पुण्यात
असताना मी रोज सकाळी एका विविक्षित मार्गाने फिरायला जातो. माझ्या
फिरण्याच्या मार्गावरील एका चौकात, एक विक्रेता सकाळी असतो. त्याच्या समोर
एका फोल्डिंग टेबलवर, सात आठ स्टेनलेस स्टीलचे डबे व ग्लास, चमचे वगैरे
साहित्य असते. एकदा कुतुहुल म्हणून मी सहज जवळ जाऊन बघितले. सहसा कुठे न
मिळणारे गाजर, काकडी, भोपळा सारख्या फळभाज्यांचे रस हा गृहस्थ सकाळी विकत
असतो आणि ज्या अर्थी तो रोज सकाळी दिसतो तेंव्हा त्याला नियमित
गिर्हाईकेही मिळत असणार हे ओघानेच आले. अर्थात हे रस त्या विक्रेत्याने
लावलेल्या पाटीच्या अनुसार, आरोग्याचे कारंजे वगैरे आहेत किंवा नाहीत, हे
सांगणे एकंदरीत कठीणच आहे.
भाज्यांचा रस हा जरी थोडा सहसा न मिळणारा प्रकार असला तरी फळांचे रस
सगळीकडे अगदी कोपर्याकोपर्यावर मिळतात. या रसांचा स्टॉल टाकणे सोपे असते.
दोन मिक्सर आणि फळे कापण्यासाठी एक टेबल एवढे असले की झाले. हा रस बहुदा
ताजा काढून दिला जात असल्याने तो स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असतो असा
सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात फ़ळे, ग्लासेस. मिक्सरची भांडी कशी व
कुठल्या पाण्याने धुतात? फळांची गुणवत्ता काय असते? वगैरे प्रश्नांची
उत्तरे संदग्धच असल्याने या रसाची स्वच्छता व आरोग्यदायित्व तपासूनच घ्यावे
लागेल.
दाबाखालील कर्बद्विप्राणिल वायू आत घातलेला असल्याने, बाटली उघडल्यावर फसफसतील अशी पेये (कोका कोला, पेप्सी, 7 अप वगैरे) साधारणपणे ‘सोडाज’ (Soda’s) या नावाने ओळखली जातात. ही पेये आरोग्यास अहितकारक असून फळाचे रस त्यापेक्षा कितीतरी चांगले असे मानले जाते. माझ्या एका मित्रवर्यांना, आपण ही फसफसणारी पेये जरा जास्तच पितो असे वाटले. त्यांना सौम्य मधुमेह आहे. त्यांनी आता आपण ‘सोडाज’ पिणे बंद करून, फक्त फळांचे रस घेणार अशी त्यांनी घोषणा केली. पुढच्या काही आठवड्यांत त्यांनी रसांचे अनेक डबे फस्त केले व आता आपण अतिशय निरोगी असल्याचे ठरवले. परंतु साखरेचे प्रमाण तपासल्यावर ते थोडे वाढलेलेच आढळले. प्रत्यक्षात या फळांच्या रसात साखर घातलेली असते आणि त्यामुळे ते ‘सोडाज’ पेक्षा फारसे जास्त आरोग्यदायक नसतातच.
आहारतज्ञांच्या मताप्रमाणे, फळांचे रस पिणे ही फळांचे सेवन करण्याची योग्य पद्धत नाहीच. रसात शरीराला आवश्यक असणारे आरोग्य संवर्धक घटक जरी असले तरी फळांच्या फोडींमध्ये असलेला फ्लेव्हनॉईड्स(flavonoids)हा घटक फळांच्या रसात नसतो. फळातील क जीवनसत्व या घटकाशिवाय शरीरात शोषले जात नाही. अन्न पचन होण्यासाठी तंतुमय पदार्थांची आवश्यकता असते. भाज्या किंवा फळांच्या रसातून हे मिळतच नाहीत. त्यासाठी फळांच्या फोडीच खाव्या लागतात. काही फळांच्या रसात (उदा. आंबा) एवढ्या कॅलरीज व साखर असते की असा रस टाळणे हेच उत्तम असते.
फळांचे रस प्यायचेच असले तर कोणत्या फळाचा रस प्यायचा हे ठरवणे आवश्यक असते नाहीतर आरोग्यास मदतीपेक्षा हानी होण्याची शक्यताच आधिक असते. काही फळांचे रस साखर न घातलेले ‘फक्त रस’ म्हणून मिळतात. हे आरोग्यास जास्त चांगले असतात. अशा रसांच्यात फळांचे तुकडे असलेले रस आधिक उत्तम.
भाज्यांचे रस पिणे हे कच्च्या भाज्या खाण्यासारखेच असते. त्या भाज्या रस काढण्याआधी स्वच्छ केल्या असतील किंवा नाही हे असे रस बाहेर पिताना समजणे अशक्य आहे. त्यामुळे भाज्यांचा रस प्यायचाच असला तर तो घरी तयार करूनच प्यावा.
आंग्ल भाषेत एक म्हण आहे. “रोज एक सफरचंद खा व डॉक्टरला दूर ठेवा”. या म्हणीबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. लक्षात घेण्याची गोष्ट एवढीच आहे की सफरचंद खावे असे ही म्हण सांगते. सफरचंदाचा रस प्यावा असे नाही.
16 सप्टेंबर 2009