Sunday, 18 January 2015

सिंहो वा! श्वानो वा!




चीनच्या हेनान प्रांतातील लुहे (Luohe) या गावात सर्वसामान्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून पिपल्स पार्क या नावाचे एक उद्यान, निर्माण केलेले आहे. या उद्यानात एक प्राणिसंग्रहालय सुद्धा आहे. बच्चे मंडळी आणि त्यांचे आईवडील यांच्यामध्ये हे प्राणिसंग्रहालय बरेच लोकप्रिय झालेले आहे. जंगली प्राणी कसे दिसतात? त्यांच्या आरोळ्या कशा असतात? किंवा ते कसे गुरगुरतात? कसे चित्कारतात? हे आपल्या मुलांना समजावे यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना घेऊन येथे आलेले दिसतात. याच पद्धतीने, या गावात रहाणार्‍या मॅडम लिऊ या नावाच्या एका महिलेला आपल्या मुलाला जंगली प्राणी दाखवण्याची बर्‍याच दिवसापासून हौस असल्याने एक दिवस तिने या प्राणीसंग्रहालयाला भेट देण्याचा बेत आखला व प्राणिसंग्रहालयाची 15 युऑन किंवा 2.45 अमेरिकन डॉलर एवढी प्रवेश फी भरून तिकिटे काढली व प्राणीसंग्रहालयात प्रवेश घेतला. प्राण्यांच्या पिंजर्‍यासमोर आखलेल्या रस्त्यांवरून फिरत फिरत हे मायलेक, “आफ्रिकन सिंह” अशी पाटी असलेल्या एका पिंजर्‍याजवळ आले. या पाटीवर आफ्रिकन सिंह हा प्राणी कोठे सापडतो? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? वगैरे सर्व माहिती सुबक रितीने लिहून ठेवलेली होती. त्या पिंजर्‍याजवळ उभे राहून प्राण्याचे निरिक्षण करत असताना मॅडम लिऊ यांना आश्चर्याचा एक प्रचंड मोठा धक्का बसला कारण पिंजर्‍यातील प्राणी चक्क कुत्र्यासारखा भुंकत होता.
भयंकर संतापून मॅडम लिऊ त्या उद्यानाच्या प्राणिसंग्रहालय विभागाकडे गेल्या व त्यांनी सिंहाच्या पिंजर्‍यात कुत्रे ठेवून, प्राणिसंग्रहालय, भेट देणार्‍या प्रेक्षकांची फसवणूक करत असल्याचा त्यांच्यावर तिने आरोप ठेवला. प्राणीसंग्रहालयांच्या मुख्यांनी असे करण्यामागचे मोठे अजब कारण तिला दिले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पिंजर्‍यातील खरा सिंह प्राणी पुनरुत्पादन केंद्राकडे पाठवण्यात आला असल्याने सुरक्षा कारणांसाठी तेथे एक तिबेटी मास्टिफ श्वान (mastiff) ठेवलेला आहे. मॅडम लिऊ यांचे अर्थातच या खुलाशाने समाधान झालेले नाही. तसे बघायला गेले तर तिबेटी मास्टिफ श्वान हा मोठ्या आकाराचा व केसाळ असलेला असा एक अतिशय रुबाबदार आणि देखणा प्राणी आहे. परंतु तो कितीही देखणा असला तरी तो सिंहाची जागा कोणत्याच परिस्थितीत घेऊ शकत नाही.

स्थानिक वृत्त वाहिन्यांवर हे फसवणुकीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर बर्‍याच लोकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली व त्यांच्या असे लक्षात आले की आणखी बर्‍याच ठिकाणी सुद्धा पिंजर्‍यात दुसरेच प्राणी ठेवून लोकांची फसगत करण्यात येत आहे. चित्याच्या पिंजर्‍यात एक पांढर्‍या रंगाचा कोल्हा ठेवलेला आढळला तर लांडगा म्हणून एक कुत्रा काम निभावून नेत होता. एका सापाच्या पिंजर्‍यात फक्त दोन घुशी सापडल्या.

बिजिंग यूथ डेली या वृत्तपत्राने हे वृत्त सर्व देशभर प्रसिद्ध केल्यावर ट्विटर सारख्या असलेल्या सिना वायबो या चिनी सेवेवर अनेक मंडळींच्या प्राणीसंग्रहालयावर टीकेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
एकजण म्हणतो:
” हे गंमतदार नसून प्राणिसंग्रहालय आणि त्यातील प्राणी यांसाठी हा एक काळा दिवस आहे.”
दुसरा ट्वीट म्हणतो:
“त्यांनी कमीतकमी एक हस्की (मोठा व केसाळ कुत्रा) तरी लांडगा म्हणून ठेवायला हवा होता.”


आणखी एक ट्वीट:
” या पद्धतीने, प्राणीसंग्रहालयाने थोडी भटकी कुत्री पकडून आणली की त्यांचे काम होईल.”
आहे की नाही रोचक?
7 सप्टेंबर 2013