Monday, 8 September 2014

सिंगापूरमधले अनुभव- सार्स आणि स्वाइन फ्ल्यू

रोज सकाळी संगणकावर मी पुण्या-मुंबईची वर्तमानपत्रे चाळतो. गेल्या काही दिवसापासून, स्वाइन फ्ल्यू किंवा H1N1 हा व्हायरल रोग, पुण्या-मुंबईला वाढतच चालला आहे. आजच्या बातम्या वाचून तर आता साथ येते की काय असे वाटू लागले आहे. सिंगापूरला मे महिन्याच्या सुरवातीला, स्वाइन फ्ल्यूचे पहिले रुग्ण सापडले. तेंव्हापासून येथील शासनाने या रोगासाठी कोणते व कसे प्रतिबंधक उपाय योजले ते येथे थोडेफार अनुभवता आले व वर्तमानपत्रांतून या उपायांना प्रसिद्धी दिलेली असल्याने लक्षात आले.

या आधी 2003 मधे, सार्स या अशाच व्हायरल, पण कितीतरी जास्त प्राणघातक, अशा  रोगाने सबंध दक्षिण-पूर्व एशियामधे थैमान घातले होते. तेंव्हाही मी येथेच होतो. त्या वेळेस येथल्या शासनाची, या रोगाशी सामना करण्याची तयारीच नव्हती. त्यामुळे बर्‍याच जास्त संख्येने रोगी दगावले. त्या अनुभवाने शहाणे होऊन सिंगापूर शासनाने आपली रोगप्रतिबंधक यंत्रणा अतिशय कार्यप्रवण केली आहे. या दोन्ही वेळचा माझा अनुभव नक्कीच आपल्या येथे उपयुक्त ठरेल असे वाटते.

या प्रकारच्या बहुतेक व्हायरल रोगांची लागवण ही तळहातांच्या द्वारे होते. या रोगाची लागण झालेल्या रुग्णाला बहुदा शिंका-पडसे झालेले असते. त्यामुळे त्याचा हात स्वत:च्या नाका तोंडाला लागणे स्वाभाविक असते. अशा वेळी या रोगाचे व्हायरस त्याच्या तळहातावर साचून रहातात. असा रोगी (त्याला स्वत:लाच आपल्याला हा रोग झाला आहे हे माहिती नसल्याने) जेंव्हा समाजात वावरतो तेंव्हा तो बस किंवा टॅक्सीची हॅंडल्स, दरवाज्याचा कड्या, चमचे, पेले ग्लास सारख्या असंख्य ठिकाणी हात लावतो. त्यावेळी हे व्हायरस त्या वस्तूंवर चिकटतात व 24 तासापर्यंत जिवंत राहू शकतात. या वस्तूंना दुसर्‍या निरोगी व्यक्तीने हात लावला तर त्याच्या तळहातावर हे जिवाणू लगेच चिकटतात. रोगी वयाने लहान असेल तर त्याचा हात, आई-वडील, नातलग, मित्र-मैत्रिणी हातात घेऊ शकतात. अशा सर्व वेळांना हे जिवाणू एका हातावरून दुसर्‍या हातावर जातात.

_46110024__45707237_flubody-1

फ्ल्यूचे जिवाणू


या नंतर जेंव्हा या निरोगी व्यक्तीचा हात आपल्या नाकातोंडाला अजाणता लावला जातो तेंव्हा हे जिवाणू त्याच्या श्वसनसंस्थेत प्रवेश करतात व या व्यक्तीला या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.
या शिवाय हा रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा हे जिवाणू हवेत फवारले जातात. असे जिवाणू जर एखाद्या निरोगी व्यक्तीच्या श्वसनसंस्थेत शिरले किंवा त्याच्या तळहातावर चिकटले तरी या निरोगी व्यक्तीला लागण होऊ शकते.

या जिवाणूंचा प्रसार कसा होतो हे लक्षात घेतले तर एक व्यक्ती म्हणून आपण अतिशय साधे पण प्रभावी असे प्रतिबंधक उपाय योजू शकतो. प्रथम म्हणजे आपले हात साबणाने स्वच्छ धुतल्याशिवाय नाका-तोंडाला न लावणे. सार्वजनिक जागेत आणि मुख्यत्वे बंदिस्त सार्वजनिक जागेत जाताना तोंडाला मास्क लावणे. या मास्कचा 100 % जरी उपयोग झाला नाही तरी काही प्रमाणात होतोच. कोणत्याही सार्वजनिक सुविधेचा वापर केल्यावर, बस प्रवास, सार्वजनिक स्वच्छतागृहे वगैरे, हात साबणाने धुणे किंवा डेटॉल सारखे जंतूनाशकाचे एखाद दोन थेंब हातावर टाकून हात चोळणे, ज्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य असेल त्यांनी हातात पेपर टिश्यू घेऊनच शक्यतो सार्वजनिक सुविधांना हात लावणे हे उपाय अतिशय प्रभावी ठरतात. दिवसातून जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा हात साबण लावून धुवावे. सार्वजनिक स्थळांवर अनावश्यक असताना जाणे, अनावश्यक प्रवास करणे हे सुद्धा टाळावे.

Plague-AP


सिंगापूरमध्ये मे महिन्यापासून इस्पितळे, शाळा-कॉलेजे या सारख्या कोणत्याही बंदिस्त सार्वजनिक जागेत, तुमच्या शरीराचे तपमान तपासल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. या शिवाय प्रत्येकाला एक प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असते. यात त्या व्यक्तीला मागच्या आठ्वड्यात सर्दी-खोकला, ताप वगैरे झाला नव्हता तसेच कोणत्याही परदेशाहून आलेल्या व्यक्तीशी तिचा संपर्क आला नव्हता असे सांगितल्यावरच त्या सार्वजनिक जागेत प्रवेश मिळतो. प्रत्येक शाळा व कॉलेज आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे तपमान रोज सकाळी घेतात. कोणाला ताप आला आहे असे वाटले तर त्याला लगेच घरी पाठवले जाते. कचेर्‍यांच्यामधे सर्व कर्मचार्‍यांचे तपमान सकाळी घेतल्यावरच त्यांना आत सोडतात. अर्थात कामासाठी कचेरीत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची तपासणी ही होतेच. विमानतळावर येणार्‍या सर्व प्रवाशांचे तपमानही बघितले जाते.

सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य खाते यांचे उत्तम सहकार्य असल्याने, कोणत्याही संशयित रुग्णाची स्वाइन फ्ल्यूसाठी लगेच तपासणी होते. एवढे प्रभावी उपाय योजून सुद्धा सिंगापूरमधला हा रोग तीन महिने झाले तरी चालूच राहिला आहे. सार्स एवढे नाही पण काही रोगी दगावलेही आहेत. आता ज्या नवीन बातम्या वर्तमानपत्रात वाचतो आहे त्यावरून असे दिसते की पौगंडावस्थेतील मुले, गरोदर बायका आणि ज्यांना एपिलेप्सी, मधुमेह, हायपरटेन्शन या सारखे रोग आहेत अशा व्यक्ती या जिवाणूंची शिकार लवकर होत आहेत. ज्यांचे वजन जास्त आहे अशा व्यक्तींनाही धोका जास्त आहे.

रोगाची लागण होऊ नये म्हणून शाळा कॉलेजे बंद ठेवणे, सार्वजनिक सण समारंभांना या वर्षी सुट्टी देणे हे उपायही शासनाने करणे जरूरीचे आहे. आपल्या येथे यातले कुठले उपाय किती प्रमाणात योजता येतील आणि योजले जातील हे सांगणे खरोखरच कठीण आहे. म्हणूनच वैयक्तिक आणि आपले कुटुंब या पातळीवर आपण आपले स्वत:चे उपाय योजणे अतिशय आवश्यक आहे. सिंगापूरचा अनुभव लक्षात घेतला तर हा रोग लवकर पळून जाणारा नाही. त्याच्याशी सर्वांनी मिळून लढणे आवश्यक आहे.


9 ऑगस्ट 2009