरुणांचा गट आहे. या गटाने असे मनावर घेतले की महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची ओळख रहावी म्हणून बनवलेली स्मारके सगळीकडे दिसतात तसे श्री. मोदी यांच्याबद्दलचे गावाचे प्रेम दर्शवणारा त्यांचा एक अर्ध पुतळा आपल्या गावात असावा. त्यांनी यासाठी 1.65 लाख रुपये जमवले व गावाच्या सरपंचांकडे सुपूर्द केले. ओरिसाहून कारागीर आणून त्यांनी हा पुतळा बनवून घेतला व आता 14 फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण भारतमातेच्या मंदिरात केले जाणार आहे. हा पुतळा अगदी हुबेहुब श्री मोदी यांच्यासारखा दिसतो आहे असे गावकरी अभिमानाने सांगत आहेत.

हे मंदीर मुळात भारतमातेचे असले तरी आता श्री मोदी यांचे मंदीर म्हणूनच ओळखले जाणार आहे. येथे रोज सकळ संध्याकाळ आरतीही केली जाते.

हे सर्व वाचून  काय म्हणायचे तरी काय या उद्योगाला? असाच प्रश्न कोणाच्याही मनामधे येणार नाही का? पंतप्रधान मोदींनी साहजिकच या उद्योगाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून असले उद्योग करू नका अशी विनंती केलेली आहे.

12 फेब्रुवारी 2015