Saturday, 29 November 2014

एका सर्पवेड्याची कहाणी- भाग अखेरचा


मागच्या आठवड्यात मी केव्हिन ओ या 19 वर्षाच्या तरुणाच्या घरी विषारी नाग आणून पाळण्याच्या अचरट उद्योगाची कहाणी दिली होती. हा केव्हिन ओ जर्मनी मधल्या North Rhine-Westphalia प्रांतातल्या Mühlheim an der Ruhr या गावचा रहिवासी. या अचरट उद्योगाची सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता अखेर झाली.
हा विषारी नाग शोधण्यासाठी, या गावातल्या अग्निशामक दलाचे जवान व ड्युसेलडॉर्फ मधल्या अग्निशामक दलाच्या सर्प विभागाचे तज्ञ, यांनी केव्हिनचे तिसर्‍या मजल्यावरचे ऍटिक अपार्टमेंट तर केंव्हाच उध्वस्त केले होते. त्यानंतर त्यांनी खालच्या मजल्यावरची कार्पेट्स वगैरे काढून टाकून तिथे सापाची हालचाल समजावी म्हणून पीठ पसरले होते व दोन्ही बाजूंना चिकटपणा असलेल्या टेप्स चिकटवल्या होत्या. अखेरीस त्या टेप्सना हे 3 महिन्याचे नागाचे पिल्लू हालचाल करत असताना चिकटले व उपासमारीने मेले. हे नागाचे पिल्लू अंदाजे 1 फूट तरी लांब होते.

आपल्या मूर्खपणा केव्हिन ओ या तरुणाला चांगलाच भोवणार असे दिसते आहे. या गावातील अग्निशामक दल, ड्युसेलडॉर्फचे सर्प तज्ञ व उध्वस्त केलेले घर परत बांधणे या सगळ्यासाठी किमान 1 लाख युरोचे (साठ ते सत्तर लाख रुपये) बिल त्याला भरावे लागणार आहे. अर्थात North Rhine-Westphalia या राज्यात विषारी नाग घरी पाळू नये असा काही कायदा नसल्याने केव्हिन ओ च्या विरुद्ध पोलिस काही कारवाई करणार नाहीत एवढे तरी त्याचे सुदैवच म्हणायचे.
9 एप्रिल 2010