पराठे, छोले, बटुरे या सारख्या पदार्थांना यशस्वी स्पर्धा जर कोणी
केली असली तर ती दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांनी! उत्तरेला कश्मिर पासून ते
पार आसाम पर्यंत सगळीकडे इडली डोश्यांसारखे दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ
एकदम पॉप्युलर आहेत. परदेशात सुद्धा भारतीय पदार्थ मिळणार्या कोणत्याही
उपहारगृहात हे पदार्थ मिळतातच. माझ्या लहानपणी हे पदार्थ बाहेर उपहारगृहात
मिळत पण ते एवढे लोकप्रिय नव्हते. मिसळ, खिचडी, पोहे हे पदार्थ जास्त
लोकप्रिय होते.
मला या पदार्थांची खरी चटक लागली ती बेंगलुरुला शिक्षणासाठी होस्टेलमधे
राहण्याची वेळ आली तेंव्हापासून. आमच्या होस्टेलच्या मेसमधे तर रोज
न्याहरीला व संध्याकाळच्या चहाबरोबर हे पदार्थ असतच पण रवीवारी ब्रिगेड
रोडवरच्या कौशी’ज मध्ये खालेल्या कुरकुरीत डोश्यांची चव अजुनही माझ्या
तोंडावर रेंगाळते आहे. आता ते उपहारगृह तेथे नाही पण खाल्लेले ते डोसे
मात्र मला आठवतात. त्या वेळेस डोश्यांची किंमत पण दीड किंवा दोन रुपये
एवढीच असे.
पूर्वी या पदार्थात फारसा चॉइस नसे. फार तर रवा इडली, रवा डोसा, मैसूर
डोसा या सारख्या व्हरायटीज मिळत. आता मात्र पार खिमा डोश्या पासून ते पेपर
डोसा या सारखे अनंत प्रकार मिळतात. हे डोसा पुराण मी आज का लावले आहे असे
वाचकांच्या मनात येणे साहजिक आहे. पण याला कारण आहे, बेंगलुरूच्या
मल्लेश्वरम या भागात असलेल्या ‘राजभोग’ या उपहारगृहाने काढलेला एक नवा
डोश्याचा प्रकार.
काही वर्षांपूर्वी खाण्याच्या विड्याला चांदीचा वर्ख लावण्याची पद्धत
अगदी कॉमन झाली होती. तसा वर्ख लावलेला विडा खाणे म्हणजे एक फॅशन समजली जात
असे. मुंबईला कोणत्या तरी पंचतारांकित हॉटेलसमोर सोन्याचा वर्ख लावलेला
विडा खाल्याचेही मला आठवते. बर्फी, बंगाली मिठाई या सारख्या पदार्थांवर
चांदीचा वर्ख लावलेला असतोच. कदाचित या वर्ख लावलेल्या मिठाईवरूनच कल्पना
घेऊन, या ‘राजभोग’ उपहारगृहाने काढलेल्या या नवीन डोश्याला चक्क सोन्याचा
वर्ख लावलेला असतो. साधारण 6 इंच बाय 6 इंच एवढ्या आकाराचे सोन्याचे पान या
डोश्यावर चिकटवून तो ग्राहकाला सर्व्ह केला जातो.
माझ्या मताने अगदी साध्या डोश्याची किंमत सुद्धा सध्या आभाळाला टेकू
लागली आहे. डोश्यांचे विविध प्रकार 50 ते 100 रुपये या रेंजमधेच मिळतात. मग
या राजभोगच्या गोल्ड प्लेटेड डोश्याची 1011 रुपये ही किंमत काही खूप आहे
असे म्हणता येणार नाही. राजभोग उपहारगृह आपण गिर्हाईकाला कमीत कमी 1
मिलिग्रॅम सोने खायला देऊच अशी गॅरन्टी देत असते. अर्थात सोन्याचे भस्म
वगैरे गोष्टी आयुर्वेदीय औषधांत वापरतातच, त्यामुळे डोश्यांवर सोनेरी वर्ख
लावणे काही आरोग्याला विघातक वगैरे आहे असे म्हणता येणार नाही. हे राजभोग
उपहारगृहे ही सोन्याची पाने राजस्थान मधल्या एका कंपनीकडून खरेदी करते आहे व
बेंगलुरूच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या खाद्यपदार्थ नियंत्रण विभागाने या
गोल्ड प्लेटेड डोशाला हिरवा कंदील दाखवला आहे.
पण या डोश्यांना गिर्हाईक कोण? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. पण
बेंगलुरूला माहिती क्षेत्रातील उद्योगामधून बक्कळ पैसे मिळवलेली बरीच मंडळी
आहेत. या मंडळींना स्वत:ची श्रीमंती दाखवण्याचा हा एक चांगला मार्ग उपलब्ध
झाला आहे कारण सुरूवातीला जेंव्हा या उपहारगृहाने प्रायोगिक स्वरूपात हा
डोसा गिर्हाईकांना ऑफर केला होता तेंव्हा त्याला आलेला प्रतिसाद एकंदरीत
खूपच उत्साहवर्धक असल्याने या उपहारगृहाने आता आपल्या नेहमीच्या
मेन्यूमध्ये या डोश्याचा अंतर्भाव केला आहे.
मी परवाच कोठेतरी वाचले की या वर्षी भारतातील सोन्याची आयात 1000 टन
एवढी होणार आहे. एवढ्या थोरल्या सोन्यात या डोश्यांमुळे अशी किती भर पडणार
आहे? तेंव्हा चालू दे!
26 डिसेंबर 2011
