Wednesday, 8 October 2014

नादस्वरम

सिंगापूरमधे माझा मुक्काम असला की रोज सकाळी, घराच्या समोरूनच वहात जाणार्‍या एका कॅनॉलच्या बांधावर असलेल्या रस्त्याने, फिरायला जाण्याचा माझा परिपाठ आहे. माझे पाऊल घराच्या बाहेर पडते त्या सुमारास सूर्य नुकताच उगवलेला असतो. या कॅनॉलच्या बाजूलाच एक दक्षिण भारतीय मंदिर आहे. सकाळच्या वेळी या मंदिरात हमखास, कोणी ना कोणी वाद्यवादक, नादस्वरमवर एखादा राग आळवत असतो. नादस्वरमचे स्वर आसमंत नुसते भरून टाकतात. त्यात भैरव, शंकरा किंवा शिवरंजनी सारखा राग असला तर त्या स्वरांनी अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय रहात नाही.
नादस्वरम हे खरे म्हणजे मोकळ्या आवारात वाजवण्याचे वाद्य आहे. त्याचा मूळ व्हॉईसच एवढा मोठा आहे की ते बैठकीचे वाद्यच नाही. सनई सारखेच दिसणारे हे वाद्य आकाराने बरेच मोठे असते. दक्षिण भारतात मिळणार्‍या व शिसवीसारख्याच दिसणार्‍या एका वृक्षाच्या लाकडापासून नादस्वरमची निर्मिती केली जाते. नादस्वरमचा अंर्तभाग बासरीसारखा लंबगोल नसून तो शंकूच्या आकाराचा (Conical) असतो. त्यामुळे हे वाद्य तोंडात धरण्याच्या बाजूला निमुळते तर दुसर्‍या बाजूला हॉर्नसारखे पसरलेले असते. बासरीप्रमाणेच नादस्वरमला सात छिद्रे असली तरी बासरीमधे या छिद्रांवरचा बोटांचा दाब कमी जास्ती करून जसे तीव्र किंवा कोमल स्वर वाजवता येतात तसे नादस्वरममधे वाजवता येत नाहीत. हे वाजवण्यासाठी नादस्वरममधे तळाला आणखी पाच छिद्रे असतात. बासरीप्रमाणेच नादस्वरममधून अडीच सप्तके (मंद्र ते तीव्र) वाजवता येतात. स्वरनिर्मितीसाठी, नादस्वरमच्या निमुळत्या तोंडाला एक धातूची नळी बसवलेली असते व त्यात एक बांबू किंवा वेताची पट्टी बसवलेली असते. या पट्टीत हवा फुंकून स्वर निर्मिती होते.




तामिळनाडू मधले एक मूर्तीकार श्री. चिन्नकान्नू यांनी काळ्या ग्रॅनाईट दगडातून नुकतीच नादस्वरमची यशस्वीपणे निर्मिती केली आहे. 2 फूटाहून जास्त लांब असलेले हे वाद्य श्री. चिन्नकान्नू यांनी एकाच अखंड दगडातून कोरून काढले आहे. हे वाद्य बनवण्यासाठी योग्य असा दगड ते अनेक वर्षे शोधत होते. हा दगड त्यांच्या घराजवळच्या शेतजमिनीतच त्यांना मिळाला. श्री. चिन्नकान्नू म्हणतात की त्यांनी जेंव्हा आपल्या छिन्नीने या दगडावर ठोकून बघितले होते तेंव्हा एखाद्या ब्रॉन्झच्या मोठ्या खंडावर ठोकल्यासारखा आवाज आला होता. हे वाद्य कोरताना त्यात कोणतीही बारिकशी सुद्धा चीर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. श्री. चिन्नकान्नूंना सर्वात भिती याचीच वाटत असल्यामुळे हे वाद्य बनवत असताना जवळजवळ प्रत्येक पायरीला या भितीनेच त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात होते. या भितीमुळेच या वाद्यातील सर्व छिद्रे सुतार वापरतात तशा हाताने फिरवण्याच्या गिरमिटाने पाडावी लागली आहेत. या गिरमिटामुळे श्री. चिन्नकान्नूंच्या तळहातावर संपूर्ण फोड येऊन ते सोलून निघाले होते.




तीन महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर हे नादस्वरम तयार झाले. तोंडाने हवा फुंकून वाजवण्याची जी वाद्ये आहेत त्यात तांबे किंवा पितळी नळ्यांचा उपयोग न करता बनवलेले हे नादस्वरम सर्वात मोठे वाद्य आहे.

श्री. चिन्नकान्नू म्हणतात की निरनिराळ्या मंदिरांमधल्या दगडी कोरीवकाम केलेल्या मूर्ती ते बघत असत. यात नादस्वरम वाजवणार्‍या मूर्ती बघूनच त्यांना हे वाद्य दगडातून कोरून काढण्याची स्फूर्ती मिळाली. अनेक वादकांनी हे नादस्वरम वाजवून त्यातून निघणारे स्वर अतिशय सुंदर असल्याचे सांगितले आहे

एका शिल्पकाराने बनवलेले हे शिल्प नुसते नयनमनोहर शिल्प न राहता सुंदर स्वरही निर्माण करू शकते हे एक आश्चर्यच आहे.



19 जानेवारी 2010