सध्या पुण्यामध्ये लग्नांचा मौसम अगदी जोरात चालू आहे. पूर्वी मे
महिन्यात जशी हजारोंनी लग्ने लावली जात तशी आता डिसेंबरमध्ये लावली जातात.
थंडीच्या मोसमात कपडे, दागिने घालून जसे बायकांना मिरवत येते तसेच
पुरुषांना सुद्धा सूट बूट घालून फिरता येते. थंडीमध्ये लग्न समारंभ जास्त
एनजॉय करता येतात हे खरेच आहे. परवा अशाच एका लग्नाचे मला बोलावणे आले
होते. पत्रिकाच मुळी एवढी जबरदस्त होती की ज्या कुटुंबांमधे हा समारंभ होता
त्यांच्या आर्थिक स्थितीची चांगलीच कल्पना यावी. पत्रिका दोन तीन भागात
होती. सीमान्त पूजन समारंभाची एक पत्रिका, मुख्य लग्न समारंभाची एक
पत्रिका, मेंदी समारंभाची एक पत्रिका या तीन पत्रिका मी बघितल्या. या शिवाय
आणखी एक पत्रिका पण होती. ही कसली आहे म्हणून जरा कुतुहल वाटले व म्हणून
ती नीट बघितली. ज्या मुलाचे व मुलीचे लग्न होते त्या दोघांनी मिळून केलेले
ते निमंत्रण होते. आणि हे निमंत्रण होते एका कॉकटेल पार्टीचे, म्हणजे हे
होणारे नवरा-बायको, लग्नाआधी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये आपल्या
नातेवाईकांना, परिचितांना व मित्र मैत्रिणींना मद्य प्यायला व नाचायला
बोलावत होते. आता या दोन्ही गोष्टींमध्ये मला रस नसल्याने मी तेथे जाण्याचा
प्रश्नच नव्हता. पण ते निमंत्रण माझ्या लक्षात मात्र राहिलेच.
या संदर्भात साठ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग मला आठवतो आहे. महर्षी
अण्णासाहेब कर्वे यांचे पुत्र दिनकरराव कर्वे यांच्या घरी घडलेला हा
प्रसंग आहे. काहीतरी लग्नसमारंभासाठी अण्णासाहेबांचे मोठे चिरंजीव शंकरराव
कर्वे आफ्रिकेहून पुण्यास आले होते. ते दिनकरराव कर्वे यांचे कडे उतरले
होते. घरातील मोठ्या हॉल मध्ये बसून मंडळी गप्पा मारत होती. आम्ही दोन चार
मुले कोपर्यात बसून काय चालले आहे ते बघत होतो. शंकरराव काहीतरी सांगत
होते व एकीकडे त्यांचे धूम्रपानही चालू होते. साठ पासष्टीच्या वयाच्या
शंकररावांनी अचानक तोंडातली सिगरेट विझवून पटकन पलीकडच्या रक्षापात्रात
टाकून दिली. कोणीतरी त्यांना असे करण्याबद्दल विचारले तेंव्हा त्यांनी त्या
व्यक्तीचे लक्ष पलीकडे वेधले. काठी टेकत नव्वदीच्या घरात असलेले अण्णा
त्या खोलीत येत होते.
आपल्या नव्वद वर्षाच्या वडीलांच्यासमोर आपण सिगरेट ओढणे योग्य दिसणार
नाही म्हणून ती विझवून टाकणारे शंकरराव व पंचवीस वर्षाचा हा लग्न होणारा
तरूण व बावीस वर्ष वयाची त्याची वधू यांचे आपल्या नातेवाईकांना, परिचितांना
व मित्र मैत्रिणींना मद्य पिण्यासाठीचे आमंत्रण, ही दोन चित्रे म्हणजे
केवढा विरोधाभास आहे? आपल्या सामाजिक जाणीवा किंवा पद्धती केवढ्या बदलत
चालल्या आहेत याचेच ते निदर्शक आहे असे मला वाटले. पण नंतर असे वाटले की
जनरेशन गॅप म्हणतात ती हीच.
वडिलधार्यांसमोर सिगरेट विझवणे म्हणजे आदर दाखवणे का? हा जसा एक
प्रश्न आहे तसाच वडीलधार्यांना मद्य पिण्यास बोलावणे म्हणजे त्यांचा अनादर
केला आहे असे का म्हणावे? हाही एक प्रश्नच आहे. यापैकी एक कृत्य योग्य व
दुसरे अयोग्य हे कोण ठरवणार?. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी असणारी
सध्याची पिढी असेही म्हणू शकते की सिगरेट विझवण्याचे कृत्य याला एक
प्रकारची हिपोक्रॉसी किंवा दांभिकता असे का म्हणू नये? त्याच प्रमाणे मद्य
पिणे आणि नाच करणे या गोष्टींनी जर आनंद वाटत असला तर त्या लपून छपून का
करायच्या? त्यात वडीलधार्यांना सहभागी का करून घेऊ नये?
या दृष्टीकोनात मला तर काही फारसे गैर आहे असे वाटत नाही. पण जुन्या
पिढीच्या लोकांना तो पटेलच असे खात्रीने म्हणताही येत नाही. प्रत्येक दोन
पिढ्यांमध्ये जनरेशन गॅप ही असतेच. पुढच्या पिढीच्या गोष्टी मागच्या पिढीला
खटकतातच. त्यातलाच हाही एक मामला.
असे हे चालायचेच. प्रत्येक दोन पिढ्यांमधे असेच घडते एवढेच फार तर म्हणता येईल.
18 डिसेंबर 2011
