पश्चिम
महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी या गावाजवळ, भीमा नदीवरचे एक
अतिशय मोठे धरण आहे. उजनी धरण या नावाने ओळखल्या जाणार्या या धरणाची पाणी
साठविण्याची क्षमता 1517 गिगालिटर्स (GigaLitres) एवढी प्रचंड आहे.
क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्यानंतर तिसरा
लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक
नद्यांमधून येत असते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे
मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.

लॅन्डसॅटने घेतलेला उजनी धरणाचा फोटो
मंगळवार तारीख 28 जुलैला कुमार नगरे आणि त्याचे इतर सहकारी मच्छीमार हे आपल्या होड्या घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. त्यांच्या होड्यांच्याजवळ पाणी अचानक उकळल्यासारखे उफाळू लागले. यामुळे घाबरून जाऊन त्यांनी त्वरेने होड्या काठावर आणल्या. याच दिवशी गोरख सल्ले, नवनाथ कनिचे व सुरेश परे हे या जलाशयाच्या कुंभारगाव भागात होड्या नेऊन मच्छीमारी करत होते. त्यांना पाण्यातून सहा ते सात फूट उंच फवारे उडताना दिसले. फवार्याने उडणारे पाणी काळ्या रंगाचे, रासायनिक व दुर्गंधी येणारे होते. गोरख परसय्या हा मच्छीमार एका थर्मोकोलच्या प्लॅटफॉर्मवर बसून मासे पकडत होता. त्याचा प्लॅटफॉर्म तर खाली पाणी उफाळू लागल्याने हवेत उडाला. या उफाळणार्या पाण्याने होड्या भोवर्यात अडकल्यासारख्या झाल्या व काही काळ त्यांना काठाकडे जाणेही शक्य होईना. या प्रकारामुळे मच्छीमार मंडळी हादरली व तीन चार दिवस मच्छीमारी बंदच आहे.
गेले काही आठवडे भीमा नदीतून या जलाशयाकडे येणारे पाणीच या प्रकाराला जबाबदार असावे असे वाटते. पुणे व तिथून दौंडपर्यंतचे असलेले प्रकल्प यांच्याकडून येणारे सांडपाणी व रासायनिक प्रदुषणयुक्त पाणी या पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळलेले आहे. उजनीच्या पात्रामधे बरीच वर्षे साठलेले रासायनिक घटक व हे सांडपाणी यांची प्रक्रिया व त्याचा धरणाच्या पाण्यात असलेल्या सेंद्रीय पदार्थांवर होणारा कुजण्यासारखा परिणाम यामुळे मिथेन (Methane) वायु तयार होतो व तो उफाळून वर आल्याने हे फवारे उडतात.

उजनी धरण
गेल्या तीन वर्षांपासून उजनीचे पाणी पिण्यासही योग्य नसल्याचे आढळून आले आहे. दुधासारखा तवंग मधून मधून पाण्यावर दिसतो. पाण्यातील शंख शिंपल्यांसारखे प्राणी, मृत होत आहेत. फिल्टरेशन करूनही पाण्याला दुर्गंधी येते. बारामती नगरपालिकेने तर उजनीचे पाणीच नको अशी भूमिका घेतली आहे. अर्थात बाकीच्या छोट्या मोठ्या गावांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.
एवढ्या मोठ्या प्रकल्पातील जलाशयाचे पाणी पुरेसे स्वच्छ नसून ते प्रदुषणयुक्त आहे ही गोष्ट, खरोखरच पोल्यूशन कंट्रोल बोर्डाच्या व जलसंपत्तीचे नियोजन करणार्या अधिकार्यांसाठी लांछनास्पद आहे. परंतु खरे जर कोणी बळी जात असतील तर ज्यांना हे पाणी वापरण्याशिवाय तरणोपाय नाही असे काठावरच्या गावांमधले शेतकरी.
1 ऑगस्ट 2009