Tuesday, 9 September 2014

एक सुखद सकाळ

रोज सकाळी जाग आली की प्रथम मी खोलीची खिडकी उघडतो आणि बाहेर बघतो. आज सकाळी बाहेर बघताना रस्त्यावर नेहमीची वाहनांची गर्दी दिसत नव्हती. एकदम लक्षात आले की आज सुट्टी आहे. आकाशही अभ्राच्छादित होते आणि छान वारा सुटला होता. एकदम मनात आले की कुठेतरी बाहेर जायला किती छान हवा आहे! आश्चर्य म्हणजे घरातल्या बाकी सर्व मंडळींना बहुदा तसेच वाटले होते. त्यामुळे ईस्ट कोस्ट पार्कला ब्रंच घ्यायला जायचा बेत लगेचच ठरला. बच्चे मंडळींना तयार केले आणि आम्ही निघालो सुद्धा.

kallang_paya_lebar0.MainPar.0015.Image


मागच्या वर्षी एक नवीन जलद मार्ग वापरासाठी खुला झाला होता तो आम्ही बघितलाच नव्हता. त्यामुळे या नवीन मार्गाने म्हणजे ‘कालांग-पाया लेबॉ एक्सप्रेसवे’ने जायचे ठरले. 12 किलोमीटर लांबीच्या या 6 पदरी रस्त्याचा 9 किलोमीटर लांबीचा भाग पूर्णपणे जमिनीखालून जातो.

या रस्त्याने प्रवास करणे हाच एक मोठा सुखद अनुभव वाटला. पोटातले पाणी सुद्धा हलणार नाही इतका सपाट रस्ता. शास्त्रीय विचार करून केलेली दिव्यांची व्यवस्था व प्रत्येक एक्झिटच्या आधी व्यवस्थित पाट्या यामुळे जमिनीखालचा रस्ता आताच सुरु झाला असे वाटत असताना तो संपला देखील आणि आम्ही ईस्ट कोस्ट पार्क पर्यंत पोचलो देखील.


ecp2new


ईस्ट कोस्ट पार्क हा समुद्र किनार्‍याला लागून असलेला अंदाजे 15 किलोमीटर लांबीचा पार्क आहे. या पार्क मधे ‘बिग स्प्लॅश’ नावाचे एक नवीन क्रीडा केंद्र सुरू झाले आहे.

IMG_0023new

तिथे गाडी पार्क करून आम्ही आत शिरलो. अर्थातच सगळ्यांची पावले प्रथम बीच कडे वळली.


IMG_0024new


IMG_0053New


स्वच्छ पिवळट-पांढरी वाळू आणि मागे अतिशय नाजूकपणे किनार्‍यावर येणार्‍या लाटा हे या किनार्‍याचे वैशिष्ट्य आहे.

IMG_0057lowbit


त्यामुळे वाळूत हात खूपसून बच्चे मंडळींच्या बरोबर वाळूचे किल्ले बनवायला खूपच मजा येते. किनार्‍याच्या कडेने पळत सुटावे. मधूनच पाण्यात उभे राहून नाजूकपणे येणार्‍या लाटा पायावर झेलाव्यात. वेळ भरकन पुढेच सरकतो.

IMG_0056lowbit


पुष्कळ मंडळी स्वत:चे तंबू घेऊन येतात व किनार्‍यावर तो उभा करून त्यात आराम करतात.

IMG_0071lowbit


किनार्‍याच्याच कडेने एक रस्ता केलेला आहे. त्यावर जॉगिंग करणारे खूप जण दिसतात. इथे सिंगल सीट, डबल सीट अशा सायकली पण भाड्याने मिळतात. त्या घेऊन सायकली फिरवणारेही खूप जण दिसतात.

IMG_0072lowbit


वेळ कसा गेला ते जरी कळले नसले तरी पोटातले कावळे कोकलायला लागल्यावर आपसुकच पावले जरा पलीकडे असलेल्या कोणत्या तरी स्टॉलकडे वळतात. आम्हाला एक बिस्ट्रो सापडला. त्याच्याकडचा ब्रेकफास्टचा मेन्यू बघुनच तोंडाला पाणी सुटले.

IMG_0075lowbit


लोणी व जॅम लावलेले लुसलुशीत टोस्ट, स्क्रॅम्बल्ड एग्ज, बेकन, पॅनकेक्स, ऍपल ज्यूस आणि शेवटी इंग्लिश ब्रेकफास्ट टी चा कप असा मजबूत ब्रेकफास्ट झाल्यावरच सगळ्यांनी घड्याळ्याकडे बघितले.

IMG_0078lowbit


घड्याळ तर दुपारचे 12 वाजून गेल्याचे दाखवत होते.


13 ऑगस्ट 2009