Monday, 8 September 2014

एजंट ऑरेंज

व्हिएटनामच्या गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासातला, 10 ऑगस्ट हा एक अतिशय दुख:द दिन समजला जातो. 1961 साली याच दिवशी प्रथम, अमेरिकन विमानांनी, व्हिएटनामच्या जंगलांच्यावर, एजंट ऑरेंज या रसायनाची फवारणी केली होती. नारंगी पट्टे ओढलेल्या ड्रम्समधून या रसायनाची ने आण केली जात होती व म्हणूनच त्याला हे नाव मिळाले होते. या रसायनाची फवारणी केलेल्या भूभागावरील सर्व झाडे झुडपे हे रसायन नष्ट करते. अमेरिकन सैन्याच्या जनरल्सची अशी समजूत होती की कम्युनिस्ट व्हिएटनामी सैनिक हे या घनदाट झाडीत लपलेले असल्याने, त्यांच्याशी लढणे अमेरिकन सैन्याला कठीण जाते. यावर उपाय म्हणून ही  झाडीच नष्ट करावी असे त्यांनी ठरवले व एजंट ऑरेंजचा वापर केला. 1961 ते 1971 या दहा वर्षात 800 लाख लिटर रसायन अमेरिकन विमानांनी व्हिएटनामच्या जंगलांच्यावर फवारले. एजंट ऑरेंजमधे डायॉक्सिन हा अत्यंत विषारी पदार्थ असतो. त्यामुळे अंदाजे 366 किलोग्रॅम डायॉक्सिन व्हिएटनामवर फवारले गेले.

north vietnam map


एजंट ऑरेंजचा वापर करण्याचा ज्या कोणी निर्णय घेतला त्यांनी या रसायनाचा निरपराध व्हिएटनामी नागरिकांच्यावर काय परिणाम होईल याचा विचारच बहुदा केलेला नसावा. एजंट ऑरेंजच्या या कालातल्या फवारणीत कालात अंदाजे 48 लाख निरपराध व्हिएटनामी नागरिक तरी सापडले असावेत. एका अंदाजाप्रमाणे तीन ते चार लाख नागरिक तरी मृत्युमुखी पडले असावेत.

orangeday-reuters


लाखो इतर नागरिकांच्यावर आयुष्यभरासाठी कॅन्सर व जेनेटिक डिफेक्ट्स सारखे दुष्परिणाम झाले व यामुळे मोठ्या प्रमाणात जन्मजात व्यंगे घेऊन अर्भके जन्माला आली. फक्त हो-चि-मिन्ह शहरातच या रसायनाचे पिडीत असे 4000च्या वर नागरिक आहेत.

ALeqM5hDCZ3wh5QWJbPnb7Yhbwgjd7POFA


या पिडीतांना मदत करण्याच्या हेतूने ‘व्हाव्हा’ Vietnam Association for Victims of Agent Orange (VAVA) ही संस्था प्रयत्न करीत आहे. अमेरिकन सिनेटर मॅककेन जरी म्हणत असले की अमेरिकन सरकारने 460 लाख डॉलर्स डायॉक्सिनच्या व्हिएटनामी नागरिकांवर झालेल्या दुष्परिणामावर उपचार करण्यासाठी खर्च केले आहेत तरी इ.स. 2005मधे या रसायनाच्या उत्पादकांविरुद्ध भरलेल्या खटल्यात, अमेरिकन न्यायसंस्थेने पिडीतांच्या विरुद्ध निकाल दिल्याने, अमेरिकन सरकारकडून मदत मिळविण्याचा या पिडीतांचा मार्ग खुंटल्यासारखाच आहे. त्यामुळे आता चॅरिटी शोज सारख्या माध्यमातून पैसे उभे करण्याचा या संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. दर वर्षी 10 ऑगस्ट हा दिवस ऑरेंज डे म्हणून पाळायचा असे व्हिएटनाम सरकारने ठरवले आहे.

agentorange2-214-09


या निरपराध नागरिकांचे झालेले हाल व आता जन्मजात व्यंग घेउन जन्माला आलेल्या नागरिकांची छायाचित्रे बघताना डोळ्यात अक्षरश: पाणी उभे रहाते.


10 ऑगस्ट 2009