Monday, 13 October 2014

फ्रुगल इंजिनीयरिंग

फ्रुगल इंजिनीयरिंग हे शब्द मागच्या वर्षी मी प्रथम वाचले. एका मोठ्या बहुराष्ट्रीय मोटरगाड्या बनवणार्‍या कंपनीचे एक अतिवरिष्ठ अधिकारी त्या वेळी भारताच्या भेटीवर आले असताना त्यांनी इथल्या फ्रुगल इंजिनीयरिंगची बरीच स्तुती केली होती. तेंव्हापासून माझ्या मनात हा प्रश्न होता की इंजिनीयरिंगचा हा काय प्रकार आहे? मी चाळीस एक वर्षांपूर्वी इंजिनीयरिंग मधली पदवी प्राप्त केली होती. तेंव्हा तर आम्हाला असा काही विषय कोणी शिकवला नव्हता. नंतर स्वत:च्या उत्पादनाच्या व्यवसायातही हा प्रकार कुठे ऐकला नव्हता. त्यामुळे आताच एकदम हा नवा प्राणी कोठून उत्पन्न झाला? असा प्रश्न माझ्या मनाला साहजिकच पडला.

भारतातल्या उद्योगांमधे जे संशोधन कार्य (R&D) चालते ते फक्त बहुराष्ट्रीय कंपन्याच करतात अशी एक भ्रामक समजूत पाश्चात्य जगतात आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीने मागच्या वर्षी या विषयी एक शोधनिबंध सादर केला होता. या निबंधाचा रोख, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील संशोधन केंन्द्रे, आपल्या मूळ कंपनीच्या शोधांना सहाय्यक असेच कार्य फक्त करतात की स्वतंत्रपणे सृजननिर्मिती (Innovation) दर्शवणारे संशोधन करतात याची पाहणी करण्याचा होता. या निबंधाच्या लेखकांनी भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिकेत किती पेटंट्स मिळवण्याचे अर्ज केले आहेत याचा शोध घेतला. त्यावरून त्यांना असे आढळून आले की इ.स.2000 मधे असे फक्त 50 अर्ज आले होते तर 2007 मधे अशा अर्जांची संख्या 500 च्या वर पोचली होती. टेक्सास इंस्टूमेंट्स, IBM, जनरल इलेक्ट्रिक या सारख्या कंपन्या असे पेटंट अर्ज सादर करण्यात आघाडीवर होत्या. भारतात या बहुराष्ट्रीय कंपन्या जे सृजननिर्मित संशोधन (Innovative Research)करतात ते भारतातील परिस्थिती, उर्जा व कच्च्या मालाची उपलब्धता आणि इथली आर्थिक व सामाजिक परिस्थिती यांच्या अनुषंगानेच केले जाते असे या शोधनिबंधाच्या लेखकांना आढळून आले.

या शोधनिबंधांच्या लेखकांनी, संशोधन करण्याच्या या पद्धतीला काटकसरीची किंवा फ्रुगल पद्धत असे नाव दिले आहे. आणि या पद्धतीने केलेले हे संशोधन जगातील इतर देशातील संशोधनापेक्षा, बदललेल्या जागतिक परिस्थितीत, अतिशय महत्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या शोधनिबंधाची माहिती वाचल्यावर माझ्या हे लक्षात आले की सिंगापूरच्या या अभ्यासकांना हे फ्रुगल इंजिनीअरिंग अगदी नवा कनसेप्ट कदाचित वाटत असेल आणि भारतातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ही पद्धत नवी वाटत असेल पण भारतातले बहुतेक उत्पादक आणि मुख्यत्वे लघु उद्योजक वर्षानुवर्षे हेच तर करत आलेले आहेत.

आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारण्याच्या आधी भारत सरकारने उद्योग धंद्यांच्यावर एवढी कडक बंधने घातली होती की कोणत्याही उद्योगाला फ्रुगल पद्धत न वापरता काही उत्पादन करणे शक्यच झाले नसते. कच्च्या मालाच्या उपलब्धतेची कोणतीही खात्री नाही. आज एखादी गोष्ट मिळते म्हणजे उद्या ती मिळेलच असे नाही. वीज जोडणी मिळण्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता. कामगार कामावर ठेवण्यासंबंधीचे जाचक नियम आणि अनेक खात्यांच्या इन्स्पेक्टर्सच्या तुमच्या कारखान्याला होणार्‍या भेटी, नियम आणि कायदे कानू. या सगळ्या चक्रव्ह्युहातून भारतातले उत्पादक मार्ग काढतच होते.
या सगळ्यातून मार्ग काढत असताना भारतीय उत्पादकांनी आपली फ्रुगल पद्धत विकसित केली. सिंगापूरचे हे अभ्यासक काही उदाहरणे देतात. कलकत्याला लोकांना चहा 1 रुपयातच देता यावा म्हणून खास तयार केले गेलेले छोटे चिनी मातीचे कप किंवा वीजेच्या भारनियमनाला तोंड देता यावे म्हणून बॅटरीवर चालणारे छोटे रेफ्रिजरेटर अशी उदाहरणे त्यानी दिली आहेत. मला तर वाटते की भारतात तयार होणार्‍या जवळ जवळ सर्व गोष्टी या ग्राहकाची क्रयशक्ती विचारात घेऊनच बनवलेल्या असतात. धातू किंवा लाकूड या ऐवजी प्लास्टिकचा वापर यामुळेच वाढला आहे.

फ्रुगल इंजिनीयरिंग आता फक्त उत्पादनांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. मोबाईल फोन वापर जनसामान्यांना परवडावा म्हणून प्रती सेकंदाला 1 पैसा इतका कमी दर जगात दुसरीकडे कुठेही नाही. मोबाईल फोन जरी स्वस्त झाले तरी त्यावरून कॉल करणे लोकांना परवडले पाहिजे या साठी हा दर ठरवणे व त्यासाठी आवश्यक अशा संगणक प्रणाली विकसित करणे हे फ्रुगल इंजिनीअरिंगच आहे यात शंकाच नाही.

भारतातल्या बहुसंख्य कंपन्या आता फ्रुगल इंजिनीअरिंगचे हे मॉडेल दत्तक घेऊ लागल्या आहेत. बाजारात येणारी सर्व नवी उत्पादने कमीत कमी उत्पादन खर्च, प्रचंड प्रमाणात उत्पादन व कमीत कमी फायद्याचे प्रमाण ही त्रिसूत्री आपली मानत आहेत. या पद्धतीत कंपनीकडे येणार्‍या कॅश फ्लो मधे प्रचंड वाढ होते व असे उत्पादन कंपनीला परवडते. ग्राहकाला उत्पादन स्वस्तात मिळाल्यामुळे त्याची काहीच तक्रार नसते.

फ्रुगल् इंजिनीअरिंग वापरून बाजारात येणार्‍या टाटांच्या नॅनो गाडीसारख्या उत्पादनांची मालिकाच आता बाजारात येऊ लागली आहे. भारतात विकसित होणारे हे तंत्रज्ञान बाकीच्या देशात थोड्याच कालात लोकप्रिय होईल यात शंका वाटत नाही.


21 जानेवारी 2010