Tuesday, 9 September 2014

असे क्रिकेटियर

स्वर्गिय. मोतीलालजी नेहरू (स्व. जवाहरलाल नेहरूजींचे वडील) यांच्याबद्दल असे सांगतात की ते आपले कपडे पॅरिसहून शिवून आणत असत. ब्रिटिशांच्या काळातले राजेरजवाडे किंवा संस्थानिकही या बाबतीत काही फारसे मागे नव्हते. अगदी रोजच्या वापरातील गोष्टींपासून ते घरातील फर्निचरपर्यंतच्या सर्व गोष्टी ते जगातल्या निरनिराळ्या देशांतून निवडून मागवत असत. आजच्या युगात, क्रिकेट या खेळाला, भारतीय उपखंडात अमाप प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्यामुळेच हा खेळ खेळणार्‍या खेळाडूंच्या मानधनात, कल्पनाही करता येणार नाही या प्रमाणात सतत वाढ होते आहे. या सर्व क्रिकेटियर्सची आता नवश्रीमंतात गणना होते. पूर्वीच्या राजेरजवाड्यांच्या पावलावर या नवश्रीमंत क्रिकेटियर्सनी त्यामुळेच पावले टाकली तर नवल वाटायला नको.


1223398133


साकीबुल हसन हा असाच एक नवश्रीमंत बंगला देशी क्रिकेटियर आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या 20 ओव्हर्सच्या आंर्तराष्ट्रीय स्पर्धेमधे भाग घेतलेल्या बंगला देशी टीमचा तो एक खेळाडू होता. या स्पर्धेच्या दरम्यान एक दिवस साकीबुल हसन आपल्या काही मित्रांसह मियां अमीन अली यांच्या मालकीच्या, मेडनहेड गावामधल्या, ‘पपया इंडियन रेस्टॉरंट’ मधे जेवण करायला गेला. त्याला तिथले जेवण इतके आवडले की त्याने अमीन अली यांच्याकडून त्याने त्यांचे बिझिनेस कार्ड मागून ठेवले.
मागच्या आठवड्यात मियां अली यांना, साकीबुल हसनचा दुबईहून फोन आला. साकीबुल, त्या फोनमधे त्यांना विचारणा करत होता की ते दुबईला 50 ते 60 लोकांसाठी जेवण इंग्लंडहून पाठवू शकतील का? तो दुबईच्या काही मित्रांसाठी, ज्यात काही शेख पण आहेत, एक पार्टी आयोजित करू ईच्छित होता. 41 वर्षाच्या मियां अलींनी, अर्थातच ही ऑर्डर घेण्यास तयारी दाखवली.

Jul24_DubaiCurries


हे जेवण आता पॉलीस्टायरीनच्या मोठ्या पेट्यांच्यातून दुबईला हवाई मार्गाने पाठविण्यात येणार आहे. ते खराब होऊ नये म्हणून शुष्क बर्फ (ड्राय आईस) मधे ते ठेवण्यात येईल. अली यांचे सर्व स्वैपाकी, आपली कला आपल्याला दुबईपर्यंत पाठवता येणार म्हणून प्रचंड खुष आहेत. अली, त्यांचा भाऊ शाम व मुख्य स्वैपाकी नासिरउल्ल्हा हे स्वत: जेवण घेऊन दुबईला जातील व गरम करून पार्टीत वाढतील. त्यांचा प्रवास खर्च, साकीबुल हसनच करणार असून त्यांची रहाण्याची व्यवस्था एका आलीशान हॉटेलात करण्यात येणार आहे.
आता या जेवणाची एकूण किंमत किती होणार आहे हे साकीबुल हसन आणि मियां अमिन अली यांनाच माहिती!

असे हे नवश्रीमंत क्रिकेटियर्स आणि असे हे त्यांचे किस्से!

14 ऑगस्ट 2009