Saturday, 18 October 2014

घरे कोणासाठी?

मध्यंतरी आलेल्या आर्थिक मंदीनंतर, म्हणजे गेले चार पाच महिने, पुण्यातले कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघितले तरी किमान काही पानांवर तरी मोठमोठ्या, रंगीबेरंगी आणि पूर्ण पान भरणार्‍या जाहिराती नक्की बघायला मिळतात. या जाहिराती असतात नवीन गृहबांधणी प्रकल्पांच्या. हे प्रकल्प, अर्थातच सदनिका संकुलांचे बहुतांशी असतात. काही वेळेला एखादी जाहिरात बंगल्यांचीही दिसते. या जाहिरातींमध्ये दिसणारी घरे किंवा सदनिका, अतिशय नयनमनोहर दिसतात. चित्रे बघितल्यावर अशी कल्पना होते की ही घरे अत्यंत हवेशीर, सुविधापूर्ण व प्रशस्त असावीत. घराभोवती खूप मोकळी जागा, त्यात हिरवेगार दिसणारे लॉन ,भरपूर छाया देणारे बरेच वृक्ष व असंख्य फुलझाडे दिसतात. बाजूला निळ्या टाईल्स लावलेला व स्फ़टिकागत शुभ्र पाण्याने भरलेला पोहण्याचा तलाव असतो. त्याच्या बाजूला बीच चेअर्सवर अनेक मंडळी आराम करताना दिसतात. तसेच क्लब हाऊस, टेनिस कोर्टस वगैरेसारख्या सर्व आधुनिक सुविधाही दिसतात. थोडक्यात म्हणजे पाश्चात्य देशांच्यातील घरबांधणी प्रकल्प व पुण्यात होणारे हे प्रकल्प यात तसा काही फरक या चित्रांवरून तरी दिसून येत नाही. मी असे धरून चालतो की प्रत्यक्षात उभे राहिलेले हे प्रकल्प, जाहिरातीत दाखवलेल्या चित्रांच्या प्रमाणेच होत असावेत. यावरून साहजिकच असे म्हणता येईल की पुण्यातल्या लोकांचे राहणीमान अतिशय उच्च व पाश्चात्यांच्या तोडीचे होत चालले आहे.


परंतु या नवीन प्रकल्पातील सदनिकांच्या किंमतीची चौकशी जरी केली तरी हा भ्रमाचा भोपळा लगेच फुटतो. या आधुनिक सदनिकांच्या किंमती आजमितीला दीड, दोन कोटी ते सहा कोटी या रेंजमधे असाव्यात. माझ्या मनात नेहमीच एक प्रश्न उभा रहातो की या किंमतीला या सदनिका विकल्या तरी कशा जातात? मी नेहमीच एक सरळ हिशोब करून बघतो. पुण्यातल्या बर्‍या परिस्थितीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न जर वर्षाला 9 लाख आहे असे धरले तर 30 वर्षाच्या कालखंडात ते कुटुंब एकूण 2 कोटी सत्तर लाख कमावते. दोन कोटी किंमतीची सदनिका घेण्यासाठी या कुटुंबाने समजा तेवढेच कर्ज घेतले तरी व्याजाचा बोजा, तीस वर्षात मुद्दलाच्या 50% धरून या कुटुंबाला 3 कोटी रुपये तरी कर्जफेड करण्यासाठी लागतील. ही तर अशक्य कोटीतील बाब झाली. म्हणजेच वर्षाला 9 लाख किंवा महिन्याला 75000 रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबालाही यातली कोणतीच सदनिका परवडण्यासारखी नाही. परंतु महिन्याला 75000 उत्पन्न असलेली तरी अशी किती कुटुंबे पुण्यातल्या 50 लाख लोकांच्यात आहेत हा ही प्रश्नच आहे. कदाचित एकूण लोकसंख्येचा 0.1% किंवा 500 कुटुंबाना या सदनिकांच्या किंमती परवडत असाव्यात.म्हणजे फक्त 500 कुटुंबांसाठी पुण्यातला घर बांधणी उद्योग एवढे नवीन प्रकल्प सादर करत असतो असेच अनुमान यावरून काढता येईल.


नवीन घरे कोण घेऊ इच्छितात? असा प्रश्न विचारला तर दोन प्रकारचे लोक मनासमोर येतात. एक तर नवीन लग्न होऊन पुण्यात नोकरीधंद्यासाठी आलेली तरूण जोडपी आणि आयुष्याच्या मध्यकाली आर्थिक सुबत्ता प्राप्त झाल्यामुळे जीवनमान वर नेऊ पाहणारी कुटुंबे. यापैकी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना तर सदनिका खरेदी करण्याचा विचार सुद्धा करणे झेपणार नाही. त्यामुळे राहिली ती आर्थिक सुबत्ता प्राप्त झालेली कुटुंबे. ही कुटुंबेच या सदनिकांचे ग्राहक आहेत.
यावरून एक गोष्ट मला तरी स्पष्ट होते आहे. पुण्यातला बांधकाम उद्योग हा फक्त अतिशय थोड्या ग्राहकांसाठी घरे तयार करतो आहे. मग उरलेल्या लोक संख्येचे काय? ते रहातात त्याच दाटीवाटीने बांधलेल्या जुनाट घरांच्यात किंवा नवीनच घर घेण्याची वेळ आली तर घेतात कात्रजच्या घाटापलीकडे किंवा दौंड किंवा मुळशी गावाजवळ. या लोकांना कामाला येण्याजाण्यासाठी करावा लागणारा प्रवास अतिशय गचाळ आणि अपुर्‍या वाहतुकव्यवस्थेमुळे अतिशय त्रासदायक होतो आहे. बरे या लांबवरच्या घरांच्यात मूलभूत सुविधाही तितपतच असतात. थोडक्यात या लोकांचे हाल कुत्रा सुद्धा खात नाही.जी घरे बहुसंख्य लोकांना परवडण्यासारखी नाहीत ती बांधून आम्ही शहरातील दुर्मिळ भूखंड वाया का घालवतो आहोत? हे समजण्यासारखे नाही.
या समस्येवर उपाय शोधण्याची नक्कीच वेळ आली आहे. नाहीतर थोड्याच दिवसात पुण्यात सुद्धा मुंबईत दिसतात तशा झोपडपट्टीने चहुदिशांनी गराडा घातलेल्या तुरळक आलिशान इमारती व आजूबाजूला फक्त झोपडपट्ट्या व गलिच्छ वस्त्या यांचा समुद्र एवढेच दृष्य दिसू लागेल.

23 मार्च 2010