मुंबईच्या भूतकालातील या अप्रिय कालावधीची आठवण मला आजच्या वृत्तपत्रातील एक बातमी वाचल्यावर प्रकर्षाने होते आहे. ही बातमी आहे दक्षिणपूर्व एशिया मधला नवा व क्लेशदायक असा धार्मिक संघर्ष जेथे उफाळून आला आहे त्या ब्रम्हदेशाच्या रखिन (Rakhine) राज्यातल्या सितवे (Sittwe) या शहरातील दंग्याबद्दल! या पूर्वी लिहिलेल्या एका लेखात मी या राज्यातील तणावग्रस्त परिस्थिती व त्याचे भारतातील मिझोराम राज्यावर होणारे दूरगामी परिणाम याचे व्यापक विवेचन केले होते. रखिन राज्याची राजधानी असलेल्या सितवे शहरात जून 2012 मध्ये नवे जातीय दंगे उफाळून आले होते. हे दंगे सुरू होण्यासाठी कारणीभूत ठरली होती ती, एका बौद्ध महिलेवर झालेला अत्याचार व तिचा खून या तथाकथित बातमीची अफवा. या वेळी भड्कलेल्या दंग्यांत 78 लोक मृत्यूमुखी पडले होते, 5000 निवासस्थाने जाळली गेले होती आणि 75000 हून अधिक लोक निर्वासित झाले होते. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात दंगे परत भडकले. ब्रम्हदेशाचे अध्यक्ष श्री. थेइन सेइन (Mr . Thein Sein) यांनी स्वत: सांगितल्याबरहुकूम कमीत कमी 89 लोक या वेळी मृत्यूमुखी पडले असून 136 जखमी झाले आहेत. 5351 निवासस्थाने आगीच्या भक्षस्थळी पडली आहेत तर आणखी 32000 लोक निर्वासित झाले आहेत. या आकड्यांवरून या जातीय वैमनस्यतेने किती भीषण व भयंकर रूप धारण केले आहे याची सहज कल्पना येऊ शकते.
आता सितवे शहरात वर वर सर्व काही
आलबेल दिसत असले तरी ही फसवी शांतता आहे व शहर अतिशय तणावाखाली असून
अंतर्यामी खदखदत आहे ही जाणीव येथे राहणार्या सर्वांनाच आहे. जून
व ओक्टोबर महिन्यामध्ये येथे झालेले दंगे हे राखिन राज्याचे रहिवासी
असलेले बौद्ध धर्मिय व रोहिंग्या ही मुस्लिम जमात या मध्ये भडकले होते. या रोहिंग्या जमातीच्या लोकांना रखिन लोक बंगाली या नावाने ओळखतात. विस्थापित
झालेले सर्व रोहिंग्या जमातीचे लोक आता सितवे शहराच्या एका कोपर्यात
असलेल्या आणि अस्वच्छ व घाणीने भरलेल्या अशा निर्वासित छावण्यांत रहात आहेत. उदाहरणार्थ ते चुआंग (Te Chaung) छावणी निरनिराळ्या वयोगटाच्या लोकांनी भरून वाहत आहे. अधिकृत रित्या येथे 18500 निर्वासित राहतात, प्रत्यक्षात हा आकडा बराच जास्त असावा. जून 2112 मध्ये
सितवे शहराच्या नाझिर या भागातली रोहिंग्या मुस्लिमांची निवासस्थाने
जेंव्हा पेटवली गेली तेंव्हा प्रथम या छावणीमधे विस्थापित म्हणून रोहिंग्या
जमातीचे लोक आश्रयासाठी आले. ऑक्टोबर 2012 मध्ये 5000 लोकांच्या एका जमावाने क्याउकफ्र्यु (Kyaukphyu) या वस्तीमधील 800 निवासस्थाने पेटवून दिली. त्यानंतर 20 तास प्रवास करून या वस्तीमधील आणखी विस्थापित ते चुआंग छावणीमध्ये आले.
सितवे शहरामधेच ते चुआंग छ्वणीसारख्या आणखी चार छावण्या आहेत. दंग्यांत जे रखिन बौद्ध विस्थापित झाले आहेत ते बहुतेक सर्व नाझिर छावणीमधे रहात आहेत. या छावणीमधली परिस्थिती इतर छावण्यांपेक्षा बरीच बरी आहे. नाझिर छावणीमधे असलेल्या प्रत्येक कॅम्प्मध्ये 700 ते 1000 विस्थापित रहात आहेत. बांबू व फळ्या यांचा वापर करून बांधलेल्या व त्यावर पत्र्याचे छप्पर असलेल्या झोपड्यांत हे विस्थापित रहात आहेत. आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कॅम्पमधे स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहेत. असे असले तरी नाझिर छावणीमधल्या सर्व विस्थापितांची तक्रार आहे की आलेली मदत सर्वच्या सर्व रोहिंग्या मुस्लिमानाच दिली जात आहे.
संयुक्त राष्ट्र संस्था व Médecins Sans Frontières आणि Action Against Hunger याअ साअरख्या काही सेवाभावी संस्था ब्रम्हदेश सरकारने दिलेल्या संरक्षणाखाली या विस्थापितांना मदतीचे कार्य करत आहेत. परंतु मूळ वाद सुटला नाही तर या प्रकारचे दंगे परत उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या जातीय दंग्यांचा प्रभाव दक्षिणपूर्व राष्ट्रांची संघटना The Association of Southeast Asian Nations or ASEAN हिच्यावरही पडला आहे. या संघटनेची एकी या आधीच, दक्षिण चीन महासागरामधील विवादास्पद बेटांवर स्वामित्व सांगणार्या चीनच्या कुटील कारवायांनी भंग पावलेली आहे. या संघटनेमधील मलेशिया, इंडोनेशिया व ब्रुनेई या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तर कंबोडिया, ब्रम्हदेश, व्हिएटनाम व सयाम येथे बौद्ध धर्मीय बहुसंख्य आहेत. या कारणामुळे एसिआन संघटनेला रोहिंग्या पुनर्वसनच्या बाबतीत निर्णय एकमताने घेणे मोठे अवघड बनले आहे.
या कारणांमुळे भारताला अशी भिती वाटते आहे की रोहिंग्या पुनर्वसनाचा वाद जर कायमस्वरूपी पद्धतीने लवकर मिटला नाही तर मिझोरामच्या सीमेवरून रोहिंग्या विस्थापितांचा ओघ मिझोरामकडे सुरू होईल. आसाम मध्ये नुकतेच झालेले जातीय दंगे आणि ईशान्येकडील राज्यांतील परिस्थिती या पार्श्वभूमीवर मिझोराम-ब्रम्हदेश सीमा ही पूर्णपणे असुरक्षित असल्याने भारताला ही काळजी साहजिकच वाटते आहे. वाटते आहे. बांगलादेशी सरकारने प्रवेश देण्याचे नाकारल्यानंतर मोडक्या तोडक्या बोटींवरून प्रवास करणार्या रोहिंग्या विस्थापितांचा लोंढा मलेशियाकडेही सुरू झालेला आहे. मलेशियामध्ये या आधीच अधिकृत पंजीकरण झालेले रोहिंग्या मुसलमान आहेत. बांगला
ब्रम्हदेशातील लोकप्रिय व शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या नेत्या, आंग सान सू चि (Aung San Suu Kyi) यांनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले असून पश्चिम ब्रम्हदेशातील या भयानक जातीय दंग्यांबाबत आपण आपल्या नैतिक नेतृत्वाचा उपयोग करून कोणत्याही एका बाजूच्यातर्फे बोलणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्या म्हणतात की ” जोपर्यंत लोक एकमेकाचा जीव घेण्यासाठी टपलेले आहेत आणि एकमेकांच्या घरांना आगी लावत आहेत तोपर्यंत आपण कोणत्या आधाराने हा विवाद सोडवणार आहोत?”
रोहिंग्या प्रश्नाचे जर लवकर निरसन झाले नाही आणि हा प्रश्न सुटला नाही तर दक्षिण पूर्व एशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा बाळ्गणे हे मृगजळामागे धावण्याप्रमाणेच असणार आहे. ब्रम्हदेशातील जातीय दंग्यांमुळे होणार्या रक्तपाताचे पर्यावसान अफगाणिस्तान मधील यादवी युद्धाप्रमाणे शेवटी अतिरेकी कारवायांमध्ये होण्याची शक्यता चांगलीच बळावली आहे. दुर्दैवाने ते तसे झाले तर संपूर्ण दक्षिण पूर्व एशिया मधील परिस्थिती अस्थिर होणे शक्य आहे.
5 डिसेंबर 2012




