Sunday, 5 October 2014

विषबाधा

नैसर्गिक जलस्त्रोत व दरडोई पाण्याची असलेली उपलब्धता या बाबतीत जगातील कोणता देश सर्वात श्रीमंत असेल तर तो म्हणजे बांगला देश. ब्रह्मपुत्रा नदी व तिला येऊन मिळणार्‍या पद्मा वगैरे सारख्या इतर नद्या, आपली जलसंपत्ती बांगला देशात अक्षरश: ओतत असतात. या शिवाय वर्षातले सहा ते आठ महिने वरुणराज आपली कृपादृष्टी या देशाकडे वळवतोच.




असे असले तरी हे एवढे पाणी या देशाला सोसतच नाही. नद्यांना सारखे पूर येतात. समुद्री तुफानांच्यामुळे किनार्‍यालगतचे भाग खार्‍या पाण्याने जलमय होतात. आणि चहुकडे पाणीच पाणी असताना बांगला देशातील गरीबांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतत भेडसावतो असे सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही. पण ही सत्य परिस्थिती आहे. नद्यांना सतत येणार्‍या पुरापासून शेती, गावे यांचे संरक्षण व्हावे म्हणून जागोजाग संरक्षक तलाव बांधण्यात आलेले आहेत. या हजारो तलावांपैकी खूपसे तलाव आंर्तराष्ट्रीय मदत संस्थांच्या मार्फतही बांधले गेलेले आहेत. नद्यांना आला की पुराचे पाणी या तलावां त साठवले जाते व ते शेतीत, गावांच्यात शिरत नाही.

गेल्या काही वर्षांपासून या तलावाचे पाणी पिणार्‍या नागरिकांना, अनेक विचित्र आजारांनी सतावते आहे. तीव्र स्वरूपाच्या पोटातील वेदना, अतिसार, ओकार्‍या व हातापायात असह्य पेटके या सारखे त्रास या पाण्याचे सेवन करणार्‍यांच्यात आढळून आले आहेत. जास्त प्रमाणात पाणी जर पोटात गेले तर काही जण मृत्युमुखी पडल्याचेही आढळले आहे. तसेच या भागात रहाणार्‍या नागरिकांमधे मुत्राशय, मुत्रपिंड, फुफ्फुसे व त्वचेच्या कर्करोगांचे प्रमाणही वाढत चालले आहे.




या आजारांचे कारण शोधण्यासाठी या तलावांच्या पाण्याचे जेंव्हा पृथ:करण करण्यात आले तेंव्हा या पाण्यात आर्सेनिक या धातूचे प्रमाण 50 मायक्रोग्रॅम प्रति लिटर या हानी न पोचवणार्‍या पातळीपेक्षा बरेच जास्त आहे असे आढळून आले. या चाचणीमुळे असे म्हणता येते आहे की बांगला देशच्या नागरिकांवर हा एक प्रकारचा विषप्रयोगच होत आहे.




या विषबाधेचे स्वरूप इतके विस्तारले आहे की सध्याच्या अंदाजाप्रमाणे बांगला देशच्या 14 कोटी लोकसंख्येपैकी अडीच कोटी लोकसंख्येला ही विषबाधा होणे संभवनीय आहे. जगाच्या इतिहासात एवढ्या विस्तृत प्रमाणात विषबाधा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.




या विषबाधेचे कारण शोधणार्‍या शास्त्रज्ञांना, आता या तलावांच्यात, प्रमाणाबाहेर असलेल्या आर्सेनिकच्या हजेरीचे, खरे कारण सापडले आहे. 1970 सालापर्यंत बांगला देशी शेतकरी व ग्रामीण हे अशा प्रकारच्या तलावांचे पाणीच फक्त पीत असत. या पाण्यात रोगराई पसरवणारे बॅक्टेरिया असल्यामुळे हे पाणी पिण्याऐवजी बोअरवेलचे पाणी लोकांनी प्यावे अशी सूचना UNICEFF WHOने केली व त्यांच्याच मदतीने 80 लाखांहून आधिक बोअरवेल 1970 नंतर खोदण्यात आल्या.

या बोअरवेलच, आर्सेनिकच्या विषबाधेचे खरे कारण असल्याचे आता आढळून आले आहे. कोणत्याही जमिनीत, आर्सेनिक हा धातू, 2 मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम, या प्रमाणापर्यंत असतोच. हे आर्सेनिक प्राणवायुसारख्या इतर मौलांबरोबर संयुगे तयार करते. नद्यांचे वाहणारे पाणी ही आर्सेनिकची संयुगे पाण्याबरोबर वहात नेतात व शेवटी गाळाबरोबर नदीच्या मुखापाशी जमवत जातात. बांगलादेशमधल्या नद्या कोट्यावधी वर्षे हेच करत असल्याने, तिथल्या जमिनीत ही आर्सेनिकची संयुगे साठत आली आहेत. बोअरवेलमधून जमिनीखालील पाण्याचा उपसा सुरू झाला की हे आर्सेनिक मिश्रित पाणी जमिनीबाहेर येते व शेवटी वहात जाऊन या तलावांच्यात साठत जाते. सध्या या तलावात असलेले आर्सेनिकचे अतिप्रमाण हे अनेक वर्षांच्या बोअरवेल पाण्याच्या उपसामुळे झालेले आहे.

ही विषबाधा टाळण्यासाठी आता विविध प्रकारचे फिल्टर वापरण्यात येऊ लागले आहे. पण बांगला देशाच्या गरीबांना मात्र हे विषमिश्रित पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्यायच सध्या उपलब्ध नाही ही सत्य परिस्थिती आहे.



18 नोव्हेंबर 2009