Monday, 8 September 2014

मूर्खपणाचा कळस

तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या तळहातावरून किंवा अंगावरून मी मोटर सायकल चालवून दाखवतो असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही काय कराल? त्या माणसाला घरातून हाकलून द्याल की नाही! पण तामिळनाडूमधल्या विलुपुरम जिल्ह्यातल्या (Keezhperumpakkam) कीझपेरुम्पक्कम या गावातल्या सरकारी प्राथमिक शाळेचे, डिसेंबर 2008 पासून असलेले हेडमास्तर, श्री. रामानुजम, यांना मात्र हा मूर्खपणा म्हणजे शौर्याचे लक्षण वाटते. अर्थात हे त्यांचे वाटणे त्यांच्या शाळेत शिकणार्‍या मुलांच्याबद्दल असावे. त्यात त्यांची स्वत:ची मुले आहेत की नाही ते माहित नाही.

IndiaTv87363e_stunt


तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कै. कामराज यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तामिळनाडूमधे एक जन्मोत्सव साजरा केला जात आहे. त्या उत्सवाचा एक भाग म्हणून हे शौर्यप्रदर्शन आयोजित केले होते. प्रथम किरकोळ कराटेची प्रात्यक्षिके झाल्यावर या मुख्य शौर्यप्रदर्शनाला सुरवात झाली. यात पहिली ते पाचवी मधल्या मुलांना जमिनीवर हात पसरून झोपवण्यात आले व त्यांच्या कोवळ्या पंजांच्यावरून एका अचरटशिरोमणीने मोटर सायकल चालविली. त्यानंतर एका मुलीला उताणे झोपवून तिच्या अंगावर एक फळी ठेवण्यात आली व त्यावरून मोटर सायकल चालविली गेली.

STUNT


या कार्यक्रमात मुलांना फुकट गणवेश आणि इतर शिक्षण साहित्य तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी यांच्या एका ट्रस्टमार्फत देण्यात येणार होते. त्यामुळेच बहुदा या मुलांच्या पालकांनी या अचरटपणाला संमती दिली असावी. या मंत्रीमहोशयांच्या पत्नी या कार्यक्रमाला हजर होत्या. ही दोन शौर्यप्रदर्शने झाल्यावर या बाईंच्या डोक्यात बहुदा प्रकाश पडला व त्यांनी हेडमास्तरना सांगून हा अचरटपणा थांबविला.

शाळेतली मुले शिक्षकांचे सर्व ऐकतात म्हणून त्यांना काय काहीही करायला लावायचे का? या कोवळ्या मुलांना त्यांचे काही हक्क आहेत की नाही? या मुलांना काही इजा झाली असली तर जबाबदार कोण? किमान या श्री. रामानुजन यांच्यावर तरी काही कारवाई होणार आहे का? मनात अनेक प्रश्न उभे राहिले.

29 जुलै 2009