Sunday, 5 October 2014

सहारा वाळवंटातील सुसर

माझी खात्री आहे की वरील मथळा वाचून तुम्ही नक्की बुचकळ्यात पडले असणार. माझी तब्येत बरी आहे ना? अशी शंका सुद्धा कदाचित काही जणांना आली असेल. पण सहारा वाळवंटात सापडलेल्या सुसरीची बातमी 100% खरी आहे. ही सुसर फक्त अनेक कोटी वर्षांपूर्वीची आहे व ती आता जीवाश्म स्वरूपातच अस्तित्वात आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथील पुरातन जीवाश्मांचे दोन अभ्यासक, पॉल सेरेनो आणि लान्स लार्सन यांना नायजर देशातल्या Gadoufaoua या भागात हे जीवाश्म आढळून आले आहेत. पृथ्वीच्या इतिहासातल्या क्रेटेशस (Cretaceous ) या युगातले असून साडेसहा ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. या कालात पृथ्वीवरील खंडे एकमेकाच्या जास्त जवळ होती. हवा उबदार होती. व पावसाचे प्रमाणही जास्त होते. या कारणानी आफ्रिका खंडामधे हिरव्यागार परिसरातून वहाणार्‍या विशाल नद्या होत्या. आता सहारा वाळवंट आहे तो भाग दलदलीच्या स्वरूपात होता. त्यामुळेच महाकाय सुसरीसारखे प्राणी तिथे वास्तव्य करून होते.




पॉल सेरेनो आणि लान्स लार्सन यांना सुसरीच्या सहा प्रजाती या ठिकाणी सापडल्या असून त्यांच्या जबड्यांच्या आकारावरून या सुसरींना डुक्करसुसर, उंदीरसुसर, कुत्रासुसर, बदकसुसर, धिरडेसुसर व सर्वात मोठी असलेली सुपरसुसर (BoarCroc, RatCroc, DogCroc, DuckCroc, PancakeCroc and supercroc) अशी नावे या संशोधकांनी दिली आहेत. या संशोधकांना या ठिकाणी सापडलेल्या जीवाश्मांत सुसरींची अंडी, कवट्या, हाडे, पाठीचे कणे, जबडे याची जीवाश्मे सापडली आहेत. या संशोधकांनी या जीवाश्मांचा एक्स-रे, सी.टी स्कॅन सारख्या साधनांनी अभ्यास करून आपले संशोधन केले आहे.





सुसरीच्या या सहा प्रजातींचे खाद्य निरनिराळे होते. त्यांची जीवनपद्धती अलग होती. असे दिसते की या सहा प्रजातींनी सर्व पर्यावरण आपापसात वाटून घेतले होते. या सुसरींपैकी सर्वात विशाल होती सुपरक्रॉक.. ही सुसर चाळीस फूट लांब होती व तिचे वजन 8000 किलोच्या आसपास होते. या सुसरीचा जबडाच सहा फूट लांब होता व त्यात शंभर तरी शक्तीमान दात होते. ही सुसर मासे तर खात होतीच पण लहान डायनॉसॉरसनाही खात असावी.




डुक्करसुसर व धिरडेसुसरी 20 फुटापर्यंत लांब होत्या तर सर्वात लहान सुसरीच्या जबड्याची लांबी फक्त तीन इंच होती. यातल्या काही प्रजाती दोन पायावर ताठ उभ्या राहू शकत होत्या व आपल्या ताकदवान कवटीने भक्षाला जोरदार धडक देऊ शकत होत्या. या प्रजाती आधुनिक सुसरीसारख्या दिसत नसल्या तरी काहींचा जबडा उत्तर भारतात आढळणार्‍या घडियल या सुसरीसारखा आहे.

सध्या आपण पृथ्वीच्या पर्यावरणात, भू ताप वृद्धीमुळे जो किरकोळ बदल होत आहे त्यामुळे घाबरून गेलो आहोत. पण पृथ्वीचा इतिहास बघितला तर याहून अत्यंत भयंकर बदल पृथ्वीच्या पाठीवर अनेक वेळा घडले आहेत. या प्रत्येक बदलाच्या वेळी जीवसृष्टी नामशेष झाली असली तरी सुसरीसारखे काही प्राणी या सर्व बदलांच्यातून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत व म्हणूनच अजून आपले अस्तित्व अजून टिकवून आहेत.



23 नोव्हेंबर 2009