Saturday, 29 November 2014

कोडागुच्या दर्‍याखोर्‍यांमधली फुले


कोडागु हा कर्नाट्क राज्याच्या नैऋत्य कोपर्‍यातला एक छोटासा जिल्हा. केरळ राज्याची सीमा या जिल्ह्याच्या अगदी पश्चिमेलाच लागून असल्याने लोकांची वेशभूषा, घरे बांधणी यावर केरळी संस्कृतीची छाप स्पष्ट जाणवते. भारताच्या पश्चिम किनार्‍याला समांतर जाणार्‍या पश्चिम घाटाच्या, पूर्व डोंगर उतारावरच हा संपूर्ण जिल्हा असल्याने साहजिकच हा सर्व जिल्हा हा उंच सखल अशा डोंगर दर्‍यांनी भरलेला आहे. घनदाट वृक्षराई, त्यात पसरलेले कॉफीचे मळे यामुळे कोठेही बघितले तरी आसमंत हिरवागार दिसतो. या हिरवाईत काळोख्या रात्री तारे चमचम करताना दिसावे तशी लाल, गुलाबी, जांभळी फुले एकदम नजरेत भरतात. त्यापैकी काही फुलांची मला भावलेली छायाचित्रे.



मी काही वनस्पतीतज्ञ नाही. जास्वंदी, धोत्रा या सारखी फुले सोडली, तर यातल्या बहुतेक फुलांची नावे सुद्धा मला अचूक माहिती असतीलच असे नाही. परंतु म्हणून माझ्या दृष्टीने या फुलांचा मनमोहकपणा मला काही कमी झाल्यासारखा वाटला नाही.



ही फुले रस्त्याच्या कडेला, किंवा जरा मागच्या बाजूला इतर झाडाझुडपांच्या, दगड धोंड्यांच्या मधेच मला दिसली. जर ही फुले नसती तर या झाडांकडे कोणाचेच लक्ष गेले असते असे मला वाटत नाही.



काही फुलझाडे घराच्या अंगणात मुद्दाम लावलेली होती. म्हणजेच कोणीतरी ती हौशीने लावलेली असणार. त्यामुळे या फुलांना रानफुले म्हणणे खचितच योग्य होणार नाही.



रस्त्याच्या कडेला एवढी सुंदर फुले दिसत आहेत हे बघितल्यावर साहजिकच माझ्या इथल्या वास्तव्यात ही फुलझाडे शोधण्याचा आणि त्यांची छायाचित्रे काढण्याचा नादच लागला. मी काढलेल्या छायाचित्रांपैकी मला सर्वात आवडलेली चित्रे या ब्लॉगवर टाकली आहेत. बघा तुम्हाला आवडतात का?
30 मे 2010